भारतीय खाद्यसंस्कृतीत कोकणी खाद्यसंस्कृती आपले एक ठळक वैशिष्ट्य लेऊन नांदते . कोकणात निसर्गात आढळणाऱ्या ताज्या , साध्या आणि मोजक्याच घटक पदार्थांचा वापर करून एक चविष्ट अशी पंगत कशी बसवावी , हे कोकणी घरांतल्या प्रत्येक अन्नपूर्णेला चांगलेच ठाऊक ! फणसासारख्या एकाच फळापासून , त्याच्या निरनिराळ्या जातीचा वापर करून अवचित आलेल्या पाहुण्याला तांदळाच्या मऊसूत भाकरीसोबत कोवळ्या कुयरीची भाजी , कुरण्या फणसाची चमचमीत कापे नी बरक्याच्या गऱ्यांचा रस चाळून कधी मोदकपात्रात उकडलेली सांदणे पानात पटदिशी वाढली जातील . हापूसचीही तीच गत .. अगदी पुरी बुचकळायला जायफळ घातलेल्या आमरसापासून ते आंबाभातापर्यंत , रायवळच्या आंबट तिखट सासवाने , पानात रंगीबेरंगी मेजवानी सजेल . दारातल्या तवशा , पपई नी भोपळ्याचे वडे नी आंबेमोहोराची खीर असली की खाणाऱ्या आत्म्याची ब्रह्मानंदी टाळी लागायला काय हो अवकाश ! उसळी, सांबारांशिवाय तर लग्नाचे वर्हाड अंगणातून बूड हलवेल तर शप्पथ … “अन्न हे पूर्णब्रह्म ” , मानणारी ही कोकणी खाद्यसंस्कृती आणि तिच्यावर अतीव प्रेम करणारा कोकणी मनुष्य साध्या ताम्बसाळाच्या भाताच्या पेजेवर सुद्धा म्हणूनच समाधानाने दिवस व्यतीत करतो . माझे हे वरील विवरण बऱ्याच जणांना पटेल , कारण त्यात अतिशयोक्ती काहीच नाही .
हे सगळे जरी असले तरी , कोकणी माणसं ” चवीने खाणार त्याला देव देणार “, या उक्तीची देखील प्रचंड भोक्ती ! कुणाची तरी पंगत जेवून आलेला आमचा संत्या काका , ” काय जल्ला तो आचारी , कोबीची भाजी केलान होती पचपचीत, मी सांगितलेय शिवलकरांसना , पुढल्या खेपेक यास नको बोलवू ” , असे अति शिजलेल्या कोबीच्या उपकारीचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही . भेंडीची भाजी बुळबुळीत झालेली , म्हणजे घरातल्यांनी आळशीपणाने कोकमा काय घरात साठवली नाय की काय , असा प्रश्न खाणाऱ्याला पडू शकतो हो ..इस्टेट गेली तरी बेहत्तर , पण बांगड्याच्या सुक्क्या – कालवणात तिरफळा नाय असा होऊचाच नाय ! गवारीच्या सुक्या भाजीत कारळे कुटून घातलेच पाहिजे , हा जणू दंडकच ! एकदा माझी शाळेतून यायची वेळ झाली होती , म्हणून आजीने घाईघाईने पिठले बनवले , आणि ते होते साधे मिरची , लसणाच्या फोडणीचे .. आता जरी हे क्विक पिठले माझे आवडीचे असले तरी तेव्हा आमच्या रत्नागिरी पद्धतीच्या हिरव्या मसाल्यातल्या पिठल्याची चव खूप आवडायची . मी जेवताना निमूट जेवले पण खेळायला जाताना, ” ए आज्जे , केलेस तर पाट्यावर वाटून कर पिठले , नाही तर नको ब्वा मला ..” असे म्हणून ,” कार्टे लैच शेफारलीय चवीची कोंबडी .” असा आजीने हसत हसत घातलेला धपाटा खाऊन मी पळाले सुद्धा !
तर आमच्या या कोकणी जिव्हा रसास्वादासाठी आसुसलेल्या .. केळीचे अख्खे पान भरून मेजवानी असली तरी पानाच्या डावीकडील , लोणची , पापड , सांडगी मिरच्या , चटण्या सुद्धा अगदी चाटून पुसून खाल्या जातात ! रात्री पटकन टाकलेल्या कुळदाच्या पिठीसासोबत आमच्याकडे पोह्याचे मिरगुंड तळायला कोणी विसरत नाही . साध्या वरण भातासोबत आंब्याचे ताजे करकरीत लोणचे नी आमटी भातासोबत सांडगी मिरची वाढली जाते . लसूण- खोबऱ्याची लालेलाल चटणी पिठले भाताच्या गोळ्याशेजारी शोभतेच . आईने मस्त वाफाळता कढी भात केला असला की अचानक आलेला पद्या मामा , ” ए सुमन , वाईच तोंडी लावूक कायतरी हाय ना “, या प्रश्नावर आईने हसून हो म्हटल्यावरच जेवूक बसतो .. आणि मग आईने भिड्यावर खरपूस तळलेल्या मिरच्यांचा सुगंध नाकात शिरताक्षणीच , ” वाढ गे लवकर , पोटात उंदीर कबड्डी खेलूक लागले आता “, असे म्हणत स्वतःच ताट- वाटी -तांब्या मांडावयास घेतो .
कोकणात मुसळधार पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा भाज्या , मासे यांचा तुटवडा असतो तेव्हा कोणत्याही आमटी , कढी सोबत मिरच्या भरून मस्तपैकी तळल्या जातात . त्यांच्या सारणात हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच घटक पदार्थ , पण ताज्या मिरच्यांच्या करकरीतपणाने चवीचा मामला एकदम फिट्ट बसतो . माझा तर शनिवार दुपारचा नेहमीचा आवडीचा मेनू – मसुराची आमटी किंवा ताकाची कढी , भात आणि भरल्या मिरच्या .. मग द्यायची सोफ्यावर पथारी पसरून किंवा बाल्कनीत चिंब कोसळणारा पाऊस बघत आरामखुर्चीतच एक डुलकी ..

- साहित्य:
- • २५० ग्रॅम्स लांब किंवा बुटक्या जाड अशा हिरव्या मिरच्या ( भावनगरी असेल तर उत्तम )
- • २ कप = १८० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- • १ लिंबाचा रस
- • दीड टीस्पून हळद
- • पाव टीस्पून हिंग
- • चवीपुरते मीठ
- • अर्धा कप बेसन ( चण्याचे पीठ )
- • तेल
- कृती:
- • मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसून घ्याव्यात . मिरच्यांच्या मधोमध देठापासून ते टोकापर्यंत एक लांब चीर पडून घ्यावी . देठ तुटू देऊ नये .
- • एका मोठ्या वाडग्यात किसलेले खोबरे , हळद १ टीस्पून , हिंग , कोथिंबीर आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे . लिंबाचा रस घालून ढवळून घ्यावे .
- • आता बेसन घालून एकत्र मिळून घ्यावे जेणेकरून आपल्याला ते मिरच्यांत भरता येईल .
- • हे सारण मिरच्यांच्या दाबून भरावे परंतु जास्त भरून मिरच्या तुटू देऊ नयेत नाहीतर त्या तेलात सोडता क्षणीच पसरतात .
- • एका पसरट तव्यात ४-५ टेबलस्पून तेल गरम करावे , तेल चांगले तापले की आच मंद करून हळूच मिरच्या तेलात सोडाव्यात . व्यवस्थित कडा पालटून खरपूस तळून ( शॅलो फ्राय ) घ्याव्यात .
- • या मिरच्या गरमागरम कढी भात , कोकम सार भात किंवा मसुराच्या आमटीसोबत वाढाव्यात .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply