माझ्या मनात शैक्षणिक जीवनातल्या आठवणींचं एक सेफ डिपॉझिट आहे . कधीकधी हळूचकन उघडून तो खजिना मी हृदयाशी घट्ट कवटाळून, आसवांनी जरासं त्याला सिंचन करून , दोन क्षण आनंदाचे, समाधानाचे अनुभवते . माझं शेक्षणिक जीवन हे शाळेपुरतं मर्यादित न राहता , आत्ता आत्ता अगदी २०१७ च्या पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत व्यापलं होतं . रोज आयुष्याच्या शाळेत नवनवीन धडे गिरवतोय, ते वेगळंच !
सद्गुरू श्री. वामनराव पै यांचे हे प्रसिदध वाक्य ” तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार “, मला नेहमीच प्रोत्साहित करते . परंतु त्या आकाररहित आयुष्यरूपी शिळेला एका रेखीव शिल्पात रूपांतरित करण्याची प्रेरणा मनुष्याला कोठून मिळत असावी ? मला वाटतं , आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील पहिला शिक्षक , गुरु म्हणजे आई ! नंतर बऱ्याच घटना , बरीच माणसं आपल्या मनावर , तसेच वागणुकीवर निरनिराळे संस्कार करीत असतात .
माझी शाळा हे माझ्यासाठी एका देवालयाहून कमी नव्हती … नुसती शाळाच नाही तर पुढे, इंजिनीअरिंग कॉलेज , हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज , इतकेच नाही तर प्रोफेशनल परीक्षांचे क्लासेस सुद्धा , याला अपवाद नव्हते .. माझ्या सुदैवाचा भाग म्हणा ! परंतु या निर्जीव जागांवर इतके प्रेम बसण्याचे कारण म्हणजे तिथला शिक्षकवर्ग हे मी आजदेखील इतकी वर्षं उलटून गेलीत तरी , छातीठोकपणे सांगू शकते !
लहानपणी अभ्यासातलया प्रोत्साहनासोबत , भाषेवर संस्कार करत, वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रोत्साहन देऊन , स्वतः तयारी करवून , बक्षीस मिळाल्यावर पोटाशी घट्ट धरणाऱ्या बाई …. नृत्य, नाटक अशा कलांशी दोस्ती करवत , नंतर शाळेसाठी आंतर शालेय स्पर्धांची तयारी करताना स्वतःचं घर , मुले , वृद्ध सासू सासरे … सगळी तारेवरची कसरत सांभाळून , डोंबिवली वरून गच्च भरलेल्या लोकल ट्रेन ने सक्काळी सक्काळी आम्हा मुलींच्या आधी पोचणाऱ्या बाई .. आजही आठवतेय एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी, दुसऱ्या शाळेत एका वर्गात फक्त जाडसर पडदा लावून तयार केलेल्या रंगपटात, स्वतः मला स्वामी विवेकानंदांच्या रूपात तयार करणाऱ्या बाई आणि बक्षीस नाही मिळाले तरी, ” अग त्यात काय चिमणे … आपल्याला दोन तास बाहेर भटकायला तर मिळाले ना … ” असे खळखळून हसत म्हणणाऱ्या बाई !
पहिल्या वहिल्या हिंदी नाट्यवाचन स्पर्धेत , प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आम्हा पोरींच्या कंपूला आनंदाने दादर चौपाटीवर ओली भेळ खाऊ घालणाऱ्या, आमच्यासारख्याच खोडकर आणि मिश्किल बाई… कधी काळी घरात आलेल्या संकटांमुळे कोवळ्या वयात मनावर आलेलं मळभ , बरोब्बर ओळखून , कधी नव्हे ते मागच्या बाकावर बसून, मान खाली घालून बसलेल्या मला , ” पुढे येऊन बस मयेकर … कोशात गुरफटू नकोस! ” , असे म्हणून नकळत दिलासा देणाऱ्या बाई !
शाळेतल्या आठवणी सांगू तितक्या कमी , कारण त्या वयात शाळा म्हणजे दुसरे घरच जणू , इतका तो घट्ट सहवास आपल्या शिक्षकांशी ! परंतु इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये खडूस , कडक शिस्तीचे शिक्षक जेव्हा माझ्या एका मैत्रिणीची डिग्री इंजिनीअरिंगची पूर्ण फी भरतात, तेव्हा शिक्षकी हा निव्वळ पेशा नक्कीच नाही , तर ती समाजाची सेवा आहे यांवर माझा पक्का विश्वास बसलाय !
हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये , ‘आपली लठ्ठ पगाराची आय टी ची नोकरी सोडून , ही कोण आलीय येडबंबू’ , अशी तोंडावर तर कधी पाठीमागे खिल्ली उडवली जायची ! तेव्हा खरे आधार ठरले, ते तिकडचे शिक्षक ……. त्यांनीच माझी जिद्द समजून वेळोवेळी पाठिंबा दिला , एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीसारखे समजून घेतले !केबिनमध्ये एका हळव्या क्षणी फुटलेला माझा अश्रूंचा बांध, माझ्या मेंटॉर मॅमनी आईच्या मायेने सावरला आणि ‘यापुढे कोणत्याही टीकेला घाबरून न जाता त्याला तोंड देण्यास समर्थ राहा’, असे हलकेच कानसुद्धा टोचले !
किती लिहू नी किती नको असे झालेय मला …. ह्या आठवणी म्हणजे सागरातले मोती आहेत. ओंजळ भरून घेतली तरी खाली टपटप पडतच आहेत , इतके अगणित आणि विलक्षण सुंदर ! या शिक्षक दिनी मनातले हे सेफ डिपॉझिट उघडले गेले … मन प्रसन्न झाले !
तसे आपण सगळे सण , दिन विशेष साजरे करतो , म्हटले या आठवणींनी टवटवीत झालेला हा दिवस सुद्धा साजरा करायला हरकत नाही .. ठरवलं काहीतरी वेगळं खायला केले पाहिजे .. फ्रुट बास्केट मधले अर्धकच्चे पेरू खुणावत होते . मला पेरू प्रचंड आवडतो . याच्या आंबट गोड चवीत भूतकाळाच्या फांद्यांवर बांधलेला हिंदोळा आहे आणि आज माझं मन सुद्धा त्याच हिंदोळ्यावर उंच झोके घेऊन आलंय !
आज माझ्या साऱ्या प्रेमळ शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्यासाठी ही जराशी वेगळी आणि चटपटीत मेजवानी !
राजस्थानी पद्धतीची पेरूची भाजी
अज्वाईनी पराठे
दाल तडका
जीरा राइस
Leave a Reply