माणसाला पाच ज्ञानेंद्रिये असतात -सांगा बरे कोणती? बघा … सगळे कसे शाळेत शिकवलेल्या क्रमानेच उत्तर पुटपुटायला लागलेत, होय ना ? डोळे , नाक , कान , जीभ आणि त्वचा ! आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका तर मला अजून आठवतात , त्यांनी अगदी हाताचे तळवे एकेक इंद्रियावर लावून तसेच वेडावल्यासारखी जीभ बाहेर काढून मग आपल्याच हाताला हलकाच चिमटा काढून , जीभ नी त्वचा म्हणायला शिकवले होते ! आता आठवले तरी ओठांच्या कडा अगदी कानांपर्यंत पसरून हसायला येते ! माझी दोन ज्ञानेंद्रिये अनुक्रमे डोळे नी कान लहानपणीच मायनस नंबरच्या जाड भिंगांच्या अतिरिक्त भारामुळे थोडीशी दमलेली ..
जरी अभ्यासात हुशार होते तरी हा चष्म्याचा दागिना लहानपणी आजीच्या नी मामाच्या धाकाला न जुमानता शेजाऱ्यांच्या व्हईसीआर वर रात्री अपरात्री गॅलरीत लावलेल्या कलर टीवीवर पाहिलेल्या ” खून भरी मांग ” सारख्या चित्रपटांची भेट ! पण ही सगळी कसर भरून काढली ती माझ्या घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रियाने – नाक आणि जीभेने !
तसेही चाळीत राहणाऱ्या लोकोत्तर व्यक्तींना आणि त्यातून कोकणात जन्मलेल्या प्रत्येकाला ही जन्मजात देणगी असतेच ! कसे ते सांगते , कोणाच्या घरात आज बोंबील तळला जातोय , तर कोणाकडे आज नुसते तव्यावरची अंड्याची पोळी , कुठे काजे ची आमटी की कोळंबीचा बरबाट हे आमच्याकडे चड्डीतले पोर सुद्धा नाक पुसत सांगेल . माझी पणजी तर पाठमोरी ओटीवर वाती वळता वळता स्वयंपाकघरात घरकाम करायला आलेल्या जमुआक्काला म्हणायची , ” जमे , गे खोबरा जरा अजून लाल भाज , आसा पिवळा बिरडा तुज्या आवशीन तरी बनवलानं होता !” पणजीच्या खेळकर कंमेंट ला जमू अक्का सुद्धा , हसत हसतच ” व्हय गे नानी , तुजे पाठीस डोले बसवून घीतलेस का काय .. होय तर ..” अशी कोपरखळी मारायची!
आमच्याकडे कोणत्याही अन्नाला नाव ठेवणे आणि एखादा अन्नघटक आहारातून वगळणे , यासारखे अक्षम्य अपराध नाही . आवडत नसेल तर विकत आणूच नका , आणि आणले तर ते न फुकट घालवता खाल्ले जावे , हीच एक माफक अपेक्षा ! आता सुद्धा मी माझ्या घराचे स्वयंपाकघर ताब्यात घेतले असताना, हाच नियम कायम ठेवला आहे . म्हणूनच , आईच्या पिशवीत मुळ्याचा हरित संभार किंवा शेपूचा तुरा बाजार पिशवीतून डोकावताना दिसला की , अचानक ” आईचे माझ्यावर प्रेमच नाही ” , असे वाटायला लागायचे . त्यातून मुळ्याची भाजी फोडणीला घातली की बाजूला बोळात खेळत असताना , एखादी वात्रट मैत्रीण चिरकायची , ” ए कुठून वास येतोय , स्मिता तुझ्याकडे वाटते , आमच्याकडे आज बटाटेवडे आणलेत , मी जाते बाबा .. ” आजीने बशीभर वाढलेली भाजी खाताना मैत्रिणीकडचे बटाटेवडे डोळ्यांसमोर उभे राहायचे . तसेच शेपूच्या भाजीचे.. एवढे मात्र नक्की की माझी आई या दोन्ही भाज्या चवीला मात्र अप्रतिम बनवायची , कधी चण्याची डाळ घालून तर कधी उकळत्या वरणात मूठभर शेपू द्यायची सोडून .. नाकामुळे या दोन भाज्यांशी गट्टी जमायला थोडा वेळ लागला इतकेच !
कोकणात आंबोळी , घावन यासारख्या पदार्थांचे विशेष महत्त्व ! नेहमीच्या आंबोळीसोबत तवशाची आंबोळी , गोड आंबोळी , डाळींचे आडे असे वेगवेगळे पदार्थ बनत असतात . जसा चण्याच्या पीठाचा पोळा , अंड्याची पोळी असे शब्दप्रयोग सर्रास वापरले जातात तसेच या आंबोळ्यांना ‘पोळे’ असेही संबोधण्यात येते . शेपूची भाजी या पोळ्यात वापरून गरम भिड्यावर सकाळी सकाळी काढलेले शेपूचे पोळे नाश्त्यासाठी खास पसंद केले जातात . आणि शेपूचा जो एक सुगंध असतो ज्यामुळे लोकांचा तो नावडता असतो , तो सुगंध सुद्धा या पोळ्यांत बेमालूमपणे मिसळला जाऊन अतिशय अप्रतिम चवीचे गोडसर पोळे बनतात ! यासोबत लाल मिरच्यांची झणझणीत चटणी किंवा कैरीची चटणी तर अप्रतिम लागतेच , किंवा कोणतीही उसळ बनवून वाढा , खाणारा त्या शेपूच्या पोळ्याच्या रंगामुळे आणि चवीने इतका हरखून जातो की सांगता सोय नाही !
ही रेसिपी कोकणात मुख्यत्वे गोव्यात सर्रास बनवली जाते आणि शेफ दीपा अवचट यांच्या ” गोवा पोर्तुगीजा ” या पुस्तकात तिचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो . म्हणजे साध्या साध्या साहित्यातून बनणाऱ्या इतक्या आरोग्यदायी पाककृती आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीत आहेत , याचा खरंच अभिमान वाटतो !
शेपूचे आहारातील फायदे :
- पचनसंस्थेचे आरोग्य वृद्धी : शेपू पचनासाठी मदत करणारे पित्त आणि इतर द्रव्य निर्माण करते म्हणूनच पचनसंस्थेतील अडथळे दार होतात . तसेच हा वात आणि पित्त सुधारक असल्याने नवजात बालकांना आवर्जून शेपूच्या बियांची धुरी दिली जाते .
- स्त्रियांच्या गर्भाशय आरोग्यासाठी आणि हार्मोन्स संतुलनासाठी शेपू खाण्याचा सल्ला दिला जातो .
- न थांबणारी उचकी , फुगलेले पोट , वाढलेले कोलेस्टेरॉल यांवर नियंत्रणासाठी शेपू हा जालीम उपाय मानला जातो ! हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी शेपूचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे .
- लहान मुलांच्या वाढत्या वयात कॅल्शिअम , मॅग्नेशिअम तसेच लोहाची हाडांच्या बळकटीसाठी खूप गरज असते . तेव्हा कुठल्याही पद्धतीने शेपू लहान मुलांच्या पोटात गेला पाहिजे अशी तरतूद नेहमीच्या जेवणात करावीच !
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील आंतरिक संसर्गापासून बचावासाठी तसेच जखमा भरून येण्यास शेपू सगळ्यात उपयोगी !
- मधुमेहींनी तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी नियमित शेपूचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो !
मी वर दिलेले फायदे हे पिढ्यानपिढ्या आपल्या पणज्या , आज्ज्यांपासून पुढे सरकवत आलेल्या आजीबाईच्या बटव्यातूनच आहेत . म्हणून शेपू चा गंध आवडत नाही म्ह्णून नाकं मुरडणाऱ्यांनी ही भाजी अगदीच आपल्या स्वयंपाकघरातून तडीपार करण्यापेक्षा , आज मी जसे शेपूच्या पोळ्यांची रेसिपी देतेय , तशा काही आपल्या पारंपरिक किंवा सूप सारख्या ग्लोबल रेसिपीज शोधून आहारात समाविष्ट कराव्यात असे मला प्रकर्षाने वाटते ! कारण चविष्ट असण्यासोबत आहार चौरस असणे या धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचे आहे , नाही का ?

- साहित्य:
- १ कप - २०० ग्रॅम्स लहान दाण्यांचा तांदूळ ( इंद्रायणी / बासमती तुकडा/ आंबेमोहोर )
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स उडीद डाळ
- २ टेबलस्पून = २० ग्रॅम्स चण्याची डाळ
- पाव कप = ३० ग्रॅम्स पोहे
- १ टीस्पून मीठ
- पाव टीस्पून मेथी दाणे
- तेल
- पाणी गरजेनुसार
- ७० ग्रॅम्स शेपू ( सव्वा ते दीड कप )
- ३ हिरव्या मिरच्या
- अर्धा कप = ४० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- दीड ते दोन टेबलस्पून गूळ
- कृती:
- पोळ्याच्या मिश्रणासाठी सगळे साहित्य तांदूळ , डाळी आणि पोहे स्वच्छ पाणी निघेपर्यंत चौ घ्यायचे आहे .
- नंतर मेथीचे दाणे तांदळासोबत भिजवत ठेवावे आणि डाळी सुद्धा पाण्यात बुडेपर्यंत सहा ते ८ तासांसाठी भिजवाव्यात ! पोहे वाटायच्या आधी १ तास भिजवले तरीही चालतील .
- ८ तासानंतर तांदूळ नी डाळींतील पाणी काढून टाकावे . मिक्सरमधून हे सगळे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे .
- पाऊण कप पाणी घालून मिश्रण आपण वाटून घेतले आहे . एका खोलगट भांड्यात काढून हाताने एकाच दिशेने ३-४ मिनिटे गोलाकार फिरवत नीट ढवळून घ्यावे .
- हे मिश्रण सरसरीत असावे . नंतर झाकण घालून ८ ते १० तासांसाठी झाकून आंबवण्यास ठेवावे.
- जेव्हा शेपूचे पोळे करायला घ्यायचे आहेत तेव्हा शेपूची पाने आणि कोवळी देठे , ओले खोबरे , मीठ आणि गूळ अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावेत .
- पोळ्यांचे मिश्रण ८ तासांत चांगले फुलते . त्यात शेपूची पेस्ट घालावी . मिश्रण सरसरीत असले तर पाणी घालून नये .
- एका भिड्यावर/ काहिलीवर किंवा नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल पसरवून गरम करून घ्यावे . नंतर आच मध्यम करून दीड ते दोन डाव मिश्रण मध्यभागी घालून गोलाकार पसरवावे . पोळे थोडे जाडच घालावेत . झाकण घालून २ मिनिटे होऊ द्यावेत .
- नंतर बाजू उलटून पोळे दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घयावे .
- गरम गरम शेपूचे पोळे चटणीसोबत किंवा उसळीसोबत खायला द्यावेत .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply