त्या दिवशी एक कॉमेडी शो पाहताना तुफान हसले . चित्रविचित्र कपडे घातलेला स्त्रीवेषातील विनोदी कलाकार बॉलिवूडच्या चित्रपटांमधील आईचे मूड्स सांगत होता .. जेव्हा मुलाला नोकरी लागल्याच्या खुशीत , आई आनंदी असते तेव्हा ,आदरणीय निरुपा रॉय यांच्या शैलीत , ” बेटा आज मैने अपने हातों से तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है …” असे म्हणून डोळ्यांतले आनंदाश्रू पुसते !
” आई ” म्हणजे तसेही आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय नी ” आईच्या हातच जेवण ” हे त्याहूनही संवेदनशील प्रकरण ! मराठी अभिनय क्षेत्रातलं जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामत माझे अत्यंत आवडते .. त्यांची ” आणि काय हवं ?” ही वेबसिरीज पाहताना त्यातील अनेक गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या घटनांशी थोड्या फार फरकाने सारखेपण जाणवल्याने मला खूप आवडली होती. . ” पुरणपोळी ” या एका भागात पूर्ण एपिसोड साकेत ( उमेश ) जुईला (प्रिया) त्याच्या आईच्या हातची पुरणपोळी कशी उत्तम वगैरे सांगून बोअर करतो . शेवटी जुई बिचारी मेहनतीने पुरणपोळीचा घाट घालतेच आणि त्यानंतरची क्लायमॅक्समधील गंमत दर्शकांना खदखदा हसायला भाग पाडते !
माझ्या नी पार्टनरच्या स्वभावातील एक गुण मात्र सारखा , दोघांचेही खाण्यावर नितांत प्रेम . त्याचे लहानपण मुंबईत आगरी समाजाच्या सहवासात गेले असल्याकारणाने त्याला कोकणी खाद्यसंस्कृती नवखी नव्हती , परंतु माझ्यासाठी अगदी मोहरीच्या तेलाची चव अंगवळणी पडण्यापासून सुरुवात! परंतु म्हणतात ना मनाची कवाडे सताड उघड ठेवली की बदल स्वीकारणे अवघड जात नाही .. त्यातून सासूबाई आणि पार्टनरच्या मामी उत्तर प्रदेशीय विशेष पदार्थ बनवण्यात वाकबगार ! मामेसासूंच्या हातची तांदळाची खीर म्हणजे स्वर्गसुख , तर सासूबाईंचे पाकात मुरलेले गुलाबजाम तोंडात टाकताक्षणीच विरघळणारे .. म्हणून मी सुद्धा एक नवीन खाद्यससंस्कृती शिकायला मिळतेय या आनंदाने हरखून शिष्येची भूमिका स्वीकारली . उत्तर प्रदेश हे महाराष्ट्राप्रमाणेच कृषिप्रधान राज्य , त्यामुळे धान्यांप्रमाणेच फळभाज्या , भाज्या यांचा जेवणात मुबलक वापर आणि दूध दुभते सुद्धा वारेमाप ! माझ्या सासरी सगळे प्रचंड गोडखाऊ .. म्हणून जेवणात पाकाचा , तसेच दुग्धजन्य पदार्थाचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ अधिक प्रमाणात बनवले जातात . यात निरनिराळ्या प्रकारच्या खिरी आणि हलवे यांचा वरचष्मा अधिक !
आज मी ही गाजराच्या हलव्याची रेसिपी शेअर करीत आहे , ती माझ्या सासूबाईंनी शिकवलेलीच ! दिवाळीत लक्ष्मीपूजनाला खव्याचे गुलाबजाम , संक्रांतीला तिळगुळ लाडू किंवा गजक आणि प्रत्येक हिवाळ्यात गाजराचा हलवा , हे आमच्या घराचे शास्त्र व परंपरा म्हटले तर हरकत नाही ! आताशा सरावाने या रेसिपी सुद्धा माझ्या अंगवळणी पडल्यात , त्या बदलांनी देखील मला स्वीकारलय ! म्हणूनच मी यात वापरला जाणारा खवा सुद्धा घरी बनवते , आणि हा गाजराचा हलवा खऱ्या अर्थाने एकदम पारंपारिक आणि होममेड बनतो ! तसेही गाजराचा हलवा बनवण्याच्या अनेक झटपट युक्त्या सांगणारे व्हिडिओस यु ट्यूब वर आहेत , परंतु माझे असे प्रांजळ मत आहे की कधी कधी स्वतःच्या मनाला डिटॉक्स करायचे असेल , मनाच्या कप्प्यात खोलवर दडलेल्या काही आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर असे पारंपरिक , जरासे वेळखाऊ पदार्थ नक्की बनवावेत .. एक स्ट्रेस बस्टर म्हणून ते उत्तम काम करतात आणि सरतेशेवटी अतिशय चविष्ट पदार्थ पानात वाढला जातो ते सुख वेगळेच ! म्हणूनच माझ्या अनुभवांतून शिकलेलया काही महत्त्वाच्या बाबी मी खाली शेअर करीत आहे .
१. खरी चव गाजराच्या निवडीत : हलव्यासाठी गाजर घेताना लालबुंद आणि अगदीच मळ्यातून खुडून नाही , तरी ताजी गाजरे पाहून घ्यावीत . लेचीपेची , डागाळलेली गाजरे तर प्रश्नच दूर …. गाजरे स्वतः निवडून घ्यावीत . नाहीतर भाजी विक्रेत्याने तुमचा डोळा चुकवून एखादे दुसरे जून किंवा खराब गाजर तराजूत तोललेच म्हणून समजा ! अति लहान किंवा लठ्ठ गाजरे घेऊ नयेत , मध्यम आकाराची बेस्ट !
शक्यतो जेव्हा हलवा बनवायचा आहे तेव्हाच गाजरे आणून लगेच किसायला घ्यावीत , फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे . सर्वप्रथम पाण्यात गाजरे व्यवस्थित बुचकळवुन धुवावीत . नंतर चाळणीत निथळत ठेवावीत किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावीत , म्हणजे अतिरिक्त पाण्याचा अंश राहणार नाही .
२. किस बाई किस : गाजराची दोन्ही टोके कापून, त्यांच्या अंतर्भागाचा कोवळा भाग शाबूत राहील इतक्याच नाजूकपणे सोलण्याने ( peeler ) त्यांच्या साली काढून घ्याव्यात . नंतर त्यांचे ३–४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत म्हणजे किसणीवर किसताना हातात नीट धरता येतील . किसताना शक्यतो किसणीच्या मध्यम आकाराच्या छिद्रांचा वापर करावा . तसेच गरज असल्यास इथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावयास बिलकुल कचरू नये . मी इथे माझा स्वयंपाकघरातील शिलेदार ” फूड प्रोसेसर” यांचा उल्लेख करीत आहे . जेव्हा पाहुणे येति घरा , तेव्हा अशा वेळखाऊ कामांसाठी फूड प्रोसेसर नक्की उपयोगी पडतो . टीप : जेव्हा १ किलो चा हलवा बनवायचा असतो तेव्हा साधारण ११०० किंवा १२०० ग्राम गाजरे घ्यावीत म्हणजे सोलून त्यांचे वजन १ किलो पर्यंत येते . याला कलिनरी सायन्स मध्ये “ Preparation Loss ” असे म्हणतात .
३. दुग्ध–शर्करा योग : किसलेले गाजर एका जाड बुडाच्या कढईत घालून त्यात दूध आणि साखर घालावे . मध्यम आचेवर या मिश्रणाची भट्टी जमू द्यावी . नंतर झाकण घालून हा मिलाप चांगला ४५ मिनिटे ते १ तास होऊ द्यावा . इथे घाईचे काम नाही , गाजरे स्वतःच्या रसात नी दूधसाखरेत जितकी उत्तम शिजतात तितकाच रसरशीत पणा हलव्याला येतो . म्हणून हलवा बनवताना आधी हे मिश्रण शिजत घालावे नी तोपर्यंत सगळा स्वयंपाक आटपून घ्यावा किंवा आवडत्या वेबसीरिजचा एखादा एपिसोड बघून घ्यावा .
४. लुसलुशीत : जसजसे दूध गाजराने शोषून घेतले की बाजूला एका तव्यात खवा हलका गुलाबी रंगावर २ ते ३ मिनिटे परतून घ्यावा . खव्याचा लुसलुशीत पणा शाबूत ठेवूनच खवा भाजावा . जर जास्त भाजून दाणेदार झाला तर गाजरात मिळून येत नाही .
५. मेव्याची रंगत : गाजर शिजून दूध आटले की एका ताटात काढून घ्यावे . कढईत तूप मंद आचेवर वितळवून त्यात सुका मेवा हलकासा परतून घ्यावा . बेदाणे छान फुलले पाहिजेत . बाजूला काढून घ्यावेत . त्याच तुपात शिजलेले गाजर २–३ मिनिटे परतून घ्यावे . गाजराच्या कणाकणांना तुपाचा सुगंध आणि चव लपेटून एक अप्रतिम चव येते . नंतर खवा घालून हलव्यात एकत्र करून घ्यावा . गरज वाटल्यास चमच्याने हलके दाबून खवा मिक्स करावा . तुपात परतलेला सुका मेवा घालून एकदा एकत्र करून घ्यावे .
६. शाही सुगंध : गाजराच्या हलव्यात वेलदोडे कुटून घालणे हे शास्त्र आहे , आणि हलवा आचेवरून उतरवायच्या क्षणभर आधीच मिसळून द्यावे . आपल्या पाहुण्यांना नवाबी थाटाची मेजवानी तुम्ही प्लॅन करत असाल तर एक दोन थेंब खायचे गुलाब इससेन्स किंवा केवडा इससेन्स हलकेच मिसळून द्यावे . चांदीचा वर्ख असल्यास हात बिलकुल मागे न घेता वर लावून द्यावा .
गाजराचा हलवा वरून सुक्यामेव्याचे काप आणि तुपाची धार सोडून गरमागरम खावयास द्यावा .
- तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
- शिजवण्यासाठी वेळ : १ तास
- कितीजणांना पुरेल : ६ ते ८
- साहित्य:
- १ किलो गाजरे ( लाल रंगाची )
- २५० ग्रॅम साखर
- २५० ग्रॅम्स खवा
- ७५० ml दूध
- १ टीस्पून वेलची पावडर
- अर्धा कप सुका मेवा आणि बेदाणे
- पावकप तूप
- २-३ थेंब खाण्याचा गुलाब इस्सेन्स
- १. खरी चव गाजराच्या निवडीत : हलव्यासाठी गाजर घेताना लालबुंद आणि अगदीच मळ्यातून खुडून नाही , तरी ताजी गाजरे पाहून घ्यावीत . लेचीपेची , डागाळलेली गाजरे तर प्रश्नच दूर .... गाजरे स्वतः निवडून घ्यावीत . नाहीतर भाजी विक्रेत्याने तुमचा डोळा चुकवून एखादे दुसरे जून किंवा खराब गाजर तराजूत तोललेच म्हणून समजा ! अति लहान किंवा लठ्ठ गाजरे घेऊ नयेत , मध्यम आकाराची बेस्ट !
- शक्यतो जेव्हा हलवा बनवायचा आहे तेव्हाच गाजरे आणून लगेच किसायला घ्यावीत , फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे . सर्वप्रथम पाण्यात गाजरे व्यवस्थित बुचकळवुन धुवावीत . नंतर चाळणीत निथळत ठेवावीत किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यावीत , म्हणजे अतिरिक्त पाण्याचा अंश राहणार नाही .
- २. किस बाई किस : गाजराची दोन्ही टोके कापून, त्यांच्या अंतर्भागाचा कोवळा भाग शाबूत राहील इतक्याच नाजूकपणे सोलण्याने ( peeler ) त्यांच्या साली काढून घ्याव्यात . नंतर त्यांचे ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत म्हणजे किसणीवर किसताना हातात नीट धरता येतील . किसताना शक्यतो किसणीच्या मध्यम आकाराच्या छिद्रांचा वापर करावा . तसेच गरज असल्यास इथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावयास बिलकुल कचरू नये . मी इथे माझा स्वयंपाकघरातील शिलेदार " फूड प्रोसेसर" यांचा उल्लेख करीत आहे . जेव्हा पाहुणे येति घरा , तेव्हा अशा वेळखाऊ कामांसाठी फूड प्रोसेसर नक्की उपयोगी पडतो . टीप : जेव्हा १ किलो चा हलवा बनवायचा असतो तेव्हा साधारण ११०० किंवा १२०० ग्राम गाजरे घ्यावीत म्हणजे सोलून त्यांचे वजन १ किलो पर्यंत येते . याला कलिनरी सायन्स मध्ये " Preparation Loss " असे म्हणतात .
- ३. दुग्ध-शर्करा योग : किसलेले गाजर एका जाड बुडाच्या कढईत घालून त्यात दूध आणि साखर घालावे . मध्यम आचेवर या मिश्रणाची भट्टी जमू द्यावी . नंतर झाकण घालून हा मिलाप चांगला ४५ मिनिटे ते १ तास होऊ द्यावा . इथे घाईचे काम नाही , गाजरे स्वतःच्या रसात नी दूधसाखरेत जितकी उत्तम शिजतात तितकाच रसरशीत पणा हलव्याला येतो . म्हणून हलवा बनवताना आधी हे मिश्रण शिजत घालावे नी तोपर्यंत सगळा स्वयंपाक आटपून घ्यावा किंवा आवडत्या वेबसीरिजचा एखादा एपिसोड बघून घ्यावा .
- ४. लुसलुशीत : जसजसे दूध गाजराने शोषून घेतले की बाजूला एका तव्यात खवा हलका गुलाबी रंगावर २ ते ३ मिनिटे परतून घ्यावा . खव्याचा लुसलुशीत पणा शाबूत ठेवूनच खवा भाजावा . जर जास्त भाजून दाणेदार झाला तर गाजरात मिळून येत नाही .
- ५. मेव्याची रंगत : गाजर शिजून दूध आटले की एका ताटात काढून घ्यावे . कढईत तूप मंद आचेवर वितळवून त्यात सुका मेवा हलकासा परतून घ्यावा . बेदाणे छान फुलले पाहिजेत . बाजूला काढून घ्यावेत . त्याच तुपात शिजलेले गाजर २-३ मिनिटे परतून घ्यावे . गाजराच्या कणाकणांना तुपाचा सुगंध आणि चव लपेटून एक अप्रतिम चव येते . नंतर खवा घालून हलव्यात एकत्र करून घ्यावा . गरज वाटल्यास चमच्याने हलके दाबून खवा मिक्स करावा . तुपात परतलेला सुका मेवा घालून एकदा एकत्र करून घ्यावे .
- ६. शाही सुगंध : गाजराच्या हलव्यात वेलदोडे कुटून घालणे हे शास्त्र आहे , आणि हलवा आचेवरून उतरवायच्या क्षणभर आधीच मिसळून द्यावे . आपल्या पाहुण्यांना नवाबी थाटाची मेजवानी तुम्ही प्लॅन करत असाल तर एक दोन थेंब खायचे गुलाब इससेन्स किंवा केवडा इससेन्स हलकेच मिसळून द्यावे . चांदीचा वर्ख असल्यास हात बिलकुल मागे न घेता वर लावून द्यावा .
- गाजराचा हलवा वरून सुक्यामेव्याचे काप आणि तुपाची धार सोडून गरमागरम खावयास द्यावा .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply