मनुष्याच्या उत्क्रांती मध्ये खाणे पिणे हा महत्त्वाचा भाग आहे. आठवतोय का शाळेतला अश्मयुगाचा धडा! कच्च्या अन्नापासून ते अग्नीच्या शोधामुळे अन्न शिजवून खाण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास.
शेती , गुरेचराई आणि आतापर्यंतचा औद्योगिकीकरणाचा प्रवास .. आणि या प्रवासात माणसाने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींत आमूलाग्र बदल घडवून आणला ! घाबरू नका हो , मी इतिहासाचे दाखले इथपर्यंतच लिहिणार आहे आणि वळणार आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या विषयाकडे म्हंजे खादाडीकडे! माझे उभे आयुष्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद येईपर्यंत मुंबईत गेले, इथे मी नमूद करू इच्छिते , परळ , लालबाग, दादर, काळाचौकी आणि भोईवाडा या पंचक्रोशीत! हा पूर्ण एरिया मिल कामगारांचा , आमच्या चाळीतच ३०-४० बिऱ्हाडे मिल कामगारांची! सकाळची शिफ्ट गाठणाऱ्यांना दुपारी १२ वाजता जेवणाची सुट्टी मिळायची , आणि तीही इतकी छोटी की कुठे निवांत बसून खायला पुरेसा वेळ नसायचा ! जे डबेकरी होते ते नशीबवान! पोटोबा नीट नाही भरला तर अंगमेहेनतीचे काम कसे व्ह व्हायचं! मग काय आली की नवीन बिजनेस आयडियांची वावटळ! एका महापुरुषाच्या , हो हो महापुरुषच म्हणेन मी, मनात आले की जर मी या मिल कामगारांना असे काही खाऊ घातले की ते पटकन खाऊन ताजेतवाने होऊन आणि न ढेपाळता , न जांभई देता कामावर परत जाऊ शकतात तर … ” आणि अशा रीतीने पुंडलिकाभेटो विठूमाऊली आली हो महाराजा ” अशा कीर्तनकारांच्या धर्तीवर त्याने आपल्याकडील होत्या नव्हत्या तेवढ्या भाज्या घालून बनवली की हो अशी सुरेख, चविष्ट भाजी , आणि सोबत पोर्तुगीज भेटीतला होता कि पाव ! कामगारांनी दिला तृप्तीचा ढेकर आणि झाली प्रसिद्ध ही “पावभाजी’!
पाव भाजी बघायला गेले ,तर जास्त कटकटीची नाही ,, परंतु ती जर अजून झटपट आणि कमी लक्ष देऊन बनवली गेली तर फारच उत्तम ! माझ्या आयटीच्या शिफ्ट जॉबमध्ये जेवण बनवण्यासाठी फार मर्यादित वेळ मिळायचा. मग माझ्या मदतीला धावून आली ती टेकनॉलॉजि म्हणजे, आपला फूड प्रोसेसर आणि मायक्रोवेव ओव्हन ! माझ्या खादाड मित्रमैत्रिणींनो ही उपकरणे खरंच वेळ वाचवतात , फक्त आपल्याला गरज आहे , त्यांना थोडे प्रेमाने समजून हातमिळवणी करायची!
आज मेरीवाली पावभाजी ही मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये बनवलेली , जोपर्यंत त्यात ती शिजते ना तेवढ्या वेळात तुम्ही आरामात सोफ्यावर लोळत टीवी पाहू शकता किंवा पुस्तक वाचू शकता! तुम्हाला अजिबात एवढा मोठा कुकर बरबटवायची , सारखे सारखे कढईत उलथणे हलवायची बिल्कुल गरज पडत नाही ! आता काहीजण म्हणतीलही की तव्यावरची पावभाजीचा बेश्ट म्हणून! हरकत नाही , माझ्यासाठी तर मी ” सखा माझा पांडुरंग”च्या धर्तीवर म्हणेन ” सखा माझा मायक्रोवेव्ह” , वेळोवेळी मला अडचणीत , कमी वेळेत उपयोगी पडणारा !
तर ही माझी रेसिपी तुमच्यासाठी, बघा आवडतेय का !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप= १२५ ग्रॅम्स फुलकोबी
- २ मध्यम आकाराचे बटाटे - साली काढून तुकडे करून =१५० ग्रॅम्स
- १/४ कप = ४० ग्रॅम्स ताजे किंवा फ्रोझन मटारचे दाणे
- १/४ कप= ४० ग्रॅम्स गाजर बारीक तुकडे करून
- १/४ कप=४० ग्रॅम्स भोपळी मिरची बारीक चिरून
- १ मोठा कांदा बारीक चिरून = १०० ग्रॅम्स
- २ मोठे टोमॅटो बारीक चिरून = २०० ग्रॅम्स
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
- २ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- १/४ टीस्पून हळद
- १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
- २ टेबलस्पून पाव भाजी मसाला
- मीठ चवीप्रमाणे
- बटर
- तेल
- https://microwavemasterchef.com/microwave-power-time-conversion/
- सर्वप्रथम आपण भाज्या शिजवून घेऊ . एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये फुलकोबी, गाजर, बटाटे,मटार, भोपळी मिरची , १ १/२ कप पाणी आणि थोडे मीठ घालून एकत्र मिसळून घेऊ.
- १२ मिनिटांचा टाइमर संपल्यावर हातात ग्लोव्हस घालूनच बाऊल ओव्हनच्या बाहेर काढून घेऊ. शिजलेल्या भाज्या चाळणीतून वेगळ्या करून पाणी दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेऊ. ह्या पाण्याचा उपयोग नंतर भाजी शिजवताना करता येईल तर ते फेकून देऊ नये.
- शिजलेल्या भाज्या एका पोटॅटो मॅशर ने छान लगदा करून घेऊ. किंवा तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता.
- मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये १ टेबलस्पून बटर आणि १ १/२ टेबलस्पून तेल घालून गरम करून घेऊ.
- बटर विरघळले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून नीट बटर आणि तेलात चमच्याने ढवळून घेऊ.
- ४ मिनिटांत कांदा छान परतला की त्यात आले लसणाची पेस्ट घालून मिसळावी.
- ३ मिनिटांनंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून शिजवून घेऊ.
- टोमॅटो शिजून नरम होतात. आता आपण सारे कोरडे मसाले म्हणजे हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, पावभाजी मसाला घालून घेऊ. थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेऊ. मसाले ढवळत असतानांच टोमॅटो चमच्याने दाबून मॅश करून घ्यावेत जेणेकरून त्यांचा लगदा होईल.
- आता वेळ आहे छानपैकी थोडे बटर घालून मॅश केलेल्या भाज्या घालायची! भाज्या शिजताना उरलेले पाणी आपण आता घालणार आहोत. जितकी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल तेवढे पाणी घालू. मी १ १/२ कप पाणी वापरले आहे.
- ४ मिनिटांनंतर टाइमर पॉज करून भाजी एकदा वरखाली ढवळून घेऊ. बाऊल परत ओव्हन मध्ये ठेवून उरलेल्या ३ मिनिटांसाठी भाजी शिजवून घेऊ.
- ३ मिनिटांनंतर भाजी शिजून तयार आहे.
- पाव शेकून घेऊ. तुम्ही गॅसवर तव्यावरही शेकू शकता किंवा जर तुमच्याकडे ओव्हन सेफ नॉनस्टिक तवा असेल तर त्यावर थोडे बटर चोपडून आणि थोडी भाजी घालून घ्यावी. त्यावर पाव ठेवावेत.
- गरम गरम लुसलुशीत पावाबरोबर ही मायक्रोवेव्ह पाव भाजी खाऊन बघाच ! काहीतरी वेगळे करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे नेहेमीच शक्य नसतो हो !

Leave a Reply