वातावरणाचा पारा खाली उतरत चाललाय , इतके दिवस पुणेकरांना ज्या गुलाबी थंडीचा इंतजार होता , ती उशिरा का होईना आपली धुक्याची गुलाबी शाल ओढून दाखल झालीये ! हिवाळ्याचा आनंद आमच्या घरात मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी यातून दिसतो .
ठेवणीत कापडात बांधून ठेवलेला . फिल्टर कॉफीचा, केरळावरून आणलेला पितळी मोल्ड पार्टनर बाहेर काढून स्वतः स्वच्छ करतो , आणि स्वयंपाकघराच्या ओट्यावर लख्ख होऊन तो मोल्ड दिमाखात विराजमान होतो . शनिवारी रविवारी दुपारच्या हलक्या वामकुक्षीनंतर संध्याकाळची उन्हे कलताना एकाच वेळेला नाकपुड्यांशी खेळणारा तो दाट , डार्क फिल्टर कॉफीचा सुगंध आणि कढईतल्या तळणीचा सुगंध घेऊन खुर्चीत बसलेला पार्टनर मनोमन सुखावतो . पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा हा निसर्गाने आपल्याला दिलेले वरदानच आहे , गरमागरम भजी खाण्यासाठी , अशी निदान आमची तरी गोड समजूत आहे .
या नवीन वर्ष सुरवातीला कामानिमित्त मी प्रचंड बिझी होते , तो इव्हेंट यशस्विरीत्या पार पडलाय आणि जरा निवांत म्हणून मी काहीतरी वेगळे परंतु सोप्पे बनेल अशी काहीतरी रेसिपी शोधत होते . रविवार नॉनव्हेज दिवस म्हणून चिकन आणलेच होते , थोडे बोनलेस तुकडे बाजूला काढून पकोडे तळण्याचे ठरवले .
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
आणि मी हे पकोडे तळलेत दोन पद्धतींनी , एक आपला स्ट्रीट फूड स्टाईल आणि दुसरा दक्षिण भारतीय पद्धतीने ! नक्की करून पहा , आवडेल तुम्हाला ….

- २५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून
- पाऊण कप = १०० ग्रॅम्स बेसन
- १ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
- अर्धा टीस्पून ओवा
- मीठ चवीनुसार
- पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ हिरव्या मिरच्या
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
- अर्धा टीस्पून भाजलेली जिरे पावडर
- अर्ध्या लिंबाचा रस
- अर्धा टीस्पून धणे पावडर
- पाव टीस्पून आमचूर पावडर
- पाणी गरजेनुसार
- तेल
- २५० ग्रॅम्स बोनलेस चिकन , स्वच्छ धुऊन आणि सुमारे एक ते दीड इंचाचे तुकडे करून
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स बेसन
- २-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- १ अंडे
- पाव टीस्पून हळद
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर
- मीठ चवीनुसार
- ४ हिरव्या मिरच्या
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- पाव कप कोथिंबीर
- १० -१२ कढीपत्ता
- १ लहान कांदा = ४० ग्रॅम्स
- अर्ध्या लिंबाचा रस
- पाणी गरजेनुसार
- तेल
- हिरवी मिरची , आले आणि लसूण १ टेबलस्पून किंवा लागेल तेवढे पाणी वापरून बारीक वाटून घ्यावे .
- एका मोठ्या बाऊलमध्ये हिरवे वाटण , लिंबाचा रस ,लाल मिरची पूड , आमचूर पावडर , जिरे पावडर , धणे पावडर , चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे .यात चिकनचे तुकडे घालून नीट घोळून घ्यावेत . ३० ते ४० मिनिटांसाठी मॅरीनेट होऊ द्यावे .
- बेसनाचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन , कॉर्न फ्लोअर , ओवा, मीठ चवीपुरते , बारीक चिरलेली कोथिंबीर , आणि १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं तेल घालून एकत्र करून घ्यावे . साधारण २/३ कप पाणी घालून हे मिश्रण जरासे घट्टच फेटावे . बाजूला झाकून ठेवावं .
- चिकन मॅरीनेट करण्यासाठी आले , लसूण , हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , कांदा , कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून जाडसर वाटून घ्यावे .
- एका बाऊलमध्ये चिकनचे तुकडे, वाटलेला मसाला , लाल मिर्च पूड , गरम मसाला पावडर , हळद , चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात १ अंडे फोडून घालावे . बेसन , तांदळाचे पीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे चिकनचे तुकडे असेच मिश्रणात ३० -४० मिनिटे ठेवून द्यावे .
- पकोडे तळण्यासाठी कढईत तेल व्यवस्थित मध्यम आचेवर गरम करून घ्यावे . मग पहिल्या पद्धतीने मॅरिनेड केलेले चिकनचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात घोळवून मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत .
- दुसऱ्या पद्धतीने मॅरिनेड केलेलं चिकनचे तुकडे डायरेक्ट तेलात घालावेत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे .
- हे चिकन पकोडे पार्टी स्टार्टर्स म्हणून टोमॅटो केचअप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावयाला देऊ शकता !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply