एका टुमदार बंगल्यात एक रिपोर्टर तरुणी आगंतुकासारखी परवानगी वगैरे न विचारता , डायरेक्ट आत शिरते . किचनमध्ये धडक मारत तिथे उभ्या असलेल्या एका सदाबहार जोडप्याला आश्चर्याने विचारते , ” सर , आम्ही तुम्हाला चक्क बटाटावडा खाताना पाहतोय..” चेहऱ्यावर जमेल तेवढे लाघवी हास्य ठेवून आपल्या महाराष्ट्राचे लाडके म्हाग्रू उत्तरतात ,” माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो !” पुढे तिचा भोचकपणा , ” तरीही इतका फिटनेस …” ” ए बाई कशाला नजर लावती माझ्या नवऱ्याला “, असा सुप्रिया मॅडमचा लुक .. यावरही सचिनजींनी ,’ कोणी काही म्हटले तरी मैं वडा खाकर ही दम लूंगा ‘, असा आविर्भाव ठेवून , परत निरागस हसून बायकोकडे डोळे मिचकावून एक मिश्किल सिक्सर लगावलाच . ” बायकोचे प्रेम नि बटाटावडा ..”
खरं तर ही तेलाची जाहिरात , पण मी कशाला भाव देऊ हो तेलाला , आपल्याला सचिनजींच्या हातातल्या बटाटवड्याचे प्रेम ना ! आता बघा , या बटाटवड्याची भुरळ चक्क सेलेब्रिटी कपलवर पडली असताना , आम्हां पामरांची काय कथा !
आपल्या देशात बटाटावडा हा सर्वव्यापी , सर्वदूर याची ख्याती पसरलेली आहे . आपल्या महाराष्ट्र्राचा वडापाव वर्ल्ड फेमस , अगदी अटकेपार झेंडे लावून आलाय! माझ्या गुजराती मैत्रिणीच्या आईने घरी जेवायला बोलावल्यावर ताटात वाढलेले ते लिंबाच्या आकाराचे बेसनाची छोटी शेपूट आलेले क्युट गोलाकार खुसखुशीत आलू वडा , इतकी वर्षे उलटून गेलीत तरी विसरायला होत नाहीत ! उडुपीला बस स्टॅण्डवर किंवा मणिपाल च्या टायगर सर्कल ला ऐन मोक्याच्या जागी घोळका करून पेपरमध्ये लाल – हिरव्या आंबट तिखट चटणीसोबत डुंबवून खाल्लेला बटाटा अंबाडे , त्याच्या आठवणीने आता बसल्या जागी जिभल्या चाटायला भाग पाडतो . माझ्या हिंदी चॅनेल वर मी राजस्थानचा बटाटावडा बनवलाय , जो ओळखला जातो ” कोफतो ” Kofto या नावाने . माझ्या सासरी उत्तर प्रदेशात आलू बडा और धनिया – पुदिना की सील पर पीसी चटनी म्हणजे संध्याकाळचा चटखोर नाश्ता !
आता हे सगळे बटाटावड्याचे अवतार मानवाच्या क्षुधा नी पर्यायाने आत्मा शांतीसाठी असले तरी त्यांच्या साहित्यात थोडे फार बदल आहेतच ! राजस्थानच्या कोफतो मध्ये कलौंजी चा वापर , उत्तरेकडील वड्यात थोडी आमचूर किंवा थोडीशी आम किंवा भरवा मिर्च की खटाई, आपल्याकडे लसूण, कांद्याचा सढळ वापर , तर कोणाच्या पिठात तांदळाचे पीठ !
आजची माझी रेसिपी ही Urrulai Kizhangu Bonda – कृपा करून उच्चारायला सांगू नका – हास्याची खसखस पिकेल ऐकणाऱ्यांमध्ये ! सोप्पं करून सांगते, हा आहे आलू बोन्डा म्हणजेच पोटॅटो बोन्डा .. थोडक्यात दक्षिणेकडचा , खास करून चेट्टीनाडचा बटाटावडा !
तामिळनाडूमधला चेट्टीनाड प्रदेश हा चेट्टीयार समाजाचे वास्तव्य .. हे लोक अत्त्यंत उद्योगी आणि कामसू वृत्तीचे . शिक्षण , व्यापार , वाणिज्य , बँक अशा क्षेत्रांत अग्रेसर .. पूर्वीपासून इथले पुरुष कामानिमित्त बाहेरील देशांत वास्तव्य करीत असत, आपल्या गावांतील शेती व घरे सांभाळण्याची जबाबदारी त्यांची बायका मुले अगदी आनंदाने पेलीत . सणासुदीला तसेच खास कार्यक्रमांना जेव्हा या घरातील कर्त्या पुरुषांचे आपापल्या घरी पुनरागमन व्हायचे तेव्हा घरोघरी अक्षरशः मेजवान्यांचे बेत असायचे . कारण ही चेट्टीयार मंडळी खाण्यापिण्याचे सुद्धा जबरदस्त शौकीन ! तळणीच्या पदार्थांपासून ते गोडधोड , शाकाहार ते मांसाहार , अशा अनेक पदार्थांची रेलचेल या चेट्टीनाड खाद्यसंस्कृतीत आढळते .
इथलाच हा आलू बोन्डा , थोडासा निराळा , कुरकुरीत आणि तोंडात चवींची कारंजी उसळवणारा ! बघा आवडतोय का , आणि सोबत ताज्या नारळाची चटणी वाटायला विसरू नका !

- साहित्य:
- • अर्धा कप तांदूळ = १२५ ग्रॅम्स
- • अर्धा कप उडीद डाळ = १२५ ग्रॅम
- • अर्धा किलो उकडलेले बटाटे
- • अर्धा टीस्पून उडीद डाळ
- • अर्धा टीस्पून मोहरी
- • ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- • २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून = १२५ ग्रॅम्स
- • अर्धा टीस्पून हळद
- • २ मोठे टोमॅटो बारीक चिरून = १५० ग्रॅम्स
- • पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
- • एका लिंबाचा रस
- कृती:
- • तांदूळ आणि उडीद डाळ पाण्याने ३-४ वेळा खळखळून धुऊन रात्रभर किंवा २ तासांसाठी पाण्यात भिजत घालावेत . नंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून अगदी बारीक वाटावे . मला हे मिश्रण वाटण्यासाठी पाऊण कप पाणी लागले आहे . त्यात अर्धा टीस्पून मीठ घालावे आणि हे मिश्रण एका बाजूला ठेवून द्यावे .
- • उकडलेले बटाटे साली काढून किसून घ्यावेत म्हणजे ते एकसंध किसले जातात , त्यात गुठळ्या किंवा फोडी राहत नाहीत .
- • बटाट्याचे मिश्रण बनवण्यासाठी ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात उडीद डाळीची फोडणी करावी , मोहरी घालून तडतडू द्यावी . चिरलेल्या मिरच्या व कांदा घालावा . कांदा जरा पारदर्शक होऊ द्यावा .
- • चार पाच मिनिटांनी हळद घालावी . नंतर बारीक चिरलेला टोमॅटो , चवीपुरते मीठ नी थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . नीट एकत्र करून घ्यावे . झाकून मंद आचेवर शिजू द्यावे .
- • पाच मिनिटांनंतर किसलेले बटाटे , लिंबाचा रस आणि उरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावी. मिश्रण गॅस वरून उतरवून पूर्ण थंड होऊ द्यावे .
- • एका बाजूला बोन्डा तळण्यासाठी पुरेसे तेल कढईत गरम व्हावयास ठेवावे . तोपर्यंत बोनड्यांचे गोल आकार बनवून घ्यावेत .
- • तेल चांगले तापले की आच मध्यम करावी. एकेक बोन्डा वर तयार केलेल्या तांदूळ नी उडीद डाळीच्या मिश्रणात बुडवून अलगद तेलात सोडावा . ३- ४मिनिटे चांगले खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- • हे गरमागरम कुरकुरीत आलू बोन्डा नारळाच्या फ्रेश चटणीसोबत वाढावे .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply