लोकल ट्रेन ला मुंबईची लाइफलाइन म्हटले जाते , हजारो जणांचे पोट भरण्यासाठी वेळेवर कामावर पोचवण्याचे , स्वस्त प्रवासाचे साधन ! आणि कधी या लांबच्या प्रवासात , मुंबईच्या मुसळधार पावसात अडकून पडलेल्यांना , किंवा नुसताच कधीतरी टाईमपास करताना , जिभेला आणि पोटाला तृप्त करणारा वडापाव हा सुद्धा कुठल्या लाईफलाईन पेक्षा एका इंचानेही कमी नाही असे मी म्हणेन !
या वडापावचा जन्म मुंबईतला , आणि नंतर त्याची पसरलेली प्रसिद्धी त्याला सर्वदूर घेऊन गेली , अगदी साता समुद्रापार ! म्हणूनच वडापाव म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते , धडधडणारी लोकल, सी एस टी स्टेशनाच्या बाहेर लावलेल्या घडाळ्याच्या काट्यावर धावणारी माणसे , मध्यरात्री सुद्धा गाड्यावर पंप मारत पेटवलेल्या स्टोव्हवरील कढईत दणादणा उकळणाऱ्या तेलात तळलेले गरमागरम वडे चटकन वर्तमानपत्रात गुंडाळून खायला देणारी माणसे … आमच्या शालेय जीवनात आणि इंजिनीरिंग कॉलेजात असताना वडापाव खाण्यासाठी एक दिवस तरी जाणूनबुजून घरी डबे विसरले जायचे . त्या काळी २ ते ३ रुपयांचा वडापाव आज १५ रुपयांचा जाहला तरी त्याची ओढ काही कमी नाही झाली ! एरवी आईच्या हातचे जेवण म्हणजेच स्वर्गसुख मानणारे आम्ही वडापाव बनवणाऱ्याला मात्र मास्टर शेफ मानायचो !
तसे बटाटेवडे हे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील तळणीच्या प्रकारात मोडणारे व्यंजन ! परंतु त्याची पावासोबत गट्टी जमली ती मुंबईच्या गिरणी कामगारांची भूक चटकन भागवावी म्हणूनच ! दादर स्टेशनच्या बाहेर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे अशोक वैद्य नावाचे मध्यमवयीन गृहस्थ .. परिस्थिती तशी हातातोंडाशी गाठ पडण्याइतकीच ! ती वेळ होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या चळवळीची ! शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रांतिवादी विचारांचे वारे जोरात वाहू लागले होते . मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसाने आपली कंबर कसून फक्त कोणाची चाकरी न करता , स्वतःही स्वतंत्र व्यवसायांत उतरले पाहिजे असे बाळासाहेबांचे ठाम मत होते ! मनाने शिवसैनिक असणारे अशोक वैद्य आपल्या धंद्यात काय नवीन सुधारणा करता येतील या प्रयत्नात नेहमीच असत . अशाच प्रयत्नात असताना आपल्या बाजूच्या गाड्यावर आम्लेट पाव विकणाऱ्या माणसाकडून प्रेरणा घेऊन त्यांनीही आपले खमंग वडे पावासोबत विकण्याचे ठरवले . महाराष्ट्रीयन माणूस हा तिखट प्रेमी .. मग लसूण मिरची आणि खोबऱ्याची झणझणीत चटणी पावाला लावून , झाला ना ह्या वडापावचा जन्म, १९६६ मध्ये !
ही पूर्ण गोष्ट वाचण्यासाठी या लिंकवर पहा
पूर्वी फक्त २० पैशांचा मिळणारा हा वडापाव आजही गरीब श्रीमंत असा भेद न करता सगळ्यांच्या वेळेला उपयोगी पडतो . माझी शाळा दादरला आणि दादर ईस्ट ला असलेले आयडियल हे फार जुने पुस्तक भांडार ! तिथे शालेय पुस्तके , कादंबऱ्या, लागणारी स्टेशनरी घेण्यासाठी आईबरोबर वारंवार जाणे व्हायचे . तिथेच छबिलदास शाळा आहे , आई माझी इथे शिकलेली ! म्हणूनच तिथे समोरच मिळणारा श्रीकृष्ण वडापाव जो छबिलदास वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे , तिथे आम्ही दोघी न चुकता वडापाव खायचो ! माझा हा आवडता वडापाव , गोल गोल हा भला मोठ्ठा आणि त्यानंतर ठरलेली कैलास मंदिराची लस्सी ! उगीच नाही म्हणत “आई ही तुमची पहिली मैत्रीण असते” ! आता हल्लीच मुंबईला आईकडे जाणे झाले , तिला घेऊन कीर्ती कॉलेजच्या समोर असलेला प्रसिद्ध ” अशोक वडापाव ” खायला गेले होते . मस्त भरपूर चुरा घातलेला चविष्ट वडापाव , हा वडापाव मुंबईच्या प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे हां . कधी गेलात दादर बाजूला तर नक्की भेट द्या !
तसेही गणपतीत खूप गोड खाणे झालेय तर जरा चव पालट म्हणून होऊन जाऊ दे की झणझणीत वडा पाव !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Rating
- अर्धा किलो बटाटे ५०० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , उकडून
- १ लादी पाव
- ६-७ हिरव्या मिरच्या
- १ टीस्पून जिरे
- दीड इंच आल्याचा तुकडा
- १२-१५ लसणीच्या पाकळ्या
- १०-१२ कढीपत्ता
- १ टीस्पून मोहरी
- ३-४ मेथी दाणे
- पाव टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- पाव टीस्पून साखर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- तेल
- बेसनाच्या घोळासाठी :
- १ कप = १०० ग्रॅम्स बेसन
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- अर्धा टीस्पून ओवा
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून मीठ
- पाणी गरजेनुसार
- इतर साहित्य:
- हिरवी चटणी
- चिंचेची चटणी
- सर्वप्रथम आपण एक पण गरम करून त्यात बेसन भाजून घेऊ . बेसनाचा रंग बदलू देऊ नये , म्हणून ते मंद आचेवर फक्त १ ते २ मिनिटे भाजून घ्यावे . खमंग सुवास दरवळला की गॅसवरून उतरवून एका ताटलीत काढावे .
- टीप : बेसन भाजल्याने त्याची चव खुलते आणि पदार्थ खुसखुशीत होतो.
- बेसन थंड झाले की एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात तांदळाचं पीठ , ओवा, हळद, १ टीस्पून मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून मिसळावे .
- टीप: गरम तेलाचे मोहन घातल्याने वड्याचे आवरण कुरकुरीत बनते .
- एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा घोळ बनवून घ्यावा . जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावा. चमच्यावर पातळ थर बसेल इतक आवरण सरसरीत असावे, त्यासाठी मी १ कप पाणी वापरले आहे . हे बेसनाचे मिश्रण चांगले ७-८ मिनिटे फेटून घ्यावे. मग ते किमान १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
- बटाटे सोलून त्यांना किसणीने किसून घ्यावेत . असे केल्याने बटाटे एकसारखे किसले जातात व त्यातील जर टणक भाग राहिला असेल तर तो बाजूला काढून टाकता येतो. यामुळे बटाटेवड्यांना एक स्मूथ टेक्सचर येते .
- मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, लसूण ,आले आणि जिरे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
- बटाटेवड्यांचे सारण बनवण्यासाठी एका कढईत दीड टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, मेथी , कढीपत्ता , हिंग यांची फोडणी देऊन १-२ मिनिटे परतून घ्यावे. त्यात हिरवा मसाला घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
- आता हळद व थोडी चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे तेलात परतावी.
- किसलेले बटाटे , साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण २-३ मिनिटे परतावे. आता लिंबाचा रस , उरलेली कोथिंबीर घालून ढवळून गॅस बंद करावा. हे सारण थंड होऊ द्यावे.
- बटाट्याच्या सारणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून चपटे वडे थापून घ्यावेत.
- वडे तळण्यासाठी कढईत तेल मध्यम आचेवर चांगले तापवून घ्यावे. तेल तापले की पहिल्यांदा त्यात चमच्याने बेसनाचा घोळ बुंदीच्या आकाराएवढा पसरवून चुरा तळून घ्यावा . हा चुरा आपण पावातही घालणार आहोत व चटणी बनवतानाही वापरणार आहोत. सोनेरी रंगावर चुरा तळून घ्यावा .
- बटाटेवडे बेसनाच्या घोळात नीट बुडवून कढईच्या कडेने अलगद तेलात सोडावेत . मंद ते मध्यम आचेवर २-३ मिनिटे दोन्ही बाजूंनी खरपूस तळावेत.
- वडापावच्या चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात , दीड टीस्पून काश्मिरी मिरची पूड, ५-६ लसणीच्या पाकळ्या , थोडे मीठ आणि पाऊण कप तळलेला चुरा घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी.
- वडापाव खायला देताना पाव सुरीने मध्यभागी कापावे , त्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी , वडापाव चटणी लावून पावात चुरा घालावा . वडा घालून आपला वडापाव तयार ! सोबत तळलेली हिरवी मिरची द्यायला विसरू नये !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Mouth watering recipe and instructions. Very clearly given instructions means a good end result if you follow by the letter. Now,I am sure my vadas will be delicious, so will be the chutneys. Thank you, Smita. The video is excellent as ever. Is this in Hindi too? I would like my numerous non marathi friends to know from you, the correct and best method of making this iconic dish.