महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो.
मसाले भात म्हटले कि लोकांना कित्येकदा गैरसमज होतो कि यात फक्त मसाले घालून तिखट बनवला जातो , आणि काही वेळा आपलेच मराठी हॉटेल व्यावसायिक बांधव मसालेभाताची ओळख म्हणजे, अत्यंत तिखट बनवलेला फोडणीचा भात, त्यात शोधून सापडावा असा एखादा फ्लॉवरचा तुकडा , मटारचा दाणा , अशी करून देण्यात पटाईत झाले आहेत . पुण्यातल्या अत्यंत गाजलेल्या केटरर्स ने बनवलेल्या लग्नाच्या जेवणात मसाले भात हा गुरगुट्या भात आहे कि काय अशी शंका येईल इतपत तो चिकट बनवला होता. हे पाहून मन अत्यंत खट्टू होते.
वास्तविक पाहता मसालेभाताला पुलाव म्हणणे हे फक्त त्याची शिजवण्याची पद्धत पुलावासारखी आहे म्हणूनच , नाहीतर एखाद्या व्हेज बिर्याणी ला लाजवेल इतकी चव आणि रंग या भाताला असते! लांबसडक बासमती तांदळाचा दाणा किंवा आमच्या कोकणात ना आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा , विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार , गाजर , बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला !कुठेही तिखट जाळ न करता पदार्थ चविष्ट करण्याची क्षमता आहे महाराष्ट्रातल्या गोड्या मसाल्याची ! गोडा मसाला हा नावाप्रमाणेच सुगंधी, गोडसर चवीचा आणि जे सारे स्वीट स्पायसेस म्हणतात ना ,म्हणजे दालचिनी, चक्रिफूल , नागकेशर यांचा वापर करून हा बनवला जातो. तुपात तळलेले काजूगर आणि वरून पेरलेले ओले खोबरे म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोर जणू!
हा भात सगळ्या आनंदाच्या प्रसंगी जेवणात ठरलेला आणि त्याचे जोडीदार म्हणजे दह्याची किंवा ताकाची आंबट गोड कढी – अस्सा मसालेभाताचा घास घेऊन वर कढीचा मारलेला भुरका , ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 2 कप लांब दाण्यांचा बासमती तांदूळ
- ½ कप ताज्या मटारचे दाणे
- 1 मध्यम आकाराचा बटाटा - फोडी करून
- 1 कप फूलकोबी
- 1 कप तोंडली - लांब ४ तुकडे करून
- 7-8 लवंग
- 1 इंच दालचिनीचा तुकडा
- 1 टीस्पून जिरे
- 1 टेबलस्पून धणे
- 1 मोठा कांदा पातळ लांब चिरून
- 2 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- 1 टीस्पून मोहरी
- ½ टीस्पून हिंग
- 1 टीस्पून हळद
- 2 टीस्पून लाल मिरची पूड
- 3 टीस्पून गोडा मसाला
- 2 तमालपत्र
- 10-12 काजू
- ½ कप खोवलेला ओला नारळ
- तेल
- मीठ
- 1 टेबलस्पून साजूक तूप
- बासमती तांदूळ ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा.
- एका पॅन मध्ये धणे , जिरे , दालचिनी, आणि लवंग एकेक करून भाजून घ्यावे. जोपर्यंत मसाल्याचा खमंग सुवास येत नाही तोपर्यंतच ते भाजून घ्यावेत. थंड झाले कि त्यांची बारीक पावडर करून घ्यावी.
- एका कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात सर्वप्रथम काजू तळून घ्यावेत. काजू हलक्या करड्या रंगावर तळून झाले कि एका ताटलीत काढून घ्यावेत.
- त्याच तेलात तमालपत्र, मोहरी व हिंगाची फोडणी दयावी. चिरलेला कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतावा. आता आले लसणाची पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
- आता हळद, लाल मिरची पूड, गोडा मसाला , भाजलेल्या मसाल्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे. हे सगळे मिसळून मंद आचेवर ४ मिनिटे परतून घ्यावा.
- आता भाज्या घालून घ्याव्यात. फूल कोबी, मटार, तोंडली, बटाट्याच्या फोडी आणि १ कप पाणी घालून मिक्स करून घ्यावे. झाकण घालून मंद आचेवर भाज्या शिजू द्याव्यात.
- १२-१३ मिनिटांत भाज्या शिजतात. आता भिजवलेले तांदूळ पाणी काढून कढईत घालावेत. तळलेले काजू घालून साडेचार कप पाणी घालून घ्यावे ( २ कप तांदळांसाठी ). मध्यम आचेवर एक उकळी फुटू द्यावी.
- उकळी फुटल्यानंतर आच मंद करून भातात १ टेबलस्पून तूप घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे. झाकण घालून मंद आचेवर मसालेभात शिजू शिजू द्यावा.
- १५ मिनिटे मंद आचेवर भात पूर्णपणे शिजतो . गॅस बंद करून मसालेभात वाढेपर्यंत झाकूनच ठेवावा . महाराष्ट्रीयन दह्याची किंवा ताकाच्या कढीबरोबर मसालेभात अप्रतिम लागतो !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Nice Thanks for sharing !!