“राजस्थान “- राजांचे स्थान , ” Land Of Kings ” असे म्हटलं जाणारा हा प्रदेश . भौगोलिकदृष्ट्या भारतातील सगळ्यात मोठे राज्य! आजही काही लोक गर्वाने त्याला राजपुताना असे संबोधतात !
राजस्थानातले सगळी संस्थाने आणि राजवाडे तिथल्या राजपूत राजांच्या शौर्याची गाथा आजवर जगाला अभिमानाने सांगत आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या जितके श्रीमंत हे राज्य तितकेच खाद्यसंस्कृतीतही अव्वल दर्जाचे ! निसर्गाची फारशी कृपा नसूनही , दूरवर पसरलेल्या वाळवंटात पाण्याच्या अभाव असूनही या राज्याने कितीतरी नायाब पाककृती भेट दिल्या आहेत . ” लाल मांस “, ” बिना पानी कि रोटी”, ” बाजरे की खिचडी ” ,”सफेद ,मांस” आणि ” दाल बाटी चुरमा ” हिने तर खाद्यसंस्कृतीचा इतिहास रचलाय ! लढवय्यांच्या शरीरात ऊर्जा आणि सळसळत्या रक्तासाठी जसे मांसाहार इथला प्रिय तसेच शाकाहारी खाद्यपदार्थही चवीत तसूभरही मागे नाहीत. तिखट खाण्याकडे यांचा कल जास्त , कारण इतक्या उष्णतेत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम तर यायलाच हवा ! आणि यासाठीच तिखट तरीही चविष्ट खाणे ! इथली रंगीबेरंगी संस्कृती मला नेहमीच आकर्षित करते .
न जाणो कितीतरीवेळा इथल्या मारवाडी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मी ” चोखी ढाणी ” या रिसॉर्ट मध्ये मुंबई पुण्यात जाऊन घेतला आहे .
राजस्थान खाद्य संस्कृतीविषयी माझे प्रेम तुम्हाला माझ्या हिंदी युट्युब चॅनेलवरील राजस्थान स्पेशल प्लेलिस्टवरून कळेलच !
आजची रेसिपी अशीच माझी खूप आवडती ! एक तर या पावसाळी धुंद वातावरणासाठी एकदम योग्य आणि दुसरे म्हणजे मॅरिएट मध्ये ट्रेनिंग घेताना अगणित वेळा मी तिथल्या राजस्थानी थाळीच्या मेनूमध्ये हिचे प्रेपरेशन केलय. माझे मेन शेफ सुद्धा माझ्यावर काम सोपवून बिनधास्त असायचे.
भावनगरी मिरची वडा जिचे मुंबईत मिरची भजी असेही नामकरण झालेय . हा मिरची वडा जोधपूरमध्ये खूप प्रसिद्ध , म्हणून त्याला ” जोधपुरी मिरची वडा ” असेही म्हणतात . आता हा मिरची वडा देशभरात निरनिराळ्या पद्धतीने बनवला जातो . ही रेसिपी थोडी पारंपरिक वळणाने जाणारी , पहा आवडतेय का !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
- १० भावनगरी हिरव्या मिरच्या , स्वच्छ धुऊन , कापडाने कोरड्या करून
- १ कप = २०० ग्रॅम्स बेसन
- १ टीस्पून ओवा
- १ टीस्पून आले लसूण पेस्ट
- पाव टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- ४ मध्यम आकाराचे बटाटे = २२५ ग्रॅम्स उकडून , साली काढून
- १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
- १ टीस्पून बडीशेप
- १ इंच आल्याचा तुकडा , किसून
- पाव टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- अर्धा टीस्पून आमचूर पावडर
- पाव टीस्पून अनार दाना पावडर ( वाळवलेल्या डाळिंबाच्या दाण्याची पावडर )
- मीठ चवीनुसार
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- तळण्यासाठी तेल
- एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात बडीशेपची फोडणी द्यावी. आता किसलेले आले घालून १-२ मिनिटे परतावे. आल्याचा कच्चेपणा निघून गेल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून ५ मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवावा. हळद आणि लाल मिरची पूड घालून घ्यावी.
- मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडे पाणी घालून परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. उकडून मॅश केलेले बटाटे घालून एकत्र करून घ्यावेत. आमचूर पावडर, अनारदाना पावडर , आणि उरलेली कोथिंबीर घालून नीट एकत्र करून घ्यावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
- बेसनाचा घोळ बनवण्यासाठी एका खोलगट भांड्यात बेसन, ओवा, हळद, लाल मिरची पूड, आले लसणाची पेस्ट , आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. या मिश्रणात १ टेबलस्पून कडकडीत गरम केलेले तेल घालून एकत्र करावे. तेलाचे मोहन घातल्याने मिरची वडे चुरचुरीत बनतात. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. हा घोळ चमच्याच्या मागच्या भागाला कोट होईल इतपत घट्ट असावा. पातळ असू नये , नाहीतर मिरच्या तुरट कच्या कच्य्या लागतील. मी पाऊण कप पाणी वापरून घट्ट बेसनाचा घोळ बनवला आहे .
- मिरच्यांचे देठ ठेवून त्यांच्या पोटाकडच्या भागावर मधोमध चिरा देऊन , जमतील तेवढ्या बिया काढून टाकाव्यात. या मिरच्या बटाट्याच्या तयार केलेल्या सारणाने भरून बंद कराव्यात . जास्तीचे सारण काढून टाकावे .
- मिरच्यांना बेसनाच्या घोळात बुडवून तळण्यासाठी एक सोप्पी युक्ती ! एका छोट्या ग्लासमधे ज्यात मिरच्या पूर्णपणे उभ्या बुडतील , त्यात बेसनाचा घोळ घालावा . नंतर त्यात मिरच्या बुडवून , मग कढईत तळाव्यात .
- तळण्यासाठी तेल चांगले गरम आहे की नाही हे पाहण्यासाठी बेसनाचे २-३ थेंब घालून पाहावे . जर ते तळून लगेचच वर आले तर समजावे की तेल तापले आहे. मंद ते मध्यम आचेवर मिरच्या खरपूस तळून घ्याव्यात.
Leave a Reply