नुकतीच आंब्याची पाडणी होऊन , पाडव्याला पहिला आंबा ग्रामदेवतेच्या चरणी वाहून मामाने पेट्या बांधून मुंबई पुण्यास धाडल्या. पडवीत एका बाजूला पुढच्या खेपेच्या आढ्या बांधण्यासाठी हापूसचा खच पडलेला , त्याच्या अगदी समोरच्या भागात रायवळ , बिटक्याचे ढीग जिकडे आम्हा बच्चे पार्टीचा मुक्त संचार .. कोपऱ्यात माळ्याच्या जिन्याच्या आधाराने फणसांचे धूड .. बाहेरून घरात शिरणाऱ्याला कोकणमेव्याचा सुवास असा कॉकटेल च्या रूपात नाकात भसाभसा शिरायचा ! आम्हां मावस- मामे भावंडांचं वार्षिक परीक्षा आटपल्यावर दुसऱ्या दिवशीच रातराणीने मुरुडास आगमन झालेलं ! आंब्या – फणसाचा हा ढीग म्हणजे आमची चंगळ आणि त्यासोबत एकमेकांच्या अंगावर आंब्यांच्या चोखून चोथा केलेल्या कोयी नेम धरून मारणे , भाताच्या उंडवीत भसकन घुसणे , समुद्रावर पुळणीच्या डोंगरांत नखशिखांत माखून येणे , विहिरीवरच्या हौदात म्हशींसारखे तासंतास डुंबत राहणे , ह्या अशा खोड्यांनी दोनच दिवसांत घरातल्या आज्या -पणज्यांच्या , मामींच्या , मावशींच्या नाकात दम आणला जायचा ! घरी काम करणाऱ्या तान्या आजोबाला तर दुपारी-तिपारी कारटी कुठं उलथलीत ते हुडकून आणायची तसेच तिन्हीसांजेच्या आधी दम देऊन घरी बसवण्याची एक वेगळीच एक्सट्रा ड्युटी लागलेली !
असेच एका वर्षी रामनवमी होती .. आदल्या दिवशी मामा घरी घाईत आला नी तान्या आजोबाला हाताशी धरून त्याने आंब्याच्या छोट्या करंड्या भरल्या . आजोबाला मस्का मारावा नि त्याची मेहनत वाचावी म्हणून आम्ही बच्चे कंपनीने त्या छोट्या करंड्या उचलून घेत हळूहळू चालत मामासोबत गावातील रामाचे देऊळ गाठले . मुरुडसारख्या सुंदर निसर्गरम्य गावातले ते सुबक संगमरवरी राम मंदिर .. दुरूनच नीलकांती रामाची कोदंडधारी मूर्ती येणाऱ्या जाणाऱ्याला मोहित करायची . गुरवाने सांगितल्याप्रमाणे मामा आणि आम्ही त्या आंब्याच्या करंड्या एका बाजूला देवळाच्या मागे प्रसाद बनवण्याच्या चुली शेजारी नीट रचून ठेवल्या .
” मामा तू हे आंबे विकनाल का लोकांना ..” असा बोबडा प्रश्न माझ्या ३ वर्षांच्या मावसभावाने अमितने पचकन विचारला सुद्धा , तर मामाऐवजी बाजूला उभे असलेले जोशीभट हसत हसत बोलले , ” नाय रे बावा , उद्या रामासाठी प्रसाद बनवणार आंब्यांचा ,ये हो पारायणाला घेऊन निलेश या वानरसेनेला, आणि नानीला नमस्कार सांग !” दुसऱ्या दिवशी रामनवमीचा मोठ्ठा उत्सव देवळात पार पडला , पंचक्रोशीतील हे रामाचे प्रसिद्ध मंदिर ! अनेक नवपरिणीत जोडपी, नुकतेच मूल झालेले आईबाप , म्हातारी- कोतारी सगळे झाडून पारायणाला हजर होते . आम्ही मुले पारायणासाठी म्हणून गेलो पण आजीचा डोळा चुकवून देवळाच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाला गदागदा हलवून जांभळे खाण्यात ही वानरसेना रमली . आमच्यापैकी शलाकेचे घ्राणेंद्रिय सगळ्यात तेजीने काम करायचे , तिने बरोब्बर केळीच्या पानात तुपात शिजलेला गोड सुगंध ओळखला , आणि बरोब्बर प्रसाद वाटपाच्या वेळी जांभळ्या रंगात रंगलेली बोटे , जिभा आणि फ्रॉकी , गन्जी अशा अवतारांत आम्ही सगळे रांगेत शांत उभी ! खोल्यांत ( केळीच्या पानांचे द्रोण ) वाफाळलेला केशरी पिवळ्या रंगाचा तो गोड शंकू सारखा पदार्थ , तोंडात टाकता क्षणीच विरघळला . हा प्रसाद खाता खाता आजी नी इतर बायकांचे संभाषण कानी पडले , त्यातून कळले की आजीच्या भाच्याच्या बागेतले आंबेच इतके गोड आणि जोशीकाकू व सुनांनी त्यांची काय मधुर सांदणे घातली याविषयीचे कौतुक होते ते ! त्या सांदणांची चव जिभेवर आणि त्याचा लुसलुशीत तुपाळ स्पर्श बोटांवर अजून रेंगाळतोय !
कोकणातले पदार्थ हे अस्से साधे सुधे ! कोणी कितीही म्हटले बनवायला सोप्पे तरी त्यात कुठले प्रमाण किती घालावे याचा बरोब्बर अंदाज यायलाच हवा . आणि मला वाटते जेव्हा हे पदार्थ आज्ज्या बनवतात तेव्हा तर अजून आपल्या मनाच्या चंचीतून प्रेमाचा अर्क सुद्धा घालतात . माझी आजी तर असे जुने पदार्थ बनवण्यात हिरीरीने भाग घ्यायची . भूका लागल्यात तुम्हा बकासुरांनो, जा मेल्यांनो तंवसे आणा तोडून , धोंडस बनवते , तोपर्यंत माजी डोकी खाऊ नका , गप खेला ! कोणी मुंबईहून गावी जायला निघाला तर पटकन मोकळाचा डबा हातात ठेवायची . काप्या फणसाचा हाहा म्हणता फडशा पडून आठळ्या रवळीत भाजीसाठी धुवायला पडायच्या नी म्हशीसमोर चारखंडाची रास ! पण बिचारा बरक्या हिरमुसला होऊन पिकत पिकत जाऊन रस टपकू लागायचा . मग आजीच्याच प्रेमळ हातांनी चाळणीतून त्यांचा रस काढून फणस पोळी नाहीतर इडलीच्या आकाराची सांदणे न्याहारीला मिळायची !
माझ्या आजीची भावजय म्हणजे या निलेशमामाची आई मोट्ठी सुगरण , तिचे माहेर श्रीवर्धन . त्यामुळे मुरुडच्या घरांत अनेक चविष्ट पदार्थ बनवले जायचे . आंब्याची सांदणे ती बनवायला बसली की मांजरे कशी कोळणींपुढे लाळ गाळत बसतात तशी आम्ही तिच्या भोवताली कोंडाळे करून बसायचो. तिने रस काढला रे काढला की ती आंब्याची कोय आणि साली अशा राऊंड रॉबिन फॅशनमध्ये आम्हाला चघळायला मिळायच्या ! चुलीवर अगदी मंद विस्तव करून मोठया पातेल्यात पाणी उकळून त्यावर चाऱ्याने झाकले जायचे . त्यावर सांदणाची चाळणी ठेवून झाकण घालून पाऊण तासांची निश्चिती .. मग आमच्यातलं एखादं दीड शहाणे, जे शाळेत नुकतेच घड्याळ शिकलेय , ते पाहून यायचे , ” मामी आ sss जी , नऊवर मोठ्ठा काटा आला ग.. ,” मग हौदावर कपडे धुवायला गेलेली मामीआजी धावत येऊन चुलीवरून पातेले उतरवायची , आणि आम्हाला गरमागरम सांदणे नारळाच्या दुधात बुचकळून पोटभर खायला मिळायची . त्यानंतर अगदी दुपारचे दोन वाजले तरी आम्हाला भुका काही लागायच्या नाहीत !
सांदणं हा जुना पारंपरिक कोकणी पदार्थ .. गोव्यात बनवल्या जाणाऱ्या संना / सन्नास चा अपभ्रंश होत होत तो सांदण झाला , असा उल्लेख राजमान्य राजर्षी रामचंद्र सखाराम गुप्ते , यांच्या ” सूपशास्त्र” या पाकशास्त्रावरील पुस्तकात आढळतो . या पुस्तकात अजून एक माहिती देण्यात आली आहे की , सांदणे कोकणात लग्नकार्यात मुख्यत्वे मांडव परतणीस बनवतात . म्हणजे जेव्हा नववधू माहेरच्यांचा निरोप घेऊन साश्रुनयनांनी सासरी जायला निघते तेव्हा वधूपक्ष वरपक्षाला गोडाची मेजवानी देतो . हे वाचल्यावरच माझ्या चेहऱ्यावर एक आठवण नकळत स्मितरेषा उमटवून गेली ! मुरुडास पणजीच्या बागेत माड वाहायला खालच्या वटारातला किसना काका यायचा . याची एकुलती एक सुकन्या शर्मिष्ठा , दिसायला अपार देखणी , लांबसडक केसांची , काळ्याभोर डोळ्यांची! तिच्या जन्मतःच आई गेली , तरी बापाने तळहाताच्या फोडासारखी पोरीला जपली . गरिबीतूनही बारावीपर्यंत शिक्षण दिले . त्यानंतर मुंबईचे स्थळ आले , म्हणून तिचे रीतसर लग्न लावून दिले . तेव्हाही जावयाला पंगतीत, दारच्या पोटच्या लेकरासारखी वाढवलेल्या आंब्या- फणसाची सांदणे वाढताना , डोळे पुशीत किसना काका , ” माझ्या बायला सांभाळून घ्या हो ,तुमचीच समजा तिला ,,” अशी वारंवार आर्जवे करत होता . माहेरून संस्कारांचे आंदण घेऊन सासरी जाणारी ही नववधू तिथे नवीन नात्यांमध्ये स्नेह सांधायला निघाली .. या रव्या – आंब्याच्या रसातल्या मधुर सांदणाप्रमाणे !
माहेर आणि तिथल्या आठवणी …
गीतकार मंगेश कानगणेच्या या ओळी मनाला भिडतात ..
“शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी
चाले विरहाचा पुढे वारसा…
फुलमाळा मंडपाच्या दारी
झालरीना सुखाच्या किनारी
नवी नाती ओळखीची सारी
सपनांची दुनिया गं न्यारी
हळदीने सजली गं काया
सासरची मिळेल गं माया……”
-मंगेश कानगणे

- साहित्य:
- • १ कप = २०० ग्रॅम्स तांदळाचा रवा ( इडली रवा )
- • १ कप = २४० ग्रॅम्स आंब्याचा रस ( ताजा / फ्रोजन )
- • पाऊण कप साखर = १५० ग्रॅम्स
- • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- • पाव टीस्पून ताजी कुटलेली वेलची पावडर
- • चिमूटभर मीठ
- • तूप
- • पाणी
- • अर्धा टीस्पून कुकिंग सोडा ( ऐच्छिक )
- कृती :
- • रवा मंद ते मध्यम आचेवर कढईत गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यावा : साधारण ४-५ मिनिटे
- • एका मोठ्या वाडग्यात आंब्याचा रस , साखर नीट एकत्र ढवळून घ्यावी . नंतर भाजलेला रवा , ओले खोबरे , वेलची पावडर , मीठ आणि १ टेबलस्पून तूप घालून नीट एकत्र करून घ्यावे .
- • साधारण पाऊण कप पाणी घालावे आणि नीट ढवळून एका तासासाठी बाजूला झाकून ठेवावे .
- • एका तासानंतर मिश्रण चांगले फुलून येते . यात आता सोडा घालून पटकन ढवळून घ्यावे . तुमच्याकडे वेळ असल्यास अजून एका तासासाठी तुम्ही मिश्रण ठेवू शकता , मग सोडा घालायची गरज लागत नाही .
- • एका केकच्या गोल टिन मध्ये किंवा कूकरच्या गोल भांड्यात तूप लावून हे मिश्रण ओतावे आणि हलके टिन आपटून एकसंध करून घ्यावे .
- • मोदक पात्रात पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवावी . त्यावर हा टिन ठेवून मंद ते मध्यम आचेवर झाकून सांदणं २५ ते ३० मिनिटे वाफवून घ्यावीत . इडलीच्या साच्यात सुद्धा छोटो छोटी सांदणे वाफवून घेता येतात .
- • सांदणे वाफवून झाली की ती पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचा प्रयत्न करू नये , कारण आतून मऊसूत असल्याने ती तुटू शकतात .
- • गरमागरम सांदणे नारळाच्या दुधात वेलची नी गूळ घालून खावयास द्यावीत . थोडा सुका मेवा वरून घालण्यास हरकत नाही !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply