उद्या दसरा , विजयादशमी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक! दसऱ्याचे सीमोल्लंघन ,,, ते ” दसरा सण मोठा , नाहीsssss आनंदा तोटा …” असे गात घरोघरी सोने वाटत फिरणे , पाटीवर काढलेली सरस्वती , तिचे पूजन , लाल कापडावर चौरंगावर नीट मांडून , हळद पिंजर लावलेली घरातील आयुधे , टीवी फ्रिज ओव्हन हे आधुनिक स्वयंपाकघरातील शिलेदार सुद्धा झेंडू , आंब्याच्या पानाच्या माळा धारण करतील… गोंड्याच्या फुलांचे आणि आपट्याच्या पानांचा घरात रचलेला ढीग , सारे वातावरण उद्या भारलेले असेल .
तसा हा सण शौर्य , धाडस हे साजरे करण्याचा , दुष्ट प्रवृत्तीवर सत्याचा विजय मिळवण्याचा आनंद साजरा करण्याचा ! देशाच्या विविध भागांत दशावतार , रावण दहन अशा कार्यक्रमांसाठी जत्रा , मेळावे भरले जातात . नवरात्राच्या उपवासाची सांगता झालेली असल्याने , खाण्यापिण्याची चंगळ या दिवशी भारी !
आपल्या महाराष्ट्रात बहुतेक घरांत पुरणपोळी व कटाची झणझणीत आमटी ठरलेली तर काही जणांकडे केशरयुक्त वेलची श्रीखंड आणि पुरीचा बेत . दसऱ्याला घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते आणि त्यातून जर सोसायटीतील बच्चे कंपनी आपल्या पारंपारीक पेहरावात इवल्या इवल्या हातांनी सोने वाटायला आली की त्यांच्या हातात काहीतरी खाऊ ठेवायचा मोह आवरतच नाही .
म्हणून मी ठरवले की या दसऱ्याला एक वेगळा मिठाईचा प्रकार करून पाहायचा जो मला सगळ्यांना वाटता सुद्धा येईल ! माझे गोड खाणे पदार्थां पदार्थांवर अवलंबून आहे , म्हणजे मी मोदक , गुलाबजामून, काजू कातलीच्या , जिलबीच्या राशीच्या राशी उठवते , आणि बाकीच्या मिठाईचा जरासाच तुकडा तोंडात घोळवायला मला आवडतो . परंतु माझा पार्टनर पट्टीचा गोडखाऊ , ते इंग्रजीत ” स्वीट टूथ ” म्हणतात ना याला देवाने पूर्ण ” स्वीट बत्तीशी ” दिलीये . खवा घरी बनवायला यायला लागल्यापासून बऱ्याचदा मोदक, बर्फी असे सर्रास घरात बनवले जाते , एक मिठाई जी हलवायाच्या दुकानात मला खुणावायची ती म्हणजे ” मिल्क केक ” . रसदार , दाणेदार , नरम , लुसलुशीत , खाल्यानंतर बोटांवर गोडव्याचा चिकटपणा व तुपाचा सुगंध सोडून जाणारा .. तोंडात टाकताच दाताला अति नाही , परंतु दाणेदार चिवटपणा देणारा असा हा मिल्क केक !
कलाकंदच्या श्रेणीतलाच हा .. परंतु कलाकंद थोडा अजून मऊ आणि ओलसर ! उत्तर भारतात , दिल्लीत प्रसिद्ध असलेला मिल्क केक चा शोध मात्र लागला राजस्थानात , अलवर येथे ! १९४७ मध्ये बाबा ठाकूर दास यांच्या छोटेखानी दुकानात मिल्क केक बनवण्यात आला , म्हणूनच याला अलवरचा कलाकंद किंवा अजमेरी कलाकंद म्हटले जाते . साध्या घटक पदार्थांपासून बनणारी मिठाई , परंतु याचे गुपित म्हणजे बनवणाऱ्याचा ” धीर आणि एकाग्रता ” , दूध आटवताना जरासे डोळ्याचे पाते लवते ना लवते तोवर ” नजर हठी दुर्घटना घटी ” असे होऊन जाते . तसेच दूध फाडताना वापरले जाणारे आम्लयुक्त घटक जसे तुरटी , लिंबाचा रस हा किती प्रमाणात आणि केव्हा घालायचा हे महत्त्वाचे ! कारण या मिल्क केकचे दाणे हे अगदी नाजूक घट्ट संरचनेचे आले पाहिजेत , तरच तो सुंदर दिसतो असे माझे वैयक्तिक मत आहे ! बरं एवढ्यावरच आपले काम थांबत नाही , तो नैसर्गिक रित्या सेट व्हायला किमान ५-६ तास लागतात , तेवढ्या वेळात स्वतःच्या उष्णतेनेच तो अजून शिजतो आणि मधला भाग जरासा जास्त करडा होतो . म्हणून ज्या भांड्यांत सेट करायला घ्याल ते लांबी रुंदी पेक्षा जरासे खोलगटच घ्या!
नंतर वड्या पाडून दसऱ्याच्या सीमोल्लंघनापर्यंत आपला मिल्क केक तयार . एक सांगायचे राहिले की चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका सेट व्हायला किंवा नंतरही ! फ्रिजमध्ये ठेवलेला इतका रसाळ लागत नाही . कोणाला देताना छान बटर पेपरच्या चौकोनी कागदात गुंडाळून वरून पिसत्याची पावडर भुरभुरून द्या , तुमच्या आणि तुमच्या आप्तेष्ट , कुटुंबियांवर या दसऱ्याला आनंदरूपी सोन्याची लयलूट होवो ही अंबेमातेच्या चरणी प्रार्थना !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ लिटर घट्ट सायीचे म्हशीचे दूध
- पावणे दोन कप = 1¾th कप्स =३५० ग्रॅम्स साखर
- २ टेबलस्पून तूप
- पाव टीस्पून तुरटी पावडर किंवा २ टीस्पून लिंबाचा रस
- खलबत्त्यात तुरटीची पावडर कुटून फक्त पाव टीस्पून आपल्या रेसिपीसाठी बाजूला काढून घ्यावी.
- एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉन स्टिक कढईत दूध उकळत ठेवावे . एक उकळी आली की गॅस मंद करावा आणि अर्ध्या पर्यंत येईपर्यंत दूध तापवावे . मधून मधून ढवळत राहावे जेणेकरून दूध खाली लागणार नाही . दूध अर्ध्यापर्यंत यायला ४५ मिनिटे साधारण लागतात !
- आता तुरटीची पावडर घालावी व दुधात ढवळून घ्यावी . तुरटी घातल्यावर दूध फाटून दाणेदार व्हायला सुरवात होते . तब्ब्ल २० मिनिटांनंतर दूध अजून थोडे आटते . त्यात साखर बॅचेस मध्ये घालावी , एकदम घालू नये कारण साखरेला खूप पाणी सुटते आणि दूध आटवायला अजून वेळ लागू शकतो .
- आता अगदी लक्ष देऊन मंद आचेवर दूध ढवळत राहून ते आटवायचेय . अगदी दूध घट्ट होऊन दाणेदार व हलक्या बदामी रंगाचे दिसू लागेपर्यंत आटवायचेय . त्यात २ टेबलस्पून तूप घालावे म्हणजे मिल्क केक आतून मऊसूत बनतो . आपण दूध २ तास २० मिनिटे शिजवून आटवले आहे .
- मिल्क केक सेट करण्यासाठी मी एक ब्रेड लोफ टिन घेतलाय तुम्ही डब्यात किंवा पातेल्यातही सेट करू शकता .
- टीनला आतून तुपातच हात लावून घ्यावा . मिल्क केक चे मिश्रण त्यात ओतून हलके टीनला टॅप करून एकसंध करून घ्यावं. अलुमिनिम फॉईल ने किंवा घट्ट झाकणाने बंद करून एका जागी जिथे आपला हात लागणार नाही तिथे सेट करायला ठेवावे . मिश्रणाच्या उष्णतेमुळे ते अजून शिजते आणि केक ला एक छान करड्या रंगाची झाक येते , परंतु हे सर्वस्वी तुम्ही कोणत्या भांड्यात सेट करताय यावर अवलंबून आहे . म्हणून खोलगट भांड्याचा वापर करावा.
- सहा तासांनंतर मिल्क केक ताटात काढून वड्या पाडून घ्याव्यात . गार्निश करण्यासाठी वरून पिस्त्याचे काप घालावेत .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply