
मला लहानपणापासूनच देवाधर्माची फार आवड होती . या वाक्याचे स्पष्टीकरण पुढे माझ्या ब्लॉगमध्ये होईलच ! याचा अर्थ अगदीच उठता बसता ‘ देव देव ‘ करणे, किंवा देवाधर्माचे अवडंबर माजवणे नाही , माझ्या देवाच्या बाबतीतल्या फीलिंग्सच वेगळ्या होत्या .
जरी मी एकत्र कुटुंबात वाढले नसले तरी आमच्या घरात माणसांचा राबता असायचा . चाळीतल्या त्या एवढ्याश्या घरात कोणी ना कोणीतरी महिन्या दोन महिन्याला या ना त्या कारणाने भेट द्यायचे , सगळे सणसूद साग्रसंगीत , अर्थातच आईच्या नोकरीच्या वेळा सांभाळून पार पडायचे . अगदी मी इवलीशी होते , ” इतकुशी होती , जमिनीतून उगवली पण नव्हती ” , हे आजीचे वाक्य , तेव्हापासून घरातल्या धार्मिक परंपरांचे बाळकडू मोठ्यांच्या कृतीतून अगदी घोटाघोटाने पीत होते . “जेवणाच्या ताटात भाजी उरवलीस तर बाप्पा कान कापेल”, अशा बाळबोध बुद्धीला समजेल तेव्हापासून ते ” लोकांना बघ जा , एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही , नी तुला ही भाजी नको ती नको म्हणून , हट्ट करतेय , खा गुपचूप !”, ह्या इतक्या वयापर्यंत सत्याची जाणीव पदोपदी करून दिले जाणाऱ्या पापभिरू कुटुंबातले संस्कार ! त्या संस्कारांना योग्य आचार विचारांची जोड मिळावी म्हणून देव धर्माचा चपखल वापर किती आणि कसा करायचा यात माझ्या आई नी आजी अगदी पारंगत होत्या .
आम्ही मुंबईला ज्या भागात राहायचो तो मध्यमवर्गीय गिरणगाव म्हणून ओळखला जायचा . माझी आजी रोज बाजारात जायची , नी येताना वाटेत येणाऱ्या देवळांना भेट देऊन कुठल्या ना कुठल्या देवाचा प्रसाद आम्हा बच्चे कंपनीच्या हातावर टेकवायची . कधी रामाचा बुंदी लाडू , तर कधी दत्ताची साखर … साईबाबांची रेवडी तर आम्ही चिमणदातांनी चावून एवढु एवढुशी करून एकमेकांत वाटून खायचो . आमच्या एरियात तर खूप देवळे होती , म्हणजे आता सुद्धा आहेत . चाळीतुन बाहेर पडून मुख्य रस्त्यावर बस स्टॉप, टॅक्सी स्टॅन्ड किंवा रेल्वे स्टेशन साठी जायचे असेल तर एक वळसा पडायचा . चाळीतच एक छोटेसे साई मंदिर आहे . दरवाज्यातून बाहेर पडले की आपसूकच मान उजवीकडे वळायची . सक्काळी सहा वाजताच अगदी न्हाऊन , छानपैकी नवी शाल पांघरून , कपाळावर चंदनाचा टिळा लावून , शालीतून एक पदकमल बाहेर काढून, त्यावर वाहिलेले पिवळेधम्मक सूर्यफूल दुरूनही दिसेल अशा बेताने बसलेले साईबाबा आपल्या देवळात , माझा जागेवरूनच केलेला नमस्कार, स्वीकारून हसतायेत असा मला भास व्हायचा . पुढे आवारातून बाहेर पडले की उजव्या बाजूला मोठ्या औदुंबराच्या झाडाखाली दत्त आणि गणेशाचे मंदिर आहे . हा आपला हक्काचा नवसाचा देव… रोज येणाऱ्या जाणाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकत त्यांना धीर देणारा .. मुख्य रस्त्यावर मंदिर असल्याकारणाने , याच्या खांद्यावर भक्तांच्या अपेक्षांचे लोड भारी .. माझी आई तर एखाद दिवशी दुसऱ्या रस्त्याने घरी आली की बेचैन असायची , सारखे म्हणायची आज दत्ताचे दर्शन नाही झाले .. ते नसते का आपण बाहेर निघालो की घरात आईला म्हणतो , ” येते ग …” तस्सेच आणि एखाद्या दिवशी नाही बोललो की चुकचुक लागून राहते … आणि बर असेही नाही कि अगदी देवळात जाऊन मूर्तीच्या पायावर डोके ठेवून यायचे …. रस्त्याच्या पलीकडले मंदिर तर या बाजूला उभे राहून मी तर या दत्त आणि गणपतीच्या जोडगोळीला आपला सलाम नमस्ते करून पुढे सरकायचे . आज काय , तर नाटकाचे ऑडिशन , देवा मी सिलेक्ट होऊ दे रे , उद्या काय रिझल्ट , इतकेच काय शाळेच्या कॅन्टीन मध्ये गर्दीतून पहिल्यांदा मला मधल्या सुट्टीत गरम हॉट डॉग मिळू दे किंवा आज शाळेतून परत येताना डबल डेकर बस मध्ये वरच्या मजल्यावर पुढची सीट मिळू दे रे देवा , अशी देखील साकडी घातलीयेत मी . पुढच्या चाळीत माझी मैत्रीण सोनल भेटली की दोघींची बडबड सुरु होऊन आम्ही बस स्टॉप कडे सरकायचो . तेव्ह्हा डाव्या बाजूला झाडाखालच्या, मोजून ४ फरश्यांच्या साईझच्या देवळातल्या मारुतीकडे मात्र , कटाक्षाने बघायचे टाळायचे. हनुमंत तसा बलवान देव , पण त्याच्या हातातली गदा नी त्याचे पिळदार शरीर , आणि हे मोठे मोठे डोळे … आम्हा दोघींना खिदळताना म्हणायचे जणू , “ए पोरींनो, काय खीखी करताय , सकाळी वेळेत उठायला नको , ते बघ बस आली इतक्यात , शाळेला उशीर होईल , नी मग मैदानाला २ फेऱ्या माराव्या मागतील..पळा लवकर ” नी आम्ही जी धूम ठोकायचो . खरंच हो , उतारावरून धावताना उजवीकडून ३१२ नंबर बस स्टॉप मध्ये शिरताना दिसायची . बस मिळाली की मारुतीला मनोमन थँक यु नी दर शनिवारी तेल वाहून आल्यावर बाबाने आणलेला हनुमंताचा सुंठवडा मिटक्या मारत खाणे ही एवढीच काय ती मारुती रायाशी आपली दोस्ती ! लहानपणी पुराणकथा , रामानंद सागर यांचे रामायण , बी. आर. चोप्रा यांचे महाभारत यांच्यामुळे सगळ्या देवांविषयी एक आत्मीयता वाटायची . सगळ्या गोष्टींत प्रॅक्टिकलीटी चे अळणी मीठ न घालता काही गोष्टी या मनात रुजू द्यायच्या असतात , हे असे संस्कारच या पुराण कथा वाचताना अंगी बाणवले गेले .
प्रत्येक देवाशी अगदी नाटकीय ढंगाने माझी ओळख म्हणा किंवा दोस्ती झालीय असे म्हणायला हरकतच नाही . कृष्णाला रास लीला , खाऊ , नी चेष्टा मस्करी पसंद म्हणून शाळेत अगदी पुढे पुढे होऊन दहीहंडीत किंवा नाचात भाग घेण्यासाठी सरसावायचे . गणपती बाप्पा तर अगदी बेस्ट फ्रेंड , थोडक्यात आपला वेळी अवेळी मदतीला धावून येणारा आपला भिडू … गणपतीचा नैवेद्य ताटात भरण्यासाठी आई मला मुद्दाम सांगायची , मला ही ते काम खूप आवडायचे . एखादा पदार्थ दिलेल्या जागी न ठेवता चुकला तर आजीचे वटारलेले डोळे च पटकन चूक लक्षात आणून द्यायचे . काही अनुभव मात्र फजितीचे … आजीचा सोमवारचा नी शुक्रवारचा उपवास असायचा . एकदा श्रावणात गेली मला देवळात घेऊन , मी असेन ८-९ वर्षांची .. आजूबाजूच्या काकू मामी अगदी कौतुकाने पाहतायत म्हणून मीही जरा अगदी श्रद्धाळू असल्याचा भाव तोंडावर आणत आजीच्या अगदी पुढे पुढे होऊन पिंडीला प्रदक्षिणा घालू लागले . आणि ती पिंडीच्या भोवतालची निर्मळी मी ओलांडणार तोच आजीने खसकन ओढले मला मागे , नी जरा रागातच कुजबुजली , ” ते ओलांडायची नाही ..” तेव्हापासून शंकराला अर्ध प्रदक्षिणा घालायची असते हे मी या आयुष्यात तरी विसरणार नाही . नवरात्री गरबा , भोंडला नी नटण्यासजण्यासाठीच असतात म्हणून देवीचे आगमन अगदी जोशात करायचो . एकदा आई देवीची ओटी भरत असताना मी म्हटले सुद्धा होते , ” आई ही देवी किती ग सुंदर , घेऊन जाऊया का घरी आपल्या ” … आई माझा गालगुच्चा घेत म्हणाली आहे ना माझ्याकडे ही छोटी देवी ..
शाळेतून सुटल्यावर मैदानी खेळ खेळण्यासाठी आमच्या ठरलेल्या जागा होत्या , एक तर लाल ओटा मैदान , पण तिकडे वयाने मोठी असलेले दादा मंडळी क्रिकेट खेळत असत , मग आम्हाला मैदानातून हुसकावून लावत किंवा चौकार षटकार मारल्यावर चेंडू परत आणण्याचे काम देत असत . मग आम्ही जराशा आड बाजूला गल्लीत असलेल्या बागेत खेळायला जात असू . बागेचा गेट संध्याकाळी उघडेपर्यंत काय करायचे तर, बाजूला असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आम्ही लपाछपी खेळत असू . हे आमच्या एरियातले, पुराण तत्व भागाने दखल घ्यावी, इतके जुने आणि सुंदर देऊळ आहे . मंदिराचे बांधकाम दगडी आणि छप्पर कौलारू . .. आषाढी कार्तिकीला मंदिराला सोन्याची झळाळी यायची . एरवी अगदी एखाद्या शांत घरासारखे , आत देखणा विठोबा नी सुबक ठेंगणी रखुमाई ची प्रभा !तिथले मंदिराचे वारकरी बुवा सुद्धा विठ्ठलासारखेच शांत , आम्हाला बिनधास्त खेळू द्यायचे , म्हणायचे “तेवढा माउलीला तुम्हा चिमण्यांचा सहवास , बघा काय तेज उजळले माऊलीच्या चेहऱ्यावर , हरी विठ्ठल हरी विठ्ठल … ” खेळून झालयावर गाभाऱ्यात नमस्कार करताना विठ्ठलाच्या नी रखुमाईच्या डोळ्यांत समईच्या ज्योतींचा प्रकाश पाहून मला उगाचच ते हसल्याचा भास व्हायचा !
गणपती आणि विठ्ठल म्हणजे माणसाचे दुःखनिवारक केंद्राचे अध्यक्ष आहेत अशी माझी तरी समजूत आहे बुवा . रात्री कधी चिंताग्रस्त झाल्याने झोप नाही आली तर आई ” गजानना , विठ्ठला , तुला रे सगळी काळजी ..” असे म्हणत दुसऱ्या मिनिटाला घोरू लागते ! आमच्या चाळीतले निंबाळकर काका , त्यांच्या जड पिशवयांना आम्ही पोरासोरांनी जरा हात लावून पाचव्या मजल्यापर्यंत त्यांच्या घराशी सोडले की , थरथरता हात कौतुकाने डोक्यावर फिरवून माउली माउली म्हणत ! आमचा मित्र उगाच ख्याख्या करत , “आजोबा , मी अभिषेक , ही स्मिता नी ती शलाका , माउली नाही आपल्या बिल्डिंगीत …” असे म्हणून धूम ठोकायचो. त्या वेळी त्या शब्दाचा अर्थ नी त्या भावनेचा अर्थ नाही कळला !
आषाढी एकादशीला , आम्ही लहान मुले कार्डबोर्डचे मखर बनवून त्यात विठोबा रखुमाईचा फोटो चिकटवून, गळ्यात जत्रेतच घेतलेला ढोल अडकवून तो बडवत दारोदार गात हिंडायचो , ” विठोबाला लाडू पेढा , भजन करितो तो एक वेडा ..” आणि मग काही प्रेमळ काकू हातावर खाऊ ठेवायच्या तर काही जण दुपारची झोपमोड झाली म्हणून , ” हम्म मयेकरांची ना तू , येते संध्याकाळी तुझी आई आल्यावर , किती गोंधळ असतो तुमचा ..” हेच मखर नंतर सेम हनुमान जयंतीला नी फोटो मात्र मारूतिरायांचा ,आपल्या वज्रासारख्या छातीतून राम सीता लक्ष्मण यांचे दर्शन घडवतानाचा ! चाळीत गणपती उत्सवाची धमाल उडायची , आरतीच्या वेळी स्पेशली विठोबाची आरती जेव्हा सुरु व्हायची तेव्हा सगळ्यांमध्ये जणू भीमसेन जोशी संचारायचे . ” ये ईई हो विठ्ठले माझे माआआ उलीईई गे ” पासून “निढळावरी ईईईई कर अअअअअअ घेऊनि वाट मी पाहे” पर्यंत सर्वांगाला घाम फुटलेला असायचा , पण उत्साह आणि आवाज काही तसूभर सुद्धा कमी व्हायचा नाही !
पुढे शाळेत दर वर्षी पाचवी ते सातवीच्या वर्गाची आषाढी एकादशीला सहल निघायची आणि आम्ही जायचो प्रतिपंढरपूर मानले जाणाऱ्या मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठलमंदिरात . या जत्रेत खूप धमाल यायची , परंतु शाळेतून सहल जात असल्याकारणाने मानवी साखळी करून आम्ही देवाचे दर्शन घ्यायचो , एका कीर्तनकार बुवांचे लहान मुलांना समजेल या भाषेत कीर्तन आयोजित करण्यात यायचे . आणि आलेल्या वारकऱ्यांना आम्हा मुलांचे लहान लहान गट करून पाणी , प्रसाद , वगैरे देण्याची कामे दिली जायचीत . मुलांना समाजकार्याची आवड निर्माण व्हावी यासाठीच शाळेचा हा छोटासा प्रयत्न ! डोक्यावर तुळशी घेऊन चालत आलेल्या नऊवारीतल्या आजीला पाण्याचा गडू आपणहून पुढे केल्यावर कोण खुश झाली , नी आजीनेच आणलेल्या माझ्या हातातल्या नवीन लाल हिरव्या गोटांना चाचपत म्हणाली , ” माउली बांगड्या लै झ्याक हो ..”
विठ्ठलाच्या कथांतून तो नेहमी आपल्या ला एका मानवी स्वरूपातुन दर्शन घडवतो . एखाद्या देवाचे मानवीकरण जाहलले पाहायचे असेल तर हाच तो – विटेवरी उभा माझा सखा पांडुरंग ! नाथांच्या घरी पाणी भरणारा , तर कधी जनाईच्या जात्यावर दळण दळितो . रडणाऱ्या मुक्ताईची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण करायला ज्ञानाच्या पाठीवर तप्त अग्नी उत्पन्न करितो . आई बाबांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकासमोर सुद्धा आपल्या देवपणाचा बिलकुल आव न आणता त्याने पुढे केलेल्या विटेवर अनंत काळापासून भक्तांच्या भेटीसाठी उभा ! शील रक्षणासाठी आपल्या शरणी आलेल्या कान्होपात्रेला या विठाईने ह्रदयाशी कवटाळिलें . आपल्या मराठी चित्रपटांतून सुद्धा विठुरायाचे गोडवे गाणारे अनेक भक्तिप्रधान चित्रपट निर्माण झालेत . संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , कान्होपात्रा , पुंडलिक , नामदेव , एकनाथ ही अशी संत मंडळी आपल्या महान दिग्दर्शकांनी आणि अभिनेत्यांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत केली आहेत . या सगळ्या कथा आणि चित्रपट आपल्या सगळ्यांना माहित आहेतच .
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज पुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ।।
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु ।येणें मज लावियेला वेधु ।
खोळ बुंधी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु।।”🙏
असंख्य रत्नांच्या तेजासारखी कांती असलेला पांडुरंग स्वतः मात्र निर्गुण , निरहंकारी अवतार आहे . याला भेटायला देवळात जावे , त्याच्या पायावर माथा टेकवावा तर त्याची पावले अदृश्य होतात नी इकडे तिकडे पाहावे तर चराचरांत आपल्याला तो दिसून राहतो . शब्दांपेक्षा याला भक्तांच्या मनाचे भाव प्रसन्न करतात . हा भावाचा भुकेला पांडुरंग देवळात नाही , पालखीत नाही तो आहे इथेच आसपास , आपल्यातच … याची प्रचिती आलीय मला आतापर्यंतच्या आयुष्यात नी पुढे हि येणार याची खात्री आहे मला !
माझे आजोबा म्हणजे आईचे वडील मुंबईत एका छोट्या प्रायव्हेट वॉशिंग कंपनीत कामाला होते . दुर्दैवाने ती कंपनी बंद पडली , नी पदरी बायको व तीन लहान मुले .. आई तशी जाणती पण अवघी सोळा वर्षांची ! लहान मोठी कामे करून , खर्चाची तोंड मिळवणी करत आला दिवस पुढे सरत होता . एका होळीला घरात सण साजरा होण्यासाठी लागणारे सामान सुद्धा नव्हते , तेव्हा चाळीतले आजोबांचे मित्र श्रीधर मामा स्वतःहून अगदी पुरणा – वरणाचे सामान देऊन गेले . आईने शिकवण्या घेऊन घर चालवायची आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण करायची जिद्द कायम ठेवली तेव्हा तिच्या शिक्षणासाठी नी अंगावर दोन चांगली पातळ आणण्यासाठी पहिल्या मजल्यावरील भार्गव मामांनी आपली सोन्याची अंगठी गहाण ठेवून पैसे दिल्याचे आई आजही सांगते . जरी त्या मदतीचे पांग नंतर फेडले गेले असले तरी त्या कठीण वेळेची गरज या माणसातल्या पांडुरंगाने भागवली , असे बोलून आई च्या डोळ्यांत आजही त्या आठवणीने पाणी तरळते . असे अनेक विठू माउली पुढे ही आम्हला भेटत गेले आणि माझे आई बाबा स्वतःसुद्धा कितीजणांसाठी वेळेला आपली कामे बाजूला टाकून धावले !
माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा मला आजी सारखे सांगायची , वयाच्या पाच वर्षांपर्यंत मी आजी सोबत राहायचे , नंतर आई बाबांनी मुंबईत स्वतःचे घर घेतले आणि आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो . पण पाच वर्षांच्या स्मिताला आजीची आठवण शांत बसू देईना . तेव्हा कुठे फोन आणि मोबाइल होते हो .. एके दिवशी शाळेतून निघताना आपल्या नेहमीच्या स्कूल बस मध्ये न चढता जुन्या स्कूल बस मध्ये ही पोरगी चढली , का तर आजीला भेटायला .. आणि बस मधली सगळी पोरे उतरून गेली नी ही पोरगी आज नवीन दिसतेय या संभ्रमात बसचा ड्राइवर नी क्लिनर पडले . त्यांनी प्रेमाने विचारले तरीही शेवटी मात्र मी भोकांड पसरले , आणि आई पाहिजे चा धोशा लावला . शेवटी माझ्या दप्तरात डायरीत घराचा पत्ता लिहिलेला होता. तशीच ड्राइवर ने एवढी मोट्ठी बस पार भायखळ्यापासून उलटी फिरवून परेल ला आणली . तोपर्यंत शेजारच्या काकूंनी ज्यांच्याकडे आमच्या घराची चावी असायची त्यांनी घाबरून आईच्या ऑफिसमध्ये मुलाकरवी ,’स्मिता बस मध्ये नव्हती असा ‘ निरोप धाडला होताच . अस्से धावत जाऊन आईच्या गळ्यात पडून रडले होते ना , त्या वेळेला आईने त्या दोघा ड्रायवर आणि क्लिनरच्या रूपातल्या विठुरायाला कृतज्ञतेने जोडलेले हात आजही माझ्या स्मरणात आहेत !
एक किस्सा अगदी माझ्या कॉलेज जीवनाच्या उंबरठयावरचा .. डिप्लोमा इंजिनीरिंगचा पहिल्या सेमिस्टरचा पेपर , बस मध्ये अभ्यास करतच बसले होते , आणि बाजूला बसलेल्या आंबट शॉकींनाने नाकी नऊ आणले . बोलायची सोय नाही कि ओरडायची नाही , तेवढी हिम्मत गोळाच नाही करू शकले ! बसमधून उतरल्यावर सुद्धा त्याचा पाठलाग सुरु , घाबरून जीव मुठीत धरून , कसे बसे कॉलेज च्या आवारात शिरले नी दाणकन जिन्यावरच भीतीने कोसळले . आजू बाजूला कोणी नव्हते आणि छातीतील धडधड काही केल्या थांबत नव्हती .. पेपर सुरु व्हायला फक्त दहा मिनिटे शिल्लक आणि डोके भीतीने , रागाने सुन्न झालेले .. तेवढ्यात मशीन लॅब उघडायला आलेल्या एका हाऊस कीपिंग च्या दादाने मला स्फुंदून स्फुंदून रडताना पाहून , आपुलकीने विचारपूस केली , कोणी रॅगिंग केले का सांग मला , आता बघतो त्याला .. मी मानेने नाही म्हणत त्याला घडलेला प्रकार सांगितला . पटकन त्याने ५ मिनिटांत मला पाणी पाजून शांत करून वर्गापर्यंत सोडले , आणि पूर्ण तीन तास वर्गाबाहेर मधून मधून डोकावून मला हलकेच हाताने विश्वास देत होता . पेपर सुटल्यानंतर माझा हसरा चेहरा पाहून डोक्यावर हलकेच थापटी मारून म्हणाला , ” अग बहिणाई , असे रडायचे नसते , लढायचे असते अशा लोकांशी …!” हा माझा भाऊ विठुराया , मी तरी असे मानते !
विठोबा महाराष्ट्राचे आराध्य दैवत , रावरंक , रंजल्यागांजल्यांचा देव हा ! आपल्या सगळ्यांच्या भावना वारीशी जुळलेल्या , वारकऱ्यांची पदयात्रा , ते पालखीचे रिंगण , वाटेत येणाऱ्या गावच्या जत्रा , वारकऱ्यांचे गावातले स्वागत ह्याने पूर्ण वातावरण आषाढी एकादशीपर्यंत भारून गेलेले असते . “साधू- संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा ” असे समजून प्रत्येकजण आपापल्या परीने गावात येणाऱ्या वारीचे , पालखीचे स्वागत करितो, त्यांच्या राहण्याखाण्याची सोय, रात्रीची गावातल्या देवळाच्या अंगणातील कीर्तने , छोट्याश्या जत्रा , ह्या सगळ्याचा अनुभव घेऊन एका रात्रीच्या वास्तव्यानंतर वारी पुढे मार्गस्थ होते .
या वर्षी कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे आपला वारकरी संप्रदाय दिंडी आणि पालखी सोहळा साजरा करू शकणार नाही , लाडक्या विठुरायाला डोळ्यांत भरून त्याच्या चरणांना मिठी मारू शकणार नाहीय , परंतु वारीची भावना अन उत्साह तसूभर सुद्धा कमी नाही झालाय . मनामनात टाळ , चिपळ्या , मृदंगाचे गजर जोमाने होणार , दिंड्या पताका लहरत थिरकणारी पावले या वर्षीही असेल त्या जागी नादावणार ! ते म्हणतात ना ,
देव अंतरात नांदे , देव मूर्तीत ना मावे , तीर्थक्षेत्रात ना गावे , देव आपणात आहे , शीर झुकवोनिया पाहे …. हे शब्दच आपल्याला जगायचे सार पुनः एकदा शिकवून जातात !
त्या दिवशी आई बोलता बोलता म्हणाली , वारकरी आपल्या माहेरी पंढरीला नाही जाऊ शकत आहेत , तर तो विठ्ठलच आलाय आपल्याला भेटायला .
सगळीकडे आहे तो व्यापलेला … तो काय जीव वाचवणार्या डॉक्टरांच्या रूपात , रस्त्यावरील अनाथ लोकांना खाऊ घालणाऱ्या कोरोना योद्धयांच्या रूपात , कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवायचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस जवानांच्या स्वरूपात ! आहे तो, या कोरोनारूपी असुराला मात देण्यासाठी भक्तांसोबत तो हि लढतोय ! तिचे हे अगदी भावनिक होणे मला एकदम सकारात्मक ऊर्जा देऊन गेलं !तुम्हाला ही मी हेच म्हणेन , पंढरीची नाही तर माणुसकीची ही वारी आपण एकत्र अनुभवुया !
आता ” अरे संसार संसार ” या चित्रपटातलया गाण्याच्या ओळी आठवून मन भरून आलेय ,
“लेकरांची सेवा केलीस तू आई ,
कसं पांग फेडू , कसं होऊ उतराई ,
तुझ्या उपकारा जागी तोड नाही ,
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई ,
विठ्ठला मायबापा !”
आषाढी एकादशीच्या पवित्र उपवासासाठी काही पाककृती आणल्या आहेत , नक्की भेट द्या त्या लिंक्स वर :
उपवासाची पनीर कचोरी :
उपवासाच्या दिवशी ” माझा आज उपवास आहे ” याच एका मोठ्या भयगंडाखाली उपवासाचे शरीराला असलेले महत्तव विसरून गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते . मधून मधून सारखे तोंडात काहीतरी टाकण्याची लहर येतेच . मी आज ज्या कचोऱ्या बनवणार आहे त्या जरी तळलेल्या असल्या तरी पचायला हलक्या आहेत आणि संध्याकाळच्या चहा कॉफिसोबत तुम्ही खाऊ शकता . राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ हे ग्लूटेन फ्री आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय !चला तर पाहूया ह्या झटपट बनणाऱ्या उपवासाच्या पनीर कचोऱ्या !

कच्च्या केळ्याचे वडे :
आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणि बाजारात जे लोकल इन्ग्रेडिएंट्स , भाज्या , फळे मिळतात ते पाहून नक्कीच आपण उपवासासाठी पदार्थ बनवू शकतो . आज मी बनवतेय कच्च्या केळ्याचे आणि पनीरचे कोफ्ते . पनीरमधून प्रथिने मिळतात आणि ते पचायलाही हलके . कच्च्या केळ्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे:
व्हिटॅमिन A चा स्त्रोत
फायबर जास्त असल्याकारणाने पचनास उत्तम
पोटॅशिअम जास्त असल्याकारणाने हृदय आणि यकृतासाठी उत्तम
मॅग्नेशिअम सारखे क्षार जे शरीराला आवश्यक
नक्की एकदा करून पहा ही रेसिपी , कच्च्या केळ्याच्या नेहमीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा मिटक्या मारत खातील !

साबुदाण्याचा वडा :
आजचा पदार्थ साबुदाणा वडा, बऱ्याच जणांची तक्रार असते वडा तेल जास्त पितो, तेलकट होतो, किंवा आतून नीट शिजत नाही, कधी कडकच होतो , क्रिस्पी नाही होत, तर अशा सगळ्या गोंष्टींवर छान टिप्स सहित उपाय तुम्हाला या व्हिडिओत मिळेल.
तर आज माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींसाठी स्पेशल उपवासाचा साबुदाणा वडा !

लाल भोपळ्याचा हलवा :
भरपूर ऊर्जेचा स्रोत असलेला खसखस घालून केलेला लाल भोपळ्याचा हलवा करूनच पहा !
साबुदाण्याची खिचडी :

उपवास आणि साबुदाण्याची खिचडी हे आमच्या घरात तरी एक समीकरणच आहे . उपवास नसला तरी आवडीने मजली जाणारी , उपयुक्त टिप्स साठी नाकी पहा हा विडिओ :
Leave a Reply