हाडाच्या मत्स्यगोत्रींना तळलेले मासे म्हणजे स्वर्गानुभवच ! त्यातून सुरमई , पापलेट , रावस असा समुद्राचा फडफडीत चंदेरी खजिना जेव्हा कोळणींच्या टोपल्यांत सजतो तेव्हा ठरलेलं नसताना सुद्धा बाजारच्या पिशवीतून एखादी लांबुडकी सुरमईची शेपटी बाहेर डोकावत हळूच स्वयंपाकघरात ओट्यावर विसावते .
त्यातून पापलेट म्हणजे समुद्राचे चंदेरी सोने .. बरोबर म्हणतेय ना ? अहो , “माशांचा राजा” म्हणावा अशी या पापलेटची ख्याती ! एक तर चवीला सगळ्यात उत्तम , त्यातून साफ करायला सोप्पा .. माझी आजी तर तिचे दंताजीचे ठाणे उठलेले तोंडाचे बोळके सावरत म्हणायची, ” पापलेट ना , आता होईल रांधून , सगळ्यात सोच्छ sss म्हावरा तो !” – एकच मधला मोठा काटा आणि बाकीचे लिंबू- टिंबु काटे सोडले तर खायला म्हणून सान – थोरांचा फ्याव sss रेट मासा ! इतकेच काय नवोदित मत्स्यप्रेमी सुद्धा प्रॅक्टिस म्हणून आणि बिलकुल वास न येणारा मासा म्हणून पापलेटचीच निवड करतात ! म्हणूनच कुठल्याही हॉटेलात , मग ते कोकणच्या घाटातील गर्द वनराजीतले लाल मातीच्या घरातील असो की , ” युअर ऑर्डर प्लीज , मॅडम “, म्हणून टाय बूट घातलेल्या सर्व्हर्स नी भरलेले पंच/सप्त – तारांकित असो , पापलेटचा ताठा हा मेनूकार्ड वर दिसतोच !
आता माझीच गंमत तुम्हाला सांगते .. रत्नागिरीतील ” माशांचा गाव ” , अशी ख्याती असलेले मिऱ्या बंदर , आणि त्या बंदरावर समुद्राच्या गाजेच्या आवर्तनात एका कोकणी घरात माशांच्या वारी – रविवारी ( सगळ्यांसाठी तो सूर्यदेवतेचा वार असला तरी ) अस्मादिकांनी जन्म घेताना ” ट्यँहव sss ” केले . कोणत्याही आकारमानाचे मासे खाताना, ” काट्याने काटा काढणे ” , या मराठी वाक्प्रचाराचा अर्थ अंगी सॉरी तोंडी बाणवून, ताटाबाहेर फक्त काट्यांचा ढीग लावणे , हे आम्हाला उत्तम जमते ! मासे विकत घेताना , मग ते खचाखच भरलेल्या मासळी बाजारात की आता दुकानात , कालवण / सुक्क्यासाठी लहान मासे घेऊन झाले , तोंडी लावायला , तळायला सुरमई , रावस पिशवीत भरला तरी , हिरोईनने नकार दिलेल्या हिरोसारखी , मी मागे वळून वळून त्या पापलेट कडे प्रेमाने पाहतच असते . मग शेवटी पार्टनर वैतागून ओंकारला ( माझा मासेवाला मैतर , पूर्वजन्मीच्या भाऊरायाच म्हणेन ) म्हणतोच , ” भर दे यार दो पापलेट अख्खा “, आणि मग चरफडत माझं बकोट खसकन ओढत दुकानाबाहेर पडतो .
माशांवरच्या अतीव प्रेमामुळेच मला कोळीगीतं सुद्धा जाम आवडतात , आणि अशा अत्यानंदाच्या प्रसंगी आपसूकच तोंडात येतेच की हो , ” माझ्या सरंगा , माज्या सरंगा , चंदेरी पापलेटा रं , खापरी पापलेटा रं .. चल जाऊया घरा .. तळते तुला रं अख्खा भरून , नाहीतर तुकड्या पिठात घोळवून अ अ अ ….. ”
तर या पूर्वी मी पापलेट हिरवा मसाला , झटपट लगबगीच्या वेळेत होणारे कुरकुरीत पापलेट फ्राय शेअर केलेच आहे . आजची रेसिपी थोडी विस्तारीत , कारण यात आपण पापलेट दोनदा मॅरीनेट करणार आहोत आणि तुमच्या घरातल्या पार्टीसाठी एकदम मस्त अशी स्टार्टर रेसिपी ! या रेसिपीत मी खापरी पापलेट वापरले आहेत , जे नेहमीच्या चंदेरी , तुकतुकीत पापलेटहून जास्त खवले असणारे आणि साधारण काळसर रंगाचे . या पापलेटविषयी मी सविस्तर लिहीनच , माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये , तोपर्यंत तुम्ही नक्की बनवून पहा हे चमचमीत तवा पापलेट फ्राय!

- साहित्य:
- • २५० ग्रॅम्स पापलेट , स्वच्छ धुऊन , लांब पातळ तुकड्या करून
- • १ टीस्पून हळद
- • मीठ
- • १ टेबलस्पून चिंचेचा गोळा
- • दीड इंच आल्याचा तुकडा
- • ४-५ हिरव्या मिरच्या
- • ८-१० लसणीच्या पाकळ्या
- • पाव कप कोथिंबीर
- • ३ टेबलस्पून मालवणी मसाला
- • ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- • तेल
- कृती:
- • पापलेटच्या तुकड्यांना हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून बाजूला ठेवावे.
- • हिरवे वाटण बनवण्यासाठी मिक्सरमधून आले , लसूण , चिंच , मिरच्या , कोथिंबीर व फक्त १ टेबलस्पून पाणी घालून घट्ट गोळा वाटून घ्यावा .
- • ही पेस्ट पापलेटच्या तुकड्यांना लावून २० ते ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे पेस्ट व्यवस्थित तुकड्यांना चिकटून राहते .
- • आता एका ताटलीत तुकड्यांच्या वरच्या आवरणासाठी कोरडे पीठ , मालवणी मसाला आणि मीठ मिसळून घ्यावे .
- • एका पसरट तव्यात २-३ टेबल्स्पून तेल गरम करून व्यवस्थित तव्यात पसरून घ्यावे . तेल चांगले तापले की आच मंद करावी .
- • कोरड्या मिश्रणात एकेक पापलेटची तुकडी चांगली दाबून घोळवावी . तव्यात कडेने सोडून या तुकड्या दोन्ही बाजूंनी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात ( साधारण २-३ मिनिटे एक बाजू तळून घ्यावी) .
- • हे तळलेले पापलेट नेहमीच्या फिश थाळीत तर शोभतेच पण स्टार्टर म्हणून अतिशय भाव खाऊन जाते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply