” Love is in the air !” दरवर्षी जणू असे म्हणत, फेबुवारी येऊन ठेपतो ! जागतिक स्तरावर प्रेमाचा उत्सव म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकचे हे दिवस ! सळसळती तरुणाई असो किंवा मुरांब्याप्रमाणे मुरलेले अर्ध्या शतकाहून जास्त काळ सोबत असलेले , समाधानी वार्धक्य .. आपल्या नुकत्याच सुरु झालेल्या प्रेमाच्या किंवा एकत्र हा जीवनाचा भवसागर पार केलेल्या पार्टनरशिपच्या नात्याला साजरे करण्यासाठी हे दिवस वेगवेगळ्या वैशिष्टयांनी भारून गेलेले .. ऐन विशीतला नुकताच मिसरूड फुटू लागलेला तरुण हातात मोट्ठे गुलाबी रंगाचे टेडी घेऊन बाईकच्या आरशात स्वतःला निरखत किक मारून , हा पुढे निघून सुद्धा गेला , तर बागेच्या कोपऱ्यात सत्तरीच्या आजींच्या चंदेरी केसांच्या अंबाड्यात आजोबा हळूच इकडे तिकडे पाहत मोगऱ्याच्या शुभ्र कळ्यांचा गजरा माळत आहेत ! ही अशी दृश्ये नजरेस पडली की खरंच खुद्कन हसू येते . इतकेच काय आता शिशिराच्या गोठवणाऱ्या थंडीने आखडून गेलेल्या निसर्गाला सुद्धा वसंताच्या चैत्रपालवीचे वेध लागलेत.. काही दिवसांतच निसर्गाचा प्रेमोत्सव रंगणार , आणि त्या प्रेमाला कुठलाही आडपडदा नाही , ना जागेचे , ना वेळेचे , ना लोकलज्जेचे ,, असेल ते फक्त नी फक्त अमर्याद , निरंकुश, आणि निखळ प्रेम !
प्रेमाची व्याख्या करणे तसे अवघडच .. मग ते कुठलेही प्रेम असो , मातृप्रेम, पितृप्रेम, बंधू-भगिनी प्रेम , प्राणिप्रेम , जोडीदारावरचे प्रेम की आपल्या संस्कृतीविषयीचे प्रेम ! त्यातून खाण्यावर प्रेम करणाऱ्यांची वर्गवारी ही लोकोत्तर मनुष्यांत येते ,यात काही शंका कुणाला ? आपल्या घरातील खाद्यसंस्कृतीखेरीज इतर भागांत , देशांत बनणाऱ्या खाद्यसंस्कृतीविषयी खाद्यप्रेमींना आकर्षण असतेच ! आजकाल तर ग्लोबल खाद्यसंस्कृतीच्या प्रभावाने हे वेगवेगळे पदार्थ जागोजागी हॉटेलांत तर मिळतातच आणि घरी बनवणे सुद्धा शक्य आहे ! एक गम्मत सांगते , प्युअर साऊथ इंडियन अण्णाच्या हॉटेलात एखाद्या टेबलावर कोणी नूडल्स खाताना दिसतोच, तर ऑथेंटिक कोरियन रेस्टोरेंट मध्ये एका कुटुंबासमवेत असलेल्या आजींनी पंजाबी दाल मखनी ऑर्डर केलेली ऐकून मी माझी मान ९० अंशाच्या कोनातून वळवून हनीचा डिस्पेन्सर टेबलावर आडवा केला होता ! आम्हा जिमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एका मैत्रिणीच्या अवघ्या सहा वर्षांच्या पोट्ट्याने सर्वरला आल्या आल्या , ” अंकल, व्हाईट्ट पास्ता विथ चीझ , ओन्ली कापशीकम , नो ओलिव्ह हां .” असे म्हणून ऑर्डर दिली , तेव्हा त्याच्या धिटाईकडे आम्ही साऱ्या कौतुकाने पाहत राहिलो ! म्हणजे एकूण सांगायचा मुद्दा हा , की आजकाल चायनीज म्हटले की नूडलज, फ्राइड राईस , मन्चुरिअन तर इटालियन म्हटले की पिझ्झा , पास्ता हे जणू सगळ्यांसाठी समीकरण झालेले आहे , इतके ते पदार्थ आपल्या अंगवळणी पडलेत ! आजची माझी रेसिपी ही पास्त्याची , नेहमीप्रमाणे रेड सॉस पास्ता, व्हाईट सॉस पास्ता ,असा हा नसून तर खास वॅलेन्टाईनसाठी हा आहे ” पिंक सॉस पास्ता “!
प्रेमाचा रंग हा गुलाबी .. तर या रेसिपीच्या निमित्ताने आज आपण थोडेसे ” पास्त्यावर बोलू काही ..” ( ” आयुष्यावर बोलू काही ..” या धर्तीवर वाचले असेलच तुम्ही ..)
आपण भारतीय पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीला सरसकट ” कॉंटिनेंटल ” म्हणून संबोधतो . हे तितकेसे खरे नाही . कॉंटिनेंटल फूड म्हणजे मुख्यतः इंग्लंड आणि फ्रान्स इथली खाद्यसंस्कृती होय ! या देशांच्या वसाहतवादाच्या धोरणामुळे त्यांच्या अखत्यारीत हे संस्कृती खूप प्रसिद्ध होती . परंतु नंतर जगाला वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी खाद्यसंस्कृती दृष्टीस पडू लागली . यात महत्वाची होती , ती ” इटालियन ” खाद्यसंस्कृती ! असे म्हणतात की, इटालियन ही साऱ्या पाश्चात्त्य नी युरोपिअन खाद्यसंस्कृतीची जननी आहे . ” fine dining ” चे सूत्र इटली ते फ्रांस असे पोहोचले ,याचे दाखले इतिहासात आढळतात ! इटली आपल्या पास्ता , रीसोत्तो , पिझ्झासाठी , साऱ्या जगभरात इतकी प्रसिद्ध आहे .
” पास्ता ” या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेतील ” Pastos ” या शब्दात आहे – त्याचा अर्थ आहे ” Dough ” – मळलेल्या कणकेचा गोळा ! खरंच आहे ना , पहा ना एका उत्तम पास्त्याची चव त्याच्या मळलेल्या कणकेच्या गोळ्यातच असते . Durum Wheat चे पीठ , अंडी , ऑलिव्ह ऑइल आणि किंचित पाणी बास.. आणि वेगवेगळ्या भाज्यांच्या प्युरीस , किंवा हर्ब्स ने चवीत वैविध्य ! बरं हा Durum Wheat नेहमीच्या गव्हाहून थोडा मजबूत क्वालिटीचा .. यात नेहमीच्या गव्हाहून प्रथिनांचे प्रमाण जास्त म्हणजे १५ टक्के आणि ग्लूटेन त्यामानाने कमी ! पास्त्यासाठी पीठ मळताना सुद्धा पाणी कमी वापरून ग्लूटेन निर्माण करणे कंट्रोल केले जाते तरच पास्त्याची शीट ही फर्म, एकसंध निघते . Durum Wheat ऐवजी काही इतर धान्यांच्या पिठाचा वापर करून सुद्धा पास्ता शीट्स बनवल्या जातात ! या पास्त्याचे खालील दोन प्रकारांत मुख्यत्वे वर्गीकरण होते :
१. Dried Pasta : हा पास्ता बरीच वर्षे टिकणारा आणि साधारण ५६ हून अधिक आकारांत आपल्याला दुकानांत पॅकेज्ड फॉर्म मध्ये मिळतो .
२. Fresh -Homemade Pasta : हा पास्ता ताजा बनवून लगेच वापरावा नाहीतर दोनेक दिवसांत खराब होणारा , परंतु जर फ्रोझन करून ठेवला तर काही काळ टिकतो !
पास्त्याला दिवसभरात कुठल्याही जेवणात स्थान – अगदी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत , तसेच साईड डिश किंवा सूप वर गार्निश म्हणून सुद्धा , आहे कि नाही गम्मत ! कारण प्रथिनांसोबत पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्ब्स चा उच्च स्रोत असल्याकारणाने पटकन ऊर्जा मिळते .
पास्ता बनवताना सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यात वापरला जाणारा सॉस .. तसे कुठला पास्ता कोणत्या सॉस मध्ये टॉस करावा असा काही नियम नसला तरी शक्यतो फ्लॅट पास्ता जसे की Fettuccine Pasta शक्यतो क्रीमी सॉस मध्ये जास्त चांगले लागतात , तर Fusilli सारखा पास्ता टोमॅटो आणि हर्ब्स वाल्या रोबस्ट सॉस मध्ये जास्त appetizing वाटतात . पास्त्यासोबत खाली काही सॉसेस बनवले जातात :
१. टोमॅटो सॉस
२. क्रीम , बटर किंवा bechamel -based
३. meat based सॉस
४. ऑलिव्ह ऑइल आणि लसूण
५. व्हाईट किंवा ब्लू चीज
६. पेस्तो
आणि पास्त्यात वापरले जाणारे चीज तर इटलीत बोलून सोय नाही इतक्या उच्च स्तराचे :
१. Parmesan
२. Pecorino
३. Ricotta
४. Mozzarella
५. Gorgonzolla
आपल्या आजच्या पास्त्यात आपण रेड टोमॅटो आणि क्रीम यांचा सुरेख संगम साधत प्रेमाचा गुलाबी असा पिंक सॉस तयार केला आहे , खाली रेसिपीत तुम्हाला समजेलच ! जसे मी म्हटले, ड्राईड पास्त्याच्या आकारावरून ५६ हून अधिक प्रकार आहेत तसेच Stuffed पास्ता हा प्रकार Gourmet Italian Buffet ची शान वाढवतो . पास्त्याचा आकार देण्यासाठी पास्ता मशीनचा वापर केला जातो तसे Stuffed पास्ता बनवण्यासाठी हाताने आकार देऊन , त्यात निरनिराळ्या प्रकारचे चीज , भाज्या किंवा meat यांचे मिश्रण भरून नंतर दुसऱ्या पास्त्याच्या शीट ने व्यवस्थित बंद करून घेण्यात येते जेणेकरून पास्ता पाण्यात poach करताना stuffing बाहेर येणार नाही !
पास्त्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणविशेष कधी पुढच्या पास्त्याच्या रेसिपीसाठी राखून ठेवत आहे , आपल्या आजच्या रेसिपीत आपण Penne पास्ता वापरला आहे . Penne पास्ता हा नळकांड्यासारखा असून त्याची टोके तिरकस कापलेली असतात , याचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा उभट रेषांचा असतो . हा पास्ता कुठल्याही Chunky सॉस सोबत चांगला लागतो कारण तो त्यात व्यवस्थित लपेटला जातो !
पास्ता शिजवताना काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपला पास्ता हा मेणचट बनतो ! त्यासाठी खाली दिलेल्या काही टिप्स :
१. कुठलाही पास्ता आधी शिजवून घेताना पास्ता ते पाणी हे प्रमाण १: ५ असावे . म्हणजे १ कप पास्त्यासाठी ५ कप पाणी उकळत ठेवावे , जेणेकरून पास्ता हा पाण्यात सुटसुटीत उकळतो . तसेच पाण्याला उकळी आल्यानंतरच पास्ता पाण्यात घालावा .
२. पाण्यात मीठ आणि तेल घालायला विसरू नये नाहीतर पास्ता चिकट बनू शकतो आणि सॉस मध्ये टॉस केल्यावर सुद्धा बेचव लागू शकतो .
३. कोणत्याही पास्त्याला शिजवताना लागणारा वेळ हा त्याच्या पास्त्याच्या आकारावर , व तो कोणत्या पिठाचा आहे , त्यावर अवलंबून असतो . जसे की Durum Wheat चा १ कप penne पास्ता १२ ते १५ मिनिटे घेऊ शकतो . तसेच फ्रेश पास्ता फक्त २-३ मिनिटे शिजण्यास घेतो .
४. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिजल्यानंतर पास्त्याचे टेक्सचर .. पास्ता नेहमी ” Al -Dente ” शिजवावा म्हणजे ” to the bite ” किंवा ” to the tooth ” ! म्हणजे पास्ता खाताना तो दातांनी हलका चावता येण्यासारखा राहावा , जर मेणचट लागला तर समजावे की पास्ता अति शिजलाय ! ” Al – Dente ” पास्ता हा खाण्यास तर उत्तमच परंतु ज्या सॉस मध्ये तो टॉस होतो त्यात तो अजून प्रेसेंटेबल दिसतो !
ही पास्त्याची कहाणी ऐकून अजून जवळीक निर्माण झाली का ? मग करायची का सुरुवात आपल्या रेसिपीला? तसेच संपूर्ण कृतीसाठी विडिओ नक्की पहा !

- १ कप = १०० ग्रॅम्स पेन्ने पास्ता ( किंवा तुमच्या आवडीचा कोणताही पास्ता जसे मॅकरोनी, फार्फाले )
- १०० ग्राम भाज्यांचे तुकडे ( ब्रोकोली , लाल आणि पिवळी भोपळी मिरची )
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स ( लहान चौकोनी तुकड्यांत चिरून )
- १ लहान टोमॅटो = ७० ग्रॅम्स ( लहान चौकोनी तुकड्यांत चिरून)
- १/३ कप = ७० ml फ्रेश क्रीम
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो = १८० ग्रॅम्स प्युरी करून
- ऑलिव्ह ऑइल
- मीठ चवीनुसार
- अर्धा टीस्पून व्हाईट पेपर पावडर / पांढरी मिरी पावडर
- २-३ ऑलिव्ह चिरून
- १ टीस्पून बटर
- १ टेबलस्पून टोमॅटो केचअप
- ४-५ लसणीच्या पाकळ्या ( बारीक चिरून )
- अर्धा टीस्पून चिल्ली फ्लेक्स
- १ प्रोसेस चीज क्युब
- बेसिल लीव्हस २-३
- एका कढईत १ कप पास्ता शिजवण्यासाठी ५ कप पाणी उकळत ठेवावे . त्यात २ टीस्पून ऑलिव्ह ऑइल आणि १ टेबलस्पून मीठ घालावे . जसे पाणी उकळू लागले की त्यात पास्ता घालावा . Durum wheat पास्त्याला १२ ते १५ मिनिटे शिजायला लागतात . पास्ता होईपर्यंत भाज्या शिजवून घेऊ .
- दुसऱ्या भांड्यात पण उकळत ठेवावे , त्यात १ टीस्पून साखर घालावी . भाज्या ( ब्रोकोली आणि भोपळी मिरच्या ) घालाव्यात. फक्त २ मिनिटांसाठी शिजवावे . नंतर गरम पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात घालावे म्हणजे भाज्यांचा रंग नी टेक्श्चर चांगले राहते .
- पास्ता आपण १३ मिनिटे शिजवून घेतला आहे , हा आता "Al -Dente " म्हणजे " to -the -bite " शिजला आहे . पास्ता पाण्यातून काढून एका मोठ्या ताटात पसरवून ठेवावा आणि त्यावर काही तेल शिंपडावे म्हणजे एकमेकांना चिकटत नाही .
- एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तेल घालावे . थोडे बटर घालून वितळू द्यावे . चिरलेला कांदा घालून मऊ होई पर्यंत परतावा .
- नंतर बारीक चिरलेला लसूण घालून जरासा गुलाबी होऊ द्यावा . नंतर चिरलेले टोमॅटो , टोमॅटोची प्युरी आणि थोडे मीठ घालावे . टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत शिजू द्यावेत .
- २-३ मिनिटानंतर टोमॅटो केचअप , चिल्ली फ्लेक्स आणि किसलेले चीज घालून नीट एकत्र करून घ्यावे .
- सगळे साहित्य एकत्र करून घेतल्यावर फ्रेश क्रीम घालावी . त्याआधी गॅस बंद करावा . मग क्रीम घोटून मिक्स करावी म्हणजे क्रीम फाटत नाही .
- नंतर गॅस परत सुरु करावा , आपला पिंक सॉस तयार आहे . त्यात पांढरी मिरी पावडर , बेसिल ची पाने हाताने बारीक खुडून एकत्र करून घ्यावीत . बेसिल आणि पांढरी मिरी घालताना नेहमी प्रमाणात घालावी , जास्त झाली तर त्यांचा सुगंध पास्त्यात फार जास्त येतो .
- आता शिजवलेल्या भाज्या घालून सॉस मध्ये एकत्र करून घ्याव्यात . नंतर बॉइल्ड पास्ता घालून फक्त टॉस करावा . खूप वेळ शिजवू नये . पास्ता इन पिंक सॉस तयार आहे !
- हा पास्ता वरून ऑलिव्हज आणि बेसिल च्या फ्रेश पानांनी सजवून गरमागरम खायला द्यावा !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply