माणसाचे शरीर हे त्रिदोष युक्त म्हणजे कफ , वात आणि पित्त तसेच पंचेंद्रियांनी भारलेले आहे . या त्रिदोषांविषयी जाणून घेतले आणि आपल्या पंचेंद्रियांवर थोडा अंकुश ठेवला तर एक आरोग्यदायी जीवनाची किल्लीच आपल्याला गवसेल .परंतु सहसा असे होत नाही आणि आपण आपल्या ज्या गोष्टी खायची इच्छा होते त्यांचे पोषण मूल्ये जाणून न घेता त्यांवर ताव मारतोच!
म्हणूनच उपवासाच्या दिवशी ” माझा आज उपवास आहे ” याच एका मोठ्या भयगंडाखाली उपवासाचे शरीराला असलेले महत्तव विसरून गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते . मधून मधून सारखे तोंडात काहीतरी टाकण्याची लहर येतेच . मी आज ज्या कचोऱ्या बनवणार आहे त्या जरी तळलेल्या असल्या तरी पचायला हलक्या आहेत आणि संध्याकाळच्या चहा कॉफिसोबत तुम्ही खाऊ शकता . राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ हे ग्लूटेन फ्री आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय !
आणि या कचोऱ्या बनवून तुम्ही १-२ दिवस खाऊ शकता , त्या खराब होत नाहीत . चला तर पाहूया ह्या झटपट बनणाऱ्या उपवासाच्या पनीर कचोऱ्या !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १०० ग्रॅम्स पनीर
- पाऊण कप = ९० ग्रॅम्स राजगिरा पीठ
- पाऊण कप= ९० ग्रॅम्स शिंगाड्याचे पीठ
- २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ टेबलस्पून मनुका बारीक कापून
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- सैंधव मीठ
- तेल
- कचोरीच्या बाहेरील आवरणासाठी आपण पीठ मळून घेऊ. एका खोलगट भांड्यात राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात सैंधव मीठ घालावे. १ टेबलस्पून हलके गरम तेल घालावे. पीठ मळण्यासाठी १ कप कोमट पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यावे . थोडा तेलाचा हात लावून १० मिनिटांसाठी झाकून ठेवावी .
- कचोरीचे सारण बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये पनीर कुस्करून किंवा किसून घ्यावे . त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या , कोथिंबीर, बारीक कापलेल्या मनुका घालाव्यात . सैंधव मीठ चवीपुरते घालावे . नीट एकत्र घ्यावे . सारण तयार आहे .
- पीठाचे छोटे गोळे बनवून त्याच्या खोलगट पाऱ्या करून घ्याव्यात . सारण भरून गोळे बंद करून घ्यावेत. अशाच प्रकारे साऱ्या कचोऱ्या बनवून घ्याव्यात .
- कचोऱ्या तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करावे . मंद आच करून कचोऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात .
- इतक्या मापात १२-१५ कचोऱ्या बनतात . नारळाच्या चटणीसोबत खावयास द्याव्यात .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply