लोकल ट्रेन ला मुंबईची लाईफ लाईन म्हणजे जीवन रेखा संबोधले जाते कारण रेल्वेच्या घडाळ्याच्या काट्यासोबत स्वतःच्या पोटामागे धावणाऱ्या लाखों लोकांना निश्चित स्थानी वेळेवर पोचवायची जबाबदारी ती पार पाडते!
इथे गरीब श्रीमंत असा भेद मुळीच नसतो हां , तसच काहीसे वडापावचे देखील आहे. वेळेवर भूक भागवण्याचे काम हा केव्हाही करतो , मग तो मनुष्य कॉर्पोरेट जगतातील महारथी असो की बिचारा दिवसभर भीक मागून रात्री प्लॅटफॉर्मवरच्या रिकाम्या बाकड्यावर आसरा शोधणारा ! आता हा वडापाव खायला कितीही चमचमीत असला तरी अस्सल खवय्या त्यात चटण्यांचे अस्तित्व शाबूत आहे कि नाही हे पाहायला विसरत नाही !
मुंबईत तुम्हाला क्वचितच असा वडापाव विक्रेता मिळेल जो हिरवी चटणी , चिंचेची आंबट गोड़ चटणी आणि जी स्पेशल वडापाव चटणी म्हणून ओळखली जाते ती लसूण- खोबऱ्याची चटणी लावल्याशिवाय वडापाव विकेल ! कारण या चटणींचा स्वाद नाकातून धार वाहिल्याशिवाय आणि जिभेवर रेंगाळल्याशिवाय वडापाव खाल्ल्याचे समाधान कुठले हो मिळायचे ! मी तर पुण्यात आल्यावर पहिल्यांदा हौसेने वडापाव खाल्ला आणि त्यात चटणी न मिळाल्यामुळे पुढचे काही दिवस तरी हळहळत होते.
बऱ्याचदा वडापाववाल्यांना मी भोचकपणे विचारलेही आहे ,” काय हो काका , लसणाची चटणी नाही बनवलीत का ?” त्यांचे रागीट कटाक्ष टाळत माझ्या नवऱ्याने माझे बखोट धरून हिसकावलेलंही आहे ! आता तर आमच्या भागातल्या कितितरी वडापाव वाले मला येताना बघून लगेचच एक्सट्रा चटणीच्या पुरचुंड्या बांधायला लागतात आणि चटणी नसेल तर दुरूनच इशारा करतात , की ” टळ ग बाई , नाहीतर चटणी विचारशील आणि माझे बाकीचे गिऱ्हाईक देखील पळवून लावशील” ! आता यात गमतीचा भाग सोडला , तर वडापावाबरोबर लसूण खोबऱ्याची चटणी हे समीकरण सर्वश्रुत आहे. मागे एकदा टीवी वर एका प्रसिदध विनोदी कार्यक्रमात सूत्रधाराने दर्शकांपैकी एका प्रेमी विवाहित जोडप्याला “वडापाव ” संबोधून त्यांना मुले किती आहेत ह्याची विचारणा ” आपकी चटनीयां कितनी हैं?” या शब्दांत करून हास्याची खसखस पिकवली होती !
तर असे हे वडापाव आणि चटणीचे नाते – अतूट ! ही लसूण खोबऱ्याची लाल चटणी खरं तर बनवायला अगदी सोप्पी परंतु इतकी स्वादिष्ट बनते ना की तुम्हाला खोटे वाटेल माझ्या जावेला तिच्या गर्भारपणात ही चटणी आणि पिठले खायचे डोहाळे लागले होते आणि मी ते अगदी आनंदाने पूर्ण केले !
चला तर मग घ्या लसूण सोलायला , चटणी वाटायचीये ना !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १०० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- १५ लसणीच्या पाकळ्या
- १० बेडगी लाल सुक्या मिरच्या ( रंगासाठी )
- ५ लवंगी लाल सुक्या मिरच्या ( तिखटपणासाठी , जर लवंगी मिरच्या नाही मिळाल्या तर कुठलीही तिखट मिरची वापरली तरी चालेल )
- मीठ चवीप्रमाणे
- दोन्ही प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या देठे काढून मीठ घालून एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.
- मिरच्यांची जरा बारीक पूड झाली कि त्यात लसूण आणि सुके खोबरे घालून परत एकदा मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या. या वाटणात अजिबात पाणी घालायचे नाही, कोरडेच वाटावे.
- लसूण खबऱ्याची चटणी तयार आहे .
- ही चटणी वडे, भजी आणि भाकरीसोबत खूपच छान लागते !
- ही चटणी एका हवाबंद डब्यात किंवा बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावी . खूप दिवस टिकते

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Hi.. thank you for sharing such a simple and lovely recipe. Does the red chillies need roasting ? Thanks