भारत देशाला एका वाक्यात जर अनुभवायचे असेल तर मी तर म्हणेन ” A Rich Land of Festivals ” – सणांचा अतुलनीय वारसा लाभलेला भिन्न प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आपुला ! उगाचच नाही , आपली दिनदर्शिका , मग ती कालनिर्णय असो कि महालक्ष्मी , लाल रंगानी महिन्यातलया कितीतरी तारखा रंगल्या असतात !
प्रदेशाप्रमाणे सणांची नावे वेगळी तरी त्यामागचा उद्देश , भक्ती भाव हा सारखाच … आपली हरितालिका तिथे उत्तर प्रदेशात तीज म्हणून निर्जळी व्रताची आणि फलाहाराचीच पाळली जाते . मकरसंक्रांतीच्या दिवशी सारे आभाळ निरनिराळ्या इंद्रधनुष्यी पतंगांनी देशभर रंगीत होते !
थोडक्यात माझा मुद्दा हा की आनंदी राहण्यासाठी , आणि जेणेकरून आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठीच हे सण , व्रत वॆकल्ये केली जातात . गणेशोत्सवातील ढोल ताशांची धुंदी उतरतेय न उतरतेय तोवर नवदुर्गा स्तोत्रांचे मंद सूर आणि गरब्याचा ठेका धरायला लावणारे लयदार संगीत आता आसमंतात निनादू लागलेत .
शारदीय नवरात्रारंभ … दुर्गा मातेने महिषासुराशी केलेले घनघोर युद्ध , तब्बल नऊ दिवस निरनिराळ्या प्राण्यांचे रूप घेऊन दुर्गेला फसवणाऱ्या महिषासुराला अखेरीस तिने संपवून एका दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला ! ह्याच दुर्गेची नऊ रूपे आपण पुजतो या नवरात्रीत !
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून नऊ दिवस व्रत आचरले जाते , फलाहार आणि सात्त्विक अन्न यांचा आहारात समावेश केला जातो . उपवासाचे शास्त्रीय कारण आयुर्वेदात फार चांगल्या रीतीने समजावले आहे . उपवासामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो तसेच सात्त्विक आहारामुळे शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते , डीटॉक्सिफाईंग डाईट यालाच म्हणतात ! म्हणूनच उपवासाच्या दिवशी नेमके काय खावे काय खाऊ नये यालाही काही मर्यादा आहेतच ! आपल्याकडे नेमके उलट होते आणि ” एकादशी दुप्पट खाशी ” अशातला भाग होतो ! अति प्रमाणात पचनाला जड असलेले आणि तेच तेच पदार्थ खाल्ले गेल्याने नऊ दिवसांचा उपवास करणे थोडे अशक्यप्राय होऊन जाते.
आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणि बाजारात जे लोकल इन्ग्रेडिएंट्स , भाज्या , फळे मिळतात ते पाहून नक्कीच आपण उपवासासाठी पदार्थ बनवू शकतो . आज मी बनवतेय कच्च्या केळ्याचे आणि पनीरचे कोफ्ते . पनीरमधून प्रथिने मिळतात आणि ते पचायलाही हलके . कच्च्या केळ्याचे गुणधर्म खालीलप्रमाणे:
व्हिटॅमिन A चा स्त्रोत
फायबर जास्त असल्याकारणाने पचनास उत्तम
पोटॅशिअम जास्त असल्याकारणाने हृदय आणि यकृतासाठी उत्तम
मॅग्नेशिअम सारखे क्षार जे शरीराला आवश्यक
ही रेसिपी मी दोन पद्धतीने बनवलीय , एक तर कोफ्ते तळून घेतलेत आणि जर जास्त तेलकट नको असेल तर सरळ टिक्क्या बनवून तव्यावर किंवा ग्रिल पॅनवर शॅलो फ्राय करून घ्या , मी मायक्रोवेव्ह मध्ये ग्रिल करून घेतल्यात !
नक्की एकदा करून पहा ही रेसिपी , कच्च्या केळ्याच्या नेहमीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा मिटक्या मारत खातील !

- ३ कच्ची केळी ( ३०० ग्रॅम्स )
- १८० ग्रॅम्स पनीर
- १ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरलेला
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ टेबलस्पून राजगिऱ्याचे पीठ / शिंगाड्याचे पीठ / वरईचे पीठ
- १ टीस्पून सैंधव मीठ
- तेल
- केळ्यांना आपण सालीसकट उकडून घेणार आहोत . पहिल्या पद्धतीत आपण मायक्रोवेव्हमध्ये केळ उकडून घेण्यासाठी एका काचेच्या मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये केळ पूर्णपणे भिजवून ठेवायचेय . झाकण घालून बाउल ओव्हन मध्ये ठेवायचा आणि खाली दिलेली ओव्हन सेटीन्ग्स करावीत :
- दुसऱ्या पद्धतीत आपण केळी मोदकपात्रात गॅसच्या शेगडीवर उकडून घेणार आहोत . मोदकपात्रात पाणी उकळून त्यावर चाळणीत केळ्यांचे दोन किंवा ३ तुकडे करून १०-१२ मिनिटे झाकून उकडून घ्यावीत. उकडल्यानंतर केळी पूर्ण थंड झाल्यावरच सोलावीत .
- एका बाऊलमध्ये सोलली केळी घेऊन ती व्यवस्थित हाताने किंवा पोटॅटो मॅशरने कुस्करावेत . गुठळ्या राहू देऊ नयेत . मग त्यात पनीर कुस्करून एकत्र करावे .
- आता या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, आले ,दाण्याचा कूट , चवीप्रमाणे सैंधव मीठ घालावे. आता यात राजगिऱ्याचे पीठ घालावे म्हणजे मिश्रणात व्यवस्थित बाईंडिंग येते . मिश्रणाचा गोळा बनवून घ्यावा .
- या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून घ्यावे . हे कोफ्ते आपण तळून घेणार आहोत.
- आता आपण टिक्की बनवून घेऊया ज्या आपण ओव्हनमध्ये ग्रिल करून घेणार आहोत . तुम्ही तव्यावर किंवा ग्रिल पॅन वर शॅलो फ्राय करून घेऊ शकता !
- मायक्रोवेव्ह सेफ तव्यात थोडे तेल लावून त्यावर टिक्की ठेवाव्यात . हाय रॅकवर ठेवून ओव्हनमध्ये ग्रिल कराव्यात .
- १० मिनिटांनंतर दुसऱ्या बाजूंनी ४ मिनिटे ग्रिल करून घ्यावीत .
- कोफ्ते तळण्यासाठी कदाचीत तेल चांगले तापले की आच मंद करून कोफ्ते तळून घ्यावेत . तेल फार गरम असेल आणि मोठ्या आचेवर कोफ्ते तळले तर ते मागेच करपतात आणि थंड तेलात तळले तर ते फुटून पसरतात . सोनेरी रंगावर कोफ्ते तळून घ्यावेत .
- कोफ्ते आणि टिक्की नारळाच्या चटणीसोबत किंवा कोथिंबीर चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत चविष्ट लागतात !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply