मागच्या आठवड्यात माझ्या दिल्लीच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता , जवळजवळ तासभर गप्पा मारल्यानंतर सहजच फोन ठेवता ठेवता तिने मला लंच ला काय बनवले आहेस म्हणून विचारले आणि मी तिला फोडणीचा भात कसा समजेल म्हणून उगाचच त्याचे इंग्रजीत भाषांतर करून म्हटले ,” कुछ नही , बस सादा फ्राईड राईस !”
हे ऐकल्यावर ती चिडवत म्हणाली की सादा लंच मे फ्राईड राईस , मजे हैं तुम्हारे !” मग माझी ट्यूब पेटली की ती फ्राईड राईस म्हणजे आपला चायनीज समजत होती … तिला फोडणीच्या भाताची रेसिपी मी जरा फोडून सांगितल्यावर मग हसत हसत तिने फोन ठेवून दिला !
हे अस अजून एकदा माझ्याबरोबर झालेय बरं का ! काय आहे आम्ही ९० च्या दशकात जन्मलेली पिढी . घरचे जेवण आणि आज्जीचे धपाटे यांशिवाय बाहेर वारंवार खाणे अगदी नसल्यात जमा ! तरी आमचे पिताश्री , गिरगावातले ढीगभर काकाश्री आणि गावावरून आलेले मूठभर मावस-चुलत मामाश्री यांनी आपल्या चटखोर जिभांना शांत करण्यासाठी केलेल्या खादाडीत आम्हालाही लाडाने सामील करून घेतले . मग ते दादरच्या मामा काणे , पणशीकर , कैलास मंदिर पासून , भोईवाड्यातल्या उसाच्या गुर्हाळापर्यंत आणि लालबागच्या मुंबई लाडू सम्राटपर्यंत आमच्या वाऱ्या ठरलेल्या ! आणि घरी सांगायला कारणे ही मजेदार ! ” आई मी बाबासोबत वह्या बायडिंगला टाकायला जातेय ग… ” आणि बाबा व मी तिकडे लालबाग ला पियुषचे ग्लास हाताची चार बोटे घालून चाखत बसलेले असायचो! कधी आबाकाकांसोबत त्यांच्या मिलमध्ये दोन तीन तास टाईमपास करायला मिळायचा ! तेव्हा लंच टाइममध्ये आबाकाका काय मिळेल ते खाऊ द्यायचे , गूळपट्ट्या , वडापाव , चिक्क्या , बर्फाचे गोळे आणि काय नाही ! फक्त हे सगळे खाल्ल्यावर ” गो बाय , घरी सांगू नकोस हां , नायतर तुझी आऊस माका भांडील ” , असे डोळे मिचकावत मजेने म्हणायचे !
नंतर थोडे माध्यमिक शाळेत गेल्यावर महिन्याभराचा पॉकेट मनी साठवल्यावर शाळेच्या कॅन्टीन मध्ये हॉट डॉग खायला मिळायचा , तो तेव्हा १५ रुपयांना होता , हा एवढा मोठ्ठा आणि मस्त टेस्टी ! साठवलेल्या पैशांचा असल्या कारणाने काय अप्रतिम चवीचा लागायचा तो ! हळू हळू पाणीपुरी , शेवपुरी , रगडा पॅटीस यांनी आमच्या जिव्हेला लालचवायला सुरुवात केली . मधेच कधी तरी उडुपी हॉटेलात मसाला डोसा तिघींत एक असा शेअर करून पुढच्या वेळी डोश्याचा मधला जास्त भाजी वाला भाग मी खाणार म्हणून आधीच मांडवली व्हायची ! शालेय जीवन संपेपर्यंत साल २००० उजाडले आणि ग्लोबलायजेशनची मुळे भारतात रुजू लागली होती ! मॅक्डोनाल्डसचा चटेरीपटेरी गणवेश घातलेला विदूषक मुंबईत बऱ्याच ठिकाणी दिसू लागला होता ! बंद काचेच्या दुकानात , भरमसाट पैसे देऊन इंग्लिश वडापाव खाण्यापेक्षा आपला दादरचा छबिलदास चा वडापाव बरा असे स्वतःची समजूत घालत आमच्या गिरणगावातील निम्नमध्यमवर्ग त्यापासून चार हात दूरच राहिला !
मुंबईतल्या स्ट्रीट फूड कल्चर मध्ये पावभाजीची स्थान अव्वल होते आणि आजही ते अबाधित आहे ! त्यावेळी हळू हळू खाऊ गल्लीच्या एखाद्या कोपऱ्यावर गॅसच्या आडव्या लोखंडी शेगडीवर मोठया मोठया कढया लावून स्टॉल मांडले जाऊ लागले ! एका बाजूला धारदार सुरीच्या पात्याने खसाखसा कांदा , कोबी, भोपळी मिरची , गाजर वगैरे भाज्या चिरून , भरपूर आले लसणीची चरचरीत फोडणीचे आवाज आम्हा शाळा- कॉलेजांत जाणाऱ्या तरुण वर्गाचे लक्ष वेधू लागले ! तसे इंद्रियांना थोडे उग्र वाटणारे ते चायनीज सॉस चे सुगंध, या पदार्थांची चव कशी बरं असावी , याचा विचार करायला भाग पाडत होती! बघता बघता मुंबईच्या गर्दीत हे इंडो चायनीज पदार्थ कसे आपलेसे होऊन गेले ते मुंबईकरांना खात्रीने सांगता येणार नाही ! मी खाल्लेला सगळ्यात पहिला इंडो चायनीज पदार्थ म्हणजे ” व्हेज फ्राईड राईस ” तोही इन्फोसिस च्या म्हैसूर कॅम्पस मध्ये , पहिल्या नोकरीच्या ट्रेनिंग मध्ये ! त्या आधी तो कसा दिसतो , कसा खायला लागतो या बाबत आमचे ज्ञान अगाध होते ( हे उपहासाने वाचावे ही विनंती ) ! डिप्लोमा कॉलेजमध्ये वर्गात एका मुलीला प्रत्येक गोष्टीत , मला सगळे कसे माहितेय हे दाखवायची फार हौस होती , ते नाही का माळरानावर पहिल्यांदा सुटल्यावर मोकळा वारा प्यायल्यावर वारू उधळते, तशातला हिचा स्वभाव! कॉलेजमध्ये आल्यावर लागलेली शिंगे ! तिने एकदा बढाईने सांगितले , की तिची आई नवे नवे पदार्थ जसे कि बर्गर , सँडविच , चायनीज वगैरे रोज घरी बनवते आणि तिने डब्यात फ्राईड राईस आणला आहे ! आम्ही तिच्याभवती घोळका करून उभे राहिलो , तिने अभिमानाने डबा उघडला आणि क्षणार्धात आमच्यामधल्या एका मुलाने ज्याने फ्राईड राईस आधी खाऊन बघितला होता , तो ओरडला ,” अर्रे ये तो तवा पुलाव है , फ्राईड राईस नाहिय्येच , कूच बी फेक मत चल !” आमच्यांत हास्याची खसखस पिकली आणि बिचारीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता !
या प्रसंगानंतर जवळजवळ ५-६ वर्षांचा कालावधी गेला , इंजिनीरिंग पूर्ण होऊन मी नोकरीला लागले आणि तिथे कॅम्पस च्या कॅन्टीन मध्ये मी प्रथम फ्राईड राईस खाल्ला .
माझ्या फ्रिजमध्ये नेहमी चायनीज सॉसेस असतात कारण घरात कधी कोणाला काय खायची लहर येईल सांगता येत नाहो . कधी फार वेळ किचनमध्ये घालवायचा नसेल तेव्हा मी फ्राईड राइस नक्की बनवते , काय पण तुम्ही चेष्टा करताय राव , फोडणीचा भात नाही हो , इंडो चायनीज फ्राईड राईस म्हणतेय मी ! घेताय ना रेसिपी,,,,
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- १ १/२ कप = ३०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन , किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवलेला
- १/२ कप = ५० ग्रॅम्स कोबी लांब व पातळ चिरून
- १ कप = ८० ग्रॅम्स भोपळी मिरची लांब चिरून
- १/२ कप =५० ग्रॅम्स गाजर लांब चिरून
- १/२ कप = ५० ग्रॅम्स पतीचा कांदा लांब चिरून
- १/२ कप = २५ ग्रॅम्स कांद्याची हिरवी पात बारीक चिरून
- दीड टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- दीड टीस्पून सोया सॉस
- १ मॅग्गी सीजनिंग क्यूब ( मॅग्गी मॅजिक मसाला क्यूब )
- १/२ टीस्पून काळी मिरी मिरी जाडसर कुटून
- तेल
- मीठ चवीनुसार
- सर्वप्रथम आपण भात शिजवून घेऊ. हा भात आपण "ऍबसॉरपशन" मेथड ने शिजवणार आहोत. म्हणून दीड कप तांदळासाठी आपण दुप्पट म्हणजेच ३ कप पाणी वापरू. एक भांड्यात तांदूळ आणि पाणी एकत्र घालून त्यातच २ टीस्पून मीठ घालून घेऊ. मोठ्या आचेवर एक उकळी फुटू देऊ .
- आच मंद करून झाकण घालून बारीक आगीवर भात पूर्णपणे शिजू देऊ. भात शिजला की गॅस बंद करून एका ताटात पसरवून थंड होऊ देऊ . शिजलेल्या भाताला हळुवार हाताने फोर्क ने पसरावावा नाहीतर दाणे तुटतात. त्यावर थोडे तेल ( १ टीस्पून ) घालावे जेणेकरून भाताची शिते एकमेकांना चिकटून त्याचा गोळा होणार नाही !.
- भात थंड झाला कि त्यावर सोया सॉस घालून एकत्र करून घेऊ.
- एका मोठ्या लोखंडी कढईत किंवा नॉन स्टिक कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करून घेऊ. त्यात आले लसणाची पेस्ट घालून १-२ मिनिटे परतून घेऊ. त्यात सगळ्या वर चिरलेल्या भाज्या घालून मोठ्या आचेवर २ मिनिटे शिजू देऊ .
- आता मॅग्गी सिजनिंग क्यूब, काळी मिरी पावडर घालून परतून घेऊ. भाज्या अति शिजू देऊ नयेत .
- गरज असल्यास मीठ घालावे . आता शिजलेला भात घालून नीट वर खाली भाज्यांसोबत एकत्र करून घ्यावा.
- व्हेज फ्राईड राईस तयार आहे . बारीक चिरलेल्या कांद्याच्या हिरव्या पातीने सजवावा !
Leave a Reply