अंडा खिमा घोटाळा – अर्रे म्हणजे नेमके अंडे आहे कि खिमा आहे की काय हा घोटाळा … ज्या पदार्थाच्या नावात घोटाळा गडबड त्याची चव कशी असेल हो … अजिबातच घाबरू नका ,चव इतकी भन्नाट की तुम्ही शेक्स्पीअरचे वाक्य नक्की आठवाल ” नावात काय आहे ” !
आता जरा मुद्देसूद सांगते , माझ्या यु ट्यूब चॅनेलवर दर्शकांच्या प्रेमळ आग्रहाखातर मी त्यांनी सुचवलेल्या अनेक रेसिपी बनवते . काही रेसिपी या प्रसिद्ध सगळ्यांच्या माहितीतल्या असतात . परंतु काही या खरच थोड्या वेगळ्या , जास्त कोणाला ठाऊक नसतात पण खूपच इंटरेस्टिंग ! असेच माझ्या एका प्रेमळ दर्शक ” सौ. अलका सुळे ” यांनी त्यांच्या मुलाच्या आग्रहाने अंडा खिमा घोटाळा बनवायची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली . मुंबईत शिवडी स्टेशनबाहेर एक अंडा भुर्जीची गाडी लागते , त्यावर हा घोटाळा मी कित्येकदा खाल्ला आहे . पण त्याची अशी रिक्वेस्ट येईल असे वाटले नव्हते .
इंटरनेट वर जरा शोधाशोध केल्यावर मला कळले की हा घोटाळा आला आहे सुरतकडून मुंबईकडे , अगदी औद्योगिकरणाच्या काळापासून!
माझ्या एका गुजराती कलिगच्या तोंडूनही मी याची तारीफ ऐकली होतो ” ए मारे सूरतमा प्रख्यात छे ” असे अगदी गालात जीभ आडवी घालत तो म्हणाला !
या घोटाळ्याला आधी पाव भाजी वडापाव प्रमाणे गाड्यांवर स्थान होते , आता ते हळूहळू कॅफेच्या मेनू कार्डांवर देखील स्थिरावलय ! असे म्हणतात घोटाळे पचत नाहीत परंतु हा अंडा घोटाळा मात्र उभ्याउभ्या गाडीच्या बाजूला न जाणो कित्ती गरमागरम पावांसोबत आरामात खाल्ला जातो !
हा शब्द नेमका का वापरण्यात आला या पदार्थाला , याचे पुख्ता सबूत नसले तरी यात कच्चे अंडे, उकडलेले अंडे आणि फुल्ल फ्राय असं ३ प्रकारे अंडे वापरतात आणि खाणारा गडबडतो की खिमा आहे कि फुल्ल फ्राय कि भुर्जी ! म्हणूनच याला घोटाळा म्हणत असावेत….
तुम्ही हा घोटाळा एखाद्या वीकएंड ला नक्की करून पहा , तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- २ कच्ची अंडी आणि ३ उकडलेली अंडी
- १ मोठा कांदा = ९० ग्रॅम्स बारीक चिरलेला
- २ मध्यम टोमॅटो =१२५ ग्रॅम्स बारीक चिरलेले
- २-३ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
- १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
- १ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- अर्धा टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हळद
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून धणे पावडर
- १ टीस्पून पाव भाजी मसाला
- १ टीस्पून चाट मसाला
- मीठ चवीनुसार
- तेल
- एका कढई मध्ये ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात जिरे घालून तडतडू द्यावे . हिरव्या मिरच्या व कांदा घालून मध्यम ते मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्यावे .
- मग आले लसणाची पेस्ट घालून त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी . पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी .
- आता चिरलेले टोमॅटो घालून त्यात थोडे मीठ घालावे . आच बारीक करून टोमॅटो मंद आचेवर शिजू द्यावेत .
- टोमॅटो शिजले की हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , पाव भाजी मसाला आणि चवीपुरते मीठ घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
- ७-८ मिनिटे मसाला परतून घेतला की त्यात थोडे पाणी घालावे . किसणीने ( मध्यम आकारांच्या छिद्राने ) उकडलेली अंडी किसून घालावीत .
- अंडी चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यावीत . मग आच मंद करून एक कच्चे अंडे फोडून घालावे . नीट एकत्र करून अजून थोडे पाणी घालावे ( टोटल १ कप पाणी वापरले आहे ) . वरून चाट मसाला भुरभुरावा . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
- दुसऱ्या आचेवर एका पॅन मध्ये १-२ टेबलस्पून तेल घालावे . त्यात उरलेले कच्चे अंडे फोडून घालावे . त्यावर मीठ, चाट मसाला आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . बाजूने गरम तेल चमच्याने वर घालावे म्हणजे अंडे वरूनही शिजेल .
- अंड्याची ग्रेव्ही आपण ५ मिनिटे शिजू दिलीय . त्यात आता हे अंड्याचे फुल्ल फ्राय घालावे . ते नीट एकत्र करून घ्यावे .
- या रेसिपीमध्ये आपण अंडे ३प्रकारे वापरली - कच्चे , उकडलेले आणि फुल्ल फ्राय म्हणूनच हा घोटाळा एकदम मजेशीर आहे .
- हा अंडा खिमा घोटाळा थोडासा दाटसर रस्साच असावा कारण आपल्याला तो पावासोबत खायचा आहे . त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक्कत्र करावी . अंडा घोटाळा भाजलेल्या पावांसोबत खावयास द्यावा .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply