कोकणात नारळ झाडावरून उतरवणे , हा अगदी वेळखाऊ कार्यक्रम असतो ! अहो वेळखाऊ म्हणजे …. सगळ्यात पहिल्यांदा झाडावर चढणारा बाबल्या किंवा सुभान्या किंवा संत्या , या महामानवांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते . कारण पूर्ण गावात ते सगळ्यात बिझी प्रस्थ असतात . त्यांना दोन दिवस आधी सांगितल्यावर . परत दोन दिवसांनी आठवण करून मग ते चौथ्या दिवशी आमच्या आवारातून लोखंडी गेटच्या बाहेर उभे राहून , माझ्या बाबाला हाळी देतात , ” इनोदा ए इनोदा, माडावर चढुक इलय , आत्ताच टैम .. माघारून हडे नाय येऊचा ! ” मग बिचारा माझा बाबा आपले वय विसरून , हातातला चहाचा कप तस्साच खाली ठेवत जोर्रात गेट उघडायला धावतो ….. जाता जाता आईला ,” शारदे , पोहे नी चा टाक , बाबल्या इलंय “, असे म्हणतो ! आईची लगबग सुरु… रवलीत पोहे धुऊन पडतात !
इकडे बाबा गेटवर पोचेपर्यंत बाबल्याने दात कोरणे चालू ठेवून, आता तोंडाचे दळण सुरु केले असते ! “ए काय रे इनोदा , कित्या एवढा उशीर , ती कुत्री आवर तुझी … टैम नाय बाबा माजे कडे … “, मग आवारात शिरल्यावर उगाच घाई घाईत, इथे तिथे झाडांच्या खोडांना हलवून बघत , दात कोरण्याची काडी झुडपात फेकून देत , कुत्र्यांवर तोंडसुख घेत, बाबल्या नामक स्वारी बाबासोबत परसदारी माडापाशी पोचते . आपल्या एक्सट्रा शॉर्ट, कळकट्ट झालेलया कापडी पॅंटीवर, पोटाशी गच्च कापड बांधून, त्यात कोयता अडकवून मानेने उंचीचा अंदाज घेत , महाशय सराईतपणे माडावर चढायला सुरवात करतात . आता हे एवढे जोखमीचे काम , तरी ना बाबल्याची टकळी बंद ना बाबाची …. एवढ्या उंचावरून पण गावच्या गप्पा मारतायत !
त्या दोघांचे मालवणी – कोकणी मिश्रित संभाषणाची मजा पाहण्यासाठी , एव्हाना मी आणि प्रणय दोघेही पोचलो माडांखाली .. आणि काय सांगू मिस्टर बाबल्यांची काटक शरीरयष्टी नी वय पाहून प्रणय आ वासून बघत राहिला ….. अहो नाव ऐकून तुम्ही फसला असाल, पण हे बाबल्या काका माझ्या बाबापेक्षा सुद्धा वयाने , सत्तरीला पोचलेली वल्ली ! तोंड चालू नी हात सुद्धा सपासप चालू ! दे दाणादाण , सुकड्या ( सालीसकट नारळ ) पड्तायेत खाली .. मी आणि प्रणय त्या टोपल्यांत घेऊन घरात घेऊन जायला लागलो . ज्या सफाईने बाबल्या काका चढले होते तसेच सुळकन खालीसुद्धा आले . प्रणयसाठी हे प्रत्यक्षात पाहणे पहिला अनुभव होता , बाबल्या काकांच्या तोंडाच्या आणि शरीराच्या चपळाईला पाहून त्याचे आ वासून उघडलेले तोंड मी हळूच हनुवटीवर टपली मारून बंद केलं !
दोन तीन माडांवर हे काम झाले , तेव्हा घाम पुसत बाबल्या काका बाबासोबत घरात आले . मी पुढे केलेली खुर्ची हाताने नको म्हणत खालीच ओटीवर बसले , बाबाच्या बाजूला, एक पाय पोटाशी गुडघ्यात दुमडून त्यावर हात टेकवून जोरजोरात गप्पा चालूच होत्या !” कधी ईली बाय , जावय बापूक सुट्टी मिलली होय , तर काय येवंचा गावाक , इनोदा , पोरांक शेळी ( शहाळी ) द्ये हो फोडून ..” असं म्हणत माझ्या हातातून चहाचा कप नी पोहे घेऊन , बाबाशी गप्पा मारण्यात परत दंग झाली स्वारी !
यांचा आणि बाबाचा व्यवहार , आईला नी मला कधीची कळला नाही, कारण बाबल्या काकाच्या हातात प्रत्येक माडाच्या हिशेबाने पैसे ठेवून , घरातली पपई , नारळ देऊन , ” बरोबर ना , झाले ना बाबल्या , हां , येशील परत ” असे म्हणून दोघे अगदी ही ही करत हात मिळवणी करतात . जाता जाता ” येतंय ग बाय , घोवाक घेऊन नवलाई पावणाईची वटी भरून ये ,सुखी ऱ्हावा ” असा तोंडभरून आशीर्वाद देत क्षणार्धात दिसेनासे होतात !
ते गेल्यानंतर बाबाने सुकडी सोलायला घ्यायचा विचार केला . अंगणातील सती शेजारी जरासं मला झाडून घ्यायला सांगितलं , प्रणय एका बाजूला सुकडी एकावर एक रचून ठेवण्यात रमला ! शेजारच्या पन्हळीतून यमूआजी मुंबयकर जावयाला कौतुकाने हलकेच डोकावून पाहून गेली . बाबा स्वतः आत गेला. पडवीत दरवाज्याच्या मागे माझ्या आजोबांची एक जुनी ट्रंक आहे , तिच्या मागून खुडबुड करत एक पहार वजा यंत्र बाहेर घेऊन आला . त्या वजनाने बाबाला जराशी धापच लागली , मग भोवताली शेपटा हलवीत उगाच घुटमळणाऱ्या राणी आणि सुंदरीवर खेकसलाच ,” कित्या नाचतंय हय , व्हा बाहेर … मैदान मोकळं करा !”
आमच्याकडे किंबहुना कोकणात ज्यांच्याकडे नारळाची झाडे आहेत , त्यांच्याकडे ही लोखंडी उभी पहार असतेच असते . तिच्या टोकात सुकडी अडकवून जोर लावून नीट सोलता येते . कारण कोयत्याने एवढ्या सुकड्या फोडणे, जरासे मेहनतीचे काम ! एकूणच हा इंटरेस्टिंग प्रकार पाहून पार्टनर खुश झाला होता नी अगदी जोमाने पुढे सरसावून बाबाला म्हणाला ,” द्या मी करतो “.. ” करतायस प्रणय तू , कर मग …” असे म्हणत बाबा जरासा सतीच्या धक्क्याला टेकून प्रणयला सूचना द्यायला लागला . जावयाला सराईतपणे सुकडी फोडताना पाहायला , रटरटणाऱ्या सांबाराखालची आच मंद करून लगबगीने आई सुद्धा कौतुकाने ओटीवर उभी राहिली ! माझ्या घोवाचे कौतुक आमची राणी, सुंदरी , काजल नी तिची पिलावळ सुद्धा अगदी शांत बसून पाहत होती हो !
मीही जरासे लाजत मुरडत , जणू कोकणच्या गोमूवानी टोपल्यांत पटापट सोडणी ( सुकडीच्या सोललेल्या साली ) गोळा करून एका बाजूला ढीग लावायला लागले ! चूल पेटवायला सोडण्यांसाठी अनेक माणसं येतात चौकशी करत बाबाकडे , तेव्हा ती भिजू नयेत म्हणून पुढे विहिरीशेजारी चार चिऱ्याच्या खांबांवर सिमेंटचे नळे टाकून जागा केलीय त्यात आम्ही सोडण्याच्या टोपल्या भरून ठेवतो !
आता इतके काम केल्यावर सपाटून भूक लागणारच ना .. मग आईने केलेलं काळ्या वाटाण्याचं सांबार , वडे , भात , घोळ माशाचे कालवण आणि तळलेली तुकडी यांवर अगदी आडवा हात मारलाय हो माहेरवाशीण आणि जावई बापूंनी !
Leave a Reply