हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची नवलाई बास आता काही दिवसांची मेहमान आहे .एकदा बाजारात टोपल्यांवर नजर फिरवून पहा .. गाजरांचा लालभडक रंग आता तांबडेपणाकडे झुकू लागलाय ! मुळ्याच्या पाल्याची तरारी जराशी मलूलतेकडे कलंडलीय , बीटरूटाची फक्त गलेलठ्ठ गड्डी दिसतेय, पण त्याचा कोवळा पाला कुठे नाहीसा झालाय . आतापर्यंत १० रुपड्यांची मिळणारी मेथी आणि कोथिंबीर बाजार पिशवीत भरताना दुप्पट झालीय हे सांगताना माझा भाजीवाला उगाच भाव खातो . ताजा हिरवा वाटाणा ज्या हिरव्याकंच शेंगेत यायचा, ती आता पिवळसर नी जून दिसायला लागलीय ! समजून जा खव्य्यांनो , आता शेवटचा गाजर हलवा नी मटारची उसळ या आठवड्यात कधी बनवायची ते ठरवायची वेळ आली ! पण जर मटार तुमची आवडती भाजी असेल तर घाबरणे का बिलकुल नहीं ! आज या व्हिडिओचा आणि ब्लॉगचा घाट त्यासाठीच !
आपण बाजारातून सीजन नसला की फ्रोझन मटार आणतो , तो महाग तर असतोच परंतु पॅकेजिंगच्या गरजेपोटी त्यावर अजून काय प्रक्रिया केल्या असतील किंवा कृत्रिम रंगाचा वापर केलेला असेल ते सांगणे निव्वळ अशक्य !
कलिनरी सायन्स म्हणजेच स्वयंपाकघरातील विज्ञानाप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण घरच्या घरी हा मटार वर्षभरासाठी कसा साठवून ठेवू शकतो , जेणेकरून आपल्याला हव्या त्या वेळी आपले आवडीचे पदार्थ , मटार कचोरी असो , आलू मटार टोस्ट सँडविच असो , की रेस्टोरेंटसारखी मटार पनीर , कधीही बनवू शकतो !
मटार खालील तीन प्रक्रिया पार पाडणार आहे:
१. BLANCHING :
प्रत्येक भाजीत AGING ENZYMES असतात ज्यामुळे भाजीचा रंग , चव आणि टेक्श्चर कालानुरूप खराब होत जाते . उकळत्या पाण्यात मटारना काही मिनिटे ब्लांच केल्याने हे AGING ENZYMES चे कार्य तात्पुरते का होईना थांबते , कारण आपण मटार अर्ध कच्चा शिजवून घेतो . मग असे मटार जेव्हा आपण साठवतो तेव्हा त्यांचा रंग , चव आणि टेक्श्चर कायम राहते .
२. SHOCKING :
मटार उकळत्या पाण्यातून लगेच काढून त्यांना बर्फाळ पाण्यात टाकल्यावर , त्यांचे RESIDUAL COOKING थांबते म्हणजेच मटारच्या आतील उष्णतेने मटार पूढे शिजण्याची प्रक्रिया थांबते . तसेच त्यांचा हिरवा रंग टिकतो आणि उकळल्याने आकुंचित पावलेले मटारचे दाणे थंड पाण्यात परत त्यांचा गोलाकार आकार घेतात . यालाच म्हणतात “SHOCKING “!
३. STORING WITH FIFO :
कोणताही कच्चा किंवा शिजवलेला पदार्थ फ्रिजमध्ये किंवा गोदामात स्टोर करताना दोन तत्त्वे मुख्यत्वे पाळली जातात . FIFO – फर्स्ट इन फर्स्ट आऊट आणि LIFO – लास्ट इन फर्स्ट आउट ! FIFO म्हणजे जो पदार्थ आधी शिजवलेला आहे किंवा आधी खरेदी केलेला आहे तो आधी वापरावा जसे की ताजी फळे, भाज्या वगैरे ! LIFO म्हणजे अगदी उलटपक्षी – जसे की WINE – जितकी जुनी तितकी महाग आणि मुरलेली , लोणची , सरबते , मुरंबे ज्यांना मुरण्याची गरज असते !मटार हा आपला फिफो पद्धतीने साठवला जातो. म्हणून पिशव्यांवर तारखा घालायला विसरू नका !
चला तर पाहूया या साऱ्या प्रक्रिया विस्ताराने …
एका मोठ्या कढईत ३ लिटर पाणी उकळत ठेवावे . तुमच्या कढईच्या आकाराप्रमाणे पाणी कमी जास्त करावे , एवढेच की मटार पाण्यात पूर्णपणे बुडले पाहिजेत .
पाण्याला चांगली उकळी आली की मटार आणि साखर घालावी . साखरेने मटारचा हिरवा रंग शाबूत राहतो .
आपण हे मटार उकळत्या पाण्यात २ मिनिटे राहू देणार आहोत जोपर्यंत ते हलके होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागत नाहीत !
दोन मिनिटांनी गॅस बंद करावा .
मटार गाळणीतून गाळून बर्फ टाकलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यात पटकन टाकावेत .
बर्फ़ाळ पाण्यात हे मटार २ मिनिटे राहू द्यावेत . नंतर गाळणीतून गाळून एका परातीत उपसून काढावेत .
जरासे पाणी हडकले की हे मटार झिपलॉक बॅग्स मध्ये अर्धे अर्धे भरावेत , प्रत्येकी ४५० ग्रॅम्स !
नंतर त्या बॅग्स वर तारीख लिहून फ्रीझरमध्ये ठेवाव्यात . अशा प्रकारे साठवलेले मटार ६ ते ८ महिन्यांसाठी किंबहुना वर्षभरासाठी पुढचा मटार सीझन येईपर्यंत व्यवस्थित राहतात .

- साहित्य :
- २ किलो मटार सोलून त्याचे दाणे वजनात साधारण ९०० ग्रॅम्स
- १ टीस्पून साखर
- मोठी कढई - मटार उकळण्यासाठी
- खोलगट भांडे - बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यासाठी
- मोठी गाळणी
- मटार साठवण्यासाठी झिपलॉक बॅग्स किंवा चांगल्या प्लॅस्टिकच्या जाड पिशव्या
- एका मोठ्या कढईत ३ लिटर पाणी उकळत ठेवावे . तुमच्या कढईच्या आकाराप्रमाणे पाणी कमी जास्त करावे , एवढेच की मटार पाण्यात पूर्णपणे बुडले पाहिजेत .
- पाण्याला चांगली उकळी आली की मटार आणि साखर घालावी . साखरेने मटारचा हिरवा रंग शाबूत राहतो .
- आपण हे मटार उकळत्या पाण्यात २ मिनिटे राहू देणार आहोत जोपर्यंत ते हलके होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागत नाहीत !
- दोन मिनिटांनी गॅस बंद करावा .
- मटार गाळणीतून गाळून बर्फ टाकलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यात पटकन टाकावेत .
- बर्फ़ाळ पाण्यात हे मटार २ मिनिटे राहू द्यावेत . नंतर गाळणीतून गाळून एका परातीत उपसून काढावेत .
- जरासे पाणी हडकले की हे मटार झिपलॉक बॅग्स मध्ये अर्धे अर्धे भरावेत , प्रत्येकी ४५० ग्रॅम्स !
- नंतर त्या बॅग्स वर तारीख लिहून फ्रीझरमध्ये ठेवाव्यात . अशा प्रकारे साठवलेले मटार ६ ते ८ महिन्यांसाठी किंबहुना वर्षभरासाठी पुढचा मटार सीझन येईपर्यंत व्यवस्थित राहतात .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply