भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत दह्याला अतिशय महत्त्व दिले जाते हे सर्वश्रुत आहेच! त्याचे कारण असे की दह्यात कमालीचा थंडावा असून उदर स्वच्छ करण्याची याची क्षमता आहे.
म्हणूनच भारताच्या उत्तरेकडून ते दक्षिणेकडे, आणि पूर्वेपासून ते पश्चिमेकडे प्रत्येक थाळीत दह्याने बनवलेले एक तरी व्यंजन असतेच. मग तो दिल्लीचा कढी पकोडा असो , उत्तर प्रदेश आणि बिहारची कढी बडी असो की केरळची पछडी ! दह्याचे रायते हा असाच झटपट बनणारा स्वादिष्ट प्रकार! अहो इतकेच काय राजस्थानचे चने जैसलमेर के तर एकदा खाऊनच बघा, एकदा माझ्या नणंद बाई आणि जाऊबाई घरी आल्या होत्या तर काय वेगळे करायचे म्हणून त्यांच्यासाठी मी बनवले होते जैसलमेरी चणे तर माझ्या पिटूकल्या भाच्याने अगदी आवडीने खाल्ली हो चण्याची कढी … , “ चण्याची कढी ” हे त्यानेच केलेले नामकरण हां! माझ्या हिंदी यूट्यूबचॅनेल आणि इंग्रजी वेबसाइट वर आहे ही रेसिपी, नक्की पहा आणि करून बघा, आवडेल तुम्हाला.
आतापर्यंत तुम्हाला कळलच असेल की मी हे लांबलचक कढी पुराण का चालू केलेय, हो हो मी आज कढीच बनवतेय. लैई कंटाळा आलाय राव वरण भाताचा कुक्कर लावा . मग भाजी बनवा आणि पोळ्यांपासून तर सुटकाच नाही . आज माझा खूप मूड झालाय जरा माझ्या फूल झाडांसोबत गप्पा मारायचा, बिचारे दुपारी एकटेच डोलत असतात , आज त्यांना नवीन खत खाऊ घालते आणि थोडे कुरवाळते , काय सांगू तुम्हाला लगेच्च लाडात येतात आणि टवटवीत दिसतात! तर आज जेवणाचा शॉर्टकट म्हणजे ताकाची कढी आणि वाफाळलेला भात , एका तासात स्वयंपाकघर आवरून माझी स्वारी तयार!
सासूबाईंचीही कळी अगदी कढी भाताचे नाव घेतले की खुलते, त्यांना खूप आवडते. फ्रीज मधे दही आहे , जरासे आंबटच आहे , मग काय घुसळले ताक , आणि जी चर्र्र फोडणी बसलीय ना म्हणून सांगू. वाह मजा आली! माझी आई जेव्हा ही कढी करते ना तेव्हा भरलेल्या भावनगरी मिरच्या न चुकता तळते, आता माझ्याकडे नाही आहेत , मी तळणीच्या सक्या मिरच्या काढल्या आणि वाढले सासू सासर्यांना! आररे हा कसला आवाज येतोय .. मजा सांगू का सासू बाई खाताना बोटे चोखतायत!
चला तर मग तुम्ही ही करून पहा ही कढी आणि घ्या एखादे आवडीचे पुस्तक हातात वाचायला या निवांत दुपारी!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 1. 1½ कप दही - 300 ग्रॅम
- 2. 3 हिरव्या मिरच्या
- 3. 10-12 कढीपत्ता
- 4. पाणी गरजेनुसार
- 5. 1 इंच आल्याचा तुकडा
- 6. 7-8 लसणीच्या पाकळ्या
- 7. 1 ½ टेबल स्पून बेसन ( चण्याचे पीठ )
- 8. ½ टी स्पून मोहरी
- 9. ½ टी स्पून जीरे
- 10. ¼ टी स्पून हिंग
- 11. 3 लसणीच्या पाकळ्या चेचून
- 12. 1 टी स्पून हळद
- 13. 2 टी स्पून साखर
- 14. 2 टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून
- 15. मीठ
- 16. तूप 1-2 टेबल्स्पून
- • सर्वप्रथम एका खलबत्त्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या पाणी न घालता कुटून त्याचा ठेचा करून घेणे. जर मिक्सर वापरायचा असेल तर पाणी न घालता वाटून घ्यावे.
- • आता ताक घुसळून घेऊ. एका खोलगट भांड्यात दही घालून रवीने चांगले फेटून घ्यावे जेणे करून त्यात गूठळी राहणार नाही. दही फेटल्यावर त्यात 1 ते 1.5 कप पाणी घालून परत रवीने घुसळून घ्यावे. चांगला फेस येईपर्यंत ताक घुसळावे.
- • दुसर्या वाडग्यात बेसन आणि 2-3 टेबल्स्पून पाणी घालून चांगले फेटावे. हे मिश्रण अगदी एकसंध असावे त्यात बेसनाची गूठळी असू नये. हे बेसनाचे मिश्रण ताकात घालून नीट हलवुन घ्यावे. असे केल्याने बेसनाच्या ताकात गूठल्या पडत नाहीत.
- • आता हळद, साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून ताक ढवळून घ्यावे.
- • आता कढी च्या फोडणीसाठी कढईत 1-2 टेबल्स्पून तूप घालून घेऊ.
- • तूप गरम झाले की त्यात मोहरी, जीरे, हिंग आणि लसूण चेचून घालावी. कढीपत्ता घालावा.
- • लसूण गुलाबी रंगावर होत आली की त्यात वाटलेला मसाला घालावा. मध्यम आचेवर आले लसणाचा कच्चे पणा निघून जाईपर्यंत परतावा.
- • जवळ जवळ 2 मिनिटे लागतात मसाला परतून घ्यायला. आता ताकाचे मिश्रण घालून घेऊ , त्या आधी गॅस मंद करून मगच त्यात मिश्रण घालावे.
- • मंद ते मध्यम आचेवरच कढी शिजू द्यावी. मोठ्या आगीवर कढी ला लगेच उकळी येऊन कधी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ताक वेगळे आणि मसाला वेगळा असे होऊ शकते. म्हणून कढी बारीक आगीवरच शिजू द्यावी आणि सतत ढवळत राहावी.
- • मंद आचेवर कढी शिजायला जवळ जवळ 12 मिनिटे लागतात. वरुन कोथिंबीर भूरभुरावी आणि गॅस बंद करून कढी झाकून ठेवावी.
- • ही कढी हलकी थंड झाल्यावरच गरमागरम भाता सोबत वाढावी . सोबत एखादा पापड भाजून किंवा तळणी च्या कोरड्या मिरच्या नक्की वाढाव्या. अगदी ब्रह्मानंदी टाळी लागलीच समजा!

👍👍👍
धन्यवाद योगेश आमचा ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल ! खूप आभार !
मी आपल्या रेसिपी प्रमाणे बनवली आणि खूपच सुंदर….झाली👌👌👌
अतिशय धन्यवाद तुमचे 🙂