आठवड्याचा असाच मधला कुठला तरी वार , अर्थातच मासे खाण्यासाठी आमच्या घरात राखून ठेवलेला ! सकाळीच आई उठून लगबगीनं पाणी भरून , न्हाऊन , सडा रांगोळी करून न्याहारीच्या तयारीला लागलेली …
एका हाताने चटचटीत गरम झालेल्या काहिलीवर सटासट आंबोळ्या फिरवीत परसदारी झाडांना शिंपण घालायला गेलेल्या माझ्या बाबाला मागील दारातून हाक मारीत , ” ओ चला खाऊन घ्या, सूर्य डोक्यावर आला की मिळायचे नाहीत , लवकर आणून द्या , ती आता दोन तासांत दारात उभी राहतील..” आता याचा संदर्भ सांगते हां तुम्हाला , इथे माझी आई बाबाला लवकर न्याहारी करून बंदरावर किंवा पुढच्या गावात खाडीपाशी बसणाऱ्या मासे विकणाऱ्या विक्रेत्यांकडे जाण्यासाठी आग्रह करतेय , कारण जरा उशीर झाला तर त्यांच्या टोपल्या रिकाम्या होतात आणि बंदरावर सुद्धा रापणीच्या जाळी होड्यांवर सुकायला ठेवल्या जातात …आणि मग मोठ्या बाजारात जाऊन मासे घेऊन वेळेत घरी येण्याइतका माझा बाबा चटपटीत मुळीच नाही हे तिला चांगले ठाऊक आहे … वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक ओळखीच्या मनुष्याला ” हय खय आसा , हडसर चल चाई पाजतो” असे म्हणत तो घरी येईपर्यंत आमची राणी आणि तिची वंशावळ ( आमची कुत्री ) पंगतीला ठाण मांडायला दुपारी १२ पासूनच , आईने स्वच्छ केलेल्या अंगणात , ओल्या वाळूचे ठसे उमटवायला लागतात !
३६ वर्षे केंद्र सरकारच्या टपाल खात्यात नोकरी करून , मोठ्या हुद्दयावर कार्यभार सांभाळत आई रिटायर झाली. तिच्या कामातली शिस्तप्रियता आणि दुसऱ्यांना सांभाळून घ्यायची वृत्ती , यांमुळे तिच्या रिटायरमेंट समारंभाला अनेकांच्या पापण्या ओलावल्या … तिला कामे चटचट उरकायला आवडतात , आणि माझा बाबा म्हणजे रमतगमत , गप्पा झोडत , मनमौजी कारभार करणारा !म्हणूनच आई क्वचितच बाबाला रत्नगिरीच्या मोठ्या मासळी बाजारात धाडते.
आईच्या हाकांना दुर्लक्ष करीत , घराच्या मागील भागात राहणाऱ्या भाडेकरूंच्या पोरासोरांना चिडवत , त्यांना आमच्या सुंदरींची नवजात पिल्ले कशी खेळतायत, हे दाखवत आमचे पिताश्री डुलतडुलत किमान अर्ध्याएक तासाने घराच्या मागील दारातून आत डोकावतात . आई फक्त स्वयंपाक घरात लावलेल्या आजोबांच्या काळातल्या घडाळ्याकडे बोट दाखवते… दहा वाजणारच असतात , मग बाबा तसाच पुढील अंगणात आवारातील लोखंडी गेट ची कडी उघडून रस्त्यावर बंदरातून कोणी येत आहे का हे पाहावयास लागतो . कारण त्यालाही ठाऊक असते , आता गावाने सारे मैदान मारलेलं आहे , रापणीचे फ्रेश मासे नक्की संपलेले असतील .. तरी एक वायफळ प्रयत्न …
दुरून कोणीतरी येताना दिसतो , उघडबंब , माशाच्या मधल्या काट्यासारखे काटक शरीर , अंगातली गंजी काढून खांदयावर टाकलेली आणि कळकट्ट झालेली गुढघ्यापर्यंतची खाकी पॅन्ट ( हा कोकणातलया दमट हवामानामुळे बऱ्याच जणांचा पेहराव आहे त्यामुळे काही पूर्वग्रह नसावा ) , ही आकृती जशी जवळ येते , तसा माझा बाबा तिला ओळखून ” ए पद्या ए पद्या ( मूळ नाव प्रदीप,) मिलला काय ,काय काय हयसत ,” , मग प्रदीपराव उर्फ पद्या , खोचक पणे उत्तरतात , ” इनोदा ( बाबाचे नाव विनोद ) अरे वाजले किती SSS , कोलनी मच्छी घराशी रांधून भाकऱ्या बडवीत असतील , आता काय रस्त्यावर पडलेल्या माशाक खाणार्या मांजरांस बघाय चाललास ,,, होय तर ,,,!” आणि हे पद्या नावाचे सद्गृहस्थ दातातील फट दाखवत आपले फिशबोन पोट आत बाहेर करत हसतात आणि स्वतःला मिळालेले मासे , जग जिंकल्याच्या आविर्भावात घेऊन पुढे मार्गस्थ होतात !
चारी मुंड्या चीत झालेला बाबा आईला अगदी मस्का बाजी करत म्हणतो , ” शारदा , मी जातो रत्नागिरीला , मासे घेऊन येतो , तू संध्याकाळी बनव , चालेल काय ?” हे असे होणार याची पक्की खात्री असलेली आई म्हणते ” ठीकेय आंबोळ्या घातल्याचं आहेत , सांबार घालते आता साठी काळ्या वाटाण्याचे ..”
आईचा समजहूतदारपणा पाहून माझा बाबा वाकडी मान करत ” बास बास मस्त ,” म्हणत चहात गरमागरम आंबोळी बुडवून खायला लागतो !
आम्हा रत्नागिरीकर , मालवण भागातल्या कोकणस्थांना कडधान्ये अतिप्रिय , उसळी , आमट्या , सांबार , यांचा जेवणात भरपूर समावेश .. त्यातून काळे वाटाणे हे तर जणू चिकन मटण माशाला बेस्ट पर्याय ,,, श्रावणात मांसाहार वर्ज्य तेव्हा घरोघरी काळ्या वाटाण्याच सांबार नक्की , आणि कुठे बाजूच्या काकीच्या घरात आंबोळीच्या आवाजाने काहील चर्र करतेय तर बाजूची संध्या आत्या केळीच्या पानावर भाजणीचे वडे थापतेय , आमच्याकडे आईने तंवसे म्हणजे काकड्या किसून ठेवल्यात घारग्यांसाठी , तर कुठे घावनांसाठी पीठ भिजवले जातेय !
कोकणातल्या स्वच्छंदी आणि खवय्ये माणसाच्या जिभेला रुचणाऱ्या पदार्थांपैकी हा एक .. इथे काळ्या वाटाण्याचे पीक देखील अमाप घेतले जाते , आणि प्रत्येक समारंभात , लग्नकार्यात , केळीच्या पानावर वाढलेले ते काळ्या वाटाण्याचे सांबार धावत जाऊन जेव्हा बाजूला वाढलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या घट्ट खिरीत मिसळते ना , त्याचा घास घेताना कोण आनंद चेहऱ्यावर पसरतो !
मागच्या आठवड्यात कोकणातील पारंपरिक तांदळाच्या आंबोळीची रेसिपी पोस्ट केली होती ,, अपेक्षेप्रमाणे त्या रेसिपीला प्रतिसाद चांगला मिळालाच परंतु त्याचबरोबर बऱ्याच दर्शकांनी काळ्या वाटाण्याचे सांबार पोस्ट करा म्हणून आग्रह केला होता… म्हणूनच आज खास सगळ्यांसाठी आंबोळीशी घनिष्ट मैत्री असलेले ” काळ्या वाटाण्याचे सांबार “!

- १ कप = २०० ग्रॅम्स काळे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजवून , चाळणीत निथळून , एका कापडात २४ तास घट्ट बांधून मोड काढलेले
- २ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स लांब चिरलेले
- २ मोठे टोमॅटो = १२५ ग्रॅम्स , मोठे तुकडे करून
- अर्धा कप कोथिंबीर
- १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- तेल
- ७-८ कढीपत्ता
- १ टीस्पून हळद
- पाव टीस्पून हिंग
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- ४-५ टेबलस्पून मालवणी मसाला
- मीठ चवीनुसार
- काळे वाटाणे एका प्रेशर कूकरमध्ये घालून त्यात ३ कप पाणी व थोडे मीठ घालावे . मंद ते मध्यम आचेवर ४-५ शिट्ट्या येईस्तोवर शिजवावे .
- कुकर थंड झाल्यावर वाटाणे वेगळे आणि त्यांचे शिजलेलं पाणी बाजूला काढून ठेवावे.
- वाटण बनवण्यासाठी खोबरे भाजून घ्यावे . मंद आचेवर ४-५ मिनिटे खरपूस खोबरे भाजून घ्यावे .
- २ टेबलस्पून तेल एका पॅनमध्ये घालून त्यात लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . कांदा घालून चांगला ७-८ मिनिटे खरपूस परतून घ्यावा . कोथिंबीर , भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . वाटण थंड झाल्यावर पाऊण कप पाणी साधारण वापरून बारीक वाटून घ्यावे .
- टोमॅटो पाणी न घालता प्युरी करून घ्यावी . पाव कप काळे वाटाणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे .
- ३-४ टेबलस्पून तेल कढईत गरम करावे . त्यात कढीपत्ता व हिंगाची फोडणी करावी . तेलात हळद व मालवणी मसाला घालून लगेच परतावा नाहीतर करपतो . वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे . चवीनुसार मीठ घालावे आणि वाटलेली वाटाण्याची पेस्ट घालावी . नीट एकत्र करून घ्यावे .
- मसाला कोरडा पडला तर शिजलेल्या वाटाण्याचे बाजूला काढलेले पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यावा .
- उकडलेले वाटाणे घालावेत व शिजलेल्या वाटाण्याचे पाणी ( २ कप ) आणि वरून अजून गरम पाणी ( २ कप ) घालावं . मध्यम आचेवर सांबाराला एक उकळी येऊ द्यावी .
- उकळी फुटली की आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे . ५-६ मिनिटांनी टोमॅटोची प्युरी घालून मंद आचेवर शिजू द्यावे जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा निघून जात नाही .
- ६-७ मिनिटांत सांबार शिजून तयार होते . गॅस बंद करून वाढेपर्यंत झाकण घालावे म्हणजे ते जरा चांगले मुरते .
- आंबोळी , घावन किंवा वड्यांसोबत वाढावे .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Kiti chhan lihaley!
You have spiced up recipe with beautiful writing 💙
Thank you so much Meenal.. तुमचा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला , माझ्या बाकीच्या रेसिपीज देखील जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा
Hi Smita Ji,
Tumchi recipe vachun keli ghari. Chhan zali ekdm👌☺️