
नुकतीच आंब्याची पाडणी होऊन , पाडव्याला पहिला आंबा ग्रामदेवतेच्या चरणी वाहून मामाने पेट्या बांधून मुंबई पुण्यास धाडल्या. पडवीत एका बाजूला पुढच्या खेपेच्या आढ्या बांधण्यासाठी हापूसचा खच पडलेला , त्याच्या अगदी समोरच्या भागात रायवळ , बिटक्याचे ढीग जिकडे आम्हा बच्चे पार्टीचा मुक्त संचार .. कोपऱ्यात माळ्याच्या जिन्याच्या आधाराने फणसांचे धूड .. बाहेरून घरात शिरणाऱ्याला कोकणमेव्याचा सुवास असा कॉकटेल च्या रूपात नाकात भसाभसा शिरायचा ! आम्हां मावस- मामे भावंडांचं वार्षिक परीक्षा आटपल्यावर दुसऱ्या दिवशीच रातराणीने मुरुडास आगमन झालेलं ! आंब्या – फणसाचा हा ढीग म्हणजे आमची चंगळ आणि त्यासोबत एकमेकांच्या अंगावर आंब्यांच्या चोखून चोथा केलेल्या कोयी नेम धरून मारणे , भाताच्या उंडवीत भसकन घुसणे , समुद्रावर पुळणीच्या डोंगरांत नखशिखांत माखून येणे , विहिरीवरच्या हौदात म्हशींसारखे तासंतास डुंबत राहणे , ह्या अशा खोड्यांनी दोनच दिवसांत घरातल्या आज्या -पणज्यांच्या , मामींच्या , मावशींच्या नाकात दम आणला जायचा ! घरी काम करणाऱ्या तान्या आजोबाला तर दुपारी-तिपारी कारटी कुठं उलथलीत ते हुडकून आणायची तसेच तिन्हीसांजेच्या आधी दम देऊन घरी बसवण्याची एक वेगळीच एक्सट्रा ड्युटी लागलेली !
…







