मागच्या वर्षीचा ऑक्टोबर – नोव्हेंबरचा महिना असावा .. पाऊस तसा पूर्णपणे उघडलेला , मध्येच कधीतरी नवरात्रात एक शिडकावा करून गेलेला . आम्हा जिममधल्या मैत्रिणींचं नुकतंच नवरात्रात दांडियाला घागरा- चोळी घालून नटण – मुरडण , डाएट थोडंसं बाजूला सारून गोड खाणं, हे अंमळ जरा जास्त झालं होतं . दिवाळीला थोडा अवकाश होता , म्हणून वाढलेले वजनी पौंड राहिलेलया दिवसांत जरा कमी करण्यासाठी आम्ही नियमित जिमच्या वाऱ्या करत होतोच . त्यात ट्रेनरने आम्हा मैत्रिणींच्या त्रिकुटाला , वर्कआउट आणि डाएट शिस्तीत पाळायची तंबी दिली होती !
तसे डाएटच्या बाबतीत मला आणि पार्टनरला आपल्या जेवणात , गौरमॅ ( Gourmet ) स्टोअर्स मध्ये मिळणाऱ्या एक्झॉटिक भाज्या किंवा ड्रेस्ड मीट चा समावेश करणे तितकेसे पटत नाही . कारण डाएट हे सस्टेनेबल असावे , असा आमचा आणि आमच्या जिम ट्रेनरचा पक्का विचार आहे . हे आमचे वैयक्तिक मत आहे , नो हार्ड फीलिंग्स खवय्यांनो ! म्हणूनच शेतात पिकलेला नेमका ताजा माल , भाज्या व फळे , विकायला आणलेल्या विक्रेत्यांच्या टोपल्यांत डोकावून खरेदी करत , जिममधून परत यायचं , असं माझा रोजचा दिनक्रम होता ! त्यातच आमच्या एरियात दर गुरुवारी आणि शनिवारी शेतकरी आठवडा बाजार लागायला सुरवात झाली होती . आमच्या शेजारच्या काकूंकडून मी या बाजाराचं बरंच कौतुक ऐकलं होतं !
एक तर मला स्वतःला सामान पारखून , हाताळून, आणि मुख्य म्हणजे विक्रेत्यांशी गप्पा झोडत , थोडंसं हसतखेळत घासाघीस करून बाजारहाट करायला प्रचंड आवडतं ! लहानपणापासून कधी आजी- आईसोबत तर कधी बाबासोबत बाजारहाट केल्यामुळे आवड लागली असावी ! आताच्या कोरोना संकटकाळात सगळ्यात जास्त मी तेच मिस करतेय हो .. असो !
बाजार म्हणावा तर , एका छोटयाश्या गल्लीत आयताकृती आकारात मांडलेल्या भाज्यांच्या गाड्या , गूळपट्ट्या , चिक्की , वेगवेगळे मसाले ,चटण्या विकणारे विक्रेते .. तिथलं वातावरण मला खूपच आल्हाददायक वाटायचं ! जिमनंतर कितीही दमलेले असले तरी एका खांद्यावर जिमची सॅक आणि दोन्ही हातांत मोजून तीन भल्या मोठ्या तागाच्या पिशव्या भरून मी आठवड्याची भाजी आणि इतर पौष्टिक खाऊ घेऊन यायचे . नंतर नंतर मी ट्रेनरचा डोळा चुकवून गुरुवारी वेट ट्रेनिंग न करता, हलका फुलका कार्डिओ एक्सरसाईझ पटकन करून बाजारात लवकर पळायला पाहायचे . या आठवडा बाजाराविषयी कधी वेगळा साग्रसंगीत ब्लॉग मी नक्कीच लिहीन हो, इतके आता मला लिहिता लिहिता अनेक गोष्टी एका धावत्या चित्रमालेसारख्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्यात !
एकदा सगळं सामान घेऊन परतताना , फक्त पालेभाजी विकणाऱ्या दादांकडे आज्या , काकू वयोगटातल्या बऱ्याच महिला गर्दी करून होत्या , माझे घेऊन झाले होते तरी मी कुतूहलाने डोकावून पाहिलेच ! बाकी साऱ्या हिरव्यागार पालेभाज्यांमध्ये एका बाजूला ढीग लावलेली एक भाजी मात्र तितकीशी देखणी नसून सुद्धा लक्ष वेधून घेत होती . बारीक पानांची , लाल चिवट देठांची , अगदी माझ्या बोटांच्या लांबीएवढीच ! गाडीला वळसा घालून मी कोपऱ्यात त्या भाजीजवळ गेले तर एक वेगळा असा गंध नाकाजवळ दरवळला ! मी निरखून पाहते म्हंटल्यावर , शेतकरी दादा आपणहून म्हणाले , ” ताई घ्या चिवळ , रानभाजी आहे , पोटाला चांगली , एकदम ताजी ,, घ्या घ्या !” तसे मला रानभाज्यांशी सख्य असले तरी मी ही भाजी कधी खाल्ली नसल्याने , आणि करायची कशी तेही माहित नसल्याने , जरासे हसून त्यांना टाळलं !
आमच्या घरात कोकणात वाढणाऱ्या पावसाळी रानभाज्या जसे टाकळा , कुर्डू, कर्टुले , फोडशी अशा भाज्या आवर्जून खाल्य्या जायच्या . किंबहुना वर्षभराचे डिटॉक्स डाएट म्हणून या भाज्या खायला गेल्याच पाहिजेत , असा आजीचा आग्रह! म्हणून आई सुद्धा अगदी आवर्जून ऑफिसमधून येताना वसईवाल्या मावशींकडून या भाज्या घेऊन यायची . परंतु ही चिवळ माझ्या कधीच पाहण्यात नव्हती !
नंतर कामाच्या गडबडीत याचा विचार जरा मागे पडला परंतु त्यानंतर दोन तीन दिवसांनी संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर पार्टनरने एक स्टिलचा डब्बा त्याच्या बॅगेतून काढून माझ्या हातात ठेवला ! त्याच्या ऑफिसमधल्या कलिग्स साठी मी नेहमी काही ना काही बनवून देत असते आणि त्याचे टीममेट सुद्धा बऱ्याचदा आपल्या घरातील पारंपरिक पदार्थाचा आस्वाद आम्हाला चाखायला देत असतात . उत्साहाने मी डबा उघडला , आणि त्या डब्यात लंबगोलाकार ओबड धोबड गोळे, जसे काही बेसनाचे गोळे असतात ना तशा पद्धतीचे होते . परंतु त्या गोळ्यांतून डोकावणारे लाल तंतू आणि एक परिचितसा सुगंध .. कुठे बरं हा जाणवला होता मला पहिल्यांदा ? आता मात्र ” युरेका युरेका ” म्हणून आरोळी ठोकणेच बाकी होते .. कारण अर्थातच तुम्ही ओळखलं असेल ! ते चिवळ भाजीचे भेंडके होते !
पार्टनरची पुणेरी मैत्रीण सोनाली ही खान्देशाची सून , तिच्या सुग्रण सासूबाईंनी हे चिवईचे भेंडके खास आमच्यासाठी बनवून पाठवले होते . त्यांच्याकडे या भाजीला चिवई , रानघोळ किंवा तुम्हाला हसू येईल पण चिऊची भाजी असं देखील म्हणतात , असतेच ना हो इवलीशी ही भाजी चिऊताईसारखी ! तसेच भेंडक्यांना फुणके किंवा मुटके असं सुद्धा काही भागात म्हटलं जातं ! पार्टनरला मी माझा या भाजीसोबतचा फर्स्ट एनकाउंटर सांगण्यात दंग असतानाच वॉट्स ऍप वर सोनालीचा मेसेज फ्लॅश झाला , ” तुम्हा दोघांना वेगळे फूड नेहमी ट्राय करायला आवडतं ना ,म्हणून भेंडके दिलेत , आता कढी बनव गरमागरम आणि खा मस्तपैकी !” मग लागलेच तयारीला , फ्रिजमधून दही काढले नी घुसळून ताकाची जराशी तिखटच कढी केली . मऊ वाफाळत्या भातावर फुणके कुस्करून त्यावर कढी घालून अस्सा काही वरपलाय भात , अहाहा !
त्यानंतर पहिल्यांदा सोनालीच्या सासूबाईंकडून भेंडक्यांची रेसिपी घेतली आणि त्या गुरुवारी तुमच्या या खादाड मैत्रिणीने बाजारात पहिल्यांदा दादांकडे चिवईची मोठ्ठी जुडी विकत घेतली . शेतकरी दादा सुद्धा अगदी आवडीने मला भाजी कशी बनवावी हे सांगू लागले , ” ताई घरी गेलासा ना कि येकदा दोनदा धुवा म्हंजी माती जाईल, काय ना बांधानजीक वाढत्ये वो चिवळ , बियाणं सुधा न्हाय पेरत आमी हिचं .. ” मी आपलं त्यांच्या गावरान भाषेतला मायेचा रस कानांत भरून घेत होते . दादा भाजी व्यवस्थित बांधून देत पुढं सांगायला लागले की साधी मटकीची डाळ भिजत घालून फक्त तेलावर फोडणी देऊन सुद्धा ही भाजी भाकरीसोबत कशी चविष्ट लागते . ” अवो ताई आमच्या मिशीष च्या मामाला लै पोटाचा त्रास , किती डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्या तरी उपेग नव्हता , ही भाजी पोटावर एकदम बेश्ट , थंड एकदम , दर दिवसाआड ही भाजी खाऊन लै उतार पडला हो .. खोटं न्हाय सांगत , आजकाल तुमच्यासारखी शेरातील लोकं बी घ्यायला लागलीत ही भाजी ताई , ठेंक्यू हां ..या नक्की परत !” त्यांच्या उत्साहाने भारून गालातल्या गालात हसत मी परतले !
योगायोग बघा हां, माझी जिम buddy पल्लवी माहेरहून जळगावची , आणि तिने मला सांगितले की होळीच्या दिवशी खान्देशात बऱ्याच घरांत फुणके आवडीने बनवले जातात .. तेव्हा मात्र त्यांना चुरचुरीत फोडणी देऊन कोरडे खाल्ले जातात आणि सोबत चिंच गुळाचे पन्हे! रंगोत्सवाचा उल्हास पारंपरिक खाण्यापिण्यामुळे द्विगुणित होतो यात शंकाच नाही !
मग इतके सारे औषधी गुणधर्म असणारी ही चिवळ तुमच्यासाठी मी फुणक्यांच्या रूपात न आणली तरच नवल ! घ्या पटकन रेसिपी कारण आता बाजारात अगदी हिवाळा सरेपर्यंत चिवई आपल्या भेटीस येणारेय !

- किती बनतील : ८ ते १०
- तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
- बनवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
- साहित्य :
- १ कप चिवळ किंवा चिवईची किंवा चिऊची भाजी , निवडून , स्वच्छ धुऊन
- पाव कप = ५० ग्रॅम्स मूग डाळ
- पाव कप = ५० ग्रॅम्स चणा डाळ
- पाव कप = ५० ग्रॅम्स तूर डाळ
- १ लहान कांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरून
- पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ इंच आल्याचा तुकडा
- ६-७ लसणीच्या पाकळ्या
- ६-७ हिरव्या मिरच्या
- २ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- अर्धा टीस्पून हळद
- पाव टीस्पून लाल मिरची पूड
- अर्धा टीस्पून तेल ( शेंगदाण्याचे तेल असल्यास उत्तम )
- चवीपुरते मीठ
- कृती:
- सगळ्या डाळी एकत्र करून ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात . नंतर ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजू घालाव्यात .
- चिवळ निवडून तिचे जून देठ मोडून , स्वच्छ धुऊन घ्यावी . यात बारीक अळ्या असण्याची शक्यता असते , म्हणून नीट पाण्यात खळखळून धुवावी . चाळणीत थोडा वेळ काढून तिचे पाणी निथळू द्यावे आणि नंतर बारीक चिरून घ्यावी .
- डाळींतले पाणी काढून आले , मिरच्या , लसूण , आणि जिरे घालून बारीक वाटून घ्यावे . डाळी वाटताना पाण्याचा वापर करू नये . हे पेस्ट घट्टच असली पाहिजे .
- एका बाऊलमध्ये डाळींची पेस्ट, चिवळ , कांदा , कोथिंबीर , हळद , लाल मिरची पूड , हिंग , मीठ आणि १-२ टीस्पून तेल घालून नीट एकत्र करून घ्यावे .
- मोदक पात्रात किंवा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . तो पर्यंत या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे मुटके किंवा गोळे बनवावेत . हाताला थोडे से तेल लावावे म्हणजे चिकटत नाहीत . चाळणीत हे गोळे ठेवून १५ ते २० मिनिटे मंद ते मध्यम आचेवर उकडून घ्यावेत .
- गरमागरम फुणके ताकाच्या कढीसोबत वाढावेत .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply