” निसर्गाची करणी नी नारळात पाणी …” अवघ्या महाराष्ट्राचे श्रीफळ म्हणजे नारळ !. आमच्या कोकणात तर नारळावाचून पान हालत नाही . उसळी , पालेभाज्या , आमट्या , वरण , मासे , चिकन , मटण , अहो इतकेच काय गोडधोडाच्या पदार्थांत सुद्धा वेगवेगळ्या रूपांत खोबरे वापरले जाते .
रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या वाटणाच्या उसळींना , सांबारांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा आमच्याकडे कोकमाचे सार किंवा कढी म्हणा , ही बनवली जाते . मी असे म्हणतेय खरं पण या रेसिपीत नारळाचे दूध वापरले जाते , आणि नारळाचं दूध काढणे हे नसे थोडके ! पन कोकनी बायगोच्या ह्यो रोजचा खेल , ह्ये पाट्यावर येवडा येवडा खोबरा वाटून टोपभर दूध गाळताय पटदिशी .. माडावरून आताच उतरलेल्या ताज्या नारळाच्या दुधात परसात बाजल्यावर वाळत पडलेली रातांब्याच्या सालीचा आगळ घालून ही मुरलेली जराशी आंबट , तिखट , गोड कढी! हं हं .. ही वर्णनावरून जरी सोलकढी तुम्हां भासे , तरी सोलकढीच्या या जुळ्या बहिणीचा ठसका थोडा निराळा .. कारण या साराला आम्ही फोडणी देतो आणि भातासोबत ओरपतो .
माझी आई कोकमाची कढी जेव्हा बनवते तेव्हा समजावे आज सगळा निवांत मूड आहे पूर्ण घराचा ..एरवी कुठल्याही कामाला नकारघंटा वाजवणारा माझा बाबा तेव्हा मात्र धावत पुढाकार घेऊन, पडवीत एका बाजूला रचून ठेवलेल्या उतरवलेल्या सुकडी सोलून , स्वतः खोबरे वाटून देतो . या कढी भातासोबत तळलेली माशाची तुकडी किंवा बिरड्याची उसळ असली की नंतर अंगणातल्या झोपाळ्यावर जेवण लवकर संपवून कोण लवकर आडवे पडतोय यासाठी कढीच्या शेवटच्या वाटीचा पटकन भुरका मारला जातो . त्यानंतर मी झोपाळा अडवला की मात्र , ” ए बाय , सरक वाईच , मी पण पडतो जरा झोपाळ्यावर .. ” अशी बाबाने आर्जवं करताच तो नी मी एकमेकांना ढुशी देत संथ झोके घेत पहुडतो ! कम्फर्ट फूड जे म्हणतात ते हेच ते …. 🙂

- साहित्य:
- • ३७५ ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- • ६-७ कोकमं
- • मीठ चवीनुसार
- • २ हिरव्या मिरच्या
- • १ टीस्पून हळद
- • २ टीस्पून जिरे
- • ६-७ लसणीच्या पाकळ्या
- • पाव कप कोथिंबीर
- • १ टीस्पून मोहरी
- • पाव टीस्पून हिंग
- • १०-१२ कढीलिंबाची पाने
- • तेल
- कृती:
- • एका पातेलीत अर्धा कप पाणी उकळत ठेवावे . त्यात कोकमं घालून ४-५ मिनिटे उकळू द्यावी . कोकमाचा रस पाण्यात उतरू लागला की गॅस बंद करावा आणि आगळ थंड होऊ द्यावे .
- • मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे , मिरच्या , लसूण , कोथिंबीर , जिरे , हळद आणि दीड कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • हे वाटण एका पातेल्यावर गाळणी ठेवून , त्यावर सुती कापड पसरून गाळून घ्यावे . हे घट्ट नारळाचे दूध तयार आहे .
- • आता कोकम हातानेच चुरून ते आगळ गाळणीतून वेगळे वाटीत गाळून घ्यावे .
- • कोकमाचे आगळ आणि नारळाचे दूध एकत्र ढवळून घ्यावे . चवीपुरते मीठ घालावे .
- • एका कढईत २-३ टेबल्स्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी, हिंग , कढीलिंब यांची फोडणी करून नंतर नारळाच्या दुधाचे मिश्रण घालून पटकन ढवळून घ्यावे .
- • मंद आचेवर २-३ मिनिटे हे सार शिजवून घ्यावे . त्यानंतर गॅस बंद करून झाकण घालून सार जरा मुरू द्यावे आणि मगच वाढावे .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply