तो दादा मला दरवर्षी भीमथडी जत्रेत दिसतो , त्याच जागी , त्याच कोपऱ्यात … चार वर्षांपूर्वी भेटला तो ..आताशा आम्हाला ओळखू लागलाय तो …
चुलीवर चढवलेले मोट्ठे मातीचे घंगाळ , मधून मधून तो मोठ्या पलित्याने ते घंगाळात जे शिजतेय त्याला अगदी मायेने ढवळत असतो , बाहेर फक्त रटरटणारी वाफ , काहीशी गोडसर मातकट सुगंध नाकाला देणारी ! पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याला पाहिले ना तेव्हा त्यात काय शिजतेय याची उत्सुकता शिगेला ताणलेली , एवढे नवल तर मला तेव्हाही वाटले नव्हते जेव्हा तो नाही का लांबलचक दाढीवाला हॅग्रीड बाबा हॅरी पॉटरच्या सिनेमात मडक्यात काय शिजवत असतो ते पाहून ….
मागे त्याच्या छोट्याश्या त्याच्या स्टॉलवर त्याची म्हातारी आई चेहराभर पदर घेऊन हुरड्याची थालीपीठ थापीत असते , अजून दोन चार बायकांच्या सोबत .. . गावरान सोलापुरी /कोल्हापुरी गुळाच्या ढेपा व्यवस्थित रचलेलया , आणि बाजूला अतिशय साध्या प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले खपली गहू विकायला ठेवलेले … काहीसे खरबरीत, ओबडधोबड , बिलकुल पॉलिश न केलेले, त्याच्या शेतात पिकणारे ! ते पाहून एक कोडे मात्र उलगडते कि घंगाळात गूळ आणि गहू शिजतायेत , पण नक्की काय !
आमचे उत्सुक चेहरे बघून मग हसतहसत दादा आमच्यासमोर मातीचे वाडगे ठेवतो , आणि आमची अवस्था अशी ” ती आली , तिने पाहिले आणि तिने जिंकलं हो ..” अगदी दाट करड्या रंगाची , वरून सुक्या खोबऱ्याचे काप विराजित झालेली ती खपली गव्हाची तुपाळ मधुर खीर , एकामागोमाग एक असे २ वाडगे संपवल्यावरच पार्टनर मान वर उचलतो आणि त्या खिरीच्या गोडव्यासारखेच मधुर हास्य आमच्या चेहऱ्यावर … हा अनुभव दरवर्षीचा , आताशा तर भीमथडी जत्रा फिरणे हे पहिल्यांदा खपली गव्हाची खीर खाऊनच नेहमी होते . महाराष्ट्राचे जुने गव्हाचे पीक हे ,,ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छिते !
खपली गहू हे महाराष्ट्रात मुख्यतः सातारा , कोल्हापूर, सांगली , सोलापूर तसेच कर्नाटकात काही भागात , गुजरात आणि तेलंगणा या ठिकाणी काही मर्यादित प्रमाणात अजूनही पिकवला जातो . आजकाल मिळणाऱ्या गव्हाच्या नवीन जातींपेक्षा हा गहू अंमळ जास्तच कसदार ! ताकद देणारा , हा गहू टरफल युक्त असल्या कारणाने फायबर जास्त म्हणून मधुमेहींसाठी वरदान !या गव्हाचा वापर करून निरनिराळ्या पाककृती जसे खिचडी , खीर, खपली गव्हाच्या रव्यापासून शिरा , लापशी , उपमा बनवला जातो !
आपल्या महाराष्ट्रातील खपली गव्हाची खीर ही कर्नाटकात गोधी हुग्गी म्हणून ओळखली जाते . ही खीर बनवताना दुधाचा वापर होतो तर कधी नारळाचे दूध काढूनही त्यात घातले जाते !
आज आपली ही रेसिपी अस्सल मराठी मातीतली , गावच्या रसाळ गुळाचा गोडवा , आणि गोठ्यातल्या गायी म्हशीच्या धारोष्ण दुधाची अवीट चव ..
आता हिवाळा सुरु झालाय, सकाळी सकाळी न्याहारीला वाडगाभर खपली गव्हाची खीर , त्यावर सोडलेली साजूक तुपाची धार आणि सोबत खरपूस भाजलेली बाजरीची भाकर किंवा थालीपीठ व ठेचा असेल तर काय आनंद वर्णावा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप = १८० ग्रॅम्स खपली गहू , स्वच्छ निवडून , पाण्याने धुऊन , ४५ मिनिटे भिजवत ठेवावे
- २ टेबलस्पून तांदूळ , स्वच्छ धुऊन , ४५ मिनिटे पाण्यात भिजवून त्यानंतर खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावेत
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेला ताजा नारळ
- दीड कप = ३०० ग्रॅम्स गूळ ( शक्यतो सेंद्रिय गूळ घ्यावा )
- १ टेबलस्पून काजू बारीक तुकडे करून
- १ टेबलस्पून मनुका
- १ टेबलस्पून बदामाचे काप
- १ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप
- दीड टीस्पून सुंठ पावडर
- अर्धा टीस्पून मीठ
- अर्धा लिटर दूध
- तूप गरजेनुसार
- भिजवलेले गहू आणि तांदूळ प्रेशर कूकरमध्ये घालावेत . मीठ घालावे आणि बुडेल इतकेच पाणी घालावे . मध्यम आचेवर ३-४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावेत . कुकर थंड झाल्यावरच उघडावा आणि शिजलेले गहू व तांदूळ एका ताटलीत काढून घ्यावेत .
- एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे . सुका मेवा म्हणजेच सुक्या खोबऱ्याचे काप , बदामाचे काप , काजूचे तुकडे आणि मनुका तुपात परतून घ्याव्यात . हा सुका मेवा एका ताटलीत काढून घ्यावा .
- त्याच तुपात गूळ घालून वितळू द्यावा . ओले खोबरे आणि सुंठ पावडर घालून एकत्र करावा .
- नंतर तुपात परतलेला सुका मेवा घालावा . शिजवलेले गहू आणि तांदूळ सुद्धा घालून एकत्र करून घ्यावे . मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवावे .
- नंतर आच बंद करावी आणि कोमट झालेले दूध घालून एका हाताने खीर ढवळून घ्यावी . अति गरम दूध घातले तर गुळामुळे दूध फाटते .
- आचेवर परत ठेवून खीर मंद आचेवर शिजू द्यावी. ही खीर घट्ट चांगली लागते . खीर घट्ट झाली की आचेवरून खाली उतरवावी आणि सुक्या मेव्याने सजवून वरून साजूक तुपाची धार घालून खावयास द्यावी !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply