महाराष्ट्राची “मासेमारी राजधानी” म्हणून संबोधण्यात हरकत नाही , अशा ” रत्नांगिरी ” या रत्ननगरीतला माझा जन्म , आणि कोकणी माणसाच्या गुणसूत्रांचा भाग ठरावा , इतके मत्स्यप्रेम माझ्याही नसानसांत दौडत आहे . त्यामुळे पानात वाढलेला मासा हा कुठल्याही आकाराचा असला, तरी दोन घास जरा जास्तच पोटात पडतात ,यात कोणत्याही मिश्राहारी कोकणी जीवाचे दुमत नसावें !
त्यात सुरमई मासा हा सगळ्यांशी फ्रेंडली … एक तर याला स्वतःची अशी उग्रट चव नसते , दिसायला चकचकीत चंदेरी काळसर रंगाचा , आणि पातळ कातडीचा ! फिश फ्राय , कटलेट अशासाठी एकदम उत्तम … माझ्या कित्येक मित्र मैत्रिणींनी मत्स्याहार या सुरमईपासूनच सुरु केला आहे .सुरमई साफ करणे म्हणजे एकदम सोप्पे काम, तिला जास्त खवले किंबहुना नसतातच, असे म्हटलेत तरी चालेल ! डोक्याजवळचा भाग कापून पोटातली घाण अलगद बाहेर निघते . थोडी तिरकस कापून साधारण अर्धा इंच जाडीचे तुकडे करणे एकदम बेश्ट , त्याने सुरमईचा तुकडा जरा लांबट दिसतो .
त्यातून जर ही भली मोट्ठी ईसवण जाळ्यात , आपले ते .. बाजार पिशवीत गावली की आमच्या आनंदाला सुमारच राहत नाही ! मग घरी आणून त्या हातभर उंचीच्या तुकडीवर हळद ,मीठ , लिंबाच्या रसाचे किंवा कोकमाच्या आगळाचे यथासांग सोपस्कार करून ती खोलगट भिड्यावर ( खास माशासाठी वेगळे भिडे ) मंद आचेवर कुरकुरीत तळण्यातच जीवनाची किंबहुना रसनेचि धन्यता मानली जाते …..
आता मासे तळण्याच्या विविध पद्धती कोकणातल्या खाद्यसंस्कृतीत आढळतात . माझ्या हिंदी आणि मराठी या दोन्ही यू ट्यूब चॅनेल वर आणि या ब्लॉग साईट वर तुम्हाला किमान अर्धा डझन रेसिपीज तरी गावतील ! आज मी ही ईसवण हाटिलात जशी कुरकुरीत तळून देतात ना , तशी बनवली आहे . रव्यात घोळवलेली सुरमईची ताजी रेखीव तुकडी अगदी तव्यातून चुर्रर्र आवाज करीत आपल्या टेबलावर येते ना , तेव्हासुद्धा त्यावरील रव्याचे दाणे गरमागरम तेलाच्या अणुरेणूंशी सलगी करत नाचताना दिसतात .
या पद्धतीने तळलेली सुरमई तुम्ही साध्या फोडणीच्या वरण किंवा आमटीभातासोबत खाऊ शकता … माशाचे कालवण सोबत असेल तर क्या बात ! पाहुणे येणार असतील किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही ही भन्नाट लागते!
सुरमईच्या कालवणाची माझ्या घरची रेसिपी वाचण्यासाठी –https://kalimirchbysmita.com/surmai-curry-konkani-style/
सुरमई तवा फ्राय बनवण्यासाठी –https://kalimirchbysmita.com/surmai-tawa-fry-recipe-marathi/

- साहित्य:
- • ४ मोठ्या आकाराच्या सुरमईच्या तुकड्या ( १ तुकडी साधारण १०० ग्रॅम )
- • २ टीस्पून हळद
- • १ लिंबाचा रस
- • मीठ चवीनुसार
- • दीड इंच आल्याचा तुकडा
- • ४ हिरव्या मिरच्या
- • ८-१० लसणीच्या पाकळ्या
- • पाव कप कोथिंबीर
- • पाऊण कप बारीक रवा
- • पाव कप तांदळाचे पीठ
- • ३ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- • तेल
- कृती:
- • सुरमईला मॅरीनेट करण्यासाठी एल ताटलीत हळद, लाल मिरची पूड ( १ टीस्पून ) , मीठ आणि लिंबाचा रस नीट एकत्र करून घ्यावा . त्यात सुरमईच्या तुकड्या घोळवून १० मिनिटे बाजूला मुरत ठेवाव्यात .
- • हिरवे वाटण - आले , लसूण , मिरच्या आणि कोथिंबीर १ टेबलस्पून पाणी घालून बारीक व घट्टसर वाटून घ्यावे .
- • माशाच्या तुकड्यांना लावून ह्या तुकड्या फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवाव्यात , म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित चिकटून राहते .
- • एका ताटात रवा , तांदळाचे पीठ , मीठ आणि उरलेली मिरची पूड घालून नीट एकत्र करून घ्यावे .
- • एकेक सुरमईची तुकडी नीट दाबून दोन्ही बाजूंनी या कोरड्या मिश्रणात घोळवावी.
- • तव्यात पुरेसे तेल घालावे कि ज्यात आपण मासे शॅलो फ्राय करू शकतो . मध्यम आचेवर तेल चांगले तापवून घ्यावे . नंतर आच मंद करून तव्याच्या मध्यभागी सुरमईची तुकडी सोडून दोन्ही बाजूंनी ( साधारण २-३ मिनिटे एक बाजू ) खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळावी .
- • सुरमई रवा फ्राय भाकरी , पोळी , कालवण भात किंवा नुसत्या वरण भातासोबत देखील चविष्ट लागते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply