भारतीय खानपान हे सध्या संक्रमणास्थित आहे ! हे म्हणताना माझ्या डोक्यात काही विचार घोळत आहेत , तेच तुमच्यापुढे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न या ब्लॉग मधून ! चौरस आहार मिळावा म्हणून पौष्टिक खाण्याचे पर्याय शोधण्याच्या नादात आपण पार ग्लोबल खाद्यसंस्कृती रोजच्या जेवणात आत्मसात करण्यासाठी धडपडत आहोत . त्यात वाईट काहीच नाही , परंतु या प्रयत्नांत आपण आपल्या अवतीभवती ताजे पिकणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्सना अजाणतेपणी दुर्लक्ष करीत आहोत , म्हणजे ” काखेत कळसा नी गावाला वळसा ” अशातली गत होऊन राहिली ! ग्लोबल खाद्यसंस्कृतीच्या झगमगाटात आपल्या आज्या – पणज्यांचे पदार्थ जरासे बुजरे झालेत . म्हणूनच काळाच्या ओघात प्रवाहासोबत वाहताना नव्या सोबत जुनी अनुभवी वल्ह्णवं सुद्धा हाती राहू द्यावी इतकेच माझे म्हणणे !
एका धावत्या नजरेतून पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की , भारतातील कोणत्याही राज्यातील किंवा प्रदेशातील जेवणाची थाळी असो , ती सर्वार्थाने षड्रसांनी युक्त , चौरस अशीच असते आणि त्या त्या प्रदेशातील हवामानाला अनुसरून .
आहारातील मुख्य घटक म्हणजे पिष्टमय पदार्थ , स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने .. आजकाल जिममध्ये जा किंवा रेगुलर डॉक्टर चेकअपसाठी .. प्रत्येकजण आपल्याला या तीन घटकांचे संतुलन साधण्याचा सल्ला देत असतो . बाकी कार्बोहायड्रेट आणि फॅट्स यांचे स्रोत आपलयाला बरेच सापडतात , परंतु प्रथिने म्हणजे सतत डोक्यात होणारी टिकटिक .. आपल्या देशात निसर्गकृपेने बऱ्याच डाळी , कडधान्ये , पालेभाज्या , तृणधान्ये पिकवली जातात , ज्यात प्रथिनांसोबत जमिनीतल्या उपयुक्त क्षारांचा सुद्धा समावेश होतो . हे झाले Plant Proteins Sources .. जे मिश्राहारी आहेत त्यांना अजून प्रथिनांचा लाभ मिळतो तो मासे , अंडी , चिकन , मटण या प्राणिजन्य स्रोतांपासून ! इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या देशात बराच जनसमुदाय हा शुद्ध शाकाहारी वर्गात मोडतो , आणि Plant Proteins Sources व्यतिरिक्त प्रथिनांची गरज भागवण्यासाठी , दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर होतो . दुधामध्ये अतिमहत्त्वाची ९ अमिनो ऍसिड असल्याकारणाने ते ” Complete Protein ” म्हणून मानले जाते . त्यानंतर नंबर लागतो तो दह्याचा – आवडो किंवा नावडो , या दह्यात प्रथिने , कॅल्शिअम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असून मनुष्याच्या पचनशुद्धीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे . आपण भारतीयांना एकीकडे पटियाला ग्लास मध्ये भरलेल्या लस्सीचे अपार कौतुक तर कोणत्याही धार्मिक कार्यात नैवेद्याच्या पानात घट्ट वरण घातलेल्या भाताच्या मुदेवर चमच्याने अधमुरे दही आपसूकच घातले जाते .
आपल्या जेवणात दह्यापासून बनवलेली रायती , कोशिंबिरी , चटण्या यांबरोबर सगळ्यांची लाडकी कढी विसरून कसे चालेल ? मागे मी ताकाच्या कढीची ताकाची कढी रेसिपी शेअर केली होती, त्यानंतर पंजाबी कढी पकोडा आणि कोकमाचे सार कोकणी पद्धतीचे कोकमाचे सार ज्याला काही भागांत कोकम कढी असे देखील म्हणतात . आमच्या कोकणी घरांत दह्या-ताकापासून दोन प्रकारची कढी बनते – ताकाची कढी , आणि दह्याची कढी . बाकी सार , कळणं हे असे वेगवेगळे प्रकार बनतात .
ताकाची कढी ही जराशी पातळ , आणि आले,लसूण, मिरच्यांचा खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटलेला ठेचा लावून बनवलेली .. भातासोबत किंवा अशीच ओरपण्यास बेश्ट ! आज जी मी दह्याची कढी बनवतेय त्यात घरी लावलेले ताजे दही ( मला फार आंबट दही आवडतही नाही आणि सोसवतही ) किंवा जास्तीत जास्त १ दिवस जुने दही वापरून , गरजेप्रमाणे डाळीचे पीठ लावून बारीक आगीवर हळूहळू शिजवली जाते . म्हणजे त्यात साऱ्या चवी अगदी बागडत मिसळतात आणि छान मखमली अशी कढी बनते . या कढी सोबत आई नेहमी भरली वांगी बनवते आणि मी मुद्दाम तळणीच्या भरल्या मिरच्या ! अस्सा काही फर्मास बेत जमून येतो आणि काळ्याकुट्ट ढगांनी भरलेल्या आभाळामुळे स्वयंपाकघरात पसरलेलया अर्धोन्मीलित प्रकाशात , खिडकीबाहेर निसटू पाहणारा गरमागरम कढीचा वाफाळता सुगंध जेवणानंतरच्या वामकुक्षीची आर्जवे करू लागतो !

- साहित्य:
- • ४०० ग्रॅम्स दही
- • ४ टेबलस्पून बेसन ( ३० ग्रॅम्स )
- • १ टीस्पून साखर
- • मीठ चवीनुसार
- • २ टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर
- • ८-१० लसणीच्या पाकळ्या
- • १ इंच आल्याचा तुकडा
- • ३ हिरव्या मिरच्या
- • अर्धा टीस्पून हळद
- • २ टेबलसंपून तेल
- • १ टीस्पून मोहरी
- • पाव टीस्पून हिंग
- • १ टीस्पून जिरे
- • ८-१० कढीलिंबाची पाने
- • ३ सुक्या लाल मिरच्या
- कृती:
- • आले , लसूण आणि हिरव्या मिरच्या २-३ टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- • एका मोठ्या वाडग्यात दही , बेसन घालून नीट फेटून घ्यावे . गुठळ्या राहू देऊ नयेत . आता तयार केलेले हिरवे वाटण , साखर , मीठ , हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून नीट ढवळून घ्यावी .
- • आता २-३ कप पाणी घालावे . हे कढीचे मिश्रण एका कढईत घालावे , आणि मध्यम आचेवर एक हलकी उकळी येऊ द्यावी . पाच मिनिटांत एक उकळी आली की आच मंद करावी . कढी हळूहळू शिजू द्यावी . मधून मधून चमच्याने ढवळत राहावे .
- • २० ते २५ मिनिटे कढी बारीक आगीवर शिजली की चांगली घट्ट होते . गॅस बंद करावा .
- • फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , जिरे , हिंग , सुक्या लाल मिरच्या आणि कढीलिंबाची चुरचुरीत फोडणी करावी . ही फोडणी काढीत मिसळून लगेच झाकण घालावे .
- • कढी जराशी निवली कि जीरा भातासोबत वाढावी !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply