” न कर्त्याचा वार शनिवार ” , ही जी म्हण आहे ना नेहमी मलाच लागू पडते असे आताशी वाटायला लागलय ! कितीही आदल्या रात्री मनाशी पक्के ठरवूनही शनिवारी सकाळी उठायला उशिरच होतो . एरवी माझा दिवस सकाळी ६ ला सुरु होतो , परंतु का कसे माहित नाही शनिवारी मात्र माझ्या मोबाईलचा अलार्म आणि माझी बोटे झोपेत “SNOOZE ” ची पकडापकडी खेळत असतात ! अगदीच जेव्हा ८ वाजता घणाघणा घंटा वाजवत आमच्या गल्लीत कचरा गोळा करणारी घंटागाडी येते , तेव्हा मात्र नाईलाजाने पांघरूण दूर सारत मी चोरट्या बोक्यासारखी हळूच आवरायला घेते. पार्टनर नजरेनेच उलटतपासणी घेत असतो ,” काय मॅडम आज आठवडा बाजारातून भाज्या स्वप्नातच आणल्यात की काय? आजचे रेसिपी शूट देखील बोंबललेच म्हणायचे !” मग रागावलेल्या नवरोबाला खुश करण्याचा उपाय म्हणजे तोच हो आपला – ओल्ड स्कूल परंतु एकदम जालीम ! नाश्त्याला मस्तपैकी खायला काहीतरी बनवणे …
माझ्या फ्रिजमध्ये इडली डोशाचे बॅटर मी नेहमी तयार करून ठेवते , म्हटले मसाले डोसे घालुयात .. तेवढ्यात फ्रिजच्या साईड कंपार्टमेंटमध्ये ठेवलेला पिचकु सॉस टुणकन उडी मारून खाली पडला ! त्याला परत जागेवर ठेवताना मला सारी चायनीज सॉसेसची पाकिटे दिसली ! चटण्या , लोणची , गुलकंदाच्या बाटलीमागे बिचारी दडून बसली होतीत ! जणू काही ” अजि म्या ब्रह्म पाहिले ,,” अशा धर्तीवरचा आनंद झाला …. सुचली ना आयडियाची कल्पना … म्हटले डोसे घालायचेच आहेत तर आज थोडे फ्युजन करू आणि स्प्रिंग डोसे बनवू ! फ्रिजमध्ये उरलेल्या भाज्यांमध्ये दोन छोटी गाजरे, एक भोपळी मिरची , कोबीची गड्डी होतीच , आणि मागच्याच आठवड्यात व्हेज हक्का नूडल्स चा विडिओ शूट केल्यामुळे एक नूडल्स चे पॅकेट देखील होते ! ते म्हणतात ना , “कहते हैं की…अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है” आणि इथे तर खाण्यासाठी जन्म आपुला !
मग काय फटाफट भाज्या चिरल्या , एकीकडे नूडल्स शिजवून घेतले आणि घातले की हो स्प्रिंग डोसे ! आज पहिल्यांदा स्वतःचीच पाठ मी डावाने थोपटून घेतली ! पार्टनरच्या पुढ्यात जेव्हा ते वरून मस्तपैकी चीज भुरभुरलेले गरमागरम डोसे ठेवले तेव्हा थोडा प्रेमाने म्हणाला , ” ठीक है रेसिपी शूट नहीं करते आज , तुम ब्लॉग्स लिख लेना ! ” माझ्या आळशीपणामुळे झालेल्या गडबडीवर पांघरूण घातलस रे पांडुरंगा ! हे अस बऱ्याच वेळा झालेय माझ्यासोबत , आणि आजही हा जो ब्लॉग मी लिहितेय तो ही अशाच एका शनिवारचा ! कळलेच असेल तुम्हाला , मी आज तीच snooze ची पकडापकडी खेळलिये !
तर या अशा वेळेअभावी, वेळ नसताना, वेळ मारून नेणाऱ्या रेसिपीस – तसे म्हटल तर डोसा हे दक्षिण भारतीय व्यंजन आणि त्याचा इतका सुरेख मेळ इंडो चायनीज खाद्यसंस्कृतीशी घालण्याची जादू कोण्या महापुरुषाने केली असेल त्याच्या क्रीएटिव्हिटीला माझा साष्टांग दंडवत ! मुंबई दिल्ली सारख्या सतत धावत्या महानगरांमध्ये स्ट्रीट फूड संस्कृतीला जगवणाऱ्या एखाद्या हुशार विक्रेत्याच्याच सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना असावी!
असो , तर आपल्या भारतीय डोश्याचा हा इंडो चायनीज अवतार , लहान मुलांच्या पार्टीतला हा सुपरहिट पदार्थ आहे !एकदा घरी नक्की बनवून पहा , म्हंजी कस एखाद्या शनिवारी रविवारी बिनधास्त उशिरा उठायला तुम्ही मोकळे , काय ?
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- डोशाचे पीठ भिजवण्यासाठी :
- पाऊण कप इडलीचा तांदूळ ( उकडा तांदूळ )
- पाव कप नेहमीच्या वापरातला भाताचा तांदूळ
- पाव कप उडीद डाळ
- अर्धा टीस्पून मेथीचे दाणे
- डोशाच्या स्टफींग साठी:
- १ कप शिजवलेले नूडल्स ( ४० ग्रॅम्स कच्चे नूडल्स शिजवून )
- १ मध्यम आकाराची भोपळी मिरची = ७० ग्रॅम्स , लांब पातळ चिरून
- पाऊण कप = ७५ ग्रॅम्स कोबी , लांब चिरून
- पाऊण कप = ७० ग्रॅम्स पातीचा कांदा लांब चिरून ( पात्या बारीक चिरून घ्याव्यात )
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स गाजर लांब चिरून
- १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स लांब चिरून
- अर्धा टीस्पून काळी मिरी जाडसर कुटून
- १ टेबलस्पून रेड चिली सॉस
- १ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस
- दीड टीस्पून सोया सॉस
- १ टेबलस्पून शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस
- २ टेबलस्पून टोमॅटो केचअप
- २ टीस्पून व्हिनेगर
- मीठ चवीनुसार
- चीज
- बटर
- तेल
- डोशाचे पीठ बनवण्यासाठी पहिल्यांदा इडलीचा तांदूळ , उडीद डाळ आणि मेथी दाणे ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
- तांदूळ आणि मेथीदाणे एकत्र पाण्यात भिजवून घ्यावेत. उडीद डाळ वेगळी भिजवून घ्यावी. किमान ६-७ तास भिजू द्यावे. त्यानंतर पाणी काढून घ्यावे. भिजवलेले तांदूळ व मेथीदाणे आणि उडीद डाळ वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटण्यासाठी पाऊण कप आणि उडीद डाळीसाठी पाव कप पाणी वापरले आहे .
- एका खोलगट भांड्यात तांदळाची आणि उडीद डाळीची पेस्ट घालावी. १ टीस्पून मीठ घालून हाताने हे मिश्रण एकाच दिशेने गोल फिरवत ५-६ मिनिटे फेटून घ्यावे. असे केल्याने मिश्रण हलके होते . हे डोशाचे मिश्रण झाकून रात्रभर किंवा किमान ८ तास तरी एका उबदार जागी आंबवण्यास ठेवावे. मी ओव्हन २ मिनिटे हाय पॉवर वर गरम करून त्यात हे मिश्रण रात्रभर ठेवते . सकाळी छान आंबून फुलून येते .
- डोशाचे स्ट्फफिंग बनवण्यासाठी एका पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर घालून वितळू द्यावे. कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजू द्यावा. आता त्यात चिरलेल्या भाज्या घालाव्यात - भोपळी मिरची, कोबी, गाजर आणि हिरव्या पातीचा कांदा घालावा. थोडा पातीचा कांदा सजावटीसाठी राखून ठेवावा. मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्याव्यात .
- २-३ मिनिटांनंतर सॉसेस घालुयात - सोया सॉस, २ टीस्पून ग्रीन चिली सॉस, दीड टीस्पून रेड चिली सॉस , टोमॅटो केचअप , आणि २ टीस्पून शेजवान चटणी घालून नीट एकत्र करून घेऊ. २ मिनिटे शिजू देऊ.
- आता नूडल्स घालून एकत्र ढवळून घेऊ. नूडल्स कसे शिजवून घ्यावेत यासाठी व्हेज हक्का नूडल्स चा ब्लॉग नक्की वाचा. चवीनुसार मीठ , कुटलेली काळी मिरी पावडर, आणि व्हिनेगर घालून ढवळून घेऊ. गॅस बंद करू.
- डोसे बनवण्यासाठी मी पारंपारिक काईल म्हणजेच बिडाचा तवा वापरला आहे . तुम्ही नॉनस्टिक तवा देखील वापरू शकता. तव्यावर व्यवस्थित तेल लावूनघेऊ. तवा गरम झाला की आच मध्यम करून १-२ डाव भरून डोशाचे मिश्रण मधोमध घालून डावानेच गोलाकार पातळ पसरवून घेऊ. झाकण घालून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवून घेऊ.
- २ मिनिटानंतर झाकण काढून थोडे बटर व सॉसेस घालून डोशावर नीट पसरवून घेऊ. अजून थोडा वेळ डोसा चांगला कुरकुरीत होऊ देऊ. आता नूडल्सचे स्ट्फफिंग डोशाच्या मधोमध घालून नीट सपाट करून घेऊ. त्यावर किसलेले चीज , आणि थोडा पातीचा कांदा घालू . दोन घड्या घालून डोसा बंद करून तव्यावरून ताटलीत काढावा.
- हा गरमागरम व्हेज स्प्रिंग डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत मिटक्या मारत खावा !

Leave a Reply