काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली आणि बऱ्यापैकी ती सोशल मीडियावर चांगलीच फिरली . एका मानसोपचार तज्ज्ञांनी त्या पोस्ट मध्ये आपल्या सणासुदीचे आयुष्यातील महत्त्व अगदी पटेल अशा सोप्या भाषेत सांगितले होते . आपण जे सण साजरे करतो ते एक रिलॅक्सेशन असून नैराश्याला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे . सध्या आपल्याला वेळ नाही किंवा कोणी “सनातनी विचारांचे” म्हणून टॅग लावला जाईल की काय या भीतीने आपण सण साजरे करायचे सोडून आलेय . लेखकाच्या मते आणि त्यांच्या या भूमिकेशी मी पूर्ण सहमत आहे , जर सणांमागचे भाव , ते का साजरे होतात याचे उद्देश जाणून घेतले तर ते एक अवडंबर न होता स्ट्रेस बस्टर म्हणून चांगले काम करतात .
माझी चौथी शिकलेली आजी म्हणायची , ” दुःख , कळा बाजूला सारून प्रत्येक दिवसाचे हर्षाने स्वागत करावे, मग घरादारांत भरलेले सुख पाहून दैन्याची हिम्मतच होत नाही आपला उंबरठा चढायची !” या मागचा एकच अर्थ सुख आणि दुःख या मनाच्या गती आहेत , कोणाशी कसे निपटावे हे आपल्या मनाचे सामर्थ्य दर्शवते ! आजकाल डिप्रेशनमुळे व्यथित असलेले काही जीव पाहिल्यावर मनात काहूर माजतो !
या लेखाच्या धर्तीवरच प्रेरणा घेऊन मला असे वाटले की सध्या आपण शारदीय नवरात्र साजरा करतोय . खरंतर स्त्रीशक्तीचा हा जागर , दुनियेला सांभाळणाऱ्या मातेची नऊ रूपे आपण पुजतो , तर आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मला समजलेली दुर्गेची नऊ झळाळती रूपे शब्दरूपी पुष्पांजलीच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतेय .
नवदुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री ( शक्तीचा प्रवाह ) :
आज प्रथम दिनी चला पुजूया या शैलपुत्रीला … शैल राजा – हिमालयाची ही पुत्री , मागल्या जन्मीची ही सती !
“वन्दे वांच्छित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥”
नंदीवर आरूढ झालेली , उजव्या हातात त्रिशूल अन डाव्या हातात कमलपुष्प घेतलेली शैलपुत्री , नवदुर्गेचे पहिले रूप … आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हिच प्रार्थना !
नवदुर्गेचे दुसरे रूप – ब्रह्मचारिणी ( विस्तृत ब्रह्माण्डाचे प्रतीक ) :
नवदुर्गेचे दुसरे रूप , ब्रह्मचारिणी ! विशाल पर्वताची कन्या , परंतु शंकरासाठी तहान भूक विसरून हजारो वर्षे तपश्चर्या करणारी आणि फक्त फलाहारावर जीवित राहून , नामस्मरणात व्यग्र असलेली ही तपश्चारिणी ! शांत तेजस्वी मुद्रा या देवीची आपल्याला हाच संदेश देते की ,” जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सारे प्रयत्न पणाला लावून ध्येयाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे! ”
“दधाना करपद्माभ्याम्, अक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि, ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।”
उजव्या हातात अक्षमाला आणि डाव्या हातात कमंडलू धारण केलेली ब्रह्मचारिणी माता आमच्यावर प्रसन्न असू दे !
नवदुर्गेचे तिसरे रूप – चंद्रघंटा (विचारशीलता आणि निनाद यांची सांगड ) :
“पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥”
सोन्याप्रमाणे झळाळती कांती , दशभुजा चंद्रघंटा देवी आपल्या अस्त्र -शस्त्रांसहीत दुष्ट दैत्य प्रवृत्तींचा विनाश करण्यास सदैव सज्ज असते . नवदुर्गेचे हे तिसरे रूप जगतास शांती आणि कल्याण देणारे … माथ्यावर घंटेच्या आकाराचा चन्द्र धारण केलेले रूप तिचे .. हेच दर्शवते , चंद्राच्या शीतलतेप्रमाणे मन शांत ठेवावे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे जरी आपले विचार अस्थिर झाले तर हा घंटेचा चेतना , ऊर्जा रूपी निनाद ते थाऱ्यावर आणायचे काम करते .
माता चंद्रघंटा आपल्या सर्वांचे वाईट प्रवृत्ती आणि विचारांपासून संरक्षण करो ही प्रार्थना !
नवदुर्गेचे चौथे रूप – कुष्मांडा ( सृजनशीलता ) :
“सुरासम्पूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥”
नवदुर्गेचे चौथे रूप – कुष्मांडा देवीचे रूप हे विश्वातील सृजनशीलता आणि शाश्वत प्रकृतीचे प्रतीक आहे . अष्टभुजा असलेली कुष्मांडा देवी हातांत कमंडलू , धनुष्य, बाण , कमळ पुष्प , शंख, चक्र , गदा , सिद्धी देणारी जपमाळ आणि अमृतकलष धारण करून सृष्टीची रचनाकार आणि भयाची संहारक आहे ! अशी ही आपल्यातील सूक्ष्म ते विशाल शक्तींची जाणीव करून देणारी कुष्मांडा माता आपल्यात प्राणरूपी संस्थापित होवो आणि जीवन भयमुक्त करो ही प्रार्थना !
वदुर्गेचे पाचवे रूप – स्कंदमाता ( ज्ञान आणि कर्माचे प्रतीक ) :
“सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी॥”
नवदुर्गेचे पाचवे रूप – स्कंदमाता , पहाडांवर जिचा निवास , मांडीवर स्कंदकुमार म्हणजेच बालरूपी कार्तिकेयाला घेऊन शुभ्र कांतीची , पद्मासनावर बसलेली आणि जिचे वाहन सिंह आहे अशी ही स्कंद माता ! अज्ञानाचा प्रकाश दूर करणारी , जिच्या आराधनेने भक्तांना हा विशाल भवसागर पार करण्यात अडचणी येत नाहीत त्या स्कंद मातेला शतशः प्रणाम !
नवदुर्गेचे सहावे रूप – देवी कात्यायनी ( अन्याय नाही अज्ञानाचा संहार ) :
” चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥”
कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतलेली म्हणून ही कात्यायिनी … भागवत , मार्कंडेय आणि स्कंद पुराणात महिषासुराचा वध ह्याच देवीने केला असे नमूद केलेले आढळते . चार भुजाधारी , एका हातात तलवार , दुसऱ्या हातात कमलपुष्प आणि एक हाथ वरदानाचा व दुसऱ्या हाताने अभयदानाचे वचन देणारी देवी कात्यायिनी स्नेह आणि शक्तीचे प्रतीक आहे . तिच्या चरणांशी ही दुनिया नतमस्तक !
नवदुर्गेचे सातवे रूप – कालरात्री ( वैचारिक तटस्थता ) :
“एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी। वामपादोल्ल सल्लोहलता
कण्टक भूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥”
देवलोकाला नाकीनऊ आणणाऱ्या शुभ , निशुंभ आणि राक्षसांचा संहार करणारी , गडद अंधाराच्या छायेचा रंग असणारी ही कालरात्री देवी दानवांसाठी भयावह रूप घेऊन प्रस्तुत होते . परंतु आपल्या भक्तांसाठी मनात मायेचा आणि प्रेमाचा अपरंपार स्रोत . सज्जनांची रक्षा आणि दुष्टांचा संहार करणाऱ्या विधायक प्रवृत्तीचे प्रतीक म्हंजे आई कालरात्री ! अशा या देवीचा आपल्यावर सदैव आशिष असू दे हीच प्रार्थना !
नवदुर्गेचे आठवे रूप – महागौरी ( मोक्ष आणि परमानंद ) :
“वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥”
अवघ्या षोडश वर्षीय गौरीने कित्येक वर्षांच्या खडतर तपश्चर्येंने शंकराला प्रसन्न करून घेतले . उपवास आणि जंगलातील निवासाने काळवंडलेली तिची कृश काया गंगेच्या अभिषेकाने दुधासारखी झळाळु लागली , आणि ही गौरी महागौरी म्हणून नावास आली . वृषभावर आरूढ झालेली , श्वेतकांती , शुभ्र आभूषणे परिधान केलेली देवी , दोन हातांनी वरदान आणि अभयदान देते , तर दुसऱ्या हातांत डमरू आणि त्रिशूल परिधान करून आपल्या भक्तांचे संरक्षण करते .
अष्टमीच्या दिवशी या महागौरीचे पूजन करून तिचे आशीर्वाद मिळो ही प्रार्थना !
नवदुर्गेचे नववे रूप – सिध्दीदात्री ( सर्वसिद्धी दाता ) :
“सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥”
मार्कंडेय पुराणानुसर अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत . माता सिध्दीदात्री प्रसन्न होऊन या सिद्धी मनुष्यास प्राप्त करून देते . शंकरानेही देवीच्या याच रूपाची उपासना करून सिद्धी प्राप्त केली आणि त्यांचे अर्धे शरीर नारीरूपात आले , असा हा भगवान शंकर ” अर्धनारीश्वर ” म्हणून प्रसिद्ध झाला . देवी सिध्दिदात्री तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न होवो ही प्रार्थना !
उद्या अष्टमी .. देशातील बऱ्याच भागांत अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन ज्याला उत्तर भारतात कंजक पूजन असेही म्हणतात . आठ कुमारिकांचे हस्तपादप्रक्षालन करून मंत्र म्हणून देवीच्या आठ रूपांत त्यांची पूजा केली जाते . शिरा , हलवा असे बनवले जातात . म्हणून आज मी लाल भोपळ्याचा खसखस घालून हलव्याची रेसिपी देतेय .
खसखस हा ऊर्जेचा स्रोत आणि उपवासाच्या दिवशी देखील चालणारी , आणि लाल भोपळाच का असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर देवी कुष्मांडा – नवदुर्गचे चौथे रूपडे , ही हातात अमृतकलश धारण केलेली ! कुंभाच्या आकाराचा भोपळा आणि त्यातल्या असंखय बिया हे उत्पादकतेचे , सृजनशीलतेचा प्रतीक आहे , आणि कुष्मांडा देवी देखील आपल्याला सृजनशीलतेचाच संदेश देते . चवीने गोड असलेला हा लाल भोपळा मिठाई बनवण्यासाठी हलवायांचा आवडता ! मग तो आग्र्याचा पेठा असो की आपले महाराष्ट्रातील खीर किंवा घारगे !
चला तर नवदुर्गेचे स्तोत्र जपत सुरुवात करूया हलवा बनवायला !
॥ नव–दुर्गा स्तोत्र ॥
ब्रह्मोवाच ।
प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ॥
पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ॥
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ॥
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply