मटार करंजी हा पुणेकरांचा अगदी जिव्हाळयाचा विषय ( वादाचा विषय असे वाचायला माझी काहीच हरकत नाही ) . मग ती जोशी फूड्स ची उत्तम कि काका हलवाईंची ह्या किरकोळ चकमकी लढल्या जातातच !
अहो पेशवाई नांदलिये या भूमीत, रक्तातला लढवय्येपणा काही सहजासहजी जायचा नाही ! आपलयाला बुवा या भांडण तंट्याशी काही देणे घेणे नाही,मटार करंजी कुठलीही असो , चविष्ट असली कि झाले … काय बरोबर ना मंडळी! या खुसखुशीत करंज्या म्हणजे येता जाता प्रवासात किंवा हिंजवडी , मगरपट्ट्यातल्या “संथ वाहते कृष्णामाई ” च्या धर्तीवर चालणाऱ्या ट्रॅफिकमधून वाट काढत ऑफिसमधून दमून भागून घरी आलेल्या जीवाला घोटभर वाफाळलेल्या चहाबरोबर मिळाल्या कि कोण आनंद होतो ! हा निष्पाप खादाड जीव म्हणजे मी आणि माझा पार्टनर हे एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल ..
कोकणात जन्म झालेल्या माझ्या पूर्ण खानदानाची कर्मभूमी मुंबई! आमचे सगळे नातेवाईक, पाहुणे रावळे – परळ,लालबाग,दादर,काळाचौकी आणि गिरगावात ! या पंचक्रोशीच्या बाहेर पाऊल ठेवले जायचे जास्तीत जास्त भाउच्या धक्क्यावर मोठे पापलेट , आणि हलवे उचलायला किंवा,क्रौफर्ड मार्केटात कपडे खरेदीला व मस्जिद बंदरात महिन्याचे सामान आणि वर्षभराच्या मसाल्याचे आणि सुक्या मेव्याची पाकिटे उचलायला ! अशातच माझ्या एकुलत्या एका लाडक्या आणि रडूबाई मावशीला पुण्याचे स्थळ आले . रडूबाई यासाठी म्हटले कि आजी आजोबांचे हे शेंडे फळ , अगदी गरीब कोकरू हो ! कुणी नुसते डोळे मोठे करून पाहिले तरी रडू कोसळणारे, म्हणून रडू बाई! साधा , भाबडा जीव! या माझ्या मावशीला जेव्हा पुण्यातल्या तालेवार कुटुंबाचे स्थळ आले तेव्हा आजीसकट सगळ्यांना एक भितीयुक्त आनंद वाटत होता , भीती यासाठीच कि एवढ्या प्रतिष्ठित मंडळींची उठबस घरातला कर्ता पुरुष नसलेल्या साध्या मध्यमवर्गीय कुटुंबाला झेपेल कि नाही !त्यातच नुकतेच पुण्याहून आपले काम करून परतलेलया , एक फॅमिली फ्रेंड आजोबा आमच्या घरात येऊन दातांची कवळी चावत आजीजवळ पचकले , ” ताई , सगळे भामटे हो पुण्यात , दोन दिवसांत देवळाबाहेरून माझ्या नव्या कोऱ्या कोल्हापुरी पळविल्यानं लेकाच्याने , आणि मुंबई पुण्याचे भाडे नसेल त्याच्या दुप्पट भाड्यात रिक्षावाले शिंचे गरागरा फिरवतात !” त्यांच्या या शब्दांत अतिशयोक्ती होतीच परंतु यांच्या मुलीला एवढे चांगले स्थळ का आले याची एक असूया ही होतीच! माझ्या आईने मोठ्या बहिणीची जबाबदारी पेलत मावशीचे लग्न साग्रसंगीत लावून दिले . आता माझ्या मावशीकडे पाहून खरंच असे वाटते कि ” पुणे तिथे काय उणे ” या उक्तीला जागूनच पुण्याने तिला तिच्या संसारात काहीच उणे पडू दिले नाही !
इन्फोसिस मधून माझे पुण्याला पोस्टिंग व्हावे म्हणून आईने दगडू शेठच्या गणपतीबाप्पाला साकडे घातले होते , मी ते अगदी त्याचे रांगेत शिस्तीने उभे राहून दर्शन घेऊन पूर्ण केलच ! मी खूप आनंदित होते पुण्याला जायचे म्हणून! एक तर दर शनिवारी रविवारी मुंबईला घरी यायला मिळायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातली शांतता मनाला खरंच भावून गेली होती !
आम्ही जिवाभावाच्या मैत्रिणी बाणेरला एकत्र राहत होतो, मैत्रिणी कसल्या बहिणीचं आम्ही , काय म्हणतात ते आज काल ” सिस्टर्स फ्रॉम अनदर मदर ” !मॉर्निंग शिफ्टमधून परतताना आमच्या बिल्डिंग खाली असलेल्या जोशी फूड्स मधून मी कधी पातळ पोह्यांचा चिवडा, मिनी सामोसे किंवा मटार करंज्या घेऊन जायचे. सात वाजता सगळ्या मैत्रिणी घरी आल्या कि व्हायची चहा पार्टी आणि पुढील एका तासात संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत दिवसभरात झालेल्या गमतीचे , फजितीचे किस्से एकमेकींना ऐकवले जायचे! जवळजवळ अर्धा डझन बायका २ वर्षाहून अधिक काळ अशा एकत्र नांदलेल्या आतापर्यंत तुमच्या ऐकिवात आहेत का हो ! मी अभिमानाने सांगेन “हो माझ्या तर पाहण्यात आहेत !”
पुण्याने असे बरेच कडू गोड़ अनुभव दिलेत , आयुष्य स्वतंत्र, आपल्या पायांवर कसे जगायचे , हेच मुंबई पुण्याने एकत्रितरित्या शिकवलंय! म्हणूनच मला कोणी खोचकपणे विचारले ना कि ” मुंबई बेश्ट कि पुणे ” , तर तितक्याच शांतपणे कुठल्याही वादाला खतपाणी न घालता मी उत्तरते ,” मुंबई माझी माय आणि पुणे माझी जणू मावशी, आई आणि मावशीत कोणी आजवर फरक करू शकला आहे का ? ”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ कप = ३०० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- २ टेबलस्पून रवा
- मीठ
- तेल
- १ १/२ कप= ३०० ग्रॅम्स ताजे मटारचे दाणे
- ५-६ हिरव्या मिरच्या
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- १ १/२ इंच आल्याचा तुकडा
- १ मध्यम आकाराचा कांदा = ८० ग्राम बारीक चिरून
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
- १/२ कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- १ टीस्पून जिरे
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून भाजलेली बडीशेप कुटून जाडसर पावडर करून
- १ टीस्पून धणे भाजून कुटून जाडसर पावडर करून
- १ टीस्पून पांढरे तीळ भाजून
- १ टीस्पून खसखस भाजून
- अर्ध्या लिंबाचा रस
- १/२ टीस्पून साखर
- सर्वप्रथम करंजीच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत गव्हाचे पीठ, रवा आणि मीठ मिसळून घेऊ. आता १/४ कप = ६० ml कोमट तेल पिठात मोहन घालून घेऊ. ३०० ग्राम पिठासाठी आपण ६० ml तेलाचे मोहन घातले आहे. पीठ आणि तेल यांचे ५:१ हे प्रमाण लक्षात ठेवावे. पिठात तेल चांगले रगडून घ्यावे. ब्रेड क्रम्ब्स सारखे पीठ दिसायला हवे. १ कप पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्यावे. पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून १५ मिनिटे झाकून ठेवावे.
- आता करंजीचे सारण बनवून घेऊ. मटारचे दाणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर फिरवून घ्यावेत. एकाच दक्षता घ्यावी कि पूर्ण बारीक करू नयेत आणि जाड दाणे देखील ठेवू नयेत जेणेकरून करंज्या तेलात फुटू नयेत.
- हिरव्या मिरच्या, आले, आणि लसणाची पाणी न घालता जाडसर पेस्ट वाटून घ्यावी.
- कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. जिऱ्याची फोडणी घालून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. लसूण आणि कांदा आवडत नसल्यास नाही घातले तरी चालेल.
- हळद घालून ३० सेकण्ड परतून घ्यावी. आले-लसूण-मिरच्यांची वाटलेली पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावी.
- २-३ मिनिटे पेस्ट परतल्यानंतर मटारची पेस्ट घालावी .
- मटारची पेस्ट मध्यम आचेवर ६ मिनिटे परतून घेतली आहे . तिचा कच्चेपणा निघून गेल्यावर आणि ती थोडी कोरडी होऊ लागल्यावर त्यात सारे मसाले घालून घेऊ- धणे पावडर, बडीशेप पावडर, तीळ, आणि खसखस घालून घेऊ. नीट एकत्र मिसळून घेऊ.
- आता साखर, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे मिश्रण १ ते २ मिनिटे शिजवून घेऊ. ओले खोबरे आणि लिंबाचा रस घालून ढवळून घेऊ. मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ .
- मटारची पेस्ट मध्यम आचेवर ६ मिनिटे परतून घेतली आहे . तिचा कच्चेपणा निघून गेल्यावर आणि ती थोडी कोरडी होऊ लागल्यावर त्यात सारे मसाले घालून घेऊ- धणे पावडर, बडीशेप पावडर, तीळ, आणि खसखस घालून घेऊ. नीट एकत्र मिसळून घेऊ.
- आता साखर, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे मिश्रण १ ते २ मिनिटे शिजवून घेऊ. ओले खोबरे आणि लिंबाचा रस घालून ढवळून घेऊ. मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ .
- करंजीचे सारण आणि आवरणाचे पीठ तयार आहे. पीठाचे आपण छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ. एकेक गोळा तेल लावून पुरीच्या आकारात पातळ लाटून घेऊ. लाटताना पीठ अजिबात लावू नये.
- लाटलेल्या पारीवर मध्यभागी १-२ टेबलस्पून सारण घालू. सारण फार जास्त आणि फार कमीही असू नये. पारीच्या कडांना पाणी लावून घेऊ. अर्धचंद्राच्या आकारात करंजी बंद करून घेऊ. करंजीसाठी तुम्ही साचाही वापरू शकता . करंजीच्या कडा बंद करताना पीळ घालून बंद कराव्यात जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही! अशा प्रकारे साऱ्या करंज्या बनवून घेऊ.
- करंज्या तळण्यासाठी कढईत करंज्या बुडतील इतके तेल घालून तापवून घ्यावे. तेल चांगले गरम झाले कि आच मंद ते मध्यम ठेवून करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
- गरमागरम करंज्या टोमॅटो केचप सोबत खाण्यास उत्तम लागतात .

Leave a Reply