चौथीचा प्राथमिक शिष्यवृत्तीचा वर्ग चालू होता, जेमतेम दुपारचे 3 वाजले असतील. आम्ही सगळी पोरे खुश- 1 तासात शाळा सुटणार, उद्या शनिवारची फक्त अर्ध्या दिवसाची सकाळची शाळा आणि रविवारी बाबा बरोबर बसून भरपूर धमाल करायची ,या विचारांनी मनात धिंगाणा घातला होता! गणिताच्या ताम्हणकर बाई फळ्यावर गृहपाठ लिहायला लागल्या आणि तेवढ्यात शाळेचा शिपाई – आमचा लाडका सचिन मामा , जवळपास तेविशीतला , घाई घाई ने वर्गात शिरला.
थेट तो काहीतरी ताम्हणकर बाईंच्या कानात कुजबूजला , बाईंच्या हातातला खडू गळून पडला आणि त्यांचा हसरा चेहरा खररकन उतरला! चाळिशीच्या उंबरठ्यावरच्या आमच्या बाईंना खुर्चिचा आधार घ्यावासा वाटला , रुमालाने तोंड पुसत कापऱ्या आवाजात त्यांनी आम्हाला म्हटले “ बाळांनो , दप्तरे भरून बसा रे, आज आई बाबा किंवा कोणी नातेवाईक आल्याशिवाय घरी जाता नाही येणार तुम्हाला….उद्या शाळा बंद राहील!”
अवघी 8-9 वर्षांची चिमणी तोंडे एकमेकांकडे पाहू लागली! एक बावळट चिरकले सुद्धा , “येयेयेये , उद्या सुट्टी” म्हणून! परंतु कुठे तरी मनात भावनांचा कल्लोळ उठला होता की सुट्टी मिळाली म्हणून आनंदिते व्हावे की ताम्हणकर बाईंच्या चिंतीत चेहऱ्याकडे पाहून शांत बसावे!
तेवढ्यात अचानक जोरदार काहीतरी फुटल्याचा आवाज झाला,धड्डम ……
फटाका फुटला वाटते- क्रिकेट ची मॅच आहे का इंडिया- पाकिस्तान…. नाही… तर मग कसला आवाज हा! 15 मिनिटे भयाण शांतता , आणि अचानक शाळेत थोडी धावपळ सुरू झाली . सचिन मामा आणि विष्णू आजोबा – आमच्या शाळेचे रिटाइयर्मेंटला आलेले शिपाई , दोघेही एक एक विद्यार्थ्याचे नाव पुकारत त्यांना घेऊन जायला निघाले , त्या मुलांचे पालक शाळेत आले होते न्यायला. आता मात्र हद्द झाली उत्कंठेची , कोणीच काही सांगत नव्हते, आणि निरनिराळे आवाज कानी पडू लागले “ प्लाज़ा सिनेमा , पासपोर्ट ऑफीस , सेंचुरी बझार”….
कितीतरी वेळा प्लाज़ा सिनेमाला गरम गरम वडापाव खात मराठी सिनेमा बघितला होता म्हणून प्लाज़ा सिनिमा ओळखीचा आणि शाळेपासून अगदी जवळ होता. सेंचुरी बझारला बाबा कधी कधी इंजिन रिपेरच्या कांट्रॅक्ट साठी जात असे! आता मात्र काही जणांनी भोकांड पसरायला सुरूवात केली होती. माझ्या बाकावरचा गणेश रडत रडत , माझ्या शर्टच्या बाहीला आपले वाहते नाक पण पुसत होता . त्याला मी एक ठोसा लगावणार , तेवढ्यात विष्णू आजोबा ओरडले “ चिंटी ( माझी ठेंगणी बालमूर्ती पाहता माझे शाळेतले टोपण नाव ) चल लवकर , आजी आली तुझी!” रोज 4 च्या ठोक्याला हजर रहणारी माझी आजी आज लवकर आली होती. परेल ते दादर जवळपास 8-9 किलो मीटर चे अंतर माझी आजी 40 मिनिटात झपाझप चालत पार करायची. तिला बस टॅक्सी चे वावडे होते – आणि चालत येण्याचे दोन फायदे – एक तर तिच्या म्हणण्याप्रमाणे चालणे हा उत्तम व्यायाम आणि दूसरे तिकिटाचे पैसे वाचवणे ! विष्णू आजोबांनी जवळ जवळ मला उचललेच , अगदी हनुमंताने द्रोणगिरी उचलल्यासारखे ! गणेश माझा हात सोडायला तयार नव्हता , त्याला वाटत होते की त्याची आई येईपर्यंत त्याची मैत्रीण त्याच्याबरोबर असावी. त्याला मागे वळून टाटा करताना खूप दया आली त्याची!
हाच तो 12 मार्च 1993- मुंबईच्या इतिहासातला काळा शुक्रवार – ब्लॅक फ्राइडे म्हणून जगाच्या इतिहासात नोंदवला गेला!
खाली आजी उभी होती – आपल्या हाडकुळ्या हातांनी मला गोंजारत तिने मला हळूच सांगितले ,”श्मितु बॉम्बस्फोट झालेत , आपल्याला लवकर घरी पोचायचेय”. मी आणि माझ्या दोन मैत्रिणी ज्या बाजूच्याच चाळीत राहायच्या , अशा आम्हा 3 लहान कोकरांना घेऊन आजी निघाली. त्या दिवसाएवढी भकास मुंबई मी कधीच नाही पाहिली. एरवी मध्यरात्री एक वाजताही गजबजणारे दादरचे रस्ते त्या दिवशी उजाड झाले होते, एक चिट पाखरू ही नव्हते रस्त्याला. आजी पाळी पाळी ने एकेकीला कडेवर उचलून घेत अक्षरशः धावत होती घर गाठण्यासाठी!
बस टॅक्सी चा तर विषयच संपला! जवळ जवळ 1 तास झाला , केईएम हॉस्पिटल जवळ पोचलो आणि हा काय आक्रोश, वॅ वॅ करत अँब्युलन्स केईएम च्या गेट मधे घुसण्यासाठी उभ्या होत्या, एक आत शिरते ना शिरते तोच दूसरी येत होती. शवगृहात जागा संपली म्हणून बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह फुटपाथ वरच ठेवण्यात आले होते आणि ते दाहक दृष्य आमच्या नाजूक मनावर घाव करू नये म्हणून आजीने आम्हा तिघींनाही पदराआड लपवायचा एक निष्फळ प्रयत्न केला! आजही कधी दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या ऐकून मन द्रवते ते याच प्रसंगाचा साक्षीदार असल्यामुळे! कसे बसे घरी पोचलो आणि आजही आठवतेय की दोन तीन तासां नंतर आई बाबा घरात शिरल्यावर त्यांच्या कमरेला मिठी मारत किती मोठ्याने टाहो फोडला होता!
चाळीत त्या दिवशी एक भयाण शांतता होती. काही कुटुंबांमधली माणसे परतली नव्हती त्यांच्या घरी शेजारीपाजारी धीर द्यायला गोळा झाले होते. फोन आणि मोबाइल चा तो जमाना नव्हता . रात्री साडेबाराला आमच्या दरवाजावर थाप पडली, बाबाने दरवाजा उघडला तर समोर एक विशीतला तरुण उभा होता. चौकडीचा निळ्या रंगाचा चुरगळलेला मळखाऊ शर्ट , आणि काळ्या रंगाची रंग उडालेली पॅन्ट आणि पायात झिजलेली अंगठे उडालेली कोल्हापुरी! अस्ताव्यस्त केसांमुळे आणि त्याच्या दमलेल्या चेहऱ्याकडे पाहून बाबाला काही त्याची ओळख पटेना! आईने निरखून पाहताच तो ” सुमन ताई, मी अरुण ” म्हणून उद्गारला ! आईच्या डोक्यात प्रकाश पडला कि हा तिच्या प्रभा मावशीचा मोठा मुलगा! तिने अरुण मामा ला त्याच्या लहानपणी पाहिले असल्याने तो अचानक समोर आल्यावर ती पटकन ओळखू शकली नाही ! बाबाने त्याला अगत्याने घरात घेतले आणि आईने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी आल्याचा चहा टाकला, त्या गरम चहाचे दोन घोट पोटात जाताच त्या दमल्या जीवाला तरतरी आली. अरुण मामाच्या वडीलांना काही महिन्यां पूर्वीच देवाज्ञा झाली होती, आणि अचानक आलेला हा दैवाचा घाला परतवण्यासाठी त्याने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली. कोकणात आंजर्ला गावातून मुंबईला सामान पोचवण्यासाठी त्याने ट्रक चालवण्याचे काम सुरु केले. त्या दिवशीही तो ट्रक घेऊन मुंबईला आला आणि प्लाझा सिनेमाच्या बॉम्बस्फोटामुळे दादरला शिवाजीपार्कला अडकला,भेदरलेला तो नाईलाजाने ट्रक पार्क करून दिवसभर वणवण फिरत होता , खिशात पैसे कमी असल्याने त्याची खाण्यापिण्याची आबाळ झाली. नशिबाने त्याच्या फाटक्या पाकिटात आमच्या घराचा कधीतरी लिहून घेतलेला पत्ता मिळाला , आणि असा तो शोधत शोधत चालत रात्री निवाऱ्यासाठी आमच्याकडे पोचला !
आमची तर जेवणे आटोपली होती, आईने पटकन अर्ध्या तासात त्याला गरम गरम कुळथाचे पिठले आणि भात करून वाढलं, पोटभर जेवला बिचारा ! त्याच्या थकलेल्या डोळ्यांत आलेली चमक मी अजूनही विसरू शकत नाही ! आमच्या त्या २२५ स्क्वेअर फुटाच्या घरात माझ्या बाबांजवळ तो अगदी विश्वासाने भयमुक्त होऊन झोपला!
माणुसकी या शब्दाचा अर्थ त्या दिवशी माझ्या आई बाबाने खऱ्या अर्थाने मला जगून समजावला!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- ½ कप =60 ग्रॅम्स कुळीथ पिठी /कुळथाचे पीठ
- 2 मोठे कांदे - १८० ग्रॅम्स लांब व पातळ चिरून
- ½ कप खवलेला ताजा नारळ
- तेल
- पाणी
- 2 हिरव्या मिरच्या
- 5-6 लसणीच्या पाकळ्या
- 1 टीस्पून जिरे
- 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 टीस्पून मोहरी
- १/४ टीस्पून हिंग
- १/४ टीस्पून हळद
- 1 टेबलस्पून मालवणी मसाला (मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला )
- 2-3 कोकम
- मीठ
- सर्वप्रथम एका खलबत्त्यात जिरे , लसूण आणि हिरव्या मिरच्या जाडसर कुटून त्यांची पेस्ट करून घ्यावी. मिक्सर वापरला तरी चालेल.
- आता एका वाडग्यात कुळथाची पिठी घेऊन त्यात पाणी घालून सरसरीत पातळ करून घ्यावे. पाऊण कप पाणी घालून मी ही पिठी पातळ करून घेतली आहे.
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी , हिंगाची फोडणी घालून वाटलेला मसाला घालून घ्यावा. लसूण खरपूस होऊ द्यावी.
- आता कांदा घालून तो मध्यम आचेवर चांगला करडा होऊ द्यावा. त्यात हळद आणि मालवणी मसाला घालून २ मिनिटे चांगला परतून घ्यावा .
- कुळथाचे पीठ घालून घ्यावे आणि मसाल्यात चांगले ढवळून घ्यावे. गरज वाटेल तेवढे पाणी घालून पिठलं हवे तेवढे पातळ करावे. फार जास्त घट्ट आणि पातळ ठेवू नये. हे पिठले कोकणी घरांमध्ये भाताबरोबर जास्त खाल्ले जाते.
- आपण ४ कप पाणी घातले आहे. मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर पिठल्याला चांगली उकळी येऊ देऊ. उकळी आली कि आच मंद करून झाकण घालून पिठलं शिजू देऊ.
- ५ मिनिटे शिजवल्यावर पिठले घट्ट होऊ लागते. कोकम घालून झाकण न घालता अजून २ मिनिटे शिजू देऊ. पीठीचा कच्चेपणा दार झाला कि समजाव पिठले शिजले. आता खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून १ मिनिट शिजवून घेऊ.
- पिठले तयार आहे . गरमगरम भाकरी किंवा भातासोबत वाढावे. सोबत एखादा पापड भाजलेला मिळाला कि क्या बात !

Leave a Reply