आज धुळवड …आपापसांतले हेवेदावे विसरून नातेवाईक, मित्रमैत्रिणी शेजारीपाजारी असे सगळेजण एकत्र येऊन , एकमेकांना फक्त नी फक्त प्रेमाचा , मायेचा रंग लावण्याचा आजचा हा मौज मस्तीचा सण ! आद्ल्या दिवशीच्या होळीच्या होमात ” जुने जाऊ द्या मरणालागुनी ,” म्हणत आपण आपल्या सगळ्या चिंता , दुःखे त्या होलिकामातेच्या धगधगत्या ओटीत वाहिल्या असतातच . म्हणूनच वर्षाचा हा शेवटचा सण धामधुमीत साजरा करून , येणाऱ्या नवीन वर्षाचे जय्यतीने स्वागत करायला आपण मन नितळ साफ करून तयार राहतो !
आजकाल मोठाल्या मैदानात आयोजित केलेल्या धुळवडीचे , त्यातल्या डी जे संगीताचे इतके प्रस्थ वाढलेले पाहता , होळीचा मुख्य उद्देश हा मागे पडत चालला की काय अशी शंका येऊ लागलीय ! मागच्या वर्षी होळींनंतरच देशात कोरोना रुपी राक्षसाने मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी आ वासला नी यावर्षी सुद्धा याचा उत्मात अजूनही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीय . सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपले सण आपण साजरे केले पाहिजेत , या स्प्ष्ट मताची मी आहे ! थोडक्यात सण म्हणजे नुसती मौज मजा किंवा कर्मकांड नव्हे , तर मानवजातीला मानवतेच्या धाग्यात एकत्र गुंफून ठेवण्याचा तो एक घट्ट दुवा आहे !
महाराष्ट्राला त्याच्या डोंगरदऱ्या, समुद्री तटांप्रमाणे एक अभेद्य अशी संस्कृती , संतपरंपरा आणि खाद्यसंस्कृती लाभली आहे . आपल्या विविध प्रदेशांतल्या भिन्न संस्कृतीचे कंगोरे पाहून एखाद्याने तोंडात बोटे नाही घातली तरच नवल ! अशीच आहे कोकणातील सणांची मांदियाळी.. प्रत्येक सण साजरा करायची निराळी पद्धत , त्यातून कोकणातील होळी म्हणजेच ” शिमगो ” किंवा ” शिमगा” – हाच शब्द मी पुढे ब्लॉगमध्ये वापरणार आहे . कारण ” शिमगा ” हा कोकण्यांका नुसता सण नसा हां , तर फीलिंग आसा हो !
मागच्या वर्षी मला पार्टनरसोबत रत्नागिरीतील शिमग्याचा सोहळा ‘याची देही याची डोळा ‘ पाहण्याचा योग घडून आला . खरं तर हा ब्लॉग मागच्या वर्षीच मला अपलोड करायचा होता , परंतु या ना त्या कारणाने राहून गेला . आता या वर्षी जेव्हा घरी बसून या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे तर म्हटले माझ्या वाचकांसाठी हा शिमगा शब्दचित्ररूपी मांडण्याचा प्रयत्न करते ! मग भरा बॅगा पटापट नी चला ” शिमग्याक रत्नांग्रीस ” … होलियो ssss
माझ्या ब्लॉगच्या नियमित वाचकांना ठाऊक आहेच की मुंबईत वाढलेली ही त्यांची कोकण कन्या , गावच्या आठवणींनी किती व्याकुळ होते . तसे मी दरवर्षी किमान २ वेळा तरी रत्नागिरीस जाते , अगदी इन्फोसिस मध्ये शिफ्ट जॉब होता तरीही शुक्रवार रात्रीची स्लीप्पर किंवा शनिवार सकाळची स्वारगेटवरून एसटी पकडून १-२ दिवसांचा धावता दौरा सुद्धा व्हायचा ! ही गावाकडची ओढ आमच्या वांशिक गुणसूत्रांच्या प्रभावाचा परिणाम म्हणायला हरकत नाही ! कारण मी लहानपणापासून बाबाला शिमगा , गौरी-गणपतीला , साहेबाला लोणी लावून पटकन चार दिवस सुट्टी काढून परेल एसटी डेपोतून निघणाऱ्या रातराणीने गावाला जाताना पाहिलेय .
असेच २०१९ मध्ये नेमकी होळी आणि धुळवड आटपल्यानंतर मी आई- बाबांना भेटायला रत्नागिरीस गेले . गणपतीपुळ्यास दर्शन घेऊन वाटेत येत येत आऱ्यातील आमच्या कुलस्वामिनी केळबाईची ओटी भरून आमची रिक्षा परतीच्या वाटेला निघाली . आरे – वारे समुद्रकिनाऱ्याचे वारे पिऊन घेत मन द्वाड कोकरासारखे त्या निसर्गात हुंदडत होते . आमच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात झाडगावात पालखीची मिरवणूक दिसली . तो दिवस होता रंगपंचमीचा आदला दिवस – फाल्गुन वद्य चतुर्थी . इथे एक गोष्ट नमूद करते , की कोकणात शिमगोत्सव चांगला फाग पंचमीपासूनच सुरु होतो आणि मुख्य दिवस म्हणजे फाल्गुन शुक्ल पौर्णिमा – होळी ते फाल्गुन वद्य पंचमी – रंगपंचमी ! इतका वेळ थंड वारे लागून रिक्षात डुलक्या खाणारा बाबा ढोल ताशांच्या आवाजाने खाडकन उठून आनंदाने ओरडलाच , ” बाय बाय , भैरीची पालखी , पाया पड !” माझ्यासोबत तोही भाबडेपणाने नमस्कार करून हात तोंडाजवळ घेऊन बोटांचा मुका घेत ” भैरी महाराजा … ” असे काहीसं पुटपुटला ! रिक्षावाल्या पेडणेकर काकांनी थोडा वेळ रिक्षा बाजूला घेतली नी आम्हाला धावते पण मनोहारी असे पालखीच्या मिरवणुकीचे दर्शन झाले ! तो पालखीचा राजबिंडा साज , सजवलेली खिल्लारी बैलजोडी , ढोल ताशांचा अंतरात घुमणारा निनाद, गर्दीला कंट्रोल करत हुलपे घेत लोकांना आपल्या तारणहार ग्रामदैवताचे दर्शन घेऊ देणारे कार्यकर्ते , चोहोबाजूंनी उधळलेला गुलाल आणि प्रचंड भारलेले वातावरण पाहून विस्मयचकित झालेल्या मला आई बाबा शेवटी म्हणालेच , ” स्मितु एकदा जोड्याने याच पुढच्या होळीला , शिमग्यातले ग्रामदेवतेचे दर्शन आणि परंपरा पाहूनच घ्या !” पुढच्या वर्षी होळीला पार्टनरला घेऊन यायचेच असा मनाशी चंग बांधूनच मी पुण्याला परत आले .
त्यानंतर मी पार्टनरला अगदी ठाम बजावून सांगितले की वर्षभर सुट्टी नाही घेतलीस तरी हरकत नाही , पण पुढच्या शिमग्याला रत्नागिरीत आपले जाणे , ही काळाची गरज आहे ( हे कोणाच्या स्टाईल मध्ये , सुज्ञास सांगणे न लगे ) . तसे नेहमी ही, गोमू माहेरला जाते हो नाखवा , पण हिच्या घोवाला ऐन शिमग्यातले कोकण दाखवायची ,ही सुवर्णसंधी आत्ता चालून आली होती !
‘अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है। ” अगदी अस्सेच बाई झाले हो ! होळी पौर्णिमेच्या आदले दोन दिवस नेमके शनिवार – रविवार निघाले आणि चांगले महिनाभर आधी माझ्या आवडत्या ” नवलाई डिव्हाइन ” च्या पाहिजे त्या सीट्सचे बुकिंग ! तुम्ही म्हणाल एवढे काय त्यात , अहो लै डोक्याला ताप होतो शिमग्याला कोकणात जाताना ! एक तर कोकण रेल्वे -चार महिने आधीच फुल्ल , लाल डबे तुफान गर्दीने भरून जातात . स्लीपर बस ट्रॅव्हल्सचे मालक याच काळात गब्बर होतात , मग आमच्या नवलाई आईच्या नावाने असलेल्या या ट्रॅव्हल्स चे तिकीट मिळाल्यावर , आनंदाला पारावार न उरणे , म्हणजे नक्की काय ते कळले बरीक मला!
प्रवास चांगला झालाच , तो होणारच होता , फक्त जास्त खिदळून नी अति उत्साहाने मी स्वतः न झोपता रात्रभर पार्टनरला झोपेतून गदागदा हलवत गप्पा मारीत बसले होते . रत्नागिरी स्टँडला तांबडं फुटायच्या वेळेस बसमधून उतरलो तर पाहते तर काय , ही माझी रत्ननगरी नेहमीची नव्हतीच , ती सजली होती , जागोजागी पताक्यांच्या माळांनी , चैत्राच्या पालवीची ओढ लागून पोपटी हिरव्या पानांनी , सकाळीच शनिवारचा आठवडा बाजार लागायची लगबग सुरु झाल्यामुळे तिच्या जिवंतपणात भर पडली होती ! आम्ही मिऱ्या बंदराकडे , माझ्या गावाकडे रिक्षातून निघालो . शेरे नाक्यापासून झाडगावातील सहाणेचा सजलेला मांडव , ते जाकिमिऱ्यात घरी पोचेपर्यंत रस्त्यात जागोजागी रस्त्यांवर काढलेल्या सुरेख रांगोळ्या , गायी- म्हशी – बैलांची रंगवलेली शिंगे , गळ्यात घातलेल्या नवीन घुंगुरमाळा , झाडांच्या पानांआडून डोकावणारी विजेची तोरणे , पंधरा माडाच्या स्टॉप मागे खाडीच्या किनाऱ्याला लायनीने बांधलेल्या नावा , तिथेच उथळ पाण्यात विहार करणारे बगळे तत्सम पक्षी जरा जास्तच श्वेत भासले , हातभार उंचीवर आलेल्या सकाळच्या मंद झुळूकांवर डोलणाऱ्या पाडाच्या कैऱ्या , एरवी पसारा असलेली अंगणे नी खळी आता नीट सारवून सडा रांगोळी करून पैपाहुण्यांच्या स्वागताला तयार , कोणाच्या अंगणातील तगर नी जासवंदी नेहमीपेक्षा जास्तच भरात येऊन उगवत्या सूर्यकिरणांना अंगोपांगी खेळवत , सगळेच काही जणू धर्तीवरच्या स्वर्गभूमीसारखे , नीटस , सुंदर , रेखीव! बरोबरच आहे , ग्रामदैवत भक्तांना भेटायला आपापली देवळे सोडून घरोघरी येणार , मग त्यांच्या स्वागतासाठी निसर्गाने सुद्धा आपला कुंचला जरासा साफ करून रंगरंगोटी केलीच म्हणायची !
होळी सोमवारी होती, म्हणून लाडक्या जावईबापूंनी बरेच कोडकौतुक शनिवार-रविवारी करून घेतले आणि आम्ही मौके पे चौका मारत एक दिवस रत्नागिरीतील आसपासच्या स्थळांचे दर्शन सुद्धा! रत्नागिरी दर्शनाचा एक वेगळा ब्लॉग घेऊन येईनच लवकर ! बाजारात फिरताना धनजी नाक्याजवळ एका दुकानात ‘पालखीचे साहित्य मिळेल ‘, अशी पाटी वाचून मी कुतुहलाने शिरलेच ! पालखीच्या रेशमी गोंड्यांना आणि भरजरी कापडांना कुरवाळून पाहताना , मालकाने मला विचारले , ” कुठच्या हो ताई तुम्ही?” मिऱ्याची म्हटल्यावर ओठ बाहेर काढून एकदम खुशीत उद्गारले , ” एकदम वेळेला आलात , मिऱ्याची पालखी धूमधडाक्यात असते , पालखीला भेटून मगच जा ताई !” आमच्या मनातील उत्साह असा क्षणोक्षणी हिमालयाचे शिखर जणू गाठत होता , कधी एकदा पालखी पाहावयास मिळते असे झाले होते .
पालखीच्या आदल्या रात्री जेवणांनंतर आम्ही शतपावली करायला म्हणून बाहेर पडलो . अगदी नवलाईच्या देवळापासून ते पूर्ण गावात वरच्या नी खालच्या अंगाला संपूर्ण रस्ते डिटर्जेन्ट ने धुऊन त्यावर ऑइलपेंटने रांगोळ्या काढायचे काम चालू होते . गावातील लहान मुलांपासून ते अगदी सत्तरीच्या आजी-आजोबांपर्यंत या कामात सगळे मग्न होते . रात्रभर बसून ही सजावट उरकायची होती , तरीही उद्या पालखीलासुद्धा यांचा उत्साह दुपटीने असणार आहे, याबाबत त्यांचे फुललेले चेहरेच खात्री पटवून देत होते . इकडे पलीकडे समुद्रावर जायच्या वाटेत मोकळे मैदान आहे . सगळ्या व्हॉलीबॉल नी क्रिकेटच्या मॅची याच मैदानावर पाहायला मिऱ्या बंदर गोळा होतो . आज इकडे छोट्या दोस्तांची ढोल – ताशा प्रॅक्टिस चालू होती . आपल्या वामनावतारांप्रमाणे त्यांनी सुद्धा आपली छोटीशी पालखी बनवली होती आणि तिच्यासमोर हे उद्याचे शिलेदार , ढोल , ताशे घेऊन एकदम तालात , माना आणि हातांच्या लयदार हालचाली करत आम्हा बघ्यांच्या चेहऱ्यांवर कौतुकमिश्रित हसू फुलवत होते ! विडिओ मध्ये दिसेलच तुम्हाला … नवलाईच्या देऊळ कमिटीतल्या शिवलकरांनी , पालखी देवळातून धुपारती घेऊन सकाळी १० वाजता घरोघरी भेट द्यायला बाहेर पडेल , असे बाबाला फोन करून सांगितल्यावर मात्र , आम्ही त्या रात्रीच्या गारव्यात अजून हिंडायचा मोह आवरून लगबगीने घरी परतलो .
होळीची सकाळ :
आमचा गाव म्हणजे रत्नागिरीतील मिऱ्या बंदर.. या गावाचे भाटीमिऱ्या , जाकिमिऱ्या , आणि सडा मिऱ्या असे तीन भाग पडतात . गावच्या ग्रामदेवता म्हणजे देव म्हसोबा , देवी नवलाई , देवी पावणाई, देवी भराडी आणि देवी जाकादेवी ! ही सगळी दैवते एकमेकांचे बंधू-भगिनी , नवलाई पावणाईचे वास्तव्य गावातच ! पण भराडी आणि जाकादेवी या सासुरवाशिणी म्हणून दुसऱ्या गावी नांदायला गेलेल्या , पण प्रत्येक सणाच्या दिवशी हे सगळे भाऊ बहीण एकत्र गावच्या पालखीत मिरवतात ! मिऱ्या गावची पालखी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू! तसेच देव काळभैरव म्हणजेच ज्याला प्रेमाने भैरी किंवा भैरीबुवा म्हणून हाकारायची आमच्याकडे पद्धत आहे . त्याची पत्नी जुगाई देवी म्हणजेच जोगेश्वरी माता , हे सगळ्या १२ वाड्यांचे दैवत ! या १२ वाड्या कोणत्या ते मी लिहून ठेवले होते पण ऐनवेळेस हा ब्लॉग लिहिताना माझे ते टिपण सापडेनासे झाले . परंतु माझी चुलत मामेबहीण अमृताने विचारताक्षणीच पटकन मला या १२ वाड्यांची नावे सुद्धा पाठवून दिली. त्या वाड्या म्हणजे – मुरूगवाडा , खालची आळी , झाडगाव , टिळक आळी , मांडवी , घुडे वठार , चवंडे वठार , खडपे वठार , तेली आळी , तांबट आळी , गवळी वाडा , आणि फगर वठार ! या वाड्यांच्या नावातच कळले असेल तुम्हाला की हा शिमगोत्सव म्हणजे कुण्या एका जातीधर्मापुरता नसून त्यात गावातले २२ हून अधिक समाज व मुस्लिम बांधव सुद्धा सहभागी होतात , आणि कोकणात कुठेही पहा तिथल्या प्रत्येक सणात ही सहिष्णुता दिसून येते . हातीसच्या उरुसात नागवेकरांचा मान , ही अशीच एक आपल्या भारतीय ऐक्याची मान उंचावणारी गोष्ट ! भैरी आणि जुगाईची मंदिरे झाडगावात म्हणजे आमच्या गावच्या वेशिलगतच आहेत, त्यांचा इतिहास मी पुढे संदर्भ येईल तसा लिहीनच !
हा काळभैरव म्हणजे साक्षात शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेला , म्हणजे शिवाचेच रूप ! ” भीरू ” या संस्कृत शब्दातून त्याच्या नावाची उत्पत्ती होते . ज्याला पाहता क्षणी दैत्य , वाईट प्रवृत्ती चळाचळा कापतात असा हा दुष्टांचा कर्दनकाळ – काळभैरव ! त्याची पत्नी साक्षात शक्ती – जोगेश्वरी माता जी कोकणात जुगाई म्हणून ओळखली जाते! कोकणात काळभैरव आणि जुगाईची मंदिरे जागोजागी आढळतात , इतके त्यांच्यावर लोकांची श्रद्धा आहे . भैरीचा दरारा इतका की खोटे बोलणाऱ्याला भैरीच्या आणा भाका घेऊन खरे बोलायला भाग पडतेच ! तर या भैरीचे भाऊ बहीण म्हणजे म्हसोबा , नवलाई , पावणाई, भराडी आणि जाकादेवी प्रत्येक शिमग्या- गुढीपाडव्याला पालखीत बसून आपल्या लाडक्या भावाला भेटायला निघतात . आता ही पालखी गावात प्रत्येकाच्या घरोघरी जाणार , साक्षात देव देवळातून निघून भक्तांच्या भेटीला येणार , मग होळीची पहाट कोंबडं आरवण्याच्या आधीच न उजाडली तरच नवल ! आईने आणि मी सुद्धा पहाटेस लवकर उठून पुरणपोळीचा साग्रसंगीत नैवेद्य तयार करून ठेवला ! पालखीचे हुलपे काढायला पार्टनर बाबासोबत रमला ! देवाला वाहायला नारळ ( सुकडी ) , हार , फुले , पेढे किंवा इतर गोड पदार्थ , धूप , अगरबत्ती , तत्सम पूजेचे साहित्य म्हणजे “हुलपे” !सालाबाद प्रमाणे देवाला हुलपे देणे , म्हणजे देवा तुझ्या नावाचा आम्हाला विसर ना पडो आणि तुझी कृपादृष्टी आमच्या घराण्यावर राहो , हीच भाबडी अपेक्षा ! आमची लगबग बघून सुंदरीच्या नवजात पिल्लांनीसुद्धा सारखे पायात लुडबुड करून अजून गडबड वाढवून ठेवली . सुंदरीचा महिन्याभराचा भुत्या ( आता चांगला सव्वा वर्षाचा घोडा झालाय ) , भुंकून नी नाचून मी दारात काढलेल्या रांगोळीचा पाचच मिनिटांत फराटा ओढून ठेवलान !
पालखी बरोब्बर दहा वाजता देवळातून बाहेर पडली . प्रत्येक घरापाशी थांबत , वाजत गाजत येईपर्यंत थोडा वेळ लागणारच होता . पण मंदिराचे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने , पोलिसंनी आखून दिलेल्या वेळेप्रमाणेच , एखाद्या भावूक भक्ताचा उद्वेग त्याच्या पाठीवरून हात फिरवून शांत करीत , साधारण १ च्या सुमारास आमच्या दृष्टीपथात आली . ग्रामपंचायतीने ठरवलेला भगवा कुडता , पायजमा आणि भगवे फेटे किंवा टोपी धारी माणसांचा अलोट सागर पाहून पलीकडच्या समुद्रालाही आनंदाचे भरते आले असावे . ढोल ताशांचा आभाळाला भिडणारा निनाद , त्यात दुपारी बारा च्या सुमारास सागराला आलेल्या भरतीची उत्तुंग गाज अशी काही बेमालूम मिसळली होती , की शब्दांत सांगता येणे कठीण ! आमच्या घरापाशी पालखी थांबली नी हुलपे देताना माझ्या डोळ्यांत नकळत पाणी तरारले . एरवी देवळात भेटणारे देव , आज त्या पालखीत बसून भक्तांकडे किती मायेने पाहतायत याची जाणीव हृदयाला सुखावून गेली . त्या चांदीच्या मूर्तींचे तेज अलौकिक भासत होते . देवापुढे काय मागायचे हा प्रश्न मला कधीच पडत नाही , कारण तो सर्वज्ञ आहे ! पालखी वाजत गाजत पुढे सरकली आणि अशीच गावचे हुलपे घेत ती पुढे जुगाईच्या देवळात साधारण संध्याकाळी ४ च्या दरम्यान भेटणार असे कळले . मग आम्हीदेखील पटापट सकाळपासून धरलेल्या उपवासाचे पारणे देव दर्शनानंतर पुरणपोळीच्या सुग्रास जेवणाने फेडले .
जुगाईची पालखी भेट :
दुपारी ३ वाजताच मी आणि बाबा जुगाईच्या देवळात जाण्यास निघालो . पार्टनर ने पुरणपोळ्या व कटाच्या आमटीवर जोरदार ताव मारल्याने , पुरणातील जायफळ-वेलचीने आपली मोहिनी त्याच्यावर घातलीच होती , त्याला तसाच सोफ्यावर लोळत ठेवून मी बाबासोबत निघाले . काय आहे ना , मिऱ्यावर जन्म घेतलेल्या लोकांमध्ये सण साजरा करण्याच्या उत्साहाचे एक वेगळेच अनुवांशिक गुणसूत्र असते , त्याला मी नी माझा बापूस कसा खोटा पाडील हो ? झोप बीप तर खिजगणतीतच नाही ..
त्या दिवशी बाबासोबत चालत फिरताना , कोणास ठाऊक भक्तीच्या अनुभूतीसोबत माझ्या लहानपणीचा बाबा मला गावला हो , इतक्या वर्षांनी .. रस्त्यातील दगडांनी ठेचकाळताना थरथरत्या वृद्ध हातानी माझं मनगट धरणारा , कुठे काही इंटरेस्टिंग दिसले की , ” बाय त्याचा फोटो मार ” , असे दम्याची उबळ आवरत उत्साहाने सांगणारा .. हाच तो , जो रविवारी भर गर्दीच्या बस किंवा ट्रेनमध्ये “बाय माझ्या गळ्याक घट्ट पकड”, असे म्हणून छातीशी घट्ट कवटाळून गिरगाव चौपाटी नाहीतर म्हातारीचा बूट दाखवायला घेऊन जाणारा , हाच बाबा बिल्डिंगच्या आसपास कुठे नाशिक बँड चा आवाज ऐकल्यावर किंवा टीवीवर आवडते गाणे लागल्यावर नेहमी लेकीसोबत पालखी नाचवल्यासारखा एकाच स्टेपमध्ये खांदे उडवत नी पाय गुडघ्यात मुडपत चाळीतल्या छोटयाश्या घरात जल्लोष साजरा करणारा , मी आय सी यू त ऍडमिट असताना , जनलज्जेची तमा न बाळगता ढसाढसा रडणारा ..
या आठवांत तंद्री लागली असताना , पुढे गर्दी अचानक पांगली , आणि रस्त्याच्या कडेला माणसे उभी राहिली . बाबा म्हणाला , ” कोण्या गावची होळी तोडून आणतायेत .. ” पाहिले तर काय , तीस चाळीस माणसे , ” हिरवत रे हिरवत आमची होळी चालली मिरवत , होळीयो sss ” चा गजर करीत एक मोठ्ठाले लांबलचक झाड उचलून घेऊन जात होती . होळीला झाड अर्पण करणे म्हणजेच होळी तोडणे . आमच्या नवलाई पावणाई ची होळी ही आंब्याची – कलमाचा आंबा नव्हे ! गावातील कोणीही स्वतःहून पुढाकार घेऊन ,या वर्षी ची होळी मी अर्पण करतो ,म्हणून आपापल्या वाडीतील , इतकी वर्षे जीवापाड जपलेले झाड देऊ करते . यामागे एक त्यागाचीच शुद्ध भावना असते , हे ” वृक्षतोड करणे योग्य नाही ” वगैरे सूर लावणाऱ्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे . कारण कोकणी माणूस आपल्या पोराबाळांहून कित्येक पटीने आपल्या वाडीतल्या काजे- फणसांवर अधिक माया करतो , आणि तेवढीच वृक्ष लागवड सुद्धा ! जशी नवलाई पावणाईची आंब्याची होळी तशी भैरी देवाची सुरमाडाची .. नेहमीच झाडगावातून मानकऱ्यांच्या संमतीनेच सुरमाडाचे झाड नक्की करून भैरीच्या झाडगावातील सहाणेजवळ होळी बांधली जाते . तो एवढा मोठा वृक्ष शंभरेक किंबहुना त्याहून अधिक माणसे आपल्या खांद्यांवर वाहून नेताना पाहून अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाही ! पण या सगळ्या होळ्या नेहमी देवांच्या एकमेकांशी गाठी भेटी झाल्यानंतरच तोडण्यात येतात , याचा गर्भितार्थ म्हणजे देवही आपल्या मानवजातीला सणांच्या निमीत्ताने आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र राहा , मिळूनमिसळून राहा , असाच संदेश देतात !
मजल दरमजल करीत आम्ही जुगाईच्या देवळात पोहोचलो . बाबाने पटकन घाई करून मला गाभाऱ्याजवळील जागेवर उभे राहायला सांगितले . आमच्या दोघांचीही उंची कमी असल्याकारणाने पुढे उभे असलेल्या माणसांमुळे आम्हाला काही दिसेना . पण अशा वेळी हातात असलेली सेल्फी स्टिक चा दांडा जमेल तितका उंच करून मी मोबाइल वर सगळे शूट करू शकले . तेवढ्यात नवलाईची पालखी वाजत गाजत आली , आणि जुगाईच्या देवळात एका मोठ्या चंदनी आसनासमोर नवलाईची पालखी विराजमान झाली . मानकऱ्यांनी या जुगाई मातेकडे हा शिमगोत्सव विना अडथळा साजरा व्हावा या आशयाचे गाऱ्हाणे घातले . शेवटी ” सांभाळ माझे आई ” , या वाक्यावर गावकऱ्यांनी केलेला जुगाईचा जयघोष .. किती नी किती असे क्षण मला अनुभवायला मिळत होते . इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते , म्हटले तर काळभैरव ताकदवान – साक्षात महादेव ! पण त्याला आपल्या सहचारिणीची , जुगाईची साथ ही हवीच . गावात सुद्धा या जुगाईला सर्वांची संकट नाशिनी आई म्हणून मानतात , हे पाहून स्त्री शक्तीचा महिमा किती अफाट आहे , याची जाणीव पुन्हयांदा झाली !. जुगाईचे दर्शन घेऊन आम्ही सुद्धा पालखीसोबत पुढच्या मार्गक्रमणाला निघालो .
झाडगावातील सावंतांचा चौथरा :
पालखीचे पुढचे स्थान होते , झाडगावातील सावंतांच्या वाडीत बांधलेल्या चौथऱ्यावर ! हा चौथरा म्हणजे छोटेखानी दगडी बांधकामाचा मंडपच ! सार्वजनिक देवकार्यासाठी राखीव .. पालखी हुलपे घेत येईपर्यंत आम्ही चोथर्यावर जाऊन छानपैकी बसायची जागा निवडली . भैरी- जुगाईचे आणि आमच्या पालखीचे मानकरी तसेच मानकऱ्यांच्या कुटुंबातील स्त्रिया नटून थटून , पूजेची सगळी तयारी करून वाट पाहत बसले होते . इथे ह्या काळभैरवाचे इतिहासातील दाखले मी नाही सांगितले तर नक्कीच हा ब्लॉग अपूर्ण राहील . सतराव्या शतकात भारताचे पहिले नौदल अधिकारी म्हणून ओळखले जाणारे कान्होजी आंग्रे यांचा मुलगा सखोजी , पाच गुजर कुटुंबासमवेत कोकणात आला , हे गुजर कुटुंब सुद्धा शिवरायांच्या इतर सहकार्यांप्रमाणेच लढवय्ये ! यांनी कोकणात काळभैरवाची मंदिरे उभारली . पूर्वी या साऱ्या मंदिरांचा कारभार गावचे खोत म्हणून सावंत कुटुंबीय पिढ्यान पिढ्या सांभाळीत , म्हणजे आजही मानकरी म्हणून सावंतच का या प्रश्नाचे उत्तर वाचकांना मिळालेच असेल ! त्यानंतर एकोणिसाव्या शतकात भैरीची प्रसिद्धी आणि त्याच्यावर असलेली लोकांची श्रद्धा पाहता , सरकार दरबारी श्रीभैरी संस्थानाची रजिस्टर्ड नोंदणी झाली आणि हा भैरी आता रूढार्थाने फक्त देव न राहता ” सरकारी पेन्शनर ” झाला . ही पदवी त्याला रत्नागिरीकर निखळ विनोदानेच देतात ! अहो इतकेच काय , जेव्हा भैरीची पालखी रत्नागिरी पोलीस स्टेशनात पोचते तेव्हा खाकी वर्दीतले आपले रक्षक सुद्धा या भैरीला बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देतात , आले ना अंगावर रोमांच वाचून ! गाव तिथे गजाली , हा कोकणाचा स्थायी भाव ! इथे दंतकथा नी आख्यायिकांना सुमारच नाही , आणि कोकण्यांक त्या घोळवून , रंगवून सांगूक कंटाळो कधीच येवचो नाय ! अशीच एक दंतकथा – पूर्वी सावंतांकडे खोत म्हणून देवळाचा कारभार असताना , भैरी देव अशाच एका शिमग्याला घरोघरी हुलपे घेत भेटत होता , त्यावेळी एका माडकऱ्याने ( माड वाहणारे ) कुत्सितपणे , ” निगालो भैरी भीक मागूक दारोदार “, असे म्हणून निंदा केली . या निंदेने भैरीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली , आणि त्याच क्षणी भैरीच्या रागाचा उद्रेक होऊन तो माडकरी माडावरून धाडकन जमिनीवर कोसळला , मृत नाही पण कायमचा अधू झाला ! त्याच वेळी भैरी देवाने झाडगावात सहाणेवर आपले बस्तान मांडले आणि मी इथून कुठेही जाणार नाही अशी प्रतिज्ञा केली . म्हणून झाडगावातली सहाणेची जागा ही भैरीचे मानाचे स्थान मानले जाते . तर असा हा भैरी देवाचा इतिहास .. बाबा हे सगळं सांगत असतानाच पालखी एकदम जोशात सावंतांच्या चौथऱ्यावर आली आणि तिथेही तिची साग्रसंगीत पूजा होऊन गार्हाणे घातले गेले ! या नंतर पालखी पूर्ण रत्नागिरी शहराला वळसा घालून , नवलाई पावणाई आणि भैरीच्या इतर देवळांतही भेटीगाठी करून मग रात्री बाराच्या सुमारास झाडगावातील भैरीच्या मुख्य मंदिरात येते . म्हणून आम्ही आमचा मोर्चा घराकडे वळवला !
कालभैरवाच्या देवळातील पालखी भेट :
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रात्रीचे जेवण पटकन आटपून मी , पार्टनर नी आमचा गाईड कम बाबा भैरीच्या देवळात पोचलो. भैरीच्या मंदिरात लोटलेला भक्तांचा समुदाय, तुफान गर्दी .. जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे ! काही झाडांवर चढलेली , कोणी दीपमाळेला बिलगून , लहान पोरे बापाशीच्या खांद्यांवर .. हे असे दृश्य इंडिया पाकिस्तान च्या मुंबईतील मॅचला वगैरेच असू शकेल ! आम्ही सुद्धा पटकन भैरीचे दर्शन घेऊन बाबाने बोट दाखवले त्या जागी हूं कि चूं न करता चढून बसलो . ती जागा होती देवळाच्या कठड्यावर , जायन्ट प्रोजेक्टर स्क्रीनला बिलगून .. म्हणजे समोर काय घडतेय ते ही दिसत होते आणि स्क्रीनवर पूर्ण गाभाऱ्यातले सुद्धा ! म्हंटले ना मी , ” किसी चीज को शिद्दत ..” तेच ते .. पंचक्रोशीतली अनेक लहान लहान गावांतील पालख्या वाजतगाजत येत होत्या , भैरीची भेट घेऊन परतीला निघत होत्या . पालखीसोबत आलेली मंडळी तुफान नाचत होती, गुलाल उधळत होती . पण सगळ्यांना इंतेजार होता मिऱ्याच्या पालखीचा .. का बरं .. बारा वाजायला काही अवकाश होता , सगळ्यांची चुळबुळ वाढली , पालखीला उशीर का झाला या बद्दल आसपास कुजबुज सुरु झाली .. बरोब्बर बाराचा ठोका पडला असेल नी मोठ्याने नगारा वाजला , “ हुरा रे हुरा आमच्या नवलाई पाव्हनाईचा सोन्याचा तुरा..” असा भक्तांचा एकच जयघोष झाला अन
भैरीची भावंडे आत्यंतिक प्रेमाच्या उद्वेगाने भावाच्या भेटीसाठी मंदिराच्या प्रांगणात धावत शिरली …. ” ईली हो ईली , नवलाई पावणाई ईली , म्हसोबा नी जाकादेवी भराडी संगतीला !” मी हा क्षण नाहीच सांगू शकत शब्दांत , तुम्ही विडिओ मध्ये पहाच ! काय तो जल्लोष , काय ती पालखीची ग्रॅण्ड एंट्री , प्रांगणात मध्यभागी पालखीच्या भोईंनी ज्या तर्हेने गिरकी घेऊन पालखी फिरवलीय , जणू काही जगाच्या कल्याणासाठी ताटातूट होऊन आपल्या वेगळ्या मंदिरांत राहणारी ही भावंडे शिमग्याच्या निमित्ताने एकमेकांना कडकडून मिठी मारताहेत ! नंतर ती एवढी जड पालखी फक्त एका मनुष्याच्या डोक्यावर ठेवून नाचवली जाते ते पाहून ” अशक्य भारी ” एवढेच उद्गार बाहेर पडतात . नंतर भैरीची पालखी सुद्धा देवळातून प्रांगणात आणून या दोन्ही पालख्या एकमेकांना जवळ आणून त्यांची भेट घडवली जाते . या पालख्या बराच वेळ नाचवल्या जातात . नंतर माझा मोबाईल सुद्धा इतका थकला की बिचारा स्विच ऑफ झाला . पण हे क्षण याची देही याची डोळा आम्ही अनुभवले आणि ते या जन्मात तरी कधी विसरणे शक्य नाही !
रात्री बारानंतर सगळ्या पालख्या आपापल्या निवासस्थानाकडे परततात . मग भैरी निघतो सगळ्यांचा डोळा चुकवून आपल्या अर्धांगिनी ला भेटायला .. देव असले म्हणून काही भावना नाहीत का त्यांना ! जुगाई भैरीसोबत न राहता तिच्या माहेरील गावात जवळच राहते . होळीला तिच्याकडून भैरीला रीतसर आमंत्रण दिले जाते , आणि मग भैरी देव आपल्या देवळामागील चोरवाटेने , खाच खळग्यातून , चिखल तुडवत पत्नीच्या ओढीने निघतो. आणि खरंच हे भैरीच्या पालखीचे भोई चोरवाटेने अगदी धावडवत जुगाईच्या देवळाशी पालखी आणतात . मग जुगाईच्या देवळात भैरीला विराजमान करून मंदिराचे दरवाजे नी खिडक्या अक्षरशः बंद केले जातात आणि दिवे सुद्धा ! आपल्या लाडक्या देवांना त्यांची एकांताची गुजगोष्टी करायची ही मध्यरात्र ! किती तो थरार आणि रंजकता ! नंतर रामप्रहरी जुगाईच्या मंदिरातून भैरी देव झाडगावात आपल्या स्थानावर म्हणजेच सहाणेवर येऊन विराजमान होतो . घरी परतायला आम्ही रिक्षात बसलो . माझे लक्ष कुठे होते , माझी तर तंद्री लागली होती . जणू काही सर्वांगाला सहस्त्र चक्षु आले होते , तीच सुंदर दृश्ये सारखी तरळत होती .
होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला नवलाईचा होळीचा शेंडा – आंबा , देवळात सूर्योदयापूर्वी आणला जातो व होळीचे दहन केले जाते . तसेच गावचा गुरव एका ढोलियाला संगतीला घेऊन नवलाई गावातील ज्या मार्गाने भावास भेटण्यास जाते त्या वेशीपर्यंत देवीची चाक म्हणजेच दृष्ट काढायला येतो . मग घरोघरी बायका आपापल्या चुलीतील निखारे घेऊन आपापल्या कवाडीच्या बाहेर ठेवतात ! या नंतर फाल्गुन कृष्ण चतुर्थी पर्यंत गावकरी सहाणेवर भैरीचे दर्शन घेतात , तिथेच सुरमाडाची होळी दहन करण्यात येते . चतुर्थीला भैरी पूर्ण बारा वाड्यांत फिरून पोलिसस्टेशन चा मानमरातब स्वीकारून आपल्या देवळात रंगपंचमीच्या दिवशी परततो . त्याच दिवशी आमच्या गावात नवलाईचा आशीर्वाद घेऊन मग रंग खेळले जातात . घरोघरी ” आईना का बाईना , घेतल्या बिगर जाईना ” , म्हणत गावातील पोरे ” ए इनोद काका , शारदा काकी ,” म्हणत होळीचा गुलाल लावायला नी अंगावर पाणी ओतून घ्यायला आमच्या वाड्यात बिनधास्त शिरतात .
तर असा हा कोकणातला शिमगोत्सव .. कोकणी माणूस हा परंपराप्रेमी आहे , रूढी सांभाळणारा आहे , जगाच्या पाठीवर कोठेही राहिला तरी गाऱ्हाणे ऐकताना स्थळ काळाचे भान न राखता ” होय महाराजा ..” म्हणून गहिवरणारा आहे ! पण म्हणूनच आजही कोकणातल्या शिमग्याची असो की पाडव्याची असो , पालखी अजरामर आहे ! हा अत्युच्च परमानंद आहे .. या आनंद सागरात हेलकावे खातच आम्ही पुण्यास परतलो . आज हा ब्लॉग दिवसभर लिहिताना मी ते क्षण अक्षरशः परत जगले, तुम्हाला हे शब्दचित्र कसे वाटले नक्की कळवा !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply