माझ्या बाबाचा प्रत्येक रविवारी मुंबईतल्या एका तरी नातेवाईकाला भेटायला जायचा शिरस्ता असे . कधी एका रविवारी लोकं आमच्याकडे येत असत , आणि ठरलेला आईचा चहा पोहे , शिरापुरीचा किंवा वड्यांचा कार्यक्रम …
त्यांच्यासोबत आलेली पोरंसोरं , आमचा आपला चाळीतल्या बोळात दंगा सुरु व्हायचा ! नव्वदच्या दशकातले बालपण आमचे .. रत्नागिरीतून पोटापाण्यासाठी मुंबईला आलेली माझ्या बाबाची नोकरदार पिढी ! तरी गावच्या मातीची ओढ , आपल्या भाषेतून व्यक्त होण्याचा आनंद हा असा सोशल होण्याचा मार्ग होता ! त्या दोन तासांच्या भेटीत हास्याचा गडगडाट ते देशाच्या राजकारणावरील उहापोह आणि हळूहळू नंतर ते राजकारण आपल्याच घरात कसे चाललय याचे एकमेकांना चिमटे काढले जायचे , आणि आम्हा पोरांना उगाचच धबके ” तुमास काय झाला बोंबलुक गे ” .. पण ते तेवढ्यापुरते … जाता जाता ” गो शारदे ( शारदा माझ्या आईचे नाव ) , वडे बेस झाले हो , ए इनोद , फुडल्या रयवारी खयसर , माजे कडे येतला ” असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला जायचा , ते पुढच्या रविवारच्या भेटीची आस मनात ठेवूनच !
मग कधी एखाद्या रविवारी बाबा गिरगावला काकाकाकूंना भेटायला घेऊन जात असे तर कधी कुर्ल्याचे काका काकू नाहीतर भायखळ्याला माझ्या आज्जीकडे जिने माझी आख्खी जिंदगी तिच्या प्रेमाने व्यापलीये ! आमच्या वेळेला नातेवाईकांना ते राहतात कुठे यावरूनच ओळखले जायचे , जास्त कष्ट नकोत बुद्धीला नावे लक्षात ठेवायचे , ते वरून तुमच्या लक्षात आलंच असेल .. गिरगावचे आबा काका , कुर्ल्याचे भाई काका , अँटॉप हिलचा पिंटू मामा 🙂
मला तसे नातेवाइकांचे वावडे नव्हते , आवडायचे सगळीकडे जायला ! पण शक्यतो गिरगावात खोताच्या वाडीत जायला भयंकर आवडायचे , एक तर त्यांच्या चाळीचे लाकडी जिने , बाबा घरात काका काकूंशी गप्पा मारत असताना , मी मात्र ट्रेन बनून तोंडाने शिट्टीचा कुईईईई आवाज करत , जिने वरखाली उतरत त्या जिन्यांच्या धडधड आवाजात तिथल्या मुलांशी खेळत असायचे आणि दुसरे म्हणजे त्यांना भेटल्यानंतर बाबा लगेचच सव्वापाच च्या दरम्यान काढता पाय घ्यायचा आणि आम्ही दोघे धूम ठोकायचो ते डायरेक्ट गिरगाव चौपाटीवर … समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य , वाळूत किल्ला बनवणारी बाबाची छोटी स्मितु , आणि ” ए बाय ए बाय , पाण्यात जाऊ नको, ” म्हणत भेळवाल्याकडे ओल्या भेळीचे पुडके बांधून घेणारा माझा बाबा ! मग गिरगावातून गर्दीच्या बसमध्ये बाबाच्या गळ्याला मिठी मारून खीखी करत घरी पोचायचो ते आईचा ओरडा खायलाच ! दोघांचे वाळूने आणि भेळीच्या चटण्यांच्या डागांनी मळलेले कपडे पाहून आईच्या तोंडाचा पट्टा सुरु ! ते दृश्य, त्या आठवणी मनावर जणू कोरल्या गेल्यात …..
मुंबई आणि भेळपुरी – हे समीकरण एकमेकांशी निगडित ! पहा ना , मुंबईत कितीतरी जातीधर्माचे लोक एकत्र राहतायत आणि त्यांच्या संस्कृती एकमेकांत इतक्या विलीन झाल्यात की बाजूच्या आगरी लोकांच्या घरातील मासळी कधी उत्तर प्रदेशातुन मुंबईला पोटापाण्यासाठी आलेल्या कुटुंबात थाळीत वाढली जाते आणि त्यांचा लिट्टी चोखा बाजूचा दादूस हातातील सोन्याची जाड साखळी मागे सारत मिटक्या मारत खात असतो ! भेळही अशीच , नानाविध फरसाण , चटण्या यांनी बनलेली चटपटीत , आंबट , गोड परंतु मनाला आनंद देणारी ! तिला फक्त स्वाद सामावायचे असतात आपल्यात , कुठले कुरमुरे , कुठल्या गाठी , कुठली पापडी , सगळे एकत्र ! काय पटतंय ना तुम्हाला …
आणि चौपाटीवर जाऊन भेळपुरी खायचा आनंद काही औरच असतो , समुद्रावर भेलपुरीचा स्टॉल नाही , अशक्यच ! आमच्या दहावीच्या संस्कृत शिकवणीत , जर कोणी टारगट पोरापोरींनीं तास चुकवला तर आमचे संस्कृत शिक्षक आपल्या काळ्या काड्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्याआडून त्यांचे गोल टप्पोरे डोळे गरागरा फिरवायचे आणि नंतर लटक्या रागाने मजेत म्हणायचे देखील ” कुठे गेलीत ही चौथ्या बाकावरची , गेली वाटतं ,, आपण दोघे बहीण भाऊ , चौपाटीवर भेळ पुरी खाऊ !” आम्ही फिदीफिदी हसत वह्या उघडायचो !
हा भेळपुरीचा स्वाद घरी चाखण्यासाठी मी आज हीच रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे ! मग जिभेला आंबट तिखटाची मेजवानी द्या की , या भेळपुरीने !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ कप = ५० ग्राम कुरमुरे
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स बारीक चिरलेला
- १ मध्यम आकाराचा टोमॅटो = ८० ग्राम बारीक चिरलेला
- १ मध्यम आकाराचा बटाटा = ८० ग्राम उकडून बारीक चौकोनी तुकडे करून
- हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी
- लसणाची लाल चटणी
- चिंच खजुराची गोड चटणी
- चपट्या शेवपुरीच्या पापड्या आणि पाणीपुरीच्या पुऱ्या
- अर्धा कप तिखट गाठी
- अर्धा कप भावनगरी गाठी
- अर्धा कप बारीक नायलॉन शेव
- पाव कप मसाला शेंगदाणे
- पाव कप बारीक चिरलेली कोथींबीर
- १ टीस्पून चाट मसाला
- पाव टीस्पून काळे मीठ
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- कुरमुरे व्यवस्थित साफ करून मग एका मोठ्या कढईत मंद आचेवर भाजून घ्यावेत . ४-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत , फक्त त्यांचा रंग बदलू देऊ नये .
- एका मोठ्या भांड्यात कुरमुरे , चिरलेला कांदा , टोमॅटो , बटाटा आणि लिंबाचा रस घालून एकत्र करावे . मसाला शेंगदाणे , व इतर फरसाण सुद्धा घालावे . चाट मसाला , काळे मीठ आणि पापडी व पुऱ्या चुरून घालाव्यात .
- नंतर आवडीनुसार लागेल तेवढ्या चटण्या घालाव्यात ( मी ३ टेबलस्पून हिरवी चटणी , १ टेबलस्पून लाल चटणी आणि ५ टेबलस्पून चिंच खजुराची चटणी घातली आहे ) . व्यवस्थित एकत्र करून घ्याव्यात .
- चटपटीत भेळ तयार आहे , सर्व करताना मस्त फरसाण आणि लिंबू पिळून खायला द्यावी !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
मस्तच चमचमीत भेळ… लिहिले पणखुप छान 👌👌👌
Thanks a lot Renu Tai 🙂