आज #worldbookandcopyrightday च्या निमित्ताने.. यावर्षी म्हणजे २०२१ ची थिम आहे , ” To share your story ” म्हणून हा लेखनप्रपंच!
आपल्याकडे पालकत्व आणि मुलांचे संगोपन, याविषयी सांगताना तज्ञ मंडळी म्हणतात, की पालक आपल्या आयुष्यात ज्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकले नाहीत , त्या ते आपल्या मुलांवर लादतात, जे योग्य नाही.
मला आठवतेय, नव्वद च्या दशकातला जन्म असूनही माझ्या पालकांनी असली कुठलीही अपेक्षा माझ्याकडून बाळगली नाही.. किंबहुना आपल्या मध्यमवर्गीय परिस्थितीची जाणीव हळुवारपणे करून देत , सगळ्या योग्य मागण्या पूर्ण करण्यात आई वडील कधीच मागे राहिले नाहीत.
एकुलती एक होते, वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत भायखळ्याला आजीच्या पदराखाली जरी वाढले तरी आई बाबांपासून दूर होते. आठ्वड्यातला फक्त एक रविवार, मुंबईच्या उपनगरात दहिसरला एका छोट्याश्या वस्तीत असलेल्या भाड्याच्या बैठ्या घरात आई बाबांचा संग लाभायचा. रविवारी रात्री परतताना बाबाच्या खांद्यावरून आजीकडे झेपावणाऱ्या मला पाहून आईला हुंदका आवरायचा नाही! नशिबाने लवकरच मुंबईत स्वतःचे , छोटे का होईना, म्हाडाच्या चाळीत घर झाले आणि आईला तिचे कोकरू अगदी मिठीत गवसले.
एका पाच सहा वर्षीय लहान मुलीला शोभेल किंबहुना त्याहून किंचित अधिक असा व्रात्यपणा माझ्याही ठायी ठासून भरला होता. त्यात इथे नवीन घरात आजी,मामा व मावशीचा धाक नाही , मग बोलून सोय नाही! आई नोकरी करणारी … मी शाळेतून आल्यावर मला रीतसर पणे शेजाऱ्यांकडून किल्ली घेऊन घराचे कुलूप उघडून घरात आई कामावरून परत येईपर्यंत कसे राहायचे हे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले होते ( हो हो.. हे खरंच आहे, मला सहा वर्षांची असल्यापासून घरात एकटे राहायची सवय आहे , आणि यात मला माझे कौतुक अपेक्षित नसून चाकरमान्यांची मजबूरी काय होती ते तुम्हाला सांगणे अभिप्रेत आहे ) . परंतु वांडपणा वाढीस लागून घरात आईच्या कानी तक्रारी येऊ लागल्या.. की ‘ तुमची पोर गाडी न बघता सुसाट पळत रस्ता क्रॉस करते’ ,’मैदानात चिखलाचे गोळे ( आमच्यासाठी ते चिखलाचे लाडू , बरे का ) करून ही कारटी एकमेकांवर फेकतात’ , ‘आमच्या गुड्डू ला जिन्यावरून खाली ओढले नी त्याचा दात अर्धा तुटला ( खर तर ते तो लहान होता , म्हणून वर चढून पडू नये म्हणून मी खेचत होते, कुठल्याश्या पिक्चर मध्ये पाहिले असावे )’ . तर हे असे…
आईने ही धोक्याची घंटा वेळीच ओळखली नी माझ्या आगाऊ पणावर लगाम घालण्यासाठी तिच्या इच्छा आकांक्षांचा आधार घेतला . माझ्या आईला शिक्षिका बनण्यात खूप रस होता, तिला वाचनाची भयंकर आवड होती..मी तिला पाहिलेले आठवते, रविवारी, एका सुट्टीच्या दिवशीसुद्धा दुपारच्या झोपेला तिलांजली देऊन ती खाडिलकरांचा नवाकाळ ,शब्द न शब्द वाचून काही उपयोगी कात्रणे वहीत चिकटवून ठेवायची. लग्नाआधी परिस्थिती प्रमाणे ,काम करता करता शिक्षण घेऊन ती सरकारी नोकरीत परीक्षा देऊन रुजू झाली. शाळेतल्या, ” शर आला तो धावुनी आला काळ , विव्हळला श्रावण बाळ..” किंवा ” पलिकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर..” अशा कविता आताही ती काम करता करता अगदी चालीत गुणगुणत असते…
तिच्या सुपीक डोक्याने शक्कल लढवली नी माझ्यासाठी लहान लहान गोष्टींची पुस्तके, इसापनीती, पंचतंत्र, चांदोबा,चंपक, साईबाबा सारखे पाक्षिक तिने सुरू केले. माझ्यासोबत वाचन करीत सुट्टीच्या दिवशी तीही बसू लागली, आणि हळूहळू माझ्यात एका जागी बसून वाचनाची सवय तिने लावून दिली. त्यानंतर तिच्या दादर हेड पोस्ट ऑफिस शेजारच्या मुंबई ग्रंथ संग्रहालयातील वार्षिक सभासदत्व माझ्यासाठी घेण्यात आले, मग हळूहळू घरापासून पाचेक किलोमीटरवर असलेली राष्ट्रीय मिल मजदूर संघाची लायब्ररी, जी माझ्या सोबत वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत राहिली..साहित्यातील कथा, कादंबऱ्या, ललित, शृंगार, ऐतिहासिक , कवितासंग्रह सगळ्यांशी ओळख करून देताना ही लायब्ररी कुठेच कमी पडली नाही ! आजही तिथून टॅक्सी जाताना डोळे दुथडी भरून वाहू लागतात ! नंतर इंजिनिअरिंग च्या अभ्यासामुळे मला माझे वाचन नाईलाजाने सोडावे लागले.
साधारण दहा अकरा वर्षांची असेन मी.. एक प्रसंग आठवतो मला.. शेजार -पाजारच्या माझ्या वयाच्या मुली गणपती, दिवाळीला, हळदी कुंकवाला भरजरी साड्या नेसून मुरडायच्या , आपल्या आईंच्या दागिन्यांचे प्रदर्शन करायच्या. माझ्या चष्मा लावलेल्या , चापून चोपून तेल लावून घट्ट पोनी घातलेल्या ध्यानाकडे उपहासाने पहायच्या! असच एकदा त्यांची नजर आणि चिडवणे सहन न होऊन मी जरा घरात धुसफूस करत होते.तेव्हा आईने मला अगदी प्रेमाने परंतु स्पष्ट सांगितले होते की “स्मितू, तुला मी शिक्षण , पुस्तके या बाबतीत कधीच कमी पडू देणार नाही ,पण एखादाच फ्रॉक वर्षाला घेईन चालेल ना तुला?” तेव्हाही आईच्या कमरेला मिठी मारून तिच्या धीरगंभीर चेहऱ्याकडे पाहताना , ती चार फुटी मूर्ती मला एकदम भव्य भासू लागली होती. तिने तिचा शब्द पाळला , हे काही सांगायला नकोच! त्यानंतर काही दिवसांतच त्यातलीच एक मुलगी , संस्कृतात नापास झाल्याने माझ्याकडे संस्कृत व्याकरण व धातूमालेचे ( त्या काळी अवघे २५ रुपयांचे ) पुस्तक माझ्याकडे मागावयास आली. मदत म्हणून मी ते तिला दिले , पण खरी श्रीमंती कशात आहे ते मात्र मला त्या दिवशी आईच्या आश्वासक नजरेतून कळले.
अवांतर वाचनामुळे तसेच शाळेतल्या शिक्षकांमुळे माझी भाषा सुद्धा सुधारली , लवकर सुस्पष्ट झाली आणि कुठे अलंकारिक शब्दांची पखरण सुद्धा आपसूक होऊ लागली. पण हे माझ्या नकळत घडत होते, कुठे ही आव नव्हता. तरीही माझ्या बोलण्यात ” अर्थातच..” , ” किंबहुना ” या शब्दांचा वापर आला की चाळीतल्या मुली फिदीफिदी हसायच्या… एका काकूने तर , ” ती वयाच्या मानाने जरा प्रौढच बोलते बाई, म्हाताऱ्यासारखं.. या वयात मुलींनी जरा अल्लडच असावं..” असे नाक मुरडून म्हटले होते. चाळीच्या भिंतीनाच काय , कठडा, बोळ, दारात ठेवलेले पिंप, संडास सगळ्यांनाच कान असतात.. आईला हे कळले तरी तिने दुर्लक्ष करून टाकले आणि मला ही करायला लावले. नंतर वक्तृत्व आणि नाट्यछटा स्पर्धेत मिळालेली बक्षिसे या हिणवणुकीला आणि खोचक टोमण्यांना कुठच्या कुठे झाकोळून गेलीत.
माझ्या शाळेत पहिल्या तीनात येणाऱ्या मुलींना जे बक्षीस मिळायचे ते म्हणजे आयडीयल चे १००/- , ७५/- किंवा ५०/- रुपयांचे कूपन असायचे. मुंबईकरांना दादरचे आयडियल पुस्तक भांडार माहित नसेल असे होणारच नाही.. तिथे जाऊन तासनतास धुंडाळून आई नी मी अनेक पुस्तके खरेदी केलीत. इतकी सुंदर निबंधाची पुस्तके मला त्यातून विकत घ्यायला मिळाली, की ती मी अजून जपून ठेवलीत आणि या जन्मात तरी ती माझ्या सोबत राहतील ! एकदा त्या निबंधाच्या पुस्तकांसाठी मी वेगळी पोस्ट लिहीन!
आईने माझ्या इंजिनिअरिंग च्या वेळी सुद्धा कितीही महाग असो पुस्तक , कधी ती , कधी मी तर कधी बाबाला सुद्धा दवडून विकत आणून द्यायची. तिथे कुठलीही काटकसर किंवा चालढकल केली गेली नाही ! कोणत्याही आकाराचे पुस्तक घरात आले रे आले , की त्याला नवीन कव्हर मग ते खाकी असो, की टाइम्सच्या पेज ३ चा गुळगुळीत पेपर असो, पुस्तक हे उघडे बोडके असूच नये, असा तिचा आग्रह ! तर या अशा वाचन प्रेमाने माझ्या चाळीतले इवलेसे घर सुध्दा कपाट न कपाट भरून गेलेय .
मधे काही वर्षे नोकरी निमित्त , पोस्ट ग्रॅज्युएशन निमित्त फक्त टेक्निकल पुस्तके वाचली गेली, ते ही ज्ञान वर्धकच होते म्हणा! मागील चारेक वर्षांपासून मी परत वाचन सुरू केले आहे, काही आधीच वाचलेल्या पुस्तकांची पारायणे, काही नवीन , काही वेगळ्या genre ची ..
या एवढ्या मोठ्या लेखाच्या निमित्ताने आणि आजच्या दिनानिमित्ताने सांगू इच्छिते, की माणसाला वेगवेगळे छंद असतात, त्याचे त्याला अनेक प्रकारे फायदे होतात. वाचन या छंदाने मला जगण्याचा मंत्र दिलाय, आयुष्यात बरीच वादळं आली, कोलमडून पडू की काय असे वाटू लागे,हताश झाले तेव्हा कुठल्या ना कुठल्या पुस्तकातील वाचलेले एखादे धीराचे वाक्य मनाला थोडी उभारी देऊन गेले.. विचारांच्या दिशा फोफावल्या की जेणेकरून मार्ग आणि संधी उपलब्ध होत गेल्या! वाचनाने मनुष्य इतका समृद्ध होतो की तुम्ही विचारांनी गगनात भरारी घेऊ शकता, स्वतःचे निर्णय स्वतः हिमतीवर घेऊ शकता, तुम्ही FREE राहण्याची ताकत मनी बाळगता!
आपणां सर्व वाचन वेड्या मित्र मैत्रिणींना जागतिक पुस्तक आणि कॉपी राईट दिनाच्या शुभेच्छा!
तळटीप : या ब्लॉग मध्ये माझ्या घरातील पुस्तक संग्रह , माझ्या आवडीच्या cookbooks, माहितीपर पुस्तके, कादंबऱ्या, लहान मुलांच्या गोष्टींपासून काही इंग्रजी कादंबऱ्या ते पार्टनरच्या आवडीची ,देशाच्या इतिहास व राजकारणाविषयी पुस्तके यात आहेत.. कधी भविष्यात मोठी जागा राहायला मिळाली तर नीट अजून व्यवस्थित genre प्रमाणे रचून ठेवीन ! काही फूड फोटोज् ज्यात मी styling साठी बऱ्याचदा पुस्तके वापरली आहेत, ते सुद्धा देत आहे , Because every food photo tells a story like a book!
खूप आभार माझ्या वाचकांचे, ज्यांनी ही पोस्ट पूर्ण वाचली 🙏🏻😊
Leave a Reply