मनुष्याचे जीवन सुखकर करण्याचे काम करतात – विरंगुळ्याची साधने ! वाचन , नृत्य, नाट्य, चित्रकला , खाणे, पिणे अशा निरनिराळ्या विरंगुळ्यासोबत “झोपणे ” हा विरंगुळा असू शकतो का ? अहो , द्या टाळी , असतोच मुळी ! उदाहरण पाहायचे असेल तर माझ्याकडेच बघा .. शांत झोप घेणे , अगदी ” sleep like a baby ” , ही उक्ती मी तंतोतंत खरी ठरवली आहे . हा आनुवंशिक गुण बाबाकडून माझ्यात चांगलाच उतरलाय .
जरा चालत्या ट्रेनमध्ये किंवा कारच्या खिडकीतून थंड हवेची झुळूक लागली , किंवा आताची पावसाळी हवा तर चांगलीच माझ्या पथ्यावर पडलीय , हेच कशाला गल्लीत पोरे एकमेकांचे झगे नी पॅंटी पकडून तोंडाने झुक झुक करीत आगीनगाडी खेळायला लागलीत तरी वर बाल्कनीत उभी असलेली मी जांभयांवर जांभया घ्यायला लागते ! आणि ही झोप अशी तशी नाही बरं का .. वेगवेगळ्या सप्तकातले माझे घोरणे बॅकग्राऊंड स्कोअर वाजवतेच ! आता माहोल आहे , म्युजिक आहे मग थोडे हातपाय तर हालणारच ना झोपेत .. पूर्वी अगदी इंजिनीअरिंग कॉलेज पर्यंत आजी आईला म्हणायची , ” सुमन , या पोरीला माझ्या बाजूला झोपवू नको , लै कवळता ती झोपेत , माझी हाडं दुखतात.. ” असे रोज म्हणायची नी तरी रात्री बाजूला लाडाने थोपटत झोपवायची. आता कधी मंदी पार्टनरच्या पेकाटात लाथ बसते , नाहीतर त्याला ढकलत ढकलत बिचारा पलंगावरून कडेलोट कोणत्याही क्षणी होईल अशा कॉर्नरवर पोहोचतो ! हां , एवढे मात्र आहे , झोप कितीही प्रिय असली तरी माझ्या कामाच्या वेळी , असाईन्मेंटच्या वेळी ती उडवून काम करण्याचे बळ सुद्धा तितकेच आहे माझ्यात, ही एक जमेची बाब ! जर पार्टनरने किंवा आईने माझ्या या झोपेवरून चिडवलेच तर नुकतेच वाचनात आलेलं दलाई लामांचे वाक्य मी त्यांना अगदी नाक उडवत म्हणते , ” Sleep is the best meditation !” अहो खरंच आहे ते .. चांगली झोप लागणे , हे वरदानच !
तर या झोपेमुळे कधी कधी माझ्या अलार्मची नकळत मुस्कटदाबी होते नी मग अर्ध्या पाऊण तासाचा उशीर सुद्धा कव्हर करायला बाजीप्रभूंसारखा दांडपट्टा फिरवून कामाचा फडशा पाडावा लागतो . न्याहारी , दुपारच्या जेवणाची तयारी हे सगळं आवरून सकाळच्या दहाच्या ठोक्याला लॅपटॉप गाठणं ( आताच्या वर्क फ्रॉम होम च्या जमान्यात ‘ ऑफिस गाठणं ‘ या धर्तीवर वाचावे ) हे एक आव्हानच..
अशा वेळेला शनिवारी रविवारी बाजार भरल्यानंतर स्वच्छ धुऊन , झिपलॉक मध्ये चिरून ठेवलेल्या भाज्या ऐन वेळेस कामी येतात . त्या दिवशी वेळकाढू स्वयंपाक अजिबात परवडेबल नसल्याने , पटकन फोडणीत शिजणाऱ्या , ओट्यासमोर उभं राहून लक्ष न द्याव्या लागणाऱ्या , आणि एक्झॅक्ट घड्याळात वेळ लावून शिजणाऱ्या भाज्या बनवणे अगदी पथ्यावर पडते .
कोबी व चण्याच्या डाळीची उपकरी ही कोकण किनारपट्टीवर रोजच्या जेवणात बनवली जाणारी अशीच एक भाजी आहे .”उप”करी – या शब्दाच्या फोडीतच अर्थ दडलेला आहे , जिला आपण इंग्रजीत “Side Dish ” म्हणतो , तीच ही उपकरी ! तेलात फोडणी तड्तडवून नुसती परतलेली भाजी नी त्यावर शेवटी ओल्या ताज्या खोबऱ्याची पखरण , इतकं साधं सोप्पं हे प्रकरण !ही भाजी दिसायला अतिशय साधी , बनवायला सोप्पी तरीही चव आणि पोषणमूल्ये यात १०० टक्के देणारी ! पोळी, फुलके , चपाती यांच्यासोबत डब्यात पॅक करून देता येण्यासारखी ही भाजी , कांदा -लसूण विरहित असल्याने केळीच्या पानावरील पंगतीत आणि नैवेद्याच्या पानात वरण भाताच्या मुदेशेजारी रंगांचा एक सुंदर कॉन्ट्रास्ट देऊन जाते ! इतकेच काय तर व्यायाम करणार्यांनी , वजन कमी करण्यासाठी डाएट करणार्यांनीही आपल्या meal मध्ये या भाजीचा समावेश सॅलड म्हणून करू शकता ! आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी कोबीची पोषणमूल्ये :
- कोबी लो कॅलरी भाजी असून भरपूर व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स नी युक्त !
- शरीराचा दाह कमी करण्यास कोबीचा वापर केला जाऊ शकतो .
- कोबीत पचन सुलभ करणारे तंतुमय घटक जास्त असल्याकारणाने पचनसंस्था आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते .
- हृदयाच्या कार्यपद्धतीसाठी ही भाजी अतिउत्तम !
इतकी पौष्टिक भाजी शिजवताना फक्त थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे म्हणजे त्यातली पोषणमूल्यांचा ऱ्हास न होता शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल . कोबीच्या भाजीच्या शिजवण्यासंदर्भात आमच्या संत्या काकाची एक गंमत सांगितल्याशिवाय राहवत नाहीय म्हणून सांगतेय .. श्रावणात कोणाकडे तरी पंगत जेवून आला नी , घरात शिरताक्षणीच आईला म्हणतो कसा , ” वैनी, काय ता कोबीत घडाभर पाणी वतलन होतासा वाटलेन , भाजी केलेन मेणचट नुसती … ” कोकणी माणूस साग्रसंगीत तसेच साध्या पद्धतीच्या जेवणाचा भोक्ता असला तरी चवीच्या बाबतीत एकदम particular ! म्हणूनच या छोट्याश्या टिप्स:
- कोबीमध्ये स्वतःचे पाणी भरपूर असते त्यामुळे त्यात उगाचच अधिक पाणी घालून शिजवू नये . वाफवण्याच्या म्हणजेच steaming प्रक्रियेने कोबी शिजवणे उत्तम !
- साधारण ८ मिनिटे कोबी शिजवल्याने हळूहळू त्यातील सल्फरयुक्त द्रव्ये ( हायड्रोजन सल्फाईड ) हळूहळू बाहेर पडण्यास सुरवात होते . म्हणून कोबी शक्यतो जरासा मऊ होईपर्यंतच शिजवावा , त्यातील crunch राहिला तरच भाजी छान लागते . नाहीतर अति शिजून भाजीला त्या सल्फरयुक्त द्रव्यांचा एक उग्र दर्प यायला लागतो आणि पोषणमूल्ये नष्ट होतात ते वेगळेच !
मग आता कोबीपासून दूर पळणाऱ्यांनो , एकदा ही कोकणी पद्धतीची कोबीची चणा डाळ घालून भाजी करून पहाच . या श्रावण महिन्यातल्या सात्त्विक आहाराचा आनंद सभोवतालच्या वातावरणामुळे अजून द्विगुणित होतो की नाही पहा !

- साहित्य:
- • ५०० ग्रॅम्स कोबी लांब चिरून
- • अर्धा कप चण्याची डाळ
- • १ टीस्पून मोहरी
- • अर्धा टीस्पून हिंग
- • कढीलिंबाची पाने ८-१०
- • ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- • १ टीस्पून हळद
- • १ कप किसलेले ओले खोबरे
- • तेल
- • मीठ
- कृती:
- • चण्याची डाळ स्वच्छ धुऊन पाण्यात १ तासासाठी भिजत घालावी . नंतर पाणी काढून टाकावे .
- • एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी , हिंग आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी .
- • आता भिजवलेली चण्याची डाळ घालून परतून घ्यावी ,
- • साधारण ५-६ मिनिटे डाळ शिजवून घ्यावी . आता हळद घालावी आणि १ मिनिट परतून घ्यावी .
- • चिरलेला कोबी घालून नीट एकत्र करून घ्यावे.
- • वाफवण्याच्या प्रक्रियेने कोबी झाकून शिजवून घ्यावा . जास्तीचे पाणी घालू नये .
- • साधारण ८ ते १० मिनिटांत कोबी शिजतो . नंतर चवीपुरते मीठ घालावे .
- • त्यावर किसलेले ओले खोबरे घालावे . नीट एकत्र करावे .
- • कोबीची उपकरी तयार आहे . पोळी , फुलके किंवा वरण भातासोबत वाढावी .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply