” ती आली , तिला पाहिले आणि तिने जिंकून घेतले सारे ..” केवढी सुंदर दिसत होती , सडपातळ , करकरीत बांध्याची , नाजूक धारेची , नुकतेच पाणी शिंपडल्यामुळे तिच्या हिरव्याकंच शरीरावरचे पाण्याचे थेंब सकाळच्या सूर्यप्रकाशात अगदी रत्नांसारखे चमकत होते ..
तिला पाहताच हिप्नोटाईझ झालेली मी , ” काका, भरा तराजूत २ किलो ,” असे म्हणत बाजूच्या बायकांना ढुशी देत कधी हातातील पिशवी भाजीवाल्या काकांसमोर उघडून उभी राहिले , माझे न मजला कळले ! अहो , ताजी भेंडी पाहिली रे पाहिली की आपलं असच होते बघा ..
काय्ये ना लहानपणी आजीसोबत कधी परळ, दादर तर कधी लालबागच्या मार्केटमध्ये बाजारहाट करणे म्हणजे एक वेगळीच मज्जा .. एक तर वडापाव, कुल्फी नायतर सुतरफेणी ठरलेली आणि टोपल्यांतील निरनिराळ्या रंगांची उधळण, भाज्या-फळांच्या स्वरूपात त्या कोलाहलात सुद्धा सुखावून जायची ! विशेषतः भेंडी निवडताना तिच्या कोवळेपणाची परीक्षा तिची देठे का sss ड्कन मोडून पाहण्यात जो आनंद असायचा ना … अहाहाहाहा ! एकदा मी आजीसोबत असताना , ती दुसऱ्या भाज्या घेण्यात गुंग असताना , उगाचच एका वसईवाल्या मावशीच्या टोपलीतल्या भेंडी अशाच काडकन मोडून थोट्या करून ठेवायचा सपाटा लावला , नी त्यानंतर मावशीच्या तोंडाचा जो काही पट्टा सुरु झाला , तो आजीला किलोभर भेंडी घेऊनच गप आवळून धरायला लागला आणि माझ्या पाठीत आजीचा एक सणसणीत रट्टा बसला ते काय सांगायला हवे का तुम्हाला ?
पण या भेंडीचा नखरा असलाच , ” कोणी निंदा कोणी वंदा , आपुन को क्या , आपुन तो स्टाईल मारेगा ” टाईप्स .. हिचे दिवाणे अधिक , म्हणजे ” तेरे टिफिन मे भिंडी है , ला इधर ..” असे म्हणून क्षणार्धात डबा लंपास करून दुसऱ्या क्षणी बोटे चाटत पुसत रिकामा डबा ( बंद करून देण्याचे सौजन्य ही न दाखवता ) दात विचकत आपल्या बेंचवर ठेवणारे इंजिनीरिंग कॉलेजचे मित्र , ” मस्त थी रे सब्जी , आंटी को नेक्स्ट टाईम और एक डब्बा देने को बोलना ..” असे म्हणून मला लाळ घोटत तसेच ठेवून पसार व्हायचे ! माझी एक मैत्रीण तर उपवासाला सुद्धा भेंडीची भाजी आणायची .. आणि याहून उलट किस्से म्हणजे ” भिंडी मसाला नाही यार , प्लीज , पनीर मागव ” असेही तिचा मनापासून दुस्वास करणारे आहेत ! म्हटले ना ही आहे थोडीशी चंचल , तिच्या कलाने घेतले तर पदार्थांत कमाल करते नाहीतर बुळबुळितपणाने खेळखंडोबा .. अहो अस्सल मुंबईकरांच्या डिक्शनरीत , भकाराने सुरु होणाऱ्या शिवीत सुद्धा हिला मान .. दादरला ऐन भाजीमार्केट मध्ये आमचे इंजिनीरिंगचे क्लासेस होते , तेव्हा डोक्यावरून ओझी वाहणारे रस्त्यात आडवे येणार्यांना शिव्यांनी लाखोली वाहण्याऐवजी , ” ए बाजूला हो sss , भें ssss **” असे कचकून हाणल्यावर ऐकणारा फटक्यात गारद नी , वाट मोकळी ! कोकणात कोणावर हात चोळताना , ” जलला तिचा म्होरा , तिची भेंडीची भाजी झाली बुलबुलीत .. ” आसा डोले गरागरा फिरवत म्हटला की तिकडे शाप लागणारीच्या कढईत भाजीचा गोंद झालाच म्हणून समजा !
ह्या अशा कितीतरी मजेशीर गोष्टी आपण भेंडीविषयी ऐकत असलो तरी ही भाजी म्हणजे ” superfood ” आहे , आणि तिचा आपण आपल्या जेवणात कुठल्या ना कुठल्या तर्हेने वापर केलाच पाहिजे . आमच्याकडे सुदैवाने भेंडी सर्वांना आवडते आणि माझ्या हिंदी चॅनेलवर व या ब्लॉगसाईट वर तुम्हाला भेंडीच्या निरनिराळ्या रेसिपीज सुद्धा मिळतील , की ज्यामुळे माझ्या तिच्यावरील प्रेमावर शिक्कामोर्तब होईल !
मागे काही दिवसांपूर्वी आमच्या काही दर्शकांनी , रोजच्या जेवणातील भाज्या शेअर करा , असा आग्रह केला होता , म्हणूनच आज मी माझ्या घरात बनणारी कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे . ही भाजी आम्ही संकष्टी/ गणेशचतुर्थीच्या नैवेद्यात सुद्धा पानात मांडतो, त्यावेळी मात्र तीत कांदा लसूण वापरत नाही! मग रेसिपीला सुरु करण्याआधी,
भेंडीच्या भाजीचे शरीराला होणारे फायदे :
- भेंडीमध्ये शरीराला आवश्यक असणारे धातू नी व्हिटॅमिन्स , पोटॅशिअम , व्हिटॅमिन ब , क , फॉलीक ऍसिड आणि कॅल्शिअम असते . यात कमी कॅलरीज असल्या कारणाने वजन कमी करणाऱ्यांसाठी भेंडी खाणे अगदी उपयुक्त!
- भेंडीत फायबर जास्त असल्याने मधुमेहींसाठी आहारात भेंडीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो !
- कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण मिळवण्यासाठी भेंडी खाणे योग्य !
भेंडीची भाजी बुळबुळीत होऊ नये म्हणून काही बाबी लक्षात घेण्याजोग्या :
- भेंडीमधील “mucilage” नावाच्या द्रव्याने तिला बुळबुळीतपणा असतो . हे Soluble Fiber असून शरीराराला उपयुक्त असते . भेंडी नेहमी कोवळ्या देठांची /टोकांची परंतु करकरीत निवडावीत . लेचीपेची शिळी भेंडी , भाजीला जास्त बुळबुळीत बनवते .
- बाजारातून भेंडी विकत आणल्यावर , ओलसर असल्यास थोडा वेळ हवेवर ठेवून किंवा पुसून नीट पेपर बॅग्स मध्ये किंवा प्लास्टिक झिप लॉक बॅग्समध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावीत .
- ज्या वेळेला भेंडी शिजवायची आहेत त्याच वेळेला स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुऊन एका चाळणीत किमान २० मिनिटे निथळत ठेवावीत. पाणी खाली निघून गेले की एका स्वच्छ कापडावर पसरवून पुसून घ्यावीत किंवा जरा कोरडी होऊ द्यावीत .
- त्यानंतरच भेंडी चिरायला घ्यावीत, खात्रीने सांगते भाजी अजिबात बुळबुळीत होत नाही , कारण त्यात पाण्याचा अधिकतर अंश नसतो !

- साहित्य:
- २५० ग्रॅम्स भेंडी - स्वच्छ धुऊन , १५ मिनिटे चाळणीत निथळत ठेवावी . त्यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून मग चिरावयास घ्यावी . साधारण १ दीड इंचाचे तुकडे चिरून घ्यावेत
- मोठा कांदा लांब चिरून = १०० ग्राम
- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- ७-८ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
- १ टीस्पून हळद
- २-३ कोकमं
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- तेल
- चवीपुरते मीठ
- कृती:
- एका नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात लसूण घालून जरा गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
- नंतर मिरच्यांचे तुकडे, कांदा घालून जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
- कांदा पारदर्शक होत आला की हळद घालावी आणि जराशी परतून घ्यावी . नंतर चिरलेली भेंडी घालून आच मध्यम करून जरा एकत्र करून घ्यावी.
- आच मंद करावी आणि आणि भाजी सारखी परतत राहून झाकण न घालता शिजवून घ्यावी .
- भेंडी शिजत आली की शेवटी चवीपुरते मीठ घालावे . त्यातच कोकमं पिंजून घालावीत . भाजी नीट एकत्र करून घ्यावी.
- साधारण मिनिटभर शिजवल्यावर वरून खोबरे घालावे आणि गॅस बंद करावा .
- ही साधी, सोप्पी तरीही चविष्ट अशी भेंडीची भाजी , डब्यासाठी एकदम मस्त ! तांदळाची भाकरी , चपाती , फुलके किंवा वरण भातासोबत अतिशय छान लागते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply