इंग्रजीत “FLAT BEANS ” म्हणून ओळखली जाणारी घेवड्याची भाजी महाराष्ट्रात घराघरांत बनवली जाते . कोणी तिला वालपापडी म्हणते तर गुजरात मध्ये ही सुरती पापडी या नावाने प्रचलित आहे.
श्रावणात रिमझिम पावसात घेवड्याचे अजून एक रूप पाहण्यास मिळते . एरवी ज्या सपाट शेंगा मिळतात तशा या नसून , श्रावणातलया शेंगा जराशा रूपरंगाने वेगळ्या असतात. गर्द हिरव्या , जराशा लांबट आणि थोड्या ओबडधोबड – अशा या शेंगा श्रावणघेवडा किंवा बोंबीलघेवडा ( हे कोकणातले नाव ) म्हणून ओळखल्या जातात ! जसा मान्सून सरायला लागतो तसा बाजार या घेवड्याच्या टोपल्यांनी व्यापून जातो. थंडीत तर गुजराती उंधियु बनवण्यासाठी हि सुरती पापडी हवीच आणि कोकणात पोपटी बनवताना देखील वालाच्या शेंगांबरोबरच घेवडा सुद्धा मडक्यात घातला जातो.
या भाजीची खासियत अशी आहे की अगदी थोडे इन्ग्रेडिएंट्स वापरून सुद्धा ही भाजी खाणार्याला अत्यानंद देते , इतका हीचा ताजेपणा असतो. हिचे औषधी गुणधर्म ही वाखाणण्यासारखे ! वजन कमी करण्यासाठी , मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी उत्तम आणि कॅल्शिअम व पोटॅशिअम चा उच्च स्रोत ! यात डाएटरी फायबर जास्त असल्याकारणाने रक्तातली साखर नियंत्रित करते. भाजी बनवायला अगदी सोप्पी आणि सकाळच्या घाईत लवकर बनते – म्हणजे डब्याला उत्तम ! या रेसिपी ची एक गम्मत सांगते , माझी आजी ना या भाजीत नेहमी ओव्याची फोडणी करायची , म्हणायची या भाजीचे औषधी गुण अजून वाढण्यासाठी ओवा मदत करतो. आणि विश्वास नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघाच , ओव्यामुळे काय खमंगपणा येतो ! नक्की मला तुमचा अभिप्राय कळवा!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- २५० ग्रॅम्स घेवडा / वाल पापडी
- १ मोठा कांदा लांब चिरून = ग्रॅम्स
- १ टीस्पून ओवा
- १/४ टीस्पून हिंग
- ५-६ लसूण बारीक चिरून
- १/२ टीस्पून हळद
- १ टेबलस्पून मालवणी मसाला ( मालवणी मसाला नसेल तर २ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड + १ टीस्पून गरम मसाला पावडर वापरावी )
- मीठ
- १/२ कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- तेल
- घेवड्याच्या शेंगा सोलून , त्यांचे धागे काढून त्यांचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. भाजी स्वच्छ धुऊन एका चाळणीत निथळत ठेवावी.
- कढईत ३-४ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे. ओवा आणि हिंगाची फोडणी करावी, त्यात लसूण घालून तो चांगला परतून घ्यावा.
- आता बारीक चिरलेला कांदा घालून ५-६ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावा. हळद आणि मालवणी मसाला घालावा . हे मसाले २ मिनिटे न करपवता परतून घ्यावे.
- साफ केलेला घेवडा घालून नीट एकत्र करून घ्यावा. मीठ चवीनुसार घालून ढवळून घ्यावे. अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर झाकण घालून शिजू द्यावे. फार जास्त पाणी घालू नये नाहीतर भाजी पचपचीत लागते.
- १० मिनिटे झाकून शिजवल्यावर घेवडा शिजतो आणि त्याचा नैसर्गिक crunch ही शाबूत राहतो. पाणी पूर्णपणे कोरडे झाले की ताजा खोवलेला नारळ घालून मिसळून घ्यावा. गॅस बंद करून भाजी गरम गरम वाढावी. फुलके चपातीसोबत ही भाजी डब्यासाठी उत्तम ! ओव्याच्या फोडणीने जो खमंगपणा भाजीला येतो त्याची चवच न्यारी ! वरण भाताबरोबर खूप भारी लागते !

Leave a Reply