स्वयंपाक घर हा कॅलिडोस्कोप आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . फडताळातल्या इंद्रधनुष्यी रंगाच्या सामानाने भरलेल्या बरण्या , डबे खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात अगदी तशीच रंगाची उधळण करीत असतात . कुठे नारिंगी रंगाच्या मसुरीच्या डाळी शेजारी पिवळीधम्मक चण्याची डाळ बाजूला बसलेल्या हिरव्या मुगांना खेटून घट्ट बसलीय तर बाजूच्या बरणीत पांढरे वाटाणे ” मेरा नंबर कब आयेगा ” म्हणत माझ्याकडे आशेने बघतायेत .
आज माझा आणि माझ्या स्वयंपाकघराचा ” WE ” दिवस आहे . एकेक डबा नी बरणी उघडून काय उरलय , काय मागवावे लागेल ह्या कामाचा मला कधीच कंटाळा येत नाही , कारण एकेक घटकाकडे बघत मी त्याच्याशी मनोमन गप्पा मारते , आणि तुम्हाला ठाऊकच आहे , माझा बोलघेवडेपणा !
साबुदाणे बरेच आहेत , शनिवारी पापड्या घालू , ओह्ह तांदळाच्या शेवया , गोड शिरा करतेच , पार्टनरचा आवडता ! अर्रे बापरे ओट्स चे पॅकेट , पुढच्या आठवड्यात याच्याच इडल्या नी उत्तपम करते नाश्त्याला , आणि असे मग माझे प्लॅन ठरले की ते ते माझे शिलेदार सुद्धा म्हणतात ” आमचे घोडे गंगेत न्हाले रे देवा ” .. आणि ही उरली सुरलेली , विस्मरणात जाऊन डब्याच्या तळाशी गेलेली पाकिटे मग माझ्या ओट्यावर रॅकमध्ये स्थिरावतात , पटकन हाताशी मिळायला !
कडधान्याच्या उसळी , सांबार हा माझा आणि पार्टनरचा वीक पॉईंट्च आहे . तशात आईने मागच्या रत्नागिरी भेटीत मला तिकडले पांढरे वाटाणे घेऊन दिले होते . साधारण १ किलो होते , मध्ये आम्ही रगडा पॅटीस , आणि पाणीपुरी बनवली तेव्हा वापरले गेले , बरेच दिवस झाले होते उसळ खाऊन …. पार्टनरला विचारले , काय रे उद्या पाव घेऊन येशील काय दुपारच्या जेवणाला , तर हो म्हण्याआधी ” क्या बनाओगी ” असा डोळे मिचकावून तोंडाला पाणी आणून त्याने विचारले . आमच्या घरात बेकरीचे पाव आला म्हणजे नक्की काहीतरी चमचमीत हे ठरलेल.. हातानेच त्याला सीक्रेट असल्याचा इशारा केला आणि माझ्या दुसऱ्या पार्टनर कडे म्हणजे माझ्या स्वयंपाकघराकडे वळले !
तर तुम्हाला म्हणून सांगते , मी आज बनवणार आहे पांढऱ्या वाटाण्याचा रस्सा किंवा उसळ म्हणा अगदी माझ्या माहेरी आई बनवते तशीच ! ही उसळ थोडी वेगळ्या पद्धतीची म्हणजे नेहमीच्या आमच्या रस्श्याप्रमाणे हिला सुद्धा वाटणाची गरज आहेच , परंतु अंगासरशी रस्सा एकदम मसाला वाटाण्यांसोबत लपेटलेला !
नेहमीची टोमॅटोची पेस्ट किंवा बारीक चिरलेला टोमॅटो या उसळीत नाही घातला जात तर त्या ऐवजी चिंच गुळाची जोडगोळी या रस्श्याची चव वाढवते ! आणि हो सांगायचे राहून गेले की मालवणी मसाला असला तरीहि अजून खड्या गरम मसाल्यांची फोडणी केल्यामुळे जो काही स्वाद तोंडात रुळतो ना कि सांगून सोय नाही !
आई जेव्हा ही बनवते ना तेव्हा घरात तेल लावलेली घडीची पोळी नी सोबत बेकरीचे खरपूस क्रस्ट असलेले पाव बाबा घेऊन येतो . मागच्या वेळेला रत्नागिरीला गेलो होतो तेव्हा जावयासाठी हे पाव विकत घ्यायला एरवी उशिरा उठणारा बाबा सकाळी सहा वाजताच अंगणातल्या कवाडीवर पाववाल्याच्या सायकलच्या घंटीचा कानोसा घेत उभा होता नी सोबत आमच्या सुंदरींची ४ महिन्यांची चिल्ली पिल्ले !
रत्नागिरीत किंवा मुंबईला दादर भागात मुखयत्वें कोकणातल्या लोकांची हॉटेलं आहेत त्या हॉटेलांत जी मिसळ मिळते त्यात मिश्र कडधान्ये असतात , आणि पांढरे वाटाणे आवर्जून घातले जातात . चाट विभागात यांनी जरा जास्तच भाव खाल्लेला आहे , रगडा पॅटीस , पाणीपुरी यातला तो असा मस्त मॅश केलेला वाटाणा जेव्हा चटण्यांसोबत असा काही भन्नाट लागतो , आहा …. तोंडाला पाणी सुटले ना .. आणि शरीराला सुद्धा याचे फायदे अनेक !
पांढरे वाटाणे हे प्रथिनं तसेच तंतूंमय पदार्थ पुरवतात . तसेच काही प्रमाणात क्षारांचा , म्हणजे कॅल्शिअम , पोटॅशियम ,लोह यांचा ही उत्तम पुरवठा करतात . शाकाहारी लोकांना उत्तम पर्याय ! मग आता बनवाच ही उसळ , या वीकेंड ला ब्रन्च म्हणून !
एक छोटीशी तळटीप देते हां , हे वाटाणे प्रेशर कुकर मध्ये शिजवताना कधी कधी जास्त प्रेशरमुळे खूप शिजतात आणि साली वेगळ्या होतात . असे वाटाणे उसळीत चांगले दिसत नाहीत . म्हणून मी यांना पातेल्यात शिजवते कारण ते शिजेपर्यंत बाकीची कामे आटोपता येतात . परंतु जर कूकरमध्ये शिजवायचे झालेच तर तुमची कूकरच्या डब्यात हे वाटाणे घालून अगदी किंचित पाणी घालावे , फक्त हे वाटाणे हलके बुडेपर्यंत , आणि मध्यम आचेवर एकच शिटी घ्यावी .

- १ कप = २०० ग्रॅम्स पांढरे वाटाणे , रात्रभर पाण्यात भिजवून
- १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- दीड इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून ,
- ८-१० लसणीच्या पाकळ्या ,
- १ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून
- पाऊण कप कोथिंबीर
- १ टेबलस्पून चिंच पाव ते अर्धा कप गरम पाण्यात भिजवून
- २ तमालपत्रे
- अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
- ३ लवंग
- १ मसाला वेलची
- १ टीस्पून राई
- १ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- ३ टेबलस्पून मालवणी मसाला ( नसल्यास २ टेबलस्पून काश्मिरी किंवा बेडगी लाल मिरची पूड + १ टेबलस्पून गरम मसाला पावडर )
- १ टेबलस्पून गूळ
- मीठ
- तेल
- पांढरे वाटाणे आपण पातेल्यात शिजवून घेणार आहोत . त्यासाठी ४ ते ५ कप पाणी उकळत ठेवायचे आहे . या पाण्यात रात्रभर भिजवलेले वाटाणे घालून शिजवून घ्यायचे आहेत ( साधारण १५ ते २० मिनिटे ) . असे केल्याने वाटाण्याच्या साली वेगळ्या होत नाहीत आणि वाटाणे न फुटता शिजतात .
- मसाल्याच्या वाटणासाठी सुके खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे . एका ताटात काढून घ्यावे .
- एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आल्याचे तुकडे , आणि लसूण घालून परतून घ्यावे . लसूण गुलाबी रंगावर आली की त्यात कांदा घालून चांगला लालसर होईपर्यंत खमंग परतून घयावा .
- आता कोथिंबीर घालून चांगली तेलात परतून घ्यावी . नंतर भाजलेले खोबरे फक्त एकत्र करून गॅस बंद करावा . हे सगळे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी . वाटताना मी पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे .
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात तमालपत्रे , दालचिनी , लवंगा, मसाला वेलची , मोहरी , जिरे , आणि हिंगाची फोडणी करावी .
- नंतर आच मंद करून तेलात हळद नी मालवणी मसाला घालावा . मसाला करपू देऊ नये , त्यासाठी १-२ टेबलस्पून पाणी घालावे . चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
- आता वाटण घालावे . अर्धा कप पाणी घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
- नंतर शिजलेले वाटाणे घालून त्यात दीड ते दोन कप पाणी घालून रस्सा तयार करावा . मध्यम आचेवर एक उकळी फुटू द्यावी . नंतर आच मंद करून झाकून ४-५ मिनिटे शिजू द्यावे .
- रस्सा जरासा दाटसर झाला की त्यात चिंचेचा गाळून घेतलेला कोळ घालावा , तसेच गूळ आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे .
- २-३ मिनिटांसाठी शिजू द्यावे म्हणजे चिंच गुळाचा स्वाद रश्श्यात उतरतो .
- नंतर गॅस बंद करून उसळ झाकून वाढेपर्यंत जरा मुरू द्यावी .

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
अप्रतिम कलाकृती..
स्मिता ची जादू..
जे
किचन आणि पोट दोन्ही समृद्ध करत..
पांढरा वाटाणे ऊसळ रेसिपी म्हणजे..
नाद खुळा…
शुभेच्छा. 🎉
धन्यवाद दादा