“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥”
भावार्थ : हे भारत! जब-जब धर्म की हानि और अधर्म की वृद्धि होती है, तब-तब ही मैं अपने रूप को रचता हूँ अर्थात साकार रूप से लोगों के सम्मुख प्रकट होता हूँ! साधु पुरुषों का उद्धार करने के लिए, पाप कर्म करने वालों का विनाश करने के लिए और धर्म की अच्छी तरह से स्थापना करने के लिए मैं युग-युग में प्रकट हुआ करता हूँ!!
संदर्भासाठी वाचा
जगताच्या पालनकर्त्या साक्षात विष्णूचे हे बोल ! म्हणूनच की अहंकारी , अधर्मी मथुरेचा राजा कंस याच्या पापाचा घडा भरल्यावर , भगवान विष्णूने कंसाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या देवकी वसुदेवाच्या पोटी जन्म घ्यायचे ठरवले ! श्रावण वद्य अष्टमी , दिवसभर रिपरिप करणारा पाऊस रात्री आठव्या प्रहरी अचानक रौद्र रूप धारण करतो , यमुनेचा चढत जाणारा पूर आणि आठव्या महिन्यातली अडलेली गर्भार देवकी , अचानक बाळंत कळांनी विव्हळू लागते . अंधारकोठडीत एरवी सूर्याच्या एका किरणालाही शिरायला मज्जाव , तिथे निळसर तेजोवलयात देवकी वसुदेवाच्या हातात आपल्या तेजस्वी , सावळ्या अर्भकाला देते ! त्या नवजात शिशुच्या चेहऱ्यावरचे हास्यच सांगून जाते की , ” दुष्टांनो तुमचा कर्दनकाळ या पृथ्वीतलावर अवतरला आहे !”
पुढे या द्वापरयुगात हे बालरूपी विष्णूचे अवतार – भगवान श्रीकृष्ण , जगतासी पवित्र श्रीमद्भगवदगीतेचा अजरामर संदेश देऊन गेले ! विष्णूचा रामावतार हा १४ कलांनी युक्त असा , मर्यादा पुरुषोत्तम ! वाल्मिकी रामायणात नमूद केल्याप्रमाणे जसे शास्त्र म्हणते तसे वागणे, वेदांनी घालून दिलेल्या मर्यादा रामाने १०० टक्के पाळल्या आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगतात आदर्श ठरला ! आज्ञाधारक पुत्र, निस्वार्थ बंधू, एक पत्नीव्रत ! परंतु श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हणायचे , तर हे साक्षात भगवान , वेद आणि श्रीकृष्ण यांत फरकच मानला जात नाही ! यांच्या १६ लीला , म्हणून लीला पुरुषोत्तम असेही म्हटले जाते ! गोपगोपिकांच्या घड्यांतून दही दूध लोणी चोरून गरीब मित्रांमध्ये वाटणे, दिवसभर गायी गुरांसोबत हुंदडणे , यमुनेला विषारी करणाऱ्या शेषनागाला स्वतःच्या भव्य रूपाचे दर्शन घडवीत त्याच्या अहंकाराला ठेचून टाकणे , सत्याच्या विजयासाठी पांडवांना मदत करणे अशा नानाविध लीला कृष्णाच्या ! म्हणून कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम असेही म्हटले जाते !
हा बाळकृष्ण खाण्यावर नितांत प्रेम करणारा , याला जशी पंचपक्वान्नाची ओढ तसेच सुदाम्याच्या घरचे कोरडे पोहे देखील आनंदाने मिटक्या मारत खाणारा! उडुपीच्या प्रसिद्ध कृष्ण मंदिरात तर कितीतरी प्रकारच्या नैवेद्याची रेलचेल असते कृष्ण पूजेला ! याला दुधाचे , खव्याचे , सुक्या मेव्याचे पदार्थ अतिप्रिय, म्हणूनच मथुरा येथील वृंदावनात ,दिल्ली , आग्रा परिसरात जन्माष्टमी साजरी करताना कृष्ण जन्माच्या वेळी ” पंचमेवा पाग ” ही खास मिठाई बनवली जाते . पाग म्हणजे ” साखरेच्या पाकात घोळवून बनवलेला पदार्थ” ! तसे निरनिराळ्या पद्धतीने पाग बनवली जाते. पंचमेवा पागात सुके खोबरे, डिंक, , बदाम , काजू, मगज बीज , खवा आणि मखाना यांचा वापर केला जातो . जेव्हा जन्माष्टमीच्या वेळी घड्याळाचा काटा बाराचा ठोका देतो तेव्हा जागोजागी कृष्ण मंदिरात , एकच जल्लोष होतो ,
“बृज में आनंद भयो, जय यशोदा लाल की।
हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की॥”
आणि कृष्णजन्माचा आनंद साजरा करण्यासाठी हा पंचमेवा पाग प्रसाद म्हणून वाटला जातो !
माझी धाकटी मामेजाऊ नेहा, आग्र्याची , तिच्या तोंडून नेहमीच मथुरेच्या कृष्णजन्मोत्सवाची तारीफ ऐकलेली ! ती घरीही तितक्याच उत्साहाने जन्माष्टमी साजरी करते , तिच्या आईकडून ,सौ सुमित्रा गुप्ता , यांच्याकडून मला ही रेसिपी मिळालिये ! त्या स्वतः एक उत्तम लेखिका आणि कवयित्री आहेत . त्यांची अनेक पुस्तके हिंदी भाषेत प्रकाशित झाली आहेत . अगदी वेळात वेळ काढून काकूंनी व्यवस्थित मला फोन वर रेसिपी समजावून दिली , म्हटले मथुरेचा जन्मोत्स्व पाहायचा योग येईल तेव्हा येईल , परंतु इतकी पारंपारिक पाककृती बनवायचा मौका बिलुकल दवडवायचा नाही !
लहानपणी आमच्या चाळीत गणेशोत्सवात हौशी भजनी मंडळ कृष्णाच्या अनेक गौळणी गायचेत , त्यातली एक गौळण मला आजही आठवते जी कृष्णाच्या खोडकर लीला सांगते , गाणाऱ्याने ही गौळण गायला घेतली की आम्ही पोरे अंगात आल्यासारखी नाचायला लागायचो … बघा तुम्हालाही आठवत असेल!
” यमुनेच्या तीरी काल पहिला हरी ।ओ ओ ओ
कान्हा वाजवी बासरी ।।धृ ।।
बारा सोळा ss गौळ्याच्या नारी ।
त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।ओ ओ ओ
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छळू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।ओ ओ ओ
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी।।२।।
एका जनार्दनीं गवळण राधा
ती विनवी तुजला अरे मुकुंदा
गवळ्याची नार करी सोळा शृंगार ।ओ ओ ओ
लिन झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप = २० ग्रॅम्स मखाना
- १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- पाव कप = ५० ग्रॅम्स बदाम
- पाव कप = ५० ग्रॅम्स काजू
- पाव कप = ५० ग्रॅम्स मगज बीज
- पाव कप = ५० ग्रॅम्स डिंक / गोंद
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स खवा/ मावा
- २ कप्स = ४०० ग्रॅम्स साखर
- अर्धा टीस्पून वेलची पावडर - जाडसर करुन
- तूप गरजेनुसार
- एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे. त्यात मखाना ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यावेत.
- परत १ टेबलस्पून तूप घालून काजू, बदाम , मगज बिया वेगवेगळे प्रत्येकी २-३ मिनिटे खरपूस भाजून घ्यावेत
- डिंक तळण्यासाठी पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप घालून मंद आचेवर डिंक नीट फुलवून घ्यावा . डिंक मोठ्या आचेवर तळला तर बाहेरून लवकर करडा होऊन आत कच्चा राहतो .
- डिंक तळून झाला की त्याच पॅनमध्ये उरलेलया तुपातच खोबरे भाजून फक्त चुरचुरीत होईपर्यंत भाजावे.
- नंतर त्याच पॅनमध्ये खवा फक्त २-३ मिनिटे भाजावा. जास्त कोरडा होऊ देऊ नये .
- आता मखाना , बदाम, काजू, डिंक मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यावे . खलबत्त्यात कुटले तरी चालेल .
- साखरेच्या पाकासाठी २ कप साखर एका कढईत घालून त्यात १ कप पाणी घालावे. मंद आचेवर साखर वितळू द्यावी. अजून १२ ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून साखरेचा एकतारी पाक बनवावा !
- पाक शिजत आला की त्यात कुटलेला मेवा , खोबरे ,खवा आणि वेलची पावडर घालून नीट एकत्र करून घ्यावा. ३-४ मिनिटे मंद आचेवर पाक पूर्ण मुरेपर्यंत शिजवून घ्यावे.
- गॅस बंद करून हे मिश्रण एका थाळीला तुपाचा हात लावून त्यावर चौकोनाकृती थापून घ्यावे .
- अर्धा तास थंड झाल्यावर आपल्याला हवे तसे वड्यांचे आकार पडून घ्यावेत . अजून २ तास पूर्ण थंड होऊ द्यावेत ..
- एका हवाबंद डब्यात ठेवून या वड्या ५-६ दिवस तरी बाहेर चांगल्या राहतात !

खुप छानचं पदार्थ… mouth watering
Thanks a lot for your kind words!