भिन्न प्रकृतीच्या , स्वभावाच्या व्यक्तींना एकत्र जुळवून घ्यायचे असेल तर पहिल्यांदा त्यांच्या वागणुकीत, स्वभावात असणारे साधर्म्य शोधून काढा , मग एकमेकांच्या कलाने घेत सगळ्या वेगळ्या बाबीसुद्धा स्वीकारणे सहज सोप्पे जाते . प्रोजेक्ट मॅनेजमेंट करताना पीपल मॅनेजमेंटचा हा बेसिक रूल आहे . अशीच टीम घडते आणि बरेच मोठाली कामे पार पडतात ! खऱ्या आयुष्यात सुद्धा हे लागू पडते , नाही का ? नाहीतर आपल्या समाजात लग्नसंस्था अस्तित्वातच नसती ! आमच्याकडे असे असते , तुमच्याकडे तसे असते , हे जर एकमेकांनी आदरयुक्त भावनेने शिकून घेतले तर आनंद व्दिगुणीत होतो !
माझ्या आंतरजातीय विवाहानंतर आईने मला सोनाराने कान टोचावेत तशाच काही बाबी समजावून दिल्या होत्या ! जे येतेय ते आनंदाने कर आणि नाही येत ते नम्र राहून शिकून घे ! म्हणजे थोडक्यात , ” Keep your Acceptance High and Expectations Low!”
माझ्यासारख्या कोकणी मुंबईकर मुलीला उत्तर प्रदेशातील घरच्या पद्धती अंगी बाणवायला कठीण नाही गेल्या परंतु सुरुवातीला त्यांची माझ्या सवयींशी सांगड घालायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागला , हे नक्की ! यात एक आम्हा सगळ्यांना जोडणारा एक सारखा दुवा होता तो म्हणजे , खवय्ये प्रकृतीचे कुटुंबीय ! त्यांच्या मोहरीच्या तेलाच्या फोडणीने माझी जशी भूक चाळवायला लागली तसेच मी केलेल्या ओल्या खोबऱ्याच्या पखरणीच्या भाज्या नी माशांची कालवणे त्यांनी मिटक्या मारत खाल्ली!
माझे बटाटा प्रेम तसे अक्ख्या मुंबईत वर्ल्ड फेमस ! मुंबईकरांच्या रक्तातच वडापाव ची लाल चटणी वाहते , आणि आमच्या कोकणी कोळंबी , अळसांडयाच्या तोणाकात बटाटा हवाच ! तसेच घरी लहानपणापासून पालेभाज्यांना आमच्या स्वयंपाकघरात मुक्त प्रवेश , आईला सुद्धा मी कधी पालेभाजी खाताना कटकट केल्याची आठवण नाही . कशी असेल तिला आठवण … बशीभर भाजी खाल्ल्याशिवाय उठायचे नाही , असे म्हणत वेताची छडी घेऊन समोर बसलेली माझी गब्बर आजी मलाच आठवते हो ! पण खोबरे किंवा शेंगदाण्याचा कूट घालून केलेली पालेभाजी नी भात हा आतापर्यंत माझा कंफर्ट आहार आहे , त्याचे श्रेय कोणाला ते कळलेच असेल तुम्हाला ! सासरी माझी ही आवड माझ्या पथ्यावर पडली , कारण सासरेबुवा पक्के ताज्या भाज्यांचे फॅन.. जितके साधे जेवण तितके ते खुश .. त्यांच्या हसरौली गावात उसाची शेती , भातशेती , तसेच फळभाज्यांचे मळे असल्याचा हा परिणाम !
दर एक दिवस आड बाजार पिशवीतून दुधी भोपळ्याचे नळकांडे आणि पालेभाज्यांचा फुलोरा डोकवायचाच .सोबत जर बाजारात नवीन बटाटे दिसले रे दिसले की घरी बटाट्याचा ढीगच लागायचा ! अहो उत्तर प्रदेशाचे मुख्य पीक आहे , “THE BATATA “! नंतर नंतर मी त्यांना लिस्ट करून द्यायला लागले की , ” पापा आप ये सब्जी भी लेके आईए, आपको बिलकुल ऍसिडिटी नाही होंगी ये मेरी जिम्मेदारी !” मग हसत हसत आणायला लागले !
उत्तर प्रदेशात बथुआ ( चंदनबटवा ) , पालक , मुळा, सरसो ( मोहरी ) , चौराई ( चवळई ) , सोवा (शेपू) या भाज्या वारेमाप खाल्या जातात , आणि अतिशय साध्या सोप्प्या पद्धतीने ! भाजीत जास्त मसाले घालून त्यांची खरी ताजी चव लपू नये म्हणून ! त्या मानाने मेथीची भाजी सासूबाई आवडते म्हणून , महाराष्ट्रीयन पद्धतीने करतात . या आणि अशा वेगवेळ्या भाज्यांत बटाटा जोडीदार म्हणून मिरवतो , अगदी भेंडीच्या भाजीत सुद्धा ! इथल्या बटाटा प्रेमाविषयी मी लिहू लागले तर तो एक वेगळा ब्लॉग व्हायचा , म्हणून आता आपण आजच्या रेसिपी वरच लक्ष केंद्रित करू . मी एका वेगळ्या बटाट्याच्या रेसिपीसाठी नक्कीच ते प्रेम पानावर उतरवीन !
आजची रेसिपी ही साधी सोप्पी पालक बटाटा भाजी – साग आलू ! जेव्हा आपण म्हणतो ना साग तेव्हा माझ्या सासरी ” पालक ” असे गृहीत धरले जाते बरं का ! कारण बाकीच्या भाज्यांना , ” मुली का साग “, ” मेथी का साग ” असे म्हटले जाते ! आजच्या भाजीत पालकासोबत थोडा सोवा म्हणजे शेपूसुद्धा घातलाय . अगदी घरगुती रेसिपी आहे , पार्टनरच्या बडी अम्माची म्हणजे मोठ्या काकूंची ! गावाकडे गरम गरम फुलके , रोटी किंवा वरण भातासोबत ही प्रसन्न वदने , प्रसन्न चित्तें खाल्ली जाते आणि त्यानंतर अंगाभोवती कंबल लपेटून म्हातारे दादा – दादी बाजल्यावर बसून हुक्क्याची वलयं हवेत सोडून भोवताली बागडणाऱ्या नातवंडांच्या लीला न्याहाळत बसतात !
- साहित्य:
- मोहरी तेल किंवा तुमच्या घरात वापरले जाणारे खाद्यतेल
- १२ ते १५ लसणीच्या पाकळ्या
- ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- चिमूटभर हळद
- अर्धा किलो बटाटे मोठे तुकडे करून
- शेपू बारीक चिरलेला ६० ग्रॅम्स
- पालक बारीक चिरलेला ३०० ग्रॅम्स
- मीठ चवीनुसार
- कृती :
- कढईत २ ते ३ टेबलस्पून मोहरीचे तेल चांगले तापवून घ्यावे . त्यात बारीक चिरलेला लसूण घालून खरपूस होऊ द्यावा .
- नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्याव्यात . हळद घालून परतून घ्यावी . बटाट्याचे तुकडे घ;ऊन २-३ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्यावेत .
- त्यानंतर शेपू नी पालक घालावा . नीट एकत्र करून घ्यावा . मंद आचेवर झाकण घालून बटाटे पूर्ण शिजेपर्यंत ठेवावे .
- सगळ्यात शेवटी मीठ घालावे आणि भाजी कोरडी होऊ द्यावी . आचेवरून उतरवावी .
- गरम गरम फुलके , मक्याची रोटी किंवा वरण भातासोबत वाढावी .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply