“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! ”
आपल्या आईची माया, आजीचा ओलसर जिव्हाळा आणि आपल्या स्वतःच्या घरातील जेवणावरचे प्रेम सगळ्यांचं सारखं असतं.. चुकीचे बोलले काय सांगा? नोकरी करणाऱ्या पालकांचं अपत्य म्हणून पहिल्यापासून ‘ शहाण्यासारखं वाग हां बाळ ‘ असे म्हणून आई सकाळची ८.२३ ची लोकल पकडायला पळाली की घरात मी आणि आजी आम्हा, दोघींचेच राज्य..
माझ्या व्रात्य पणाला कधी मायेनं तर कधी बांबूची छडी दुरून दाखवत फक्त नजरेच्या धाकाने तिने बरोब्बर वेसण घातली. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा जरा लवकरच मी सुधारले. पानात वाढलेली बशिभर पालेभाजी तोंड वेडेवाकडे न करता कशी खायची , हे मला विचारा! समोर नऊवारीत एकशिंगी देहयष्टीचा स्त्रीरुपी दत्त पहारा देत असायचा. मग लाडाने कुल्फी किंवा जिलेबी सुद्धा मिळायची ती गोष्ट वेगळीच!
कालांतराने आजीची दृष्टी हरपली, मग स्वयंपाकघर पूर्ण आईच्या ताब्यात आले, माझ्या नशिबाने मला माझ्या मागील दोन पिढ्यांच्या हातचे खायला मिळाले आहे.. दोघी ही सुगरणी, दोघींच्या हाताला अप्रतिम चव! खास करून नैवेद्याच्या वेळी , गणेशोत्सव किंवा इतर सणांना, आजीने केलेले उकडीचे मोदक नी आईने बनवलेले वालाचे बिरडे , ह्यांची चव तर विसरता ना विसरे!
आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे वालाची आमटी किंवा सुकी उसळ बनायचीच आणि डब्यात सुद्धा दिली जायची. कोकणी माणसाचा जीव नुसता माशात न्हाई हां तर कडधान्यांत सुदा रमता हो.. त्यातून कडवे वाल – म्हणजे वर्षभराची बेगमी! आम्हा चार माणसांच्या कुटुंबाला वर्षाकाठी १२ ते १५ किलो कडवे वाल लागायचे, ते आणल्यावर त्यांना उन्हे दाखवून मोठ्या अल्युमिनियम च्या डब्यांत कडुनिंबाचा पाला घालून साठवायचे . आजी सांगायची की गावी लाल माती पाण्यात कालवून तिचा बरबारीत लेप चोळून हे वाल उन्हात चांगले दोन तीन दिवस कडकडीत तापवून सुकवले जायचे . त्यानंतर आपल्या डब्यांत साठवले जायचे म्हणजे त्यात कीड पडत नाही किंवा एरंडेल तेलाचा मसाज करून हे वाल साठवले जातात !
मला आठवतेय , असेन एक आठेक वर्षांची!मी एकदा उत्साहाने आजीला मदत म्हणून, या कडव्या वालाचे गाठोडे साधारण ६-७ किलोचे , एकटीने उचलून घरासमोरील लाल ओटा मैदानाच्या गच्चीवर वाळत घालण्यासाठी उचलले. आजी आधीच अर्धे ओझे घेऊन केर वगैरे काढण्यासाठी पुढे गेली होती. तिच्या नकळत मी हा कारभार केला. कसेबसे जिना उतरून खाली गेले नी वजन सहन न झाल्याने धडपडले , नी तोल जाऊन पडणार व सारे वाल खाली चिखलात पडणार इतक्यात आमच्या तळमजल्यावरील , मॅन्युअल दादाने त्याच्या हातातील सामान सावरत एका हाताने मला सुद्धा पकडत ते गाठोडे खाली पडण्यापासून वाचवले.. तेवढ्यात माझी आजी आडव्या चोर बोळातून उरलेले वाल घेण्यास परतत होती, तिने हा सारा प्रकार पाहिला, तिला पाहताच मॅन्युअल दादाने आपल्या गोव्याच्या कॅथलिक ख्रिश्चन कोकणीत हेल काढून , ” आंटी कित्या रे ह्यास उचलुक सांगे, आता पडला आसता खाली चिखलात .. ” आजीने त्याच्या पाठीवरून आभाराने हात फिरवत त्याला निरोप दिला नी माझ्या पाठीत मात्र , ” आगाऊ पोर..” म्हणत हातातल्या झाडूने एक रट्टा लगावला!
आमच्याकडे वालाचे बिरडे इतके प्रिय की ‘ते सोलायला बराच वेळ लागतो’, ही सबब कोणीही पुढे करीत नाही.. जसे मी म्हटले नंतर आजीला दिसायचे बंद झाले तरी , ती स्वतःहून आईला बसून बसून लहान लहान कामांत मदत करायची. आई सकाळी मोड आलेले वाल पाण्यात भिजवायची , आजी बरोबर अंदाजाने तीन चार तासांनी टेबलावरचे पातेले चाचपून ते वाल सोलून ठेवायची नी संध्याकाळी आम्हाला भाजी खायला मिळायची., का तर माझ्या बायला आवडता बिरडे! जुन्या माणसांचं प्रेम, माया दाखवण्याची तऱ्हाच निराळी ना हो..
हे मायेचे ऋण न फिटणारे , ते जपायचे .. अंतरात!
आज माझ्या घरात बनणारे कडव्या वालाचे बिरडे, हे असले की तसे दुसरे काही लागत नाही आम्हास, पण कधी कधी कोकमाचं सार किंवा गोडं वरण आवर्जून बनवले जाते!

- साहित्य:
- • १ कप = २५० ग्रॅम्स कडवे वाल
- • १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब पातळ चिरलेला
- • अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- • अर्धा कप कोथिंबीर
- • २ मोठे टोमॅटो = १२५ ग्रॅम्स प्युरी करून
- • २ शेवग्याच्या शेंगा = ६० ग्रॅम्स , ३ ते ४ इंचाचे तुकडे करून
- • १ मोठा बटाटा = १०० ग्रॅम्स , चौकोनी तुकडे करून
- • १० -१२ कढीपत्ता
- • १२-१५ लसणीच्या पाकळ्या
- • अर्धा टीस्पून हिंग
- • अर्धा टीस्पून हळद
- • अर्धा टीस्पून धणे पावडर
- • २ टेबलस्पून मालवणी मसाला
- • मीठ
- • तेल
- कृती:
- • कडवे वाल रात्रभर ( १० ते १२ तास ) पाण्यात बजावून ठेवावेत . सकाळी त्यातील पाणी काढून चाळणीत १५ मिनिटे निथळत ठेवावेत . त्यानंतर एका फडक्यात बांधून किंवा चाळणीतच झाकून उष्ण जागी ठेवावेत म्हणजे त्यांना मोड येतील .
- • एक दिवस मोड काढल्यानंतर वाल २ तासांसाठी पाण्यात बुडवून ठेवावेत . त्यामुळे त्यांच्या साली निघणे सोप्पे जाते . वाल सोलून घ्यावेत .
- • वाटपासाठी एका कढईत सुके खोबरे ४-५ मिनिटे खरपूस भाजून घ्यावे. एका ताटलीत काढून घ्यावे .
- • त्याच कढईत २-३ टेबलस्पून तेल घालून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी. नंतर कांदा घालून चांगला ७-८ मिनिटे भाजून घ्यावा . मग कोथिंबीर घालावी , जराशी परतून घ्यावी . भाजलेले खोबरे घालावे आणि नीट एकत्र करून घ्यावे .
- • हे सगळे थंड झाले की मिक्सरमधून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात कढीपता , हिंगाची फोडणी करावी . मग हळद आणि मालवणी मसाला घालून एकत्र करून घ्यावे . वाटप घालावे आणि सोबत धणे पावडर सुद्धा ! हा मसाला तेलात चांगला परतून घ्यावा .
- • मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात बटाटे , शेंगा आणि वाल घालावेत . २ कप गरम पाणी घालावे . नीट ढवळून मध्यम आचेवर शिजू द्यावे .
- • मध्यम आचेवर एक उकळी फुटली की आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे . साधारण १५ मिनिटानंतर टोमॅटोची प्युरी घालावी . झाकण घालून ५-६ मिनिटे शिजू द्यावे .
- • वालाचे बिरडे तयार आहे ! घडीची पोळी , तांदळाची भाकरी किंवा भातासोबत अतिशय छान लागते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply