नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला ,नुकतीच तिशी उलटलेला तरुण पत्नी समवेत , आपल्या काखेत सहा महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन, रत्नांग्रीच्या एसटीतून मुंबई सेंट्रलला उतरला! जहाजांचे जनरेटर बनवणाऱ्या कंपनीचे युनिट बंद झाल्याने नोकरी सुटली , तर त्या काळी नशीब आजमावायला मुंबादेवीच्या चरणांहून दुसरे स्थान कोठले हो कोकणी माणसाला ?कोठे राहायचे, काय काम करायचे हा सगळा गुंता एकेक करून, मेहनतीने सोडवत हा तरुण आता मुंबईचा चाकरमानी झाला.
दक्षिण मुंबईतून प्रवास करीत, उपनगरात असलेले कंपनीचे प्लॉट गाठण्यासाठी कधी सक्काळी ४ वाजता घर सोडायचे, तर घरातले सगळे आटपून , पोस्ट मास्तरांचा रेड लेट मार्क आपल्या नावासमोर पडू नये म्हणून नोकरदार पत्नीची उडालेली रोजची तारांबळ, हे सगळे अनुभवांतून शिकत मुंबईच्या जीवन पद्धतीत चाकरमानी अगदी मुरांब्यासारखा मुरला!
गावी असताना, प्लॉट वर ,” मी चार मोटर्स फिट्ट केल्यात, ही एक रहायली ,, जरा दोन घास खाऊन येतो नी बसवतो.. ” असे काँट्रॅक्टरला सांगून , दुपारी पाऊण तास सुट्टी काढून घरी जेवायला येणारा हा तरुण, आता मात्र मुंबईला साईटवरच आडोशाला, ग्रीस ने काळे झालेले हात साबणाने धुऊन , गंजलेल्या लोखंडी तुटक्या सामानात ,जराशी जागा साफ करून ,बायकोने सकाळी 3 वाजता उठून डोळे चोळत का होईना मायेने बनवून दिलेला डबा उघडतो. त्या साध्याच पण चविष्ट जेवणाचा एकेक घास चवीनं खाताना आपल्या कुटुंबाविषयीच्या प्रेमाने नी त्यांच्या भल्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी बेहत्तर , या उर्मीने त्याचे डोळे आणि हृदय दोन्ही काठोकाठ भरतात!
“जेवणाचा डबा” – हा या चाकरमानी घरात रोजचा परवलीचा शब्द.. .आमचं घर सुद्धा अपवाद कसे असेल? जेव्हा घर रोजच्या वेळेप्रमाणे धावतंय तेव्हा वाटण – घाटण करून केलेल्या भाज्या, उसळी, ओल्या खोबऱ्याची पखरण केलेल्या भाज्या, कधी सुकट घालून केलेली फळभाजी तर कधी चक्क लवकर सकाळी कोळीण मावशी देऊन गेलेल्या कोळंबीचे सुके , असा जामानिमा डब्यात चाखायला मिळतो! जेव्हा मात्र सकाळी पावणे चार ची लोकल पकडायची तेव्हा आदल्या रात्री ” शारदे उद्या डबा दिशील…. की न्हाय तर असू दे.. खाईन एक दिवस बाहेर इडली नाय तर मेदुवडा .. ” या एकाच गहन प्रश्नावर चर्चा व्हायची आणि ” कश्याला बाहेरचं.. मग पोट डांबारलं ,पोट डांबारलं म्हणून रात्री पाटणकर काढा प्यायचा.. करते मी पटकन सकाळी डबा!” असा घरच्या अन्नपूर्णेने होकार दिल्यावरतर पुढे शंकेला जागाच उरत नाही हो!
मग भल्या पहाटे घरातील बाकीच्यांची साखरझोप मोडू नये म्हणून , तव्यावर कधी आदल्या रात्रीचा भात मोकळा करून, मस्त कांद्या लसणीच्या फोडणीत घरच्या मालवणी मसाल्यासोबत, अलगद बिलकुल आवाज न करता उलथन्याने परतला जातो ,तर कधी चुरचुरीत बटाटा, वांगी , सुरणाची कापं तळली जातात. गरमागरम चपात्या नी बटाट्याची कापं , डब्यात भरताना आईला सुद्धा आनंदाचं- समाधानाच भरतं येतं.. लगबगीनं अंघोळ करून, तयार होऊन चामड्याची ग्रीस ने कळकटलेली व वासाळलेली बॅग खांद्यावर अडकवून हा चाकरमानी बाबा पायात चपला अडकवतच , झोपलेल्या आपल्या बायच्या तोंडावरून हात फिरवत , ” येतो ग sss ” म्हणत पोटाच्या पाठी धावत सुटतो!
ही माझी कहाणी , कोणाला आपल्या आठवणींशी निगडित वाटली तर तो निव्वळ योगायोग न समजता, जवळपास नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या सारख्या सगळ्यांचीच, ही आपली कहाणी आहे ,असे समजावे.
मागच्या आठवड्यात मी वांग्या – सुरणाच्या कापांचा व्हिडिओ शेअर केला होता , त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की आता ही आपली आवडती बटाट्याची कापं – ती काहून मागं रहावीत..नाही का !
अहो या चुरचुरीत बटाट्याच्या कापांपायी आम्ही शाळेत वर्गात, “माझा डबा चोरून का संपवला”, असे झगडे होताना, तर दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या गटांच्या म्होरक्या ( अहो मुलींची शाळा ना ..) गळ्यात गळे घालून एकमेकांचा डबा खाताना सुद्धा पाहिलेत…
तर आता नवरात्री निमित्त विचार केला या बटाट्याच्या कापांना ट्विस्ट देऊन उपवासाची कापं बनवूया त्यासाठी काय काय लागणारेय आपल्याला , ते खाली रेसिपी मध्ये समजेलच तुम्हाला !

- ४ मध्यम आकाराचे बटाटे ( ४०० ग्रॅम्स )
- ४ टेबलस्पून वरीच्या तांदळाचे पीठ ( भगर )
- दीड टेबलस्पून लाल मिरची पूड ( तिखट आवडीनुसार , मी काश्मिरी मिरची पूड घेतलीय )
- १ टीस्पून भाजलेली जिरे पूड
- सैंधव मीठ किंवा नेहमीचे मीठ चवीनुसार
- तेल
- बटाटयाच्या साली काढून स्वच्छ धुऊन घ्यावेत .
- मध्यम जाडीच्या बटाट्याच्या चकत्या करून घ्याव्यात . फार पातळ चकत्या करू नयेत , त्या लवकर करपतात .
- एका ताटलीत वरईचे पीठ , लाल मिरची पूड, जिरे पावडर आणि सैंधव मीठ एकत्र मिसळून घ्यावे .
- बटाट्याच्या चकत्या पाण्यातून बाजूला काढून घ्याव्यात . वरील मिश्रणात व्यवस्थित दाबून घोळवाव्यात .
- एका पसरट तव्यावर ५-६ टेबलस्पून तेल व्यवस्थित पसरवून मध्यम ते मोठया आचेवर गरम करून घ्यावे .
- नंतर आच मंद करावी . हे बटाट्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यावेत .
- दोन्ही बाजूंनी कापांचा रंग सोनेरी दिसू लागतो तेव्हा हे एका ताटलीत काढून घ्यावेत .

Click to watch recipe video
Leave a Reply