त्या दिवशी एका मराठी चित्रपट वाहिनीवर ” मोगरा फुलला ” हा नवीन चित्रपट पाहत होते. त्यात एका दृश्यात विवाहासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालला होता ,, थोडक्यात ” कांदेपोहे…एईई ” कार्यक्रम!
त्यात भावी नवरदेवाची आई , मुलीच्या स्वयंपाक कलेची विचारणा ” २१ कळ्यांचे उकडीचे मोदक जमतात का?” अशी करते , आणि मुलीचा गोंधळलेला चेहरा पाहून आपले नाक दिमाखात उडवते ! मला असे खुद्कन हसू आले ना ते पाहून … लहानपणी एकामागोमाग एक उकडीचे मोदक तोंडात कोंबताना मी आजीला म्हणायचे देखील , ” आज्जी मी मोठी झाले तरी तू देशील ना मला मोदक बनवून ?” आजी हसतहसत म्हणायची ” हो ग बाय तुझ्या सासरी घेऊन जा मला , बनविन हो तुझ्यासाठी …”
महाराष्ट्रीयन घराघरांत सुगरणीची व्याख्या ही प्रदेशागणिक बदलते , कोणाच्या घरांतली गृहलक्ष्मी ही खमंग पुरणपोळी बनवण्यात एक्स्पर्ट तर चिकन मटणाचा रस्सा करण्यात एखादीचा हात कोणी धरू शकत नाही ! कोणाचे कळीचे लाडू देखणे तर कोणाच्या करंजीला नाजूक मुरड ! आमच्या कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात घरी बनवलेला साठवणीचा मालवणी मसाला , खास चिकन मटणासाठी वेगळा कोकणी गरम मसाला आणि माशाच्या कालवणासाठी बेडगी मिरचीचे तिखट व घरी कांडलेली हळद , हे ज्या स्त्रीला जमले तिने अन्नपूर्णेला प्रसन्न केले असे समजावे ! माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते आणि मसाले बनवण्यात तर तिचा हातखंडा आहे , अर्थात हा वारसा मिळालाय आजीकडून हे वेगळे सांगायला नकोच ! अहो आमच्याकडची लोक इतकी चोखंदळ , की नुसत्या चुलीवर रटरटणाऱ्या कालवणाच्या किंवा भाजीच्या वाफेवरून ओळखतील की नक्की काय शिजतेय , तिथे त्यांच्या रसनेला बाहेरचे पॅकेजड मसाले नाही हो भावत !
तेलात परतलेल्या मालवणी मसाला व हळद यांनी आलेला कडधान्याच्या रस्स्याचा रंग पाहूनच कोकणी माणसाचे मन तृप्त होते . तर असा हा मालवणी मसाला बनवणे , हे खरोखर इंटरेस्टिंग काम आहे . हा मसाला म्हणजे लाल मिरची पूड व गरम मसाला यांचे मिश्रण , म्हणजे हा जेवणात घातला की वेगळे धणे जिरे पूड , किंवा गरम मसाला असे काही टाकायची गरजच पडत नाही ! एकदम ऑल इन वन …
अगदी समजायला लागले त्या वयापासून घरचे हे अन्न संस्कार , जसे वर्षभराचा मसाला बनवणे , दिवाळीचा फराळ बनवणे , लोणची , मुरंबे बनवणे , जीवनाचा अविभाज्य अंग बनून गेले . त्यातून आई नोकरी करणारी , म्हणजे घराचा, ऑफिसचा व्याप सांभाळून हे सगळे करण्याची ऊर्जा ती कुठून आणायची हे त्या माऊलीलाच माहित ! हा मसाला थोडा थोडका नाही चांगला ८ -९ किलोचा बनतो माझ्या घरी ! माझी वार्षिक परीक्षा कधी संपतेय याचे वेध आईलाच जास्त लागायचे माझ्यापेक्षा .. परीक्षा संपल्यानंतर एक रविवार गाठला जायचा , ज्या दिवशी मस्जिद बंदर ला जाणे व्हायचे , मीही जायचे आई सोबत ! मुंबईनगरीतले मस्जिद बंदर म्हणजे घाऊक खरेदी विक्रीचे मोठे मार्केट .. तसे आम्हाला लालबाग मार्केट हाकेच्या अंतरावर , जिथे हा मालवणी मसाला , सामान विकत घेऊन तिथल्यातिथे २-३ तासांत कांडप करून सुद्धा दिला जायचा ! परंतु म्हटले ना , माझ्या आईला इन्स्टंट काहीच नाही आवडत , आजही जाते मस्जिदला ( हा तिचाच शब्द , मस्जिद बंदरचा शॉर्ट फॉर्म ) मसाल्याचे , वर्षभराचे ड्राय फ्रुट वगैरे सामान आणायला .. धडपड ही रक्तातच आहे ना !
तिच्या नेहमीच्या चाचाच्या दुकानात आमच्या नावाने रेजिस्टरचे एक पान लिहिले होते , ” मयेकर मॅडम , चिंचबंदर हेड पोस्ट ऑफिस ” , त्या पानावर आमच्या मसाल्याचे सगळे प्रमाण लिहिले होते . सेम कागद लालबाग ला ” खामकर बंधू, मसाल्याचे घाऊक व्यापारी ” यांच्या रजिस्टर मध्येही होता .. आता त्यांच्याही पिढ्या बदलल्या , आईने ते कागद आपल्या ताब्यात घेतले ,, डायरीत चिकटवून ठेवलेत ! हे मसाल्याचे सारे सामान खाकी पिशव्यांत बांधून लोकल ट्रेनमधून त्या मोठाल्या पिशव्या आम्ही दोघी उचलून आणायचो .
मग आमच्या त्या चाळीतल्या छोट्याश्या घराला ” मसाला फॅक्टरी” चे स्वरूप यायचे .. एकेक मिरच्यांची खाकी पिशवी उघडून तिला चाळीच्या समोर असलेल्या लाल ओटा मैदानाच्या ( मैदानाचा रंग पूर्ण लाल म्हणून लाल ओटा ) गच्चीवर, आजीच्या स्वच्छ जुन्या नऊवारी पातळावर पसरवून उन्हे दाखवली जायची ! पातळ वाऱ्यानं उडू नये म्हणून चारही बाजूंनी दगड ठेवायला मी मैदानात पळायचे , मग ते दगड शोधून झग्यात बांधून परत वर गच्चीवर ! या लाल ओट्यावर मिरच्या का वाळवल्या
याचे कारणही आईच्या मॅनेजमेंटचा हिस्सा .. तसे चाळीच्या गच्चीवर वाळवणे घालता यायची परंतु , तिथे जर कोण्या बोक्याने मिरच्या लाथाडलया की कबुतरांनी नृत्य प्रदर्शन केले तर कळणार कसे ? आणि आमच्या घराच्या खिडकीतून सरळ समोर लाल ओट्याची गच्ची आणि आमची वाळवणे दिसायची म्हणजे राखण करायला सोप्पं ! आहे की नाही हेड पोष्टातल्या सिनियर सुपरवायजर बाईंचे सुपीक डोके ..
एकीकडे रोज मिरच्या सन बाथ घेतायेत तर संध्याकाळी त्यांची देठे तोडली जायची आणि शेवटी यायचे खडे गरम मसाले व मिरच्या भाजायचे काम ! तशीही उन्हाळी सुट्टी , माझा खेळाचा दंगा तर असायचा पण या दिवशी जरा जास्त वेळ बाहेर राहायला मिळायचे , अगदी दुपारी सुद्धा ! कारण घरात आल्यावर उगाचच कारण नसताना आपल्या लाडक्या अशोक सराफांसारखे ” वाक्ख्या व्हिखी वुक्खुऊ ” असे खोटे खोटे खोकत आईला तिच्या मागे माझी भुणभुण नको असायची . मग हातावर एक्सट्रा रुपया ठेवला जायचा , नी एरवी पाठीत माझ्यासकट सगळ्या सवंगड्यांच्या पाठीत धपाटा घालत दुपारी झोपायला पिटाळणारी आजी त्या दिवशी मात्र डोळे मिचकावून म्हणायची ,” बाय मला पण एक कुल्फी घेऊन ये ५० पैशाची ..” मग काय वारा प्यायलेल्या वासरासारखे उंदडत आमची स्वारी गुल…
मग नेमेचि येतो पावसाळा त्याप्रमाणे आमचा मसाला कांडप दिवस उजाडायचा , आज बाबाची ड्युटी असायची ! सगळे भाजलेले मसाल्याचे सामान एका मोठ्या स्टीलच्या डब्यात आणि दुसऱ्या डब्यात हळकुंडे , वर्षभराच्या हळदीसाठी , एका मोठ्या गोणपाटाच्या पिशवीत ठेवले जायचे ! बाजूला एक पाण्याची बाटली आणि नीलकंठ खाडिलकर – अग्रलेखांचे बादशाह यांच्या लेखणीने सजलेला रविवारचा ” नवाकाळ ” , आणि सोबत बाळासाहेब ठाकऱ्यांचा झुंजार “सामना” या दोन वृत्तपत्रांच्या गुंडाळी ! ही महाराष्ट्राची दोन अनमोल रत्ने आज स्वर्गात विराजमान आहेत , पण वृत्तपत्र वाचनाची आवड आजही माझ्या पिढीला आहे , ही त्यांचीच देणगी ! अहो शिवडीच्या डंकावर बाहेर बाकड्यांवर किमान २ तास तरी बसून राहावे लागायचे , त्यावेळी मोबाइल नव्हते ना , तर पेपर वाचणे हाच विरंगुळा !
मस्त सकाळी नाचणीच्या गरम भाकऱ्या आणि सोडे भरलेले वांगे पोटभर खाऊन बाबा सकाळी सकाळी निघायचा ! साडेसात ला गेलेला बाबा १० च्या सुमारास धापा टाकत जिन्यावरूनच हाकारीत यायचा ,” ए स्मितु , ए शारदा , आलो ग ..” , सोबत खांद्यावर एक डबा आणि दुसरा हातात …
डबे उघडताच जो मसाल्याचा सुगंध दरवळायचा ना घरात… तो लालसर तांबडा मसाला जणू मावळतीच्या सूर्याची लाली आणि बाजूला पिवळीधमक हळद … आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलायचे , आठवडाभराच्या टिमवर्क आणि मेहनतीचे फळ पदरात पडल्याचे !
खजिना खजिना म्हणजे हाच का हो तो ,, चवीचा खजिना 🙂
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २०० ग्रॅम्स बेडगी सुक्या लाल मिरच्या
- ५० ग्रॅम्स संकेश्वरी सुक्या लाल मिरच्या
- ५० ग्रॅम्स पांडी किंवा लवंगी सुक्या लाल मिरच्या
- २ टीस्पून जिरे
- २ टीस्पून बडीशेप
- २ टीस्पून शाही जिरे
- १ टीस्पून मेथी दाणे
- २ टीस्पून खसखस
- १ टेबलस्पून मसाला वेलच्या
- १ टीस्पून हिरवी वेलची
- १ टेबलस्पून धणे
- १ टेबलस्पून त्रिफळ
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून काळी मिरी
- ५ ग्रॅम्स जायफळ
- १ टीस्पून लवंग
- २ टीस्पून नागकेशर
- १ टेबलस्पून कबाबचिनी
- ३ लहान हिंगाचे खडे
- १ टीस्पून चक्रीफूल
- १ टेबलस्पून जावित्री
- १ फूल मायपत्रीचे
- ३ हळकुंड
- २ टेबलस्पून दगडफूल
- ४ इंच दालचिनी
- १०-१२ तमालपत्र
- मिरच्यांना २-३ उन्हे दाखवून घ्यावीत त्यामुळे मसाला चांगला टिकतो त्यात पोरकिडे व्हायचा धोका कमी होतो !
- सगळ्या मिरच्या देठे काढून एका मोठ्या जाड बुडाच्या लोखंडी कढईत बॅचेस मध्ये मंद आचेवर भाजून घ्यावीत . चांगल्या चुरचुरीत झाल्या पाहिजेत परंतु त्याचबरोबर त्या करपणार नाहीत याची दक्षता घ्यावी .
- भाजलेल्या मिरच्या एका परातीत पसरून नैसर्गिक रित्या थंड होऊ द्याव्यात , पंख्याखाली ठेवू नयेत !
- सगळे खडे गरम मसाले एका मागोमाग एक कढईत मंद आचेवर त्यांचा सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यावेत .
- खाली मी प्रत्येक साहित्याला भाजण्यासाठी लागलेला वेळ लिहीत आहे .
- गरम मसाले भाजून झाले की ते एका ताटलीत काढावेत आणि एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करावे आणि मंद आचेवर हिंगाचे खडे तळून घ्यावेत. खड्यांचा रंग खरपूस झाला की काढून घ्यावेत .
- थंड झाल्यावर मिक्सरमधून मिरच्या बारीक वाटून त्यांची पूड करावी . वाटलेली पूड चाळणीतून चाळून राहिलेले मिरचीचे चाड परत मिक्सरला लावावे . आणि अशाप्रकारे छान बारीक पूड वाटून घ्यावी . अशाच प्रकारे गरम मसाला व हिंग एकत्र बारीक वाटून घ्यावे .
- मिरची पूड आणि गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा . मिक्सरला लावून एकत्र ब्लेंड केला तरी चालेल .
- सुमारे ४५० ग्रॅम्स चा मालवणी मसाला तयार !
- मिरच्यांच्या ४ बॅचेस भाजायला प्रत्येकी ४ मिनिटे
- धणे ३ मिनिटे
- जिरे , शाही जिरे , मोहरी, त्रिफळ, लवंगा, नागकेशर प्रत्येकी १ मिनिट
- काळी मिरे , बडीशेप, खसखस, मसाला वेलची ( फोडून ) प्रत्येकी दीड मिनिट
- मेथी दाणे, जावित्री, हळद ( फोडून ) ३० सेकंद प्रत्येकी
- चक्रीफूल , दगडफूल ४५ सेकंद प्रत्येकी
- मायपत्री २० सेकंद
- दालचिनी १ मिनिट ४५ सेकंद
- जायफळ १० सेकंद

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply