या जगात कुठे विरोधाभासांत आनंद निर्माण होतो , हे पहायचे असेल तर ती दुनिया आहे मुंबईत .. ही स्वप्ननगरी , इथे भले भले हिंमत बाळगून , अतिशय कष्ट करून आपल्या लहानमोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडत .. आणि गंमत पहा , स्वप्न पाहायला डोळे मिटून एक शांत झोप तरी असावी , तर तसे नाही हं ! ” Mumbai – a city that never sleeps” म्हणून या शहराचा गाजावाजा ! आहे की नाही अजब विरोधाभास ! म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले की , मुंबई म्हणजे चकित करणाऱ्या सुंदर विरोधाभासांची दुनिया – तुमची ,आमची ,सगळ्यांची – स्वप्नांची दुनिया !
पण ही स्वप्नं सगळ्यांचीच पूर्ण होतात का , तर नाही .. जो ही स्वप्नं उघड्या डोळ्यांनी आणि खुल्या अंतःकरणाने पाहतो , त्यासाठी प्रयत्न करतो , त्यालाच यश मिळते , हे काही वेगळे सांगायला नको ! असे म्हणतात ना , ” Don’t tell people your dreams show them !” त्यातलाच हा भाग…
माझी शाळा होती दादरला , शाळेच्या भव्यदिव्य वास्तूप्रमाणे , तिथले विशाल पटांगण .. आणि सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मोजकेच पण अतिशय चविष्ट पदार्थ विक्रीस ठेवणारे कँटीन ! माझ्यासारख्या माझ्या घोळक्यातल्या मैत्रिणी देखील ” चवीच्या कोंबड्या “! त्याकाळचा नव्वदीच्या दशकातला आमचा पॉकेटमनी आज कोणी ऐकला तर हास्याचे फवारे उडतील . त्या तुटपुंज्या पॉकेटमनी मध्ये कधी कँटीनचा वडापाव , हॉटडॉग , खोदादाद सर्कल जवळ डी. दामोदरचा सामोसा किंवा खांडवी , आणि महिनाअखेरीस राहिलेल्या २-४ रुपयांच्या चिंचा , बोरे , कैऱ्या नी बडीशेपची फुले , अशी काही ना काही आमची खादाडी अखंड चालू राहायची ! या शिवाय आम्ही शाळा नी तिच्या भोवतीची परीघ सीमा कधीच लांघली नाही . एकदा नववीच्या परीक्षेनंतर पैसे साठवून दादरच्या तृप्ती हॉटेलातील मसाला डोसा आणि एका दुसऱ्या लहान हॉटेलात मसाला पाव हाणला होता , तेही आम्ही एकट्या मुलीच आहोत , बरोबर मोठे कोणी नाही , असं न दाखवता !
शाळेनंतर डिप्लोमा इंजिनीरिंग कॉलेजमध्ये मात्र आईने पॉकेटमनी वाढवला , अहंहं खादाडीसाठी नाही , तर कधी झेरॉक्स काढायला , जर्नल पेजेस विकत घ्यायला , अशा आणीबाणीसाठी ! वीजेटीआयला कॉलेजच्या मागच्या गेटला आमचा घरी जाण्यासाठी बीएसटी बसस्टॉप .. नेहमीची बस यायच्या आधी १५ मिनिटे धावत जाऊन मागच्या टपरीवर ब्रेड पॅटीस खात बसायचो . नंतर नंतर आमच्यातल्याच कोण्या खवय्या गुप्तहेराने बातमी आणली , की दोन स्टॉप आधी चालत गेले तर महेश्वरी उद्यानाजवळ नवीन सॉफ्टी कॉर्नर उघडलेय .. फक्त दहा रुपयांत ही लांबुडकी सॉफ्टी मिळायची . मग चालली आमची वारी सॉफ्टी कॉर्नरकडे .. तिथे बाजूलाच एक सॅन्डविचवाला रोज संध्याकाळी चारच्या सुमारास आपला छोटासा ठेला लावायचा . त्याच्या ढकलगाडीवर एक कोळशाची शेगडी , त्यावर तापत ठेवलेला कुठल्याश्या धातूचा टोस्टर , त्याच्या रंगावरून तो लोखंडी होता की अलुमिनियमचा , ते सांगणे कठीण ! व्यवस्थित बारीक चिरलेल्या भाज्या – भोपळी मिरची , बीट रूट, कांदा , टोमॅटो , मिरच्या , कोथिंबीर , बटाट्याच्या चकत्या, चीज, बटर, चटणी या सगळ्यांचे डबे – त्यावरची अर्धकलती झाकणे … मिरपूड, लाल तिखट , चाट मसाला , काळे मीठ , जिरे पूड हे चवींचे शिलेदार छोट्या प्लास्टिक डब्यांत भरलेले ! मोजून इन मीन तीन प्रकारची सँडविच विकायचा .. जे गिर्हाईक येईल त्याच्या आवडीनुसार भाज्या घालून मसाल्यांच्या चटपटीत स्वादात अस्से काही सँडविच परफेक्ट ग्रिल करून कागदी प्लेटमध्ये बटरपेपर वर द्यायचा आणि वरून कोथिंबीर- पुदिन्याची तिखट चटणी आणि आंबट गोड टोमॅटो केचअप.. त्याच्या हातांचे हे सफाईदार कौशल्य पाहताना कित्येकदा मला हातातील सॉफ्टी विरघळल्याचे भान सुद्धा राहिले नाहीय ! या सॅन्डविचवाल्याच्या कार्यक्रमात मी कधीही खंड पडलेला किंवा त्याने सुट्टी घेतलेली मला आठवत नाही .
अखेरीस त्याच्या सॅन्डविचवरचे चीज ज्या रीतीने वितळायचे त्या रीतीने तोंडाला घळाघळा पाणी सुटून आम्ही एके दिवशी त्याच्या गाडीवर धाड टाकलीच . नेहमी वडापाव , दाबेली , चाट पाहून विरघळणारी मी , टपरीवरच्या सॅन्डविचचा आनंद पहिल्यांदाच घेत होते . आम्ही मैत्रिणींनी त्याच्याकडे होते नव्हते ते सगळ्या प्रकारची सँडविच विकत घेऊन , ” भैया एक्सट्रा तिखी चटनी , एक्सट्रा चीज ” अशा ऑर्डरी देऊन तुडुंब पोटोबा केला . त्यानंतर त्या चवींनी जी चटक लावली की आठवड्यातून दोन दिवस तरी ग्रिलड सँडविचेस मनसोक्त खायचो नी समोरच्या फ्लायओव्हरवरून लाल रंगात लिहिलेली ३६८ लिमिटेड ची पाटी हलवत येणारी बीईएसटी दिसली रे दिसली की एका हातात सँडविचेस ची कागदी प्लेट घेऊन चटणी माखलेला दुसरा हात बससमोर हलवत आम्ही पलीकडच्या बसस्टॉप वर पळायचो . मागून बिचाऱ्या सॅन्डविचवालया भैय्याचा काळजीयुक्त सूर ऐकू यायचा , ” संभल के बेटाजी , गाडी देखके क्रॉस करो !”
या नंतर मी आजतागायत कितीतरी ठिकाणी , कितीतरी वेळा ग्रिलड सँडविच खाल्ले असेल , अगदी टपरीपासून ते फाईव्ह स्टारपर्यंत . परंतु म्हणतात ना , ” आयुष्यातले पहिले प्रेम कधी विसरता येत नाही , तसेच चवींचा पहिला वहिला चस्का सुद्धा नाही बरं का !”
मागे काही वर्षांपूर्वी एकदा डिप्लोमाच्या मॆत्रिणीशी बोलताना ही आठवण निघाली , तेव्हा तिने जे मला सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का मुळीच बसला नाही , उलटपक्षी अत्यानंद्च झाला . कारण ज्या तर्हेने तो मेहनत करत होता , त्याचे स्वप्न पूर्ण होणारच होते . त्या सँडविच वाल्याने आपला हातगाडी वरून प्रवास सुरु करून तिकडे उत्तम पक्क्या बांधणीचे स्वतःचा गाळा खरेदी करून सँडविच कॉर्नर टाकलंय .. आणि आताही मदतनीसांसोबत स्वतः किचनमध्ये काम करून लोकांना हवे तसे सँडविच बनवून खाऊ घालतोय .
Paulo Cohelo’ ने लिहिल्याप्रमाणे “And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it” , हा चवींचा किमयागार ( Alchemist ) आपले प्रगतीचे स्वप्न साकार करण्यात यशस्वी झालाय ! या सॅन्डविचवाल्यासारख्या अशा कित्येक कहाण्या साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाल्या असतील , फक्त नी फक्त मेहनतीवर .. म्हणूनच स्वप्नरंजन करणाऱ्यांनो , नक्की मोठी स्वप्ने बघा , आणि ती पूर्ण करायला जीवतोड मेहनत करा , हेच सांगते आपली ” ये है मुंबई मेरी जान “!
पावसाळी संध्याकाळी मेघ दाटून आल्याप्रमाणे मनात साचलेल्या या आठवणी आणि सोबतची खादाडी – बॉम्बे व्हेज चीज ग्रिल्ड सँडविच !

- साहित्य:
- • ६ व्हाईट / ब्राउन ब्रेड स्लाईस
- • १ मोठा कांदा बारीक चिरून
- • २ टोमॅटोच्या पातळ चकत्या
- • १ भोपळी मिरची लांब बारीक चिरून
- • २ उकडलेल्या बटाट्यांच्या चकत्या
- • १ टीस्पून चाट मसाला
- • मीठ चवीनुसार
- • अर्धा कप कोथिंबीर पुदिन्याची चटणी
- • बटर
- • चीज
- • एका सॅन्डविचसाठी आपण ३ ब्रेड स्लाईसेस वापरणार आहोत . प्रत्येक स्लाईस वर बटर लावून घ्यावे . त्यानंतर प्रत्येक स्लाइसवर हिरवी चटणी चांगली दाटसर लावून घ्यावी .
- • सगळ्यात पहिल्या स्लाइसवर बटाट्याच्या चकत्या ठेवाव्यात . त्यावर चिरलेला कांदा घालावा . थोडे मीठ भुरभुरावे . त्यावर दुसरी स्लाइस अलगद ठेवावी . हा सॅन्डविचचा पहिला थर तयार !
- • नंतर दुसऱ्या स्लाइसवर टोमॅटोच्या चकत्या आणि भोपळी मिरचीचे तुकडे घालावेत . त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरावा . चीज किसून घालावे .
- • शेवटची ब्रेड स्लाईस अलगद दाबून बसवावी .
- • सँडविच ग्रिल करण्यासाठी थोडे बटर ग्रील पॅन वर वितळवून घ्यावे . आच मंद करून त्यावर सँडविच ठेवावे . २ मिनिटे एका बाजूने खरपूस भाजू द्यावे .
- • सॅन्डविचची बाजू उलटण्याआधी वरून थोडे बटर लावावे . दुसऱ्या बाजूने देखील ग्रिल होऊ द्यावे .
- • गरमागरम सँडविच आपल्याला आवडेल त्या आकारात कापून चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत खायला द्यावे .
- महत्त्वाच्या टिप्स:
- सँडविच साठी ब्रेडवर बटर लावताना ते कधीही वितळवून घेऊ नये . ब्रेड मऊ पडतो आणि तुटू शकतो . सँडविच बनवण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी फ्रिजमधून बटर बाहेर काढावे ,म्हणजे ते आपोआप रूम टेम्परेचरला येऊन मऊ होते , आणि ब्रेडवर व्यवस्थित पसरते .
- काही जणांना ब्रेड च्या कडा सँडविच खाताना आवडत नाहीत . परंतु सँडविच पूर्ण ग्रिल होऊन तयार होईपर्यंत त्या कडा कापू नयेत . कारण सँडविच ग्रिल होताना त्यांचा एक भक्कम आधार मिळतो अन सँडविच उलटताना तुटत नाही .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply