आठवतोय का तुम्हाला शाळेतला आपल्या छोट्या मधल्या सुट्टीतला डब्बा – घरी बनवलेला बेसनाचा लाडू, कुरमुऱ्याचा लाडू , शेंगदाण्याची चिक्की किंवा चिवडा. या सगळ्या आपल्या छोटी भूक भागविणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जर कोणती बाहेरून विकत आणलेली गोष्ट असायची ती होतो फक्त आणि फक्त ” राजगिऱ्याच्या लाडू ” !
छोट्या सुट्टीतला वर्गातला पकडापकडीचा खेळ खेळून दमलेला जीव , हा एक लाडू खाऊन आणि पाणी पिऊन पुढच्या तासांसाठी अगदी ताजतवाना व्हायचा! राजगिऱ्यात आहेच तेवढी शक्ती ! प्रथिनांचा हा उच्च प्रतीचा स्रोत असून त्यात लोह,मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन आणि देखील भरपूर प्रमाणात आढळतात. ग्लूटेन फ्री असल्यामुळे इतरांप्रमाणे हा धान्यात गणला जात नाही , म्हणूनच राजगिऱ्याची भाजी, राजगिऱ्याच्या पीठाचे थालीपीठ, पुऱ्या हे उपवासाला आवडीने खाल्ले जातात .
राजगिऱ्याचे गुळातले लाडू तर शक्तिवर्धक, रक्तवर्धक आणि थंडीच्या दिवसांत तर खास करून बनवून खावेत. हे बनवायला अतिशय सोप्पे आहेत . म्हणूनच आज तुमच्या मुलांसाठी खास कुरकुरीत राजगिऱ्याचे लाडू !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 1 कप= २०० ग्रॅम्स राजगिरा
- १/४ कप= ५० ग्रॅम्स शेंगदाणे
- 2-3 टेबलस्पून तूप
- 1 कप= २०० ग्रॅम्स चिक्कीचा
- राजगिऱ्याच्या लाडवांसाठी आपण सारे साहित्य एकेक करून भाजून घेऊ. एका खोल बुडाच्या कढईला गरम करून मध्यम ते मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यावेत नाहीतर लाडवांमध्ये त्यांचा कच्चेपणा जाणवतो!
- ३-४ मिनिटे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते एका ताटलीत काढून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यांच्या साली काढून फक्त दाण्याचे २ भाग होईपर्यंत कुटून घ्यावेत. फार बारीक कूट करू नये.
- आता आपण राजगिरा फुलवून घेऊ. राजगिऱ्याचे दाणे कढईत घालण्यापूर्वी कढई चांगली तापवून घ्यावी. जर थंड कढईत दाणे घातले तर ते फुलत नाहीत. २-३ चमचे राजगिरा घालून ते फुलवून घ्यावेत. सगळे दाणे एकदम घालू नयेत.
- गरम कढईत सतत हलवत राहत राजगिरा फुलवून घेऊ, गॅस कमी जास्त करून उष्णता नियंत्रित करत दाणे अजिबात करपू देऊ नयेत. अशाच प्रकारे राजगिरा फुलवून घ्यायचा आहे. राजगिरा पूर्णपणे थंड झाल्यावर , जे दाणे फुलत नाहीत ते आपण चाळणीने चाळून वेगळे करू. न फुललेल्या दाण्यांचे मिक्सरमधून फिरवून पीठ करून घ्यावे . हे पीठ कणकेत मिसळून पोळ्या करता येतात किंवा थालीपीठासाठीही वापरता येते.
- आता आपण गुळाचा पाक करून घेऊ. जितका बारीक गूळ चिरलेला असेल तितक्या लवकर तो वितळला जाईल . मंद ते मध्यम आच ठेवून जवळजवळ ३ मिनिटांत आपण गुळाचा पाक शिजवून घेऊ. आपल्याला हे लाडू जास्त कडक न करता कुरकुरीत करावयाचे आहेत. जितका जास्त वेळ गल शिजला जातो तितका त्याचा पक्का पाक बनून लाडू कडक होऊ शकतात. म्हणून गुळाचा पाक शिजवताना वेळेकडे काटेकोर लक्ष असू द्यावे.
- आता शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि राजगिरा घालून मिश्रण एकसारखे करून घ्यावे. गॅस बंद करून कढई खाली उतरवावी.
- हाताच्या तळव्यांना तूप चांगले चोपडून लाडवांचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात करावी. थोडे हाताला चटके बसतात परंतु तूप हाताला लावले तर थोडे कमी जाणवतात . आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यावेत. लाडू वळता वळता जर मिश्रण थंड होऊन कोरडे पडले तर परत मंद आचेवर फक्त ३० सेकंड गरम करून परत लाडू वळावेत. लाडू वळून झाले कि एका घट्ट हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत. एवढ्या साहित्यात १८ ते २० लाडू बनतात.

Leave a Reply