” न कर्त्याचा वार शनिवार ” , ही जी म्हण आहे ना नेहमी मलाच लागू पडते असे आताशी वाटायला लागलय ! कितीही आदल्या रात्री मनाशी पक्के ठरवूनही शनिवारी सकाळी उठायला उशिरच होतो . एरवी माझा दिवस सकाळी ६ ला सुरु होतो , परंतु का कसे माहित नाही शनिवारी मात्र माझ्या मोबाईलचा अलार्म आणि माझी बोटे झोपेत “SNOOZE ” ची पकडापकडी खेळत असतात ! अगदीच जेव्हा ८ वाजता घणाघणा घंटा वाजवत आमच्या गल्लीत कचरा गोळा करणारी घंटागाडी येते , तेव्हा मात्र नाईलाजाने पांघरूण दूर सारत मी चोरट्या बोक्यासारखी हळूच आवरायला घेते. पार्टनर नजरेनेच उलटतपासणी घेत असतो ,” काय मॅडम आज आठवडा बाजारातून भाज्या स्वप्नातच आणल्यात की काय? आजचे रेसिपी शूट देखील बोंबललेच म्हणायचे !” मग रागावलेल्या नवरोबाला खुश करण्याचा उपाय म्हणजे तोच हो आपला – ओल्ड स्कूल परंतु एकदम जालीम ! नाश्त्याला मस्तपैकी खायला काहीतरी बनवणे …
…