Vada Pav recipe in Marathi-मुंबई वडा पाव- How to make Vada Pav- Kali Mirch by Smita
Author: 
Recipe type: Snacks
Cuisine: Indian
 
Ingredients
तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
बनवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
किती बनतील : ८-१०
साहित्य:
 • अर्धा किलो बटाटे ५०० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , उकडून
 • १ लादी पाव
 • ६-७ हिरव्या मिरच्या
 • १ टीस्पून जिरे
 • दीड इंच आल्याचा तुकडा
 • १२-१५ लसणीच्या पाकळ्या
 • १०-१२ कढीपत्ता
 • १ टीस्पून मोहरी
 • ३-४ मेथी दाणे
 • पाव टीस्पून हिंग
 • १ टीस्पून हळद
 • पाव टीस्पून साखर
 • १ टीस्पून लिंबाचा रस
 • मीठ चवीनुसार
 • अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 • तेल
 • बेसनाच्या घोळासाठी :
 • १ कप = १०० ग्रॅम्स बेसन
 • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
 • अर्धा टीस्पून ओवा
 • १ टीस्पून हळद
 • १ टीस्पून मीठ
 • पाणी गरजेनुसार
 • इतर साहित्य:
 • हिरवी चटणी
 • चिंचेची चटणी
Instructions
कृती :
 1. सर्वप्रथम आपण एक पण गरम करून त्यात बेसन भाजून घेऊ . बेसनाचा रंग बदलू देऊ नये , म्हणून ते मंद आचेवर फक्त १ ते २ मिनिटे भाजून घ्यावे . खमंग सुवास दरवळला की गॅसवरून उतरवून एका ताटलीत काढावे .
 2. टीप : बेसन भाजल्याने त्याची चव खुलते आणि पदार्थ खुसखुशीत होतो.
 3. बेसन थंड झाले की एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात तांदळाचं पीठ , ओवा, हळद, १ टीस्पून मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून मिसळावे .
 4. टीप: गरम तेलाचे मोहन घातल्याने वड्याचे आवरण कुरकुरीत बनते .
 5. एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा घोळ बनवून घ्यावा . जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावा. चमच्यावर पातळ थर बसेल इतक आवरण सरसरीत असावे, त्यासाठी मी १ कप पाणी वापरले आहे . हे बेसनाचे मिश्रण चांगले ७-८ मिनिटे फेटून घ्यावे. मग ते किमान १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
 6. बटाटे सोलून त्यांना किसणीने किसून घ्यावेत . असे केल्याने बटाटे एकसारखे किसले जातात व त्यातील जर टणक भाग राहिला असेल तर तो बाजूला काढून टाकता येतो. यामुळे बटाटेवड्यांना एक स्मूथ टेक्सचर येते .
 7. मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, लसूण ,आले आणि जिरे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
 8. बटाटेवड्यांचे सारण बनवण्यासाठी एका कढईत दीड टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, मेथी , कढीपत्ता , हिंग यांची फोडणी देऊन १-२ मिनिटे परतून घ्यावे. त्यात हिरवा मसाला घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
 9. आता हळद व थोडी चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे तेलात परतावी.
 10. किसलेले बटाटे , साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण २-३ मिनिटे परतावे. आता लिंबाचा रस , उरलेली कोथिंबीर घालून ढवळून गॅस बंद करावा. हे सारण थंड होऊ द्यावे.
 11. बटाट्याच्या सारणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून चपटे वडे थापून घ्यावेत.
 12. वडे तळण्यासाठी कढईत तेल मध्यम आचेवर चांगले तापवून घ्यावे. तेल तापले की पहिल्यांदा त्यात चमच्याने बेसनाचा घोळ बुंदीच्या आकाराएवढा पसरवून चुरा तळून घ्यावा . हा चुरा आपण पावातही घालणार आहोत व चटणी बनवतानाही वापरणार आहोत. सोनेरी रंगावर चुरा तळून घ्यावा .
 13. बटाटेवडे बेसनाच्या घोळात नीट बुडवून कढईच्या कडेने अलगद तेलात सोडावेत . मंद ते मध्यम आचेवर २-३ मिनिटे दोन्ही बाजूंनी खरपूस तळावेत.
 14. वडापावच्या चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात , दीड टीस्पून काश्मिरी मिरची पूड, ५-६ लसणीच्या पाकळ्या , थोडे मीठ आणि पाऊण कप तळलेला चुरा घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी.
 15. वडापाव खायला देताना पाव सुरीने मध्यभागी कापावे , त्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी , वडापाव चटणी लावून पावात चुरा घालावा . वडा घालून आपला वडापाव तयार ! सोबत तळलेली हिरवी मिरची द्यायला विसरू नये !
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/vada-pav-recipe-in-marathi/